डॉ प्रदीप आवटे
- ‘आपण एक दिवशी अल्लाला प्यारे होऊन जाऊ.. नंतर कोण आठवेल आपल्याला आणि कशासाठी ?’
- मी माझ्या ताजबेगमची आठवण जपून ठेवेन.. मी तिच्यासाठी ताजमहाल बांधेन.
- खूप दुय्यम असतो पैसा, खूप दुबळी असते संपत्ती… महत्वाचं असतं ते प्रेम..! तिच्या आठवणी जगायच्या आहेत आता.
आज तुला त्याची गोष्ट सांगायचीय. नाही तरी इतके दिवस, काय करतोय मी, माणसं उलगडतोय तुझ्यासमोर. पुस्तकांपेक्षा माणसं वाचणं, किती सुंदर असतं नाही ! माणसांचा स्पर्श होतो म्हणून तर पुस्तकांनाही लाभते सजीवता हाडामांसाच्या माणसासारखी….! तशीही पुस्तकात मावत नाहीत माणसं... तो तरी कसा मावेल? … आता थकलाय तो. ऐंशीच्या आसपास उन्हाळे, पावसाळे पाह्यलंत त्यानं. या सगळयाच्या खुणा त्याच्या शरीरावर, चेह-यावर ठळक दिसून येतात. पण माणूस थकतो म्हणजे त्याचं शरीर थकतं, त्याचे स्नायू दुबळे होतात, हाडं कुरकुरु लागतात… भोगलेलं, सोसलेलं चेह-यावर जाळयांची बहारदार नक्षी काढू लागतं. पण शरीर थकलं तरी माणूस थकतोच असं नाही. आत आत उजळणारी ज्योत थकलेली नसते,थकलेली नसते प्रेम करण्याची अपरंपार, अमर्याद ताकद !
आज ‘पोस्ट’ नावाची गोष्ट आपल्या जीवनातून जवळपास नामशेष होत चाललीय. एक काळ होता माणसं पत्रं लिहायची आणि त्या पत्रांवर काळाचे अमिट शिक्के ठोकत पोस्टखातं ती पत्रं आपल्यापर्यंत पोहचवायचं. साधं पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र हा केवढा दिलासा असायचा. पोस्टाची पेटी ही कधी काळी जादूची पेटी वाटायची, यात टाकलेलं पत्र हवं तिथं कसं जातं, असं बालपणाला वाटत राह्यचं. हा तिथं काम करायचा. त्यानं पोहचवलेल्या असंख्य पत्रासारखं मी ही त्याचं जगणं पोस्टकार्डसारखं तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय. पोस्टात माणसं पैसे ठेवतात – पुनरावर्ती ठेव योजना… रिकरिंग डिपॉजिट..! कधी कधी वाटतं, माणसांची पण अशी पुनरावर्ती ठेव योजना असावी. पैसा वाढतो या योजनेत, तशीच त्याच्या सारखी माणसं वाढत जावीत. पहा, या ऐंशी वर्षाच्या रिटायर्ड पोस्टमास्तरला ठेवता येतंय का तुमच्या अकौन्टमध्ये ?

फैजुल हसन काद्री.. उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर जिल्ह्यातील कासेर कालान गावचे रहिवासी. वयानं इतक्या ज्येष्ठ असणाऱ्या या माणसाला मी ‘अरे तुरे’ करतो आहे. प्रत्यक्ष नाही जमलं, निदान शब्दांनी तरी गळाभेट घ्यावी अशा माणसांची असं जेव्हा जेव्हा वाटतं ना.. माझ्याही नकळत मी ‘अरे तुरे’ करु लागतो. सगळी औपचारिकता आपसूकच गळून पडते.
१९५३ साली फैजुलमियांचं लग्न ताजमुल्लीसोबत झालं आणि संसार सुरु झाला. खरं तर चारचौघांसारखा सुखी आणि समंजस संसार. त्यात विशेष सांगावं असं काहीच नव्हतं. पोस्टातील नोकरी, गावात थोडीशी शेतजमीन. फैजुल मियां आणि ताजमुल्ली भाभीचं कनिष्ठ मध्यमवर्गीय आयुष्य सुरु होतं. फैजूल आणि ताजमुल्लीच्या संसारवेलीवर एकही फूल उमललं नाही. खंत तर होतीच पण एकमेकांवरील निर्व्याज्य प्रेम ती उणीव भरुन काढत होतं. कमरतरता जाणवू नये, असं आयुष्य चाललं होतं.
ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची आठवण सहजपणे कुणालाही व्हावी. ज्योतिबा सावित्रीला मूलबाळ झालं नाही. कधी तरी ज्योतिबांच्या दुस-या लग्नाचा प्रस्ताव पुढं आला. सावित्रीबाईंनीही सुचवलं. जगरहाटीच ती पण काळाच्या किती तरी पुढं असणा-या या महात्म्यानं तो प्रस्ताव तर ठोकरलाच पण, ‘ कुणी सांगावं, माझ्यातच दोष असेल. तू दुसरं लग्न का करत नाहीस?’ , असं बायकोला विचारायचं धाडस दाखवलं. पुरुषी मानसिकतेवर अशी मात करणारी माणसं अभावानेच आढळतात.
फैजुल आणि ताजमुल्ली थकल्या वयातही एकमेकांना आधार देत जगत होते पण म्हातारपण येतं तसं मृत्यूचा विचार ठळक होत जातो माणसाच्या मनातला. ताजमुल्ली एके दिवशी बोलता बोलता म्हणाली, ‘आपण एक दिवशी अल्लाला प्यारे होऊन जाऊ.. नंतर कोण आठवेल आपल्याला आणि कशासाठी ?’
मरण कल्पनेने माणूस थरारतो. ‘कशाला मरणाच्या गोष्टी करतेस?’,असं म्हणून फैजुलमियांनं ते बोलणं कानाआड टाकलं पण ते वाक्य त्याच्या मनात घर करुन राह्यलं.त्यात २००९-१० मध्ये ताजमुल्ली चांगलीच आजारी पडली. साधा खोकला असेल असं वाटलं पण निदान झालं - घशाचा कॅन्सर. डॉक्टर.. दवाखाने सुरु झाले पण ताजमुल्ली २०११ मध्ये गेली. आणि घर फैजुलमियांला खाऊ लागलं.सारखी तिची आठवण येऊ लागली. लहान लहान गोष्टी.. पण आठवणींची एक माळच असते प्रत्येक नात्याची..! आणि .. ताजमुल्लीचं ते वाक्य त्याला पुन्हा आठवलं .. कोण आठवेल आपल्याला आणि कशासाठी ? खोलवर चिरत गेलं ते वाक्य..!
मी माझ्या ताजबेगमची आठवण जपून ठेवेन.. मी तिच्यासाठी ताजमहाल बांधेन. फैजुलच्या मनानं घेतलं.
खरं म्हणजे, फैजुल आणि ताजमुल्लीच्या गावापासून आग्र्याचा ताजमहाल अवघ्या शंभरेक किलोमीटरवर. पण फैजुल मियांला ताजमहालचं विशेष कौतुक वाटायचं नाही. त्याला हा साराच एका शहेनशहाचा बडेजाव वाटायचा. साहीर लुधियानवी एका नज्ममध्ये आपल्या प्रेयसीशी बोलताना असंच काहीसं नव्हता का बोलला ?
‘ एक शहेनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरीबों के मोहब्बत का उडाया है मजाक..
मेरे मेहबूब, कहीं और मिलाकर मुझसे…!’

साहीरचा प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगत होता, ‘ अगं हा ताजमहालचं वास्तुशिल्प, त्याची रंगकरामत तुला मोह घालत असेल, हा मकबरा तुला प्रेमाचं प्रतिक वाटत असेल पण कसं विसरतेस, याच वाटेनं गेलेलं या निर्दयी सत्तेचं पत्थर ह्रदयी सैन्य,या कबरीआड दडलेली पाशवी सत्ता आणि संपत्ती तुला दिसत कशी नाही? ताजमहालच्या सौंदर्यानं दिपून गेलेल्या तुला दिसत नाही का तुझ्या झोपडीतला अंधार ? अगं ,फक्त रईस लोकांचंचं प्रेम महान आणि जगात इतरांनी काय कुणी प्रेमच केलं नाही की काय ? .’
फैजुलच्या मनातही असेच काही विचार ताजमहाल बाबत येत. पण ताजमौलीच्या मृत्यूनंतर आलेल्या एकटेपणानं फैजुलला उमगत होतं…खूप दुय्यम असतो पैसा, खूप दुबळी असते संपत्ती… महत्वाचं असतं ते प्रेम..! तिच्या आठवणी जगायच्या आहेत आता. आपली आठवणही काढणार नाही कुणी उद्या म्हणून किती हळवी झाली होती ती! माझी ऐपत ती किती पण ताजू, तरीही मी उभारीन एक ताजमहाल.. तुझ्या माझ्या प्रेमाचा..!
अंतःकरण उचंबळून आलं होतं फैजूलमियाचं. तो आणि ताजू राह्ययचे त्या घरासमोरच थोडी पडीक जमीन होती, त्याच्या मालकीची. त्यानं ठरवलं, ताजूच्या स्मरणार्थ आपला ताजमहाल इथं बांधायचा. पण शहेनशहा शहाजहानला मिळाले तसे प्रतिभावंत बांधकाम विशारद कोठून आणायचे ? पण गावात असगर होता. गवंडीकामात त्याचा हात कोणी धरायचं नाही. फैजुलमियानं त्याला हाताशी धरलं आणि आपलं ताजमहालचं स्वप्न साकारयला सुरुवात केली. रिटायर झाल्यानंतर मिळालेली सारी रक्कम त्यासाठी गुंतवली. दहा पंधरा लाख खर्च झाले. थोडी जमीन विकली, त्यातून आलेला पैसाही इकडे लावला.
या मकब-याच्या मध्यभागी फैजूल मियाच्या ताजूची कबर आहे. फैजूलमियानं स्वतःच्या मरणानंतर आपली कबर देखील ताजूच्या शेजारी असावी, म्हणून जागा राखून ठेवली आहे. आता या ताजमहालचे काम देखील पूर्ण होत आले आहे. फक्त संगमरवरी फरशी बसवायची राहिली आहे.पण आता पैसा संपलाय.एका पोस्टमास्तरकडं असून असून किती पैसा असणार ?
पण प्रेम करणारी माणसं हिंमत हरत नाहीत. हे सगळं करायचेच आहे,फैजुल मियाच्या पांढ-या केसांचा आणि हिरव्या मनाचा निर्धार आहे. त्यांना या ताजमहाल भोवती एकरभर परिसर सुंदर्सा विकसित करावयाचा आहे. हिरवीगर्द झाडी, छोटंसं झील...इतकं तर हवंच हवं .एक एक मिनार उभा करताना फैजूलमिया ताजू बेगमशी बोलत राहतात. तिच्या आठवणी गोंजारत राहतात. या ताजमहालची बातमी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचली.

त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन या ताजमहालचे काम पूर्ण करण्याची देखील तयारी दर्शवली पण पुराने जमाने के पोस्ट मास्टर असलेल्या फैजुल भाईंचे फंडे ज्याम क्लिअर आहेत. ‘माझ्या गावातील माझ्या जमीनीवर उभा राह्यलेला हा ताजमहाल ही माझी आणि ताजूबेगमची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यासाठी सरकारी पैसा खर्च करणे योग्य नाही.’ उलट त्यांनी गावातल्या शाळेला मान्यता द्या, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. गावात शाळेला मान्यता मिळाली गावातील मुलाबाळांचा फायदा होईल.
फैजूलभाई पागल नाहीत,कसलं वेड नाही सवार त्यांच्यावर. ते बोलत असतात, ‘सारंच नश्वर आहे. ताजू गेली.. कल मैं भी चला जाऊंगा .. ये मेरा बनाया ताजमहाल भी कबतक रहेगा क्या पता ? पण आज ते करताना मला अतीव आनंद होतो आहे. वीटेवर वीट रचताना प्रत्येक क्षणी ताजू माझ्याशी बोलत राहते. अजून मला काय हवं ?’
जमाने के शहनशहाओं के पास दौलत होगी पण प्रेम करायची ताकद पैशानं येत नाही,सत्तेनं येत नाही... त्याला अंतःकरणाची वेगळीच माती लागते.. कोवळे अंकुर जोपासणारी !
तुम्ही दिलेले सगळे चष्मे मी काढून ठेवतो बाजूला आणि क्षणभर पाहतो या प्रेमशिल्पाकडे..! फैजुल हसन काद्री नावाच्या फाटक्या माणसानं उभा केलेला हा ताजमहाल मूळ ताजपेक्षाही कणभर अधिकच सुंदर दिसतोय मला..!
तुम्हांला ?






