Skip to main content

‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’

Atul Deulgaonkar
Today
5 views
 ‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’

अतुल देऊळगावकर


  • जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना भारतातील अनेक भाग ४५ ते ४८ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करत आहेत.


  • उष्णतेची लाट ही केवळ हवामानाची समस्या राहिलेली नसून ती आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न बनली आहे.


  • वातानुकूलित खोल्यांतील लोक आणि उन्हात काम करणारे मजूर यांच्यातील दरी वाढत्या तापमानामुळे अधिक स्पष्ट होत आहे.


  • हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बालकं, शेतमजूर, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि स्थलांतरित कुटुंबांना बसत आहे.


  • तापती शहरं थंड करण्यासाठी हरित क्षेत्रं, शीत छतं आणि लोककेंद्रित नगररचना यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे.



नऊ महिन्याच्या तान्हुल्याला न्हाऊ घालून लुगड्याच्या झुल्यात झोपाळ्यात निजवलं. दोन तासानं कामं आटोपून त्याला घ्यायला बाई गेल्या तर.. अंग ठणठणीत गार !  न रडता,  आवाज न करता बाळ गेलं. तेव्हा, एप्रिलच्या अखेरीस, लातूर जिल्ह्यातील गोन्द्री गावात (तालुका: औसा) उन्हाचा पार होता, ४१ डिग्री सेल्सिअस…  


मे महिन्याच्या अखेरीस नागपूरमध्ये सलग ७ दिवस तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेलं होतं. नागपूर रेल्वेच्या अनारक्षित व स्लीपर कोचमधून ५ मृतदेह रेकॉर्ड करण्यात आले आहेत. धावत्या गाड्यांमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर शहरामध्ये ठिकठिकाणी ५ मृतदेह आढळले. शरीराचं तापमान ४१.५ डिग्री सेल्सिअसपेक्षा (१०६.७° फॅरेनहाइट) अधिक झाल्यास त्याला अति-ताप (हायपरपायरेक्सिया) म्हणतात. तशा तापात मानवी शरीर टिकाव धरू शकत नाही, ती वैद्यकीय आणीबाणी असते. वेळीच उपचार न मिळाल्यास मेंदू, मूत्रपिंड आणि हृदय यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णाचं शरीर थंड करण्यासाठी बर्फ, थंड पाण्याच्या पट्ट्या वा इतर शीतकरण पद्धतीचा वापर करावा लागतो. नागपूर महानगरपालिकेच्या 'कोल्ड वॉर्ड' मध्ये अति-तापग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 


User Image


‘उष्णतेची चिंता ही चैन आहे’ : मजुरांच्या जगण्याची वस्तुस्थिती


३१ मे... बुंदेलखंडच्या बांदा गावात देशातील सर्वाधिक तापमान ४८ डिग्री सेल्सिअस झालं. तिथले गवंडी पप्पू सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ७ असे काम करतात. मधल्या चार तासांची विश्रांती ते उष्णतेची तीव्रता कमी होण्याची वाट पाहण्यात घालवतात. ते म्हणाले, ‘सकाळी ६ वाजता ११ चं उन आहे. उन्हात सलग काम करा किंवा थांबून-थांबून करा. आम्हाला आठ तासांचं काम पूर्ण करावंच लागतं.’ 


त्यांच्याकडे काम करणाऱ्या बांधकाम कामगार शांतीदेवी रोज ६ किलोमीटर ये-जा करतात. आग ओकणाऱ्या उन्हात, त्या वाळूच्या ट्रकची सावली धरून जेवत होत्या. त्यांच्या डब्यात भाकरी, कांदा, मीठ आणि लोणचं होतं. त्या म्हणाल्या, ‘बसून जेवायला सावली मिळत नाही. दुपारपर्यंत भाजी नासून जाते. उन्हाळा फार कसरती करायला लावतो. उष्णतेची चिंता करणं ही एक चैन आहे. गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं.’ 


बांधकामाची पाहणी करण्यास आलेल्या पाहुण्याला त्या  म्हणाल्या ‘तुम्हाला उष्माघात होईल. आम्हाला त्याची सवय आहे.’


User Image


आपल शरीर किती उष्णता सहन करू शकतं? त्यानंतर काय होतं…?


मैदानी भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअस, समुद्रकिनारी भागात ३७ डिग्री आणि टेकड्यांमध्ये ३० डिग्री सेल्सिअस ओलांडल्यास किंवा कुठेही ४५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास भारतीय हवामान खाते उष्णतेची लाट घोषित करते. परंतु केवळ तापमानावरून उष्णतेची तीव्रता लक्षात येत नाही. वाऱ्याचा वेग अधिक असेल, तर वातावरणात असलेली थंडी अधिकच जाणवते. त्याचप्रमाणे आर्द्रता वाढली की उन्हाचे चटके त्रासदायक होतात. प्रत्यक्ष तापमान आणि जाणवणारं तापमान यांत फरक असतो. म्हणूनच, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा एकत्रित विचार करून ‘उष्णता निर्देशांक’ (वेट बल्ब टेम्परेचर) काढला जातो. साध्या थर्मामीटरने मोजलं जातं ते कोरडं तापमान (ड्राय टेम्परेचर)!  ओल्या कापडाने थर्मामीटर झाकून मोजलेलं तापमान हे सभोवतालच्या हवेतील आर्द्रता गृहित धरून वेट बल्ब टेम्परेचर येतं. त्यावरून मानवी शरीर थंड होण्याची प्रक्रिया लक्षात येते. 


मानवी शरीराची उष्णता सहन करण्याची सुरक्षित मर्यादा ही ३० डिग्री सेल्सिअस असून त्याची कमाल मर्यादा ३५ डिग्री सेल्सिअस इतकी आहे. हा उष्णता निर्देशांक ३० डिग्री ते ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढल्यास, शरीर थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरातील द्रव पदार्थांची पातळी कमी होऊ लागते. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. रक्तात गुठळ्या तयार होतात. थकवा, स्नायू आखडणे, चक्कर येणे, बेशुध्द पडणे, हृदयविकाराचा वा मेंदूचा झटका येणे, असे अनेक त्रास होऊ शकतात.


User Image


‘पृथ्वीवर २०२० पासून उष्णतेचा बॉम्बहल्ला’ सुरू झाला आहे.’


दिल्ली ते कन्याकुमारी सर्व शहरांमधील बुलेट वेगवान बांधकामांमुळे सर्वदूर ‘काँक्रिटपूर’ तयार झाले आहेत. त्याआड येणारे डोंगर आणि जंगल कापून टाकले. यमुना ते कावेरी सर्व नद्यांच्या गटारी केल्या. ह्या ‘विकासक’उद्योगांमुळे मागील २० वर्षांत बंगळूरू ते श्रीनगर, अनेक शहरांतून पाणवठे व उद्याने झपाट्याने नष्ट होत गेली.  उष्णता शोषून घेणाऱ्या निळ्या व हिरव्या दोन्ही क्षेत्रांत सुमारे ४५ टक्के घट झाली. वाढत गेलंलं काँक्रिटीकरण आणि हवेचं प्रदूषण यांमुळे उष्मा नियंत्रण बिघडून जात आहे.


‘पृथ्वीवर २०२० पासून उष्णतेचा बॉम्बहल्ला’ सुरू झाला आहे.’ असं जागतिक हवामानशास्त्रज्ञांचं निदान आहे. दिवसाबरोबरीने रात्रींचंही तापमान वाढत आहे. सकाळ गायबच झालीय, रात्रही थंड होत नाही. दिवसापेक्षा रात्रीचं तापमान हे १२ ते १४ डिग्री सेल्सिअसने कमी झाल्यास रात्री गारवा जाणवतो. सध्या मुंबईसह इतर सर्व महानगरांमध्ये दिवस व रात्रीच्या तापमानात फरक हा ६ ते ९ डिग्री सेल्सिअस एवढाच जाणवत आहे. त्यात आर्द्रता वाढीची भर पडत आहे. एकाच वेळी उष्ण व दमट होत असलेली भारतीय शहरे ‘उष्णतेची बेटं (हीट आयलँड)’ झाली आहेत. 


हवामानाचं संतुलन बिघडवणाऱ्या कंपन्यांचे धुरीण, त्यांची साथ व संगत करणारे नेते व अधिकारी हे सदानकदा वातानुकुलित शीतल वातावरणात राहात असतात. तर हवामानाचे चटके भोगणारा सामान्य माणूस उघड्यावर असतो. कोणत्याही आपत्तीचा आघात हा त्या हातावर पोट असणाऱ्यांवरच होत असतो. शेतमजूर, स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले आणि गिग-वर्कर्स (डिलिव्हरी कर्मचारी) वीटभट्ट्या व बांधकामावरील कामगार, असे उन्हातान्हात काम करावं लागणारे लोक उष्णतेच्या लाटेत होरपळून निघतात. उष्णतेमुळे त्यांचं डोकं भयानक दुखतं, गरगरतं, अंधारी येते, तीन-चार तासांपेक्षाही जास्त झोप लागत नाही. उन्हाळ्यातील असह्य थकवा म्हणजे ‘रिकव्हरी डेफिसिट’ (सावरण्याची कमतरता) ! झोपेच्या कमतरतेमुळे चिंता, तणाव आणि भावनिक थकवाही वाढतो. 


User Image


भारतात अति उष्णतेमुळे एका दिवसात सुमारे ३,४०० बळी जाऊ शकतात?


नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात अति उष्णतेमुळे केवळ एका दिवसात सुमारे ३,४०० बळी जाऊ शकतात. आपल्या देशातील २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा तीव्र धोका आहे. त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, अकोला, अहमदनगर, वर्धा, वाशीम, नंदूरबार, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी बीड, जालना, धाराशिव व लातूर हे चौदा जिल्हे येतात. संपूर्ण देश यंदाच्या  उन्हाळ्यातील उष्णतेचा वणवा सहन करत आहे. तरीही  ‘उष्णतेच्या लाटे’कडे पुरेश्या गांभीर्याने पाहिलं जातं नाही. ती दूरवर पसरलेली व विखुरलेली असल्याने त्यात ‘बातमीमूल्य’ वाटत नाही. उष्माघाताच्या मृत्यूस ‘संशयास्पद’ म्हटलं जातं. त्यामुळे त्यांची नोंदच ठेवली जात नाही. 


अशा क्रूर काळात ‘बालकांना वाचवणं’ हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे. ब्रुसेल्स येथील ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या विना नफा कार्य करणाऱ्या संस्थेने ‘जागतिक हवामान संकटात  मुलांचे हक्क संरक्षित करणे’ असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणतात ‘२०२० मध्ये जन्मलेल्या ९२ टक्के मुलांना (सुमारे ११ कोटी) मुलांना उष्णतेचा कडेलोट सहन करावा लागेल. अतीतीव्र उष्णता ही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करेल. पिकांची नासाडी झाल्यामुळे मुलांचे पोषण अवघड होईल. गरीब मुलांना स्वच्छ पाणी व अन्नाची टंचाई भासेल. कुपोषणामुळे बालकांची वाढ कठीण होईल. अनेक दिवस शाळा बंद ठेवाव्या लागतील. मुलांना शिक्षण सोडून मजुरीवर जावं लागेल. बालविवाहाचं प्रमाण वाढेल. असंख्य लोकांना स्थलांतर करावं लागेल.’ 


‘तप्त शहरं आणि घरं कशी थंड करता येतील ?’


‘तप्त शहरं आणि घरं कशी शीत करता येतील ?’ यांवर लक्ष केंद्रित करणं, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सरपंच ते मुख्यमंत्री, तलाठी ते मुख्य सचिव, बातमीदार ते संपादक या सगळ्यांनी, या विषयावर मंथन घडवणं आवश्यक आहे. सध्या अनेक संस्था भारतीय शहरांमधील उष्णतेच्या ताणाचं (हीट स्ट्रेस) मापन करत आहेत. शहरांमधील हिरवी व निळी क्षेत्रं झपाट्याने नष्ट होत आहेत. कॉंक्रीटचा उभा-आडवा पसारा सर्व शहरांना व्यापून टाकल्यामुळे  शहरांतील ७५ टक्के भूभागावर उष्णतेचा विलक्षण ताण आहे. हवेचं तापमान ४० डिग्री  सेल्सिअस असेल तर कॉंक्रीट रस्त्याचं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सिअस असू शकतं. 


User Image


शहरांमधील व इमारतींमधील उष्णतेचा विलक्षण ताण कमी करण्यासाठी तातडीने देशव्यापी मोहीम घ्यावी लागेल. बाष्पीभवनाने शीतकरण (इव्हापोरेटीव्ह कूलिंग), इमारतींच्या संकुलासाठी सामूहिक शीतकरण (डिस्ट्रिक्ट कूलिंग), इमारतींमध्ये उत्तम वायूव्हिजन, गरम हवा बाहेर खेचणारे पंखे व उभी उद्याने असे अनेक उपाय केले जात आहेत. (केवळ ८०० रुपयांचा एग्झॉस्ट पंखा दिवसा गरम हवा बाहेर टाकतो आणि रात्री थंड हवा आत आणतो. ‘लोकविज्ञान’चे डॉ. अनंत फडके  व वास्तुविशारद अविनाश हावळ हे पुण्यातील सदनिकांत असह्य उकाड्यात खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून ह्या पंख्याने थंडावा निर्माण करतात. अशा अनेक कल्पकतांचा प्रसार गरजेचा आहे.) नवीन बांधकाम करताना पाया ते छत प्रत्येक टप्प्यावर उष्णता वाढू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. काँक्रिटच्या विटा (ब्लॉक) ऐवजी मातीच्या किंवा राखेच्या (फ्लाय अॅश ) विटा वापरल्या तर उष्णता शोषण्यात ४० टक्के  घट होते. 


तामिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांनी गरिबांच्या घरांच्या छतांवर एक खास प्रकारचा पांढरा ‘रिफ्लेक्टिव्ह’ रंग लावला. हा रंग उन्हाची प्रखर किरणे शोषून घेण्याऐवजी ती थेट आकाशात परत परावर्तित करतो. त्यामुळे घरतील तापमान चक्क ७ ते ८ डिग्री सेल्सिअसने कमी झालं. साहू यांनी ३०० शाळांमध्ये ‘शीत छत अभियान (कूल रूफ इनिशिएटिव्ह)’ प्रकल्प राबवला. याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने सुप्रिया साहू यांना ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ २०२५’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 


उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ओदिशा व बिहारमध्ये, ’ घराच्या छताला पांढरा रंग लाऊन घ्या. दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडू नका. सतत पाणी व सरबत प्या. डोके, कान व मान झाका.’ भोंगा फिरवून अशी माहिती दिली जाते. ठिकठिकाणी फलक लाऊन जागरूकता वाढवली जाते. त्यासोबत ‘आशा’ कार्यकर्त्या व प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयांना सजग करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व  विद्यार्थी यांची मदत घेता येईल. कोणत्याही आपत्तीचा आघात गरिबांवरच अधिक होत असतो. त्यामुळे रोजंदारी कामगार व शेतमजूर यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 


मुलांसाठी कल्पवृक्ष की वणवा? निर्णय आजच घ्यावा लागेल


हवामान बदलाच्या आपत्तींची जोखीम कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच उपाय केले जात आहेत. युरोपमध्ये हरित इमारती, हरित शहरे, विवेकी शहरे (रॅशनल) यांवर सातत्यानं कार्यशाळा व परिसंवाद घेतले जातात. शहर नियोजनकार, वास्तुविशारद, मेंदूशास्त्रज्ञ  आणि मानसशास्त्रज्ञ एकत्र बसतात. नागरिकांना कोणत्या घरांमध्ये आल्हाददायक वाटतं? हे ठरवताना त्यांच्या मेंदूचा इ.इ.जी. काढतात. हरित इमारती व हरित शहरांतील रहिवाश्यांच्या होणारे आरोग्यात सकारात्मक बदल तपासतात. त्यानंतर हवामान बदलास जुळवून घेणाऱ्या इमारती व वसाहती यांच्या रचना सुचवतात. स्थानिक संस्था अशा रचनांना खास अनुदान आणि कर सवलत देतात. उत्कृष्ट रचनांना राष्ट्रीय पातळीवर गौरवतात. याचा, महाराष्ट्रातील अभियंता व वास्तुविशारद संघटनांनी विचार करावा.


User Image


ग्राहक, स्थापत्य अभियंते व वास्तूरचनाकार आणि डॉक्टरांच्या संघटना यांना ‘कारपेट एरिया’च्या पलीकडे बांधकामास पाहावं लागेल. तरच त्यांना एकत्र येऊन शहरांच्या आरोग्यावर चर्चा घडवता येईल. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस करून कचरा शून्यावर आणणे, सांडपाण्याला निर्मळ करून पुनर्वापर करणे, प्रकाश व हवा उत्तम खेळवून विजेचा वापरच कमी करणे, भिंतींमधील वाहिन्यांतून (डक्ट) थंड व गरम  पाणी फिरवणे, सामग्री ते बांधकाम, पाया ते छत ह्या  प्रत्येक टप्प्यावर बुद्धीचा वापर करून अतोनात काटकसर करणे, हे सर्व काही शक्य आहे. आपल्या देशातच अशा अनेक हरित वसाहती होत आहेत. त्यात आय.आय.टी. व इतर अनेक  शैक्षणिक संस्था आघाडीवर आहेत.


शहरामध्ये उत्तम वृक्ष लागवड केल्यास ते हरित आच्छादन ४ ते १० डिग्री सेल्सिअसने तापमान कमी करू शकते. हे अनेक शहरे व संस्था दाखवून देत आहेत. केवळ युरोपच नव्हे; तर, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, जपान व व्हिएतनाम आदी देशांत शहरी वने निर्माण केली जात आहेत. चीनमधील लियोझाऊ हे पथदर्शी वनयुक्त शहर आहे.  तिथे एक हजार टन प्राणवायू मिळवण्यासाठी आणि दहा हजार टन कर्ब वायू शोषून घेण्यासाठी, चाळीस हजार वृक्ष आणि दहा लाख झुडुपे लावली आहेत. आपल्याकडेही महाराष्ट्रात व देशात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीसाठी अनेक संस्था व गट प्रयत्नशील आहेत. त्याला व्यवस्थित ‘आकार’ देऊन (झुडुपांना वृक्ष न ठरवता) ‘शहरी वन’ वाढवता येऊ शकतं. मुलांसाठी ‘कल्पवृक्ष’ लावायचा की त्यांना ‘निष्पर्ण वृक्षाखालील वणव्यात’ लोटायचं, हे आपणच ठरवणार आहोत.


(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत. सौजन्य - उद्याचा मराठवाडा)


Share this article
"कोकण अणुऊर्जा केंद्र बनणार? जैतापूर ते बारसू नव्या संघर्षाची चाहूल"
ताज्या घडामोडी

"कोकण अणुऊर्जा केंद्र बनणार? जैतापूर ते बारसू नव्या संघर्षाची चाहूल"

आज जगभरात पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारने कोकणात २५,४०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ६.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य बारसू, पूर्णगड, देवगड आणि जैतापूर परिसरात प्रस्तावित प्रकल्पांमुळे रोजगार आणि विकासाच्या दाव्यांसोबतच पर्यावरण, मासेमारी, शेती, फळबागा आणि स्थानिक उपजीविकेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील दशकभराचा संघर्ष अद्याप स्मरणात असतानाच, कोकणला देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा पट्ट्यांपैकी एक बनवण्याच्या हालचालींमुळे नव्या जनआंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या चर्चांमध्ये पर्यावरणीय न्याय, लोकशाही संमती आणि स्थानिक समुदायांचे हक्क यांना किती महत्त्व दिले जाते, याची कसोटी आता पुन्हा एकदा कोकणात लागणार आहे.

5 min read
S
Sirat Satpute
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare

Comments

Comments are currently disabled or loading...