टीम बाईमाणूस
- पुण्यातील शिवाजीनगर येथील पंचवटी ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खुलासा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केला आहे.
- सुमित्र यांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या लालसेपोटी घरातीलच जवळचे नातेवाईक ही वास्तू बिल्डरला विकण्यासाठी दबाव टाकत आहेत.
- समाजमाध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून सुमित्र यांनी ह्याबाबत माहिती दिली आहे.
कवी, गीतकार आणि पटकथालेखक ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेलं गीतरामायण आणि अश्या अनेक अजरामर कलाकृतींची साक्ष असलेली पुण्यातील शिवाजीनगर येथील पंचवटी ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खुलासा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केला आहे. सुमित्र यांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या लालसेपोटी घरातीलच जवळचे नातेवाईक ही वास्तू बिल्डरला विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. समाजमाध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून सुमित्र यांनी ह्याबाबत माहिती दिली आहे.
गदिमांचा वारसा सांगणाऱ्यांकडूनच पंचवटी पाडण्याचे प्रयत्न…
सुमित्र यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की,
“गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून, अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत . माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मी माझ्या जीवात जीव असे पर्यंत विरोध करतो आहे विरोध करणार आहे.गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही.केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत.
माझी बदनामी करण्याचा प्रयत्न…
पुढे त्यांनी म्हटलंय की,
“ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे. गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत. यात माझा जीव गेला तरी बेहत्तर. या लोकांनी आता माझी बदनामी सुरू केली आहे मी व माझ्या कुटुंबावर खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमच्या कुटुंबातील ज्या बायका संसारात सुखी नाहीत त्यांनी खोट्या नाट्या पोस्ट टाकून माझी बदनामी सुरू केली आहे.”
ज्या आजीवर आपल्या सख्ख्या नातीचा लैंगिक छळ केल्याच्या गुन्हा दाखल आहे व पंचवटीवर जिने भलेमोठे पुस्तक लिहिले आहे त्या बाईंचा दाखला देऊन तिचा आम्ही छळ करतो असा खोटा आरोप मी केवळ गदिमांची पवित्र वास्तू पाडायला विरोध करतो आहे म्हणून मी व माझ्या पत्नीवर करत आहेत.माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठले आहेत. खोटे नाटे कितीही ओरडून सांगितले तरी ते सत्य नसते हे आज न उद्या समोर येईलच.

माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही….
पुढे सुमित यांनी म्हटलंय की,
“गेली १० वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे,आतल्या कामाला आता सुरुवात होईल. गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे तितकीच गदिमांची पंचवटी माझ्या साठी एक देऊळ आहे, या लोकांनी माझी कितीही बदनामी केली, माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही. माझी कितीही बदनामी करा माझ्यावर कोर्ट केसेस करा पण मी लढत राहीन पण तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही,गदिमांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे व मी ही वास्तू बिल्डर ला विकू देणार नाही हे या सर्व केवळ गदिमांचे खोटे नाव घेऊन वारसा सांगणाऱ्या लबाड लांडग्यांनी म्हणजेच पडद्यामागे कारवाया करणाऱ्या नातेवाईकांनी समजावे, हिम्मत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लाऊन दाखवा.तुम्हाला माझे चॅलेंज आहे.”
सुमित्र यांच्या आई म्हणतात, ‘तेव्हा तू कुठे होतास’...
‘तेव्हा तू कुठे होतास’ अश्या आशयाचा सुमित्र यांच्या आईच्या नावाने एक संदेश सध्या समाज माध्यमांवर पसरवला जातोय ज्यात त्यांनी सुमित्र यांना ११ प्रश्न विचारले आहेत.
तेव्हा तू कुठे होतास ? @ सुमित्र श्रीधर माडगूळकर
जेव्हा पंचवटीला रंग द्यायला हवा होता तेव्हा बाबांना पैसे तर दिले नाहीसच पण विरोधच केलास. तेव्हा तुला असे वाटले नाही का की आपलेही काही कर्तव्य आहे.
पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला होता.
अजूनही पंचवटीच्या अंगण झाडण्याचे आणि रक्षणाचे काम करण्याचे पैसे मी आणि काकू देतो.
पंचवटीसाठी बिल्डर बघायला तूच पुढे होतांस.जेव्हा तुला कळले की बाबांनी विल माझ्या नावावर केले आहे तेव्हा तू 50% तुला हवेत आणि लीनताला जिने तुला वेळोवेळी मदत केली तिला नंतर द्यावेत असे तू सांगितलंस.
पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला, बहिणीला आणि मेव्हण्याला वापरलीस की ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदत केली.
बाळा, आता तरी सुधर .खोटे वागण्याचे बंद कर. अजून वेळ गेलेली नाही. शेवटी सत्याचा विजय होतो आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लागते हे लक्षात असू दे.
आज पैशाच्या लोभाने तू आपली माणसे दूर करत आहेस. पण हीच माणसे तुझ्या प्रत्येक अडचणीला उभी राहिली आहेत हे कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या हे लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल. वेळीच सावर.
आत्ता तुझ्या चुकीच्या वागण्याचे समर्थन तू पंचवटीच्या पाडण्याच्या पोस्टने केले आहेस. लोकांच्या गदिमांविषयीच्या प्रेमाचा, आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा हा प्रयत्न चुकीचा आहे.
गदिमांच्या आणि रामरायाच्या खालच्या हॉलमधल्या फोटोसमोरच्या टेबलवर, बाहेर जाताना पादत्राणे ठेवताना आपल्या आजोबांच्या थोरपणाची जाणीव कुठे जाते…? कोणी पाहुणे आले की आम्हाला उचलून ठेवायला लागतात.
जेव्हा ड्रेनेज नको त्या वस्तू टाकल्यामुळे तुंबते, पाणी तुळशीकट्ट्यापर्यंत जाते ते तुला कधीच दिसत नाही. मी आणि काकूच ते उभे राहून करून घेतो.
नामुष्कीची वेळ तुझ्या वागण्यामुळेच माझ्यावर आली आणि तो घाणेरडा आरोप तू माझ्यावर करतोस याला काय म्हणू…?
असो…परमेश्वर सारे बघत असतो आणि सत्याचा विजय होतो असा माझा विश्वास आहे. तुला लिहिलेली ही शेवटची पोस्ट…!
तुझी दुर्दैवी आई….

गदिमांच्या गाजलेल्या साहित्यकृती…
'महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी' म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांच्या साहित्याने मराठी रसिकांच्या मनावर अमीट असा ठसा उमटवला, त्यांचे 'गीत रामायण' हे त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा सर्वोच्च अविष्कार मानले जाते, ज्याने महाराष्ट्रात घरोघरी रामायणाची भक्ती आणि काव्यमय अनुभूती पोहोचवली. केवळ कवितेपुरते मर्यादित न राहता त्यांनी 'मंतरलेले चैत्र', 'जोगिया' आणि 'चैत्रबन' यांसारख्या काव्यसंग्रहातून निसर्ग आणि मानवी भावना अलगद मांडल्या, तर 'वाटेवरच्या सावल्या' या त्यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातून त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि साहित्यिक प्रवासाचे दर्शन घडवते.
यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ त्यांच्या लेखणीने समृद्ध झाला. त्यांनी 'जगाच्या पाठीवर', 'सुवासिनी' आणि 'पुढचं पाऊल' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि अजरामर गीते लिहून मराठी साहित्यात आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे महत्वाचे स्थान निर्माण केले, ज्यामुळे त्यांच्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक साहित्यकृती आजही तितकीच जिवंत आणि रसिकांना भुरळ घालणारी वाटते.
“गदिमांची पंचवटी - एक लाभलेली वास्तू"
ग. दि. माडगूळकर यांच्या 'पंचवटी' या वास्तूचे मूळ नाव 'श्री पंत-निवास' असे होते आणि तिचे बांधकाम शके १८४५ (१९२३) साली बेळगावचे पंत बाळेकुंद्री महाराज यांच्या एका शिष्याने केले होते. वाकडेवाडी रेल्वे गेटच्या पलीकडे मुंबई मार्गावरील मुख्य रस्त्यावर असणारा हा एक मोठा आणि सर्व सोयींनी युक्त असा बैठा बंगला होता, ज्याच्या आवारात आऊट हाऊस आणि तुळशीवृंदावन होते. तत्कालीन काळात या परिसरात फारशी वस्ती नव्हती, पण रस्त्यावर कारखान्यात जाणाऱ्या कामगारांच्या सायकली आणि बैलगाड्यांची मोठी वर्दळ असायची; तसेच आजूबाजूला वाकडे, राव आणि एका गुजराथी कुटुंबाचे बंगले होते. अण्णासाहेब पटिहाळ यांनी एका सिंधी माणसाला ८० हजार रुपयांना हा बंगला विकण्याचे ठरवले होते, मात्र त्याने तुळशीवृंदावन काढण्याची अट घातल्याने पटिहाळांनी तो व्यवहार मोडला होता.

पुढे १९५३ मध्ये गदिमांनी हा बंगला ६० हजार रुपये आणि फर्निचरचे ३ हजार रुपये देऊन विकत घेतला. या बंगल्याच्या आवारात पाच वटवृक्ष असल्यामुळे गदिमांनी या वास्तूला 'पंचवटी' असे नाव दिले. हा बंगला देताना पटिहाळ यांनी गदिमांना केवळ एकच अट घातली होती की, वास्तूत असलेला त्यांचे गुरु बाळेकुंद्री महाराज यांचा फोटो कधीही काढायचा नाही. याच आवारात महाराजांनी स्वतः लावलेले एक अशोकाचे झाडदेखील होते. १९५३ च्या मे महिन्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गदिमा आपल्या कुटुंबासह या बंगल्यात राहायला आले आणि आज तब्बल ७१ वर्षांनंतरही गदिमांची चौथी पिढी या वास्तूत त्यांच्या स्मृती जपत नांदत आहे.






