कोमल ठोंबरे
- आपल्या प्रिय व्यक्तीच्या ओढीने छ. संभाजी नगरमध्ये एका हिंदू महिलेची किडनी मुस्लिमाच्या, तर मुस्लिम महिलेची किडनी हिंदू पुरुषाच्या शरीरात स्थिरावली.
- उत्तर प्रदेश आणि जम्मू-कश्मीर मधील दोन कुटुंबामध्ये ना रक्ताचे नाते, ना जुनी मैत्री, एक मुस्लीम तर एक हिंदु कुटुंब, तरी त्यांच्यात जगावेगळ्या किडनी दानाने एक वेगळे नाते जुळले गेले आहे.
- एका हिंदू आईने आपला मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लिम रुग्णाला मूत्रपिंड दान केले आहे. तर, त्या मुस्लिम रुग्णाच्या पत्नीने या हिंदू रुग्णाला मूत्रपिंड दान करून अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.
नुकतीच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली, अनेक मतदार संघात विखारी प्रचार झाला. नागरिकांचे प्रश्न, विकास हे सगळे मुद्दे बाजूला राहिले आणि प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही ‘हिरवा विरुद्ध भगवा’ इथेच अनेकांची गाडी येऊन थांबली. मात्र एकाबाजूला हे सगळं होत असतानांच दुसऱ्या बाजूला हाच हिरवा रंग भगव्यात मिसळत होता आणि भगवा रंग हिरव्या रंगात… तिथे ना धर्म आडवा येत होता ना जात…
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा धर्म, जात आड येऊ नये, असे म्हणतात. याचेच प्रत्यंतर नुकतेच छ. संभाजी नगरमध्ये बघायला मिळाले आहे. केवळ आपल्या प्रिय व्यक्तीच्या ओढीने एका हिंदू महिलेची किडनी मुस्लिमाच्या, तर मुस्लिम महिलेची किडनी हिंदू पुरुषाच्या शरीरात स्थिरावली. ही शस्त्रक्रिया झाली ती शहराच्या केअर सिम्मा हॉस्पिटलमध्ये.
हिंदू आणि मुस्लिम अशा दोन पुरुषांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते; मात्र किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता, आयुष्यभर उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, सुख-दुःखात सोबत असलेल्या जीवनसाथीला गमवायचे नसल्याने दोघांच्या पत्नी किडनी देण्यास तयार झाल्या. मात्र, रक्तगट जुळत नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांना आपापल्या पतीला किडनी देता येत नव्हती. परिणामी, दोघीही हतबल झाल्या.
दरम्यान, मुस्लिम महिलेचा रक्तगट हिंदू रुग्णाशी तर हिंदू महिलेचा रक्तगट मुस्लिम रुग्णाशी जुळला; कारण रक्त ना भगवे होते ना हिरवे. ते फक्त रक्त होते. रुग्णालयातील वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रदीप सारूक आणि डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांनी एकमेकींच्या पतीला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ दोन जीव वाचले नाहीत, तर धर्माच्या भिंती ओलांडून रक्ताचे नवे नाते तयार झाले.
दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डि-स्चार्ज देण्यात आला. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. सारूक, डॉ. देशमुख, डॉ. अरुण चिंचोले आणि डॉ. संदीप बाधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हिंदू आणि मुस्लिम असो अन्य कोणतेही धर्म, ते एकमेकांपासून दूर टोकाला जाणे हे केवळ अनिष्ट नाही तर देशाच्या शांती, सौहार्दावर आलेले अरिष्ट आहे.सर्व धर्म एकाच ठिकाणी, आपले अस्तित्व जपूनही एकत्रच रहायला हवेत. हीच भारताची परंपरा आहे. एकीकडे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाने देशभरातील वातावरण पेटले असतानाच हिंदू- मुस्लिम ऐक्याच्या अशा घटना मनाला सुखावून जातात. अशा अनेक घटना गेल्या काही काळात या देशात घडल्या आहेत.
अवयवदानात हिंदू आणि मुस्लीम एकता
एक घटना नवी दिल्लीत घडली आहे. राजधानी दिल्लीच्या एका रूग्णालयात किडनी स्वॅपची ( अदला-बदल ) दुर्मिळ घटना घडली. उत्तर प्रदेश आणि जम्मू-कश्मीर मधील दोन कुटुंबामध्ये ना रक्ताचे नाते, ना जुनी मैत्री, एक मुस्लीम तर एक हिंदु कुटुंब, तरी त्यांच्यात जगावेगळ्या किडनी दानाने एक वेगळे नाते जुळले गेले आहे.
नवी दिल्लीच्या ओखला येथील फोर्टीस एस्कॉर्टस रुग्णालयात हे जगावेगळे अनोखे अवयवदान घडले आहे. 62 वर्षीय मोहम्मद सुल्तान डार हे कश्मीरच्या टेलिफोन विभाग काम करतात. तर उत्तर प्रदेशातील बरेलीत राहणारे 58 वर्षीय माजी सैनिक विजय कुमार या दोघांना आजारपणामुळे किडनी बदल्याची वेळ आली होती. परंतू किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी त्या दोघांच्या कुटुंबातील कोणत्याही किडनी दात्यांशी कोणतेही पॅरामीटर जुळत नव्हते. दोन्ही घरातील कुटुंब प्रमुखांना डायलिसीसचा सहारा उराला होता. किती वर्षे डायलिससवर रहाणार. किडनी दानातूनच त्यांना जीवदान मिळणार असल्याने किडनी दाते शोधण्यात वेळ जात होता. दोन्ही कुटुंबिय चिंतेत सापडले होत. दोन्ही पुरूषांना 18 महिन्यांपासून डायलिसिसवर ठेवण्यात आले होते.

मुत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मुख्य संचालक डॉ. संजीव गुलाटी यांनी सांगितले की दोन्ही प्रकरणात डोनर आणि रूग्ण यांचे ब्लड ग्रुप मिस मॅच होत होते. त्यामुळे एकच पर्याय शिल्लक राहीला. तो म्हणजे अदला-बदलीचा ! भारतात हा प्रकार खूपच दुर्मिळ आहे. किडनीची अदलाबदली करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर दोन्ही रूग्णांना फोर्टीस मध्ये आणले. सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या. प्री- ट्रान्सप्लांट कम्पॅटीबिलिटी चेक, हयुमन ल्युकोसाईट एंटीजन टायपिंग आणि जेनेटिक टेस्ट अशा ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या.
सहा डॉक्टरांच्या टीमने या चार शस्रक्रिया केल्या, त्यासाठी सहा तास लागले. डॉ.गुलाटी यांच्या टीममध्ये डॉ. अजित सिंह नरुला, डॉ.अनिल गुलीया आणि डॉ.परेश जैन ( युरोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट ) आणि दोन ज्युनियर डॉक्टर सामील होते. रुग्ण आणि डोनरला 27 मार्चला डिस्चार्ज दिला आहे त्यांची प्रकृती उत्तम आहे. जर वेळवर ट्रान्सप्लांट झाले नसते तर ते पाच वर्षांपर्यंतच जीवंत राहू शकले असते. धर्म आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा विचार न करता या महिलांनी एकमेकांच्या पतीला वाचविण्यासाठी पुढाकार घेत आपली एक किडनी दान केली आहे.
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाले एकमेकांच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा धर्म, जात आड येऊ नये, असे म्हणतात. याचेच प्रत्यंतर मुंबईत बघायला मिळाले आहे. एका हिंदू आईने आपला मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लिम रुग्णाला मूत्रपिंड दान केले आहे. तर, त्या मुस्लिम रुग्णाच्या पत्नीने या हिंदू रुग्णाला मूत्रपिंड दान करून अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.
वर्षभरापूर्वी कल्याणचा रहिवासी असणारा रफिक शाह आणि घाटकोपरस्थित आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांची परळच्या केईएम रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये भेट झाली. त्यांच्यात एक अनोखे बंध निर्माण झाले होते. रफिक शाह (48) यांना यादवची आई गिरिजा यांनी दान केलेले मूत्रपिंड मिळाले तर, 27 वर्षीय डॉक्टरना शाह यांची पत्नी खुश्नुमा यांनी दान केलेले मूत्रपिंड मिळाले.
कल्याणमध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारा रफिक शहा याचे मूत्रपिंड दोन वर्षांपूर्वी निकामी झाले. तिथपासूनच खुश्नुमा (38) हिला पतीसाठी मूत्रपिंड दान करायचे होते. मात्र तिचा रक्तगट ‘ए पॉझिटिव्ह’ होता. तर, तिच्या पतीचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ होता. तीच परिस्थिती गिरिजा यांच्याबाबतही होती. त्यांनाही त्यांच्या 27 वर्षीय मुलाचा जीव वाचवायचा होता. अशोक हा सात वर्षांचा असातनाच, त्याच्यात मूत्रपिंडविकार असल्याचे पहिल्यांदा लक्षात आले होते. परंतु त्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता आणि त्याचा ए पॉझिटिव्ह.

यादव यांचे वडील अशोक हे घाटकोपरमध्ये रिक्षा चालवतात. त्यांचा मुलगा राहुलला मूत्रपिंडाचा विकार होता, याचे एकमेव लक्षण होते ते म्हणजे त्याचे असणारे मोठे पोट. त्याच्यावर तो गेल्या तीन वर्षांपर्यंत वैद्यकीय उपचार घेत होता. त्यानंतर मात्र त्याला डायलिसिस करावे लागले. तरीही त्याने त्याच्या अभ्यासात खंड पडू दिला नाही आणि तो डॉक्टरही झाला, असे त्याचे वडील सांगतात. तर, शाह हे दोन वर्षांपूर्वी आजारी पडले. आता मात्र त्यांचे प्ररत्योरापण झाल्यामुळे त्यांचे सारे कुटुंबीय आनंदी आहेत.
हिंदू धर्मिय मित्राला वाचवण्यासाठी मुस्लिम मित्राने दान केली किडनी
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या हिंदू मित्राला किडनी दान देत बंधुप्रेमाचे उदाहरण मांडलं आहे. हसलू मोहम्मद असं या व्यक्तीचं नाव असून मित्राला किडनी दान देण्यासाठी त्याने आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. अर्जदार आपली किडनी दान करत आहे की पैशाच्या बदल्यात करत आहे, जे बेकायदेशीर आहे, याचा तपास करण्यासाठी आरोग्य विभागाने अर्ज स्थानिक पोलिसांकडे पाठवला.
या दरम्यान, पोलिसांनी तपासात कोणताही आर्थिक व्यवहार होत नसल्याचे स्पष्ट केले. याबाबतचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हसलू मोहम्मद आणि अचिंत्य बिस्वास यांची सहा वर्षांपूर्वी मैत्री झाली जेव्हा ते एका छोट्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करायचे. दोन वर्षांपूर्वी हसलू यांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. “जेव्हा मी ऐकले की अचिंत्याला त्वरित प्रत्यारोपणाची गरज आहे, तेव्हा मी माझी एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. असे केल्याने मी मरणार नाही, तर अचिंत्याला नवीन जीवन मिळेल,” असं हसलू म्हणाला.
धार्मिक आदराबद्दल विचारले असता हसलू म्हणाले की, मानवी जीवन सर्वात मौल्यवान आहे. "आमचा धर्म वेगळा असू शकतो पण आमचा रक्तगट एकच आहे."






