शंतनू खुजे
- त्या रात्री हाथरसमध्ये फक्त एका दलित मुलीची चिता पेटलेली नव्हती; भारतीय समाजाच्या विवेकालाच जणू आग लागली होती. पोलिसांच्या घेरावात, कुटुंबाच्या आक्रोशावर मात करत मध्यरात्री गुपचूप पार्थिव जाळलं जात असताना, देशभरातील लाखो लोक मोबाईलच्या स्क्रीनवरून लोकशाहीचा एक भयावह चेहरा पाहत होते.
- सहा वर्षांनंतर ‘हाथरस : 16 डेज’ हा माहितीपट त्या राखेत अजूनही धगधगत असलेल्या प्रश्नांकडे पुन्हा पाहायला भाग पाडतो . जात अजून किती जिवंत आहे? स्त्रीच्या शरीरावरच समाजाची नैतिकता का उभी केली जाते? आणि न्यायाच्या नावाने आपण नेमकं कोणाला वाचवत असतो?
हाथरस बलात्कार प्रकरण… ज्यात 14 सप्टेंबर 2020 रोजी दलित मुलीवर हल्ला झाला, 4 उच्चवर्णीय मुलांवर सामूहिक बलात्काराचा आरोप झाला, मुलीचा मृत्यू झाला, गदारोळ झाला, राहुल-प्रियंका गांधींसह अनेक बड्या नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, पीडितांना 25 लाखांची सरकारी मदत मिळाली, त्यानंतर बराच काळ शांतता पसरली. त्यानंतर अडीच वर्षांत 35 साक्ष आणि 70 सुनावणीनंतर 2 मार्च 2023 रोजी निर्णय आला. न्यायालयात खटला टिकला नाही. तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, एकावर अहेतुक हत्येचा दोष सिद्ध झाला. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराचा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही.
आता, तब्बल सहा वर्षांनंतर ZEE5 वर प्रदर्शित झालेला ‘हाथरस : 16 डेज’ हा माहितीपट त्या जखमेवरची खपली पुन्हा उघडतो. दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम आणि पत्रकार तनुश्री पांडे यांच्या नजरेतून उलगडणारा हा माहितीपट केवळ एका गुन्ह्याचा मागोवा घेत नाही, तर जात, पितृसत्ता, सत्तेची निर्दयता आणि भीतीने गुदमरलेल्या ग्रामीण भारताचं वास्तव समोर आणतो.
सप्टेंबर २०२० मध्ये हाथरस जिल्ह्यातील एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला. गंभीर जखमी अवस्थेत दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाने देश हादरला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी कुटुंबाच्या संमतीशिवाय केलेला अंत्यसंस्कार, प्रशासनाची भूमिका आणि नंतर सुरू झालेला राजकीय व सामाजिक संघर्ष , या सगळ्याने हाथरस केवळ एक गुन्हा राहिला नाही, तर भारतीय लोकशाहीच्या नैतिकतेवर उभा राहिलेला प्रश्न बनला.

“हाथरस अजूनही संपलेलं नाही…”
‘हाथरस : 16 डेज’ चे दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम सांगतात की, कोविड काळात घडलेली ही घटना त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली होती. २०२४ मध्ये या प्रकरणावर माहितीपट करण्याची कल्पना समोर आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.
त्यांच्या मते, हाथरस ही एक ‘एकटी’ घटना नाही. अशा प्रकारची हिंसा आजही देशाच्या वेगवेगळ्या भागांत घडते आहे. आपण काही काळ एखाद्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करतो, संताप व्यक्त करतो आणि नंतर पुढे निघून जातो. पण ज्यांच्यावर ही हिंसा कोसळते, त्यांच्यासाठी तो काळ कधीच संपत नाही.
माहितीपटासाठी टीम जेव्हा पुन्हा त्या कुटुंबाकडे गेली, तेव्हा सहा वर्षांनंतरही त्या घरात भीती, असुरक्षितता आणि आघात तसाच जिवंत असल्याचं दिसून आलं.
पत्रकार तनुश्री पांडे सांगतात,
“परिस्थिती बदलली आहे, पण चांगल्यासाठी नाही. सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली खरी, पण महागाईच्या काळात एका अत्यंत गरीब कुटुंबासाठी ते पुरेसं नाही. मला सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे हा आघात आता पुढच्या पिढीकडे जात आहे.”
पीडितेच्या लहान पुतण्यांनाही शाळेत सहज प्रवेश मिळत नाही. आरोपींची मुलं त्याच शाळेत शिकतात म्हणून कुटुंबाकडून जबाबदारीचे लेखी कागद मागितले जातात. “त्या मुलींना बलात्कार म्हणजे काय हेही पूर्णपणे कळत नाही, पण त्या आधीपासूनच भीतीच्या सावटाखाली वाढत आहेत,” असं तनुश्री म्हणतात.
ट्रोलिंग, भीती आणि पत्रकारितेची किंमत
हाथरस प्रकरणाचं वार्तांकन करताना तनुश्री पांडे यांना प्रचंड ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागला. त्या काळाची आठवण सांगताना त्या स्पष्ट शब्दांत म्हणतात, “एका क्षणी मला वाटायला लागलं होतं की माझं करिअर संपलं.”
त्यांच्या मते, हा केवळ सोशल मीडियावरील विरोध नव्हता, तर सुनियोजित हल्ला होता. “मला अटक होईल का, तुरुंगात जावं लागेल का, अशी भीती वाटत होती. मी पत्रकारिता निवडली कारण मला वाटत होतं की सत्य मांडणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं हेच तिचं काम आहे. पण जेव्हा मी ते केलं, तेव्हा मला शिक्षा दिल्यासारखं झालं,” त्या म्हणतात.

तनुश्री यांना या अनुभवातून ग्रामीण भारतातील महिलांची असुरक्षितता अधिक तीव्रतेने जाणवली. “जर माझ्यासारखी व्यक्ती, जिला काही प्रमाणात पाठिंबा आणि ओळख आहे, ती एवढी घाबरू शकते, तर एखादी ग्रामीण दलित महिला आवाज उठवताना काय सहन करत असेल?” असा प्रश्न त्या उपस्थित करतात.
“बलात्कारासारखी गोष्ट अस्तित्वातच नसते…”
या माहितीपटातील सर्वाधिक अस्वस्थ करणाऱ्या बाबींमध्ये आरोपी पक्षाच्या मुलाखतींचा समावेश आहे. आरोपींचे वडील आणि वकील उघडपणे बलात्कार नाकारतात आणि घडलेलं सर्व काही “संमतीने” झालं, असा दावा करतात. हा अनुभव सांगताना पॅट्रिक ग्रॅहम हादरलेले दिसतात. “जेव्हा तुम्ही लोकांना उघडपणे असं बोलताना ऐकता की ‘बलात्कार असं काही नसतंच’ किंवा ‘मुलीच त्यासाठी कारणीभूत असतात’, तेव्हा ते एखाद्या मध्ययुगीन समाजात आल्यासारखं वाटतं,” ते म्हणतात.
त्यांच्या मते, ही केवळ काही व्यक्तींची मतं नाहीत; तर समाजात खोलवर रुजलेल्या स्त्रीद्वेषी आणि पितृसत्ताक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. “महिलांना तुच्छ लेखणारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्कृती शेवटी समाजाला कुठे घेऊन जाते, हे हाथरस दाखवून देतं,” असं ते म्हणतात.
तनुश्री पांडे याही या मानसिकतेबद्दल तीव्र अस्वस्थता व्यक्त करतात. त्यांच्या मते, आपण सोशल मीडियावर पुरोगामी भाषा बोलतो, पण प्रत्यक्ष समाजात परिस्थिती फार वेगळी आहे.
“फक्त खेड्यांमध्येच नाही, तर शहरांमध्येही स्त्रियांविषयीचे दृष्टिकोन अत्यंत सनातनी आहेत,” त्या म्हणतात. महिलांसाठी वेगळे नियम, वेगळे निर्बंध आणि सततचं नैतिक नियंत्रण हे अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी असल्याचं त्या सांगतात.
त्या उदाहरण म्हणून आसाराम बापू प्रकरणाचा उल्लेख करतात. “दोषी किंवा आरोपी व्यक्ती समाजात मोकळेपणाने फिरते; पण पीडित महिला मात्र अजूनही घरात बंदिस्त आयुष्य जगते. आपल्या देशात निर्बंध गुन्हेगारांवर कमी आणि पीडितांवरच जास्त असतात,” असं त्या म्हणतात.
“हाथरसमध्ये गेल्यावर जणू भूतकाळात गेल्यासारखं वाटत होतं”
चित्रीकरणादरम्यानचे अनुभव सांगताना पॅट्रिक ग्रॅहम उत्तर भारतातील खोलवर रुजलेल्या लैंगिक विषमतेकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते, हाथरसमध्ये महिलांची सार्वजनिक उपस्थिती जवळजवळ अदृश्य होती. रस्त्यांवर महिला क्वचितच दिसायच्या. दिसल्या तरी चेहरा झाकलेला असायचा. स्मार्टफोन सोडले, तर जणू आपण भूतकाळात आलो आहोत असं वाटायचं.”

तनुश्री एक प्रसंग सांगतात… शूटिंगनंतर एका बँक्वेट हॉलमध्ये पुरुषांची पार्टी सुरू होती, पण तिथे एकही महिला नव्हती. “महिला मद्यपान किंवा पार्टी करताना दिसली, तर समाज लगेच तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करतो,” त्या म्हणतात.
त्यांच्या मते, महिलांविरोधातील हिंसेची सुरुवात इथूनच होते. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून न पाहणाऱ्या मानसिकतेतून.
“माहितीपट पाहताना आई पुन्हा रडली…”
माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने तो पाहिला. तनुश्री सांगतात, “आईने मला फोन केला. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. माहितीपट पाहणं म्हणजे तो संपूर्ण आघात पुन्हा जगणं होतं.”
त्या सांगतात की, पत्रकार म्हणून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला जातो, पण ही कथा टीममधील प्रत्येकाला आतून हादरवून गेली. कुटुंब अजूनही मुलीच्या आठवणींमध्ये जगतं. ती कशी स्वयंपाक करायची, घरकामात मदत करायची, हे सांगताना ते वारंवार भावूक होत होते.
मात्र, या सगळ्या वेदनेतही तनुश्री एका छोट्या आशेचा उल्लेख करतात. माहितीपट पाहिल्यानंतर काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांना फोन करून “अशा गोष्टी घडतात” हे मान्य केलं आणि आपल्या परिसरात ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करू, असं सांगितलं.
तनुश्री म्हणतात, “जर हा माहितीपट पाहून एका व्यक्तीने जरी आत्मपरीक्षण केलं, तरी कदाचित या माहितीपटाने आपलं काम केलं आहे.”
(पत्रकार तनुश्री पांडे)
मध्यरात्रीच्या अंत्यसंस्काराची साक्षीदार ठरलेली पत्रकार तनुश्री पांडे
२०२० मध्ये हाथरस प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वात आक्रमक आणि सातत्यपूर्ण ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांमध्ये तनुश्री पांडे यांच नाव अग्रक्रमाने घेतलं गेलं. पीडित कुटुंबाशी संवाद साधण्यापासून ते प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत, तनुश्रीने त्या काळात केलेलं वार्तांकन राष्ट्रीय चर्चेचा भाग बनलं होतं. विशेष म्हणजे, टीआरपीकेंद्री ‘क्राईम कव्हरेज’च्या पलीकडे जात त्यांनी हाथरसकडे जात, सत्ता आणि स्त्रीविरोधी हिंसा यांच्या छेदनबिंदूवरून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ‘हाथरस : 16 डेज’ या माहितीपटात त्यांची उपस्थिती केवळ पत्रकाराची राहत नाही; ती साक्षीदाराची, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाची आणि त्या कुटुंबाच्या वेदनेशी जोडल्या गेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची बनते.
हाथरस प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे पीडित तरुणीच्या पार्थिवावर पोलिसांनी मध्यरात्री कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध केलेला अंत्यसंस्कार. त्या रात्रीच्या घटनांची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून तनुश्री पांडे यांचं नाव विशेषतः घेतलं जातं. प्रशासनाने गाव सील केलेलं असताना, माध्यमांना रोखलं जात असताना आणि कुटुंबीयांना मुलीचा शेवटचा चेहराही पाहू दिला जात नसताना, तनुश्री घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी केलेल्या वार्तांकनातून देशाने प्रथमच पाहिलं की, एका दलित मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या कुटुंबाला सन्मानाने शोक करण्याचा अधिकार नाकारला जात होता. रात्रीच्या अंधारात पेटणारी चिता, आक्रोश करणारे कुटुंबीय आणि पोलिसांच्या घेरावात सुरू असलेली ती घाई हे दृश्य भारतीय समाजव्यवस्थेच्या अमानुष चेहऱ्याचं प्रतीक बनलं. तनुश्रीच्या रिपोर्टिंगमुळेच त्या रात्रीचा प्रश्न केवळ “काय घडलं?” इतकाच राहिला नाही, तर “राज्य व्यवस्था इतकी घाबरली कोणाला होती?” हा मोठा प्रश्न देशासमोर उभा राहिला.
तनुश्री पांडे यांचं पत्रकारितेकडे पाहण्याचं भानही या माहितीपटात प्रकर्षाने जाणवतं. त्या वारंवार सांगतात की, पत्रकारिता म्हणजे फक्त ‘दोन्ही बाजू’ दाखवणं नाही, तर सत्तेच्या केंद्रांमुळे दाबल्या गेलेल्या आवाजांना ऐकवण्याची जबाबदारी आहे. हाथरस प्रकरणानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंग, धमक्या आणि वैयक्तिक हल्ल्यांना सामोरं जावं लागलं; पण त्या अनुभवाने त्यांचा दृष्टिकोन अधिक तीव्र झाला. ग्रामीण भारतातील महिलांची भीती, दलित कुटुंबांची असुरक्षितता आणि समाजातील खोलवर रुजलेली पितृसत्ता, हे सगळं त्यांनी केवळ ‘स्टोरी’ म्हणून नाही, तर भारतीय लोकशाहीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांसारखं मांडलं. त्यामुळेच या माहितीपटात तनुश्री फक्त रिपोर्टिंग करताना दिसत नाहीत; त्या प्रेक्षकांनाही सतत अस्वस्थ करणारे प्रश्न विचारताना दिसतात.






