टीम बाईमाणूस
- आज जागतिक व्हिस्की दिवस…अगदी अलीकडेपर्यंत व्हिस्की, सिंगल माल्ट, स्कॉच प्यायची तर ती स्कॉटलंडचीच असा रिवाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून जगभरातील मद्य शौकिनांच्या तोंडी आता फक्त अमृत, इंद्री, रामपुर या भारताच्याच व्हिस्कींची नावं येतात.
- व्हिस्कीचे उत्पादन आणि निर्मितीमध्ये पाश्चिमात्य देशांचा प्रभाव असताना आता या क्षेत्रात भारताने केवळ शिरकावच केला नसून अख्खी बाजारपेठ ताब्यात घेण्याच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.
‘’अरे मित्रा, दुबईला चाललांस का, प्लिज येताना डय़ुटी फ्रीमधून दोन ‘खंबे’ घेऊन येशील का…?’’ परदेशात कुठेही जाणाऱ्या लोकांना असा प्रश्न विचारणारा भेटतोच भेटतो…!
याचं कारण असं की, व्हिस्की, सिंगल माल्ट, स्कॉच प्यायची तर ती स्कॉटलंडचीच… स्पे नदीच्या शांतशार पाण्यात बार्लीसत्त्व सामावून घेणारी. व्हिस्कीचा बाज ठरतो तो पाण्याच्या आणि बार्लीच्या दर्जावर. स्कॉटलंडमध्ये तर व्हिस्कीसाठी वापरलं जाणारं पाणी उगमाकडचं आहे का खालच्या बाजूचं यापासूनच तिचा दर्जा ठरायला लागतो. आपल्या व्हिस्की म्हणजे मळीपासनं तयार झालेल्या, अतिशय उग्र….स्कॉटलंड, आर्यलड अशा साहेबांच्या देशातल्या व्हिस्कींची सर आपल्या व्हिस्कींना नाही. म्हणूनच परदेशातून येताना डय़ुटी फ्रीमध्ये जायचं आणि प्रत्येकी दोन अशा किमान ‘ग्लेन’ कॅटेगरीतल्या सिंगल माल्ट घ्यायच्याच घ्यायच्या हा आतापर्यंतचा रिवाज.
पण, अलीकडे असं कोणी करत नाही… म्हणजे गेल्या 5-6 वर्षांपासून तरी… याला कारण आहे अमृत, इंद्री, रामपुर ही नावं… ही सगळी भारतीय व्हिस्कींची नावं आहेत आणि फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील मद्य शौकिनांच्या तोंडी आता फक्त हीच अस्सल भारतीय नावं येत असतात. व्हिस्कीचे उत्पादन आणि निर्मितीमध्ये पाश्चिमात्य देशांचा प्रभाव असताना आता या क्षेत्रात भारताने केवळ शिरकावच केला नसून अख्खी बाजारपेठ ताब्यात घेण्याच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.

जगातील पहिल्या क्रमाकांची व्हिस्की भारतीय आहेच परंतू जगभरातील टॉप १० व्हिस्की ब्रॅण्डपैकी सात ब्रॅण्ड हे भारतीय आहे… 2005 साली व्हिस्कीचा जगत्गुरू जिम मरे याने भारताच्या ‘अमृत’ व्हिस्कीला 100 पकी 82 गुण दिले. तेव्हापासून अमृतचं सोनं झालं. पुढे अनेक पुरस्कार तिच्या वाट्याला आले. पुन्हा 2010 साली जिम मरे यांनी तिचा समावेश जगातल्या उत्तम व्हिस्कींमध्ये केला. व्हिस्की बायबलने तर तिचा जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट व्हिस्की म्हणून गौरव केला. त्या पाठोपाठ गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की म्हणून इंद्री व्हिस्कीला किताब मिळाला आहे. आता तर ‘रामपूर’ सिग्नेचर रिजर्व सिंगल माल्ट व्हिस्कीने “सिंगल माल्टचा कोहिनूर” हा किताब प्राप्त केलाय…
उदाहरण म्हणून ‘रामपूर’ व्हिस्कीचे देता येईल… जगातील अनेक देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या एकूण 400 ‘रामपूर’ सिग्नेचर रिजर्व सिंगल माल्ट व्हिस्कीच्या शेवटच्या तीन बॉटल्सच हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुल्क-मुक्त विभागात शिल्लक आहेत. प्रत्येक बॉटलची किंमत आहे फक्त दीड लाख रुपये. अमेरिकन बोर्बोन आणि स्पॅनिश शेरी पिंपात तयार झालेली ही व्हिस्की लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
व्हिस्कीची मालकी असलेली कंपनी, रेडिको खेतान यांनी त्यांच्या संकेतस्थळावर याची “सिंगल माल्टचा कोहिनूर” अशी प्रशंसा केली आहे. भारतासहीत 18 युरोपिय व आशियाई देशांमध्ये ती विक्रीला ठेवण्यात आली होती. भारतीय माल्ट व्हिस्की जगभरात विकली जात आहे आणि चर्चेतही आहे. भारतीय माल्ट व्हिस्कीच्या या यशासोबत या देशातील नव्यानं जन्माला आलेला अभिजन वर्ग आणि त्यांच्यात वाहणारा राष्ट्रीय गौरवाचा प्रवाहही जोडलेला आहे.
संबंधित लेख:
1) रामपूर, इंद्री अन् अमृत… यांना आता ‘सिंगल माल्टचा कोहिनूर’ म्हटलं जातं…!
2) स्कॉचला टक्कर देतेय महुआ मॉन्ड… ताज आणि मॅरिएटमध्ये विकली जातेय मोहाची दारू!
अमृत, इंद्री आणि आता रामपूर… जगभरात भारताचा दबदबा
या सगळ्या व्हिस्कींची नावं त्या गावावरून ठेवण्यात आलंय जिथं ती गाळली जाते. रेडिको खेतानच्या रामपूर व पिकाडिली येथील इंद्री येथे शाखा आहेत. उष्णकटीबंधीय वातावरणातील फळं आणि रोमँटीक इंडियन समर या दोन्ही गोष्टींनी विदेशी जग याकडे आकर्षित होत आहेत. भारतात व्हिस्की प्यायली जाते. सिंगल माल्टमुळे त्यात एक नवीन सुरूवात झाली आहे. ही केवळ व्हिस्की नाही तर, ‘अमृत’ तसेच ‘इंद्री’मुळे एक नवीन संस्कृतीच जन्माला येत आहे.

भारतातील पहिले व्हिस्की एप्रिसिएटर्स क्लब, एसएमएसी (सिंगल माल्ट एमेटर्स क्लब)चे संस्थापक, हेमंत ओबेरॉय सांगतात, “आमच्या व्हिस्कीची ओळख वाढली आहे. पूर्वी दहापैकी तिघांना ‘अमृत’ची माहिती असायची, आता सात-आठ लोक तिला ओळखतात. युरोपीय मंडळी हसायची सुरुवातीला भारतात कोणी सिंगल माल्ट बनवलीये हे सांगितल्यावर. कारण मुदलात भारतीयांना सिंगल माल्ट हे काय प्रकरण आहे, हेच माहीत नव्हतं. त्यामुळे भारतात आणि युरोपोत मार्केट मिळत नव्हतं. मग आम्ही एक क्लृप्ती लढवली. तिचं विकणं बंद केलं आणि उत्तमोत्तम मद्यालयांत चवीन पिणाऱ्यांना तिची ओळख करून द्यायला सुरुवात केली. तशाच युरोपीय पद्धतीनं. ते विशिष्ट आकाराचे ग्लास, त्यात ओतल्यावर ग्लासच्या आतल्या भिंतीवर तिला घुसळवणं, मग तिच्या गंधाची ओळख करून घेणं आणि मग अगदी हलकासा घोट घेऊन जिभेतल्या सर्व चवचिन्हांशी तिचा परिचय करून देणं.. हे सगळं आम्ही केलं. दोन वर्षांच्या या उद्योगानंतर अमृत स्थिरावली. मग लोक आवर्जून ती मागायला लागले आणि एकदा लंडनमध्ये ती रुळल्यानंतर युरोपनं फार आढेवेढे घेतले नाहीत. फार वेळ न घालवता तिला आपलं म्हटलं आणि मग तो क्षण आला.’’
युपीची गर्मी आणि सिंगल माल्टला मिळालेली आक्रमक चव
हरियाणातील इंद्री गाव, जिथे सकाळी अकरा वाजताही दुकानं उघडत नाहीत, तिथेच मास्टर डिस्टीलर सुरिंदर कुमार 200 बॉटल्सच्या पसाऱ्यात असतात. प्रत्येकात वेगवेगळा द्रव आहे, ते तो चाखतात. गेली तीस वर्षे ते हेच काम करत आहेत. हुंगण्याचं व चाखण्याचं. ‘इंद्री’ला जो फ्रुटी आणि स्मॉकीचा स्वाद येतो त्यामागे कुमारांचं नाकच आहे. पिकाडिलीत येण्यापूर्वी ते इंद्रीच्या अमृत डिस्टीलरीत कामाला होते. जी भारताची पहिली सिंगल माल्ट व्हिस्की होती. ते म्हणतात, “अमृतचा प्रत्येक थेंब सर्वांत आधी माझ्या नाकासमोरून जातो.” आपल्या या तीक्ष्ण नाकाची देणगी त्यांना कुटुंबाकडून मिळाल्याचं ते सांगतात. त्यांच्या वडीलांपाशीही मांजरीसारखं तिखट नाक होतं.
कुमारांना चांगली सिंगल माल्ट करण्यात रस नाही. “आम्ही फक्त वेगवेगळ्या पिंपातील द्रव घेतो, मिश्रण करतो आणि एक चांगली माल्ट तयार करतो.” भारतीय सिंगल माल्ट आणि स्कॉटीश व्हिस्कीमध्ये बरंच अंतर आहे. शिवाय वातावरणाचा परिणाम होतोच. उत्तर भारतात गर्मीमुळे द्रव पदार्थ तिप्पट वेगाने पातळ होतो आणि पिंपातून झरू लागतो. त्यामुळे त्याला एक बोल्ड, आक्रमक चव येते. पण बाष्पिकरणाचाही वेग जास्त असतो. बाष्पित भागाला ‘angel’s share’ समजलं जातं आणि राहिलेल्या भागाला ‘devil’s cut’ म्हणतात.
कुमार सांगतात, “सिंगल माल्ट एक पिरामिड आहे. यात तळाला चांगली चव असते. पण ही चव कशी टिकवायची हा यातला प्रधान प्रश्न असतो.” यात एक काठीण्य एक तिखटपणा आहे जो भारतीय आस्वादकांना आवडत नव्हता. आता भारतीय लोक प्रवास करतात, पितात, त्यामुळे त्यांचीही माहिती वाढली आहे, चव बदलली आहे, आणि व्हिस्कीच्या बारीकसारीक गोष्टी जाणण्यात त्यांना रस असतो.
देशात व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एसएमसीची सदस्यसंख्या 7 हजार आहे. वीस वर्षांपूर्वी ओबरॉय यांनी याची स्थापना केली तेव्हा इतके सदस्य होतील असं त्यांना वाटलं नव्हतं. ग्राहकांना आता एखाद्या ब्रँडशी जोडलेल्या गोष्टी, किस्से ऐकायलाही मजा व उत्सुकता वाटत आहे. गोवा स्थित ‘पॉल जॉन’ सिंगल माल्ट निर्माता, जॉन डिस्टिलरीजचे वैश्विक ब्रँड एंबेसडर, हिमांशु अशर सांगतात, “भारतीयांना आता जाणून घ्यायचं आहे, शिकायचं आहे, आणि नवे अनुभवही घ्यायचे आहेत.

ज्येष्ठांनाच सिंगल माल्ट आवडते हे आता खरं नाही. तरुणांमध्येही याची आवड निर्माण होत आहे.” पॉल जॉन विजिटर सेंटर कुनकोलिम मध्ये आहे. दक्षिण गोव्यातील ज्या पाच गावांनी 1583 मध्ये पोर्तुगिजांविरोधात लढा उभारला होता त्यापैकी हे एक गाव आहे. 400 रुपयात पर्यटक इथल्या मास्टर डिस्टीलरसोबत फिरू शकतात आणि वेगवेगळे नमुने चाखुही शकतात. पिकाडिली येथेही असंच एक केंद्र उभं राहतंय. इथं इंद्री तयार केली जाते. इथले मार्केटींग मॅनेजर अभिषेक हैरीसन म्हणतात, “आम्ही इथं अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. यात संगीताचे कार्यक्रम पण असू शकतात.” रामपूर जे कधीकाळी कापूस गिरण्या आणि साखर कारखान्यांसाठी ओळखलं जायचं, तिथं रेडिको खेतानकडे आधीपासूनच चव घेणारा एकनिष्ठ वर्ग तयार आहे. मालक आणि इथले कर्मचारी इथं टेस्टिंगचं काम करतात. इथं लोकांना प्रवेश नाही.
व्हिस्की, माल्टमध्ये देशभक्त ब्रँड
इंद्री, रामपुर सिग्नेचर रिजर्व आणि पॉल जॉनच्या आधी अमृत ही विदेशातील प्रसिद्ध भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की होती. 2004 मध्ये तिचं विदेशात लॉन्चिंग झालं. नंतर ती भारतात आली. पिकाडिलीची इंद्री मात्र आधी भारतात व नंतर विदेशात पाठवण्यात आली. त्यामुळे भारतीयांसाठी ती पहिली भारतात तयार झालेली सिंगल माल्ट समजली जाते. पहिल्या चार महिन्यात इंद्रीच्या 500 बॉटल्स विकल्या गेल्या. 2012-23 कालावधीत 18000 ची विक्री झाली. यात मोठी वाढ दिसून येत आहे.
भारतातील 19 राज्ये आणि विदेशातील 18 देशांमध्ये इंद्रीचा प्रवेश झाला आहे. सर्व प्रमुख देशात ती प्रामुख्याने दिसून येते. तिचं मार्केटींग चांगलं आहे. प्रत्येक बॉटल भारतीयतेची ओळख दाखवते. इंद्रीवर देवनागरी लिपीतला मजकूर आहे. पॉल जॉनवर हत्ती आहे तर रामपूरवर दोन तलवारी आहेत. जी खानदानी समृद्ध राजपूत वारसा दर्शवते. रेडिको खेतानचे आंतरराष्ट्रीय विक्री प्रमुख आदित्य बंगा सांगतात, “मागील सात वर्षांत भारताविषयीची विदेशी लोकांची धारणा बदलली आहे. आम्ही एक मेहनती आणि देशभक्त ब्रँड झालो आहोत.”
बेवरेज एनालिटिक्स फर्म IWSR च्या आकड्यांनुसार समजतं की 2021-22 मध्ये भारतीय सिंगल माल्ट विक्रीत 144 टक्के वाढ झाली. स्कॉचमध्ये 44 टक्के इतकीच. हॅरीसन सांगतात, “विदेशात आमच्या दारूला मागणी होती पण आमचा ब्रँड मात्र नव्हता. बाजारात पोहोच, ग्राहकांचा विश्वास आणि त्याचं कौतुक खूप महत्वाचं ठरतं.” वैशिष्ट्य आणि लिमिटेड एडीशन्स यात प्रभावी ठरतात. रामपूरच्या आठ पैकी फक्त दोनच चवी भारतात मिळतात. रेडिको खेतान आजवर बाहेर विक्री करत होते पण आता देशात लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांनी आता ‘आसव’ची निर्मिती सुरू केली आहे. 2023 मध्ये जॉन बार्लेकॉर्न अवार्ड्स मध्ये आसवला बेस्ट वर्ल्ड व्हिस्कीचा सन्मान मिळाला.

गोवा स्थित व्हिस्की विशेषज्ञ आणि आगामी व्हिस्की वर्कबुकची लेखिका पल्लवी नायडू म्हणते की, “ही दुहेरी गौरवाची गोष्ट आहे.” रेडिकोसाठी याचा अर्थ भारतात त्यांची मागणी तिप्पट होईल. बंगा म्हणतात, “आम्ही आधी रामपूरची विक्री विदेशांत निश्चित केली. आता भारतातही आम्ही उतरणार आहोत आणि रामपूर आसव लवकरच इथेही उपलब्ध होईल.” भारतातील उद्योगतज्ञ सांगतात की जागतिक पातळीवरचे सन्मान मिळाले तर त्याचा खूप फायदा होतो. एखादा ब्रँड स्विकारल्याची ती खूण असते. इंद्रीच्या दिवाळी कलेक्टर आवृत्तीने ऑगस्ट 2023 मध्ये सॅन फ्रांसिस्को येथील व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवार्ड्स मध्ये ‘बेस्ट इन शो’ पुरस्कार जिंकला होता. इथं अनेक जागतिक विख्यात ब्रँडसोबत त्यांचा सामना होता.
बंगा तो काळ आठवतात जेव्हा विदेशातील भारतीय फाईन-डायनिंग रेस्टाँरेंटमध्ये देण्यासाठी एखादी भारतीय दारू नव्हती. फक्त बियर होती. रामपूर आणि रेडिको खेतानच्या जिनमुळे ती उणीव दूर झाली. आता भारतीय प्रवासीही गर्वाने आपल्याजवळची अस्सल भारतीय लक्झरी ब्रँड्स दाखवू शकतात.
सिंगल माल्ट अशी तयार केली जाते
भारतीय सिंगल माल्टच्या मागे एक प्रक्रिया आहे. एकाच गाळणीतून तयार केलेली व्हिस्की याला इतर मिश्रीत व्हिस्कींपासून वेगळी करते. पण बाजार वाढू लागतो तसा कंपन्या सिंगल माल्ट तयार करताना नियमांचं पालन करत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा धोका वाढतो. कुमार म्हणतात, “मी रोज एक नवीन सिंगल माल्ट ब्रँड बघतो. नियमन संस्थांना यावर लक्ष ठेवण्याची आणि तपासनी करण्याची गरज आहे. अन्यथा यामुळे बाजारातील भारतीय सिंगल माल्टची पत घसरेल ज्यासाठी आजवर खूप मेहनत करण्यात आली आहे.” भारतात भेसळयुक्त दारू हे जुनं दुखणं आहे. देशात सर्वाधीक जास्त नकली दारू तयार केली जाते. भारतीय सिंगल माल्टचा बाजार विकसीत होत असतानाच अशा गोष्टींमुळे त्याला अडचणी येऊ शकतात.
पत्रकार बॉबी घोष यावर लिहितात, “ग्राहक आपल्या आवडीच्या ब्रँडसाठी अधिक पैसा द्यायला तयार असल्यामुळे नकल करणाऱ्यालाही प्रोत्साहन मिळत राहतं. भारतीय ब्रँड्स आता प्रिमीयम झाल्यामुळे त्यांची लवकरच नक्कल होण्याची शक्यता आहे.” असं असलं तरी इतरांनाही या बाजारात काम करण्यासाठी भरपूर इतर गोष्टी आहेत. बाजारतज्ञ सांगतात की सिंगल माल्टमध्ये एकनिष्ठा हा प्रकार नसतो. ग्राहक कायम नवीन चवीच्या शोधात फिरत असतात. अनेक चांगल्या चवीच्या दारू अद्याप दुर्लक्षित आहेत आणि तरुणाईला याची जाणीव आहे. आणि सध्याचे ब्रँड्स त्यांची गरज पूर्ण करू शकत नाहीत. यात पॉल जॉन ‘निर्वाणा’ एक स्वस्त आणि मजेशीर पर्याय मानला जातो.

रेडिको खेतानची रणथंबोर शाखा एका उद्दीष्टामागे चालत आहे ज्यात शाही टच असेल. लक्झरी पॅकेजींगसह वरती राजपूती ग्लॅमरसोबत सोन्याची कडा असलेला वाघ आहे. याच्यात एक अडचण आहे. रणथंबोर ही तरुणांसाठी एक स्वस्त, मिश्रीत व्हिस्की आहे. त्यांनी अजून एकही सिंगल माल्ट तयार केलेली नाही. नायडू म्हणतात, “आम्ही आता कुठे प्यायला शिकतोय. डार्क दारूसाठी ओल्ड मॉन्क स्टार्टींग पॉईंट असतो. रम ते व्हिस्की, कदाचित मिश्रीत व्हिस्की, मग इंटरनॅशनल ब्रँड आणि नंतर मागील पाच वर्षांपासून भारतीय सिंगल माल्ट असा हा प्रवास असतो.” बार आता वास्तविक आणि महत्त्वाकांक्षी अशा दोन्ही प्रकारच्या मद्यदर्दी लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकतो.
टुलीहोचे संस्थापक-सीईओ विक्रम अचंता आणि एमडब्ल्यू पत्रिकेचे संपादक राधाकृष्णन नायर यांनी भारतातील सर्वोत्तम 30 बार्सचं संघटन तयार केलं आहे, जे गोवा आणि अन्य मेट्रो शहरांत आहेत. इथे इंद्री, रामपूर, अमृत, पॉल जॉन दिली जाते. कुमारसारखे काही लोक आहेत जे चुकून या व्यवसायात आले आहेत. पण त्यांना ओळख मिळाली आणि आता ते भारतीय सिंगल माल्टचे निर्माते म्हणून नावाजले जातात. ते अजून यावर काम करत आहेत आणि त्यांना तेव्हाच समाधान मिळेल जेव्हा भारतीय सिंगल माल्टला स्कॉचप्रमाणे गांभीर्याने घेतलं जाईल.






