‘’गेली 50 वर्षे मलाही असेच वाटत राहिले आहे की माझा रंग काही फारसा चांगला नाही. खरंतर मला माझ्या रंगाचा अभिमान असायला हवा होता. कुणीतरी असा उल्लेख करणं याचं मला खरंतर वाईट वाटलं. एकतर मी हे पद स्वीकारल्यापासून माझी सतत माझ्या नवऱ्याशी तुलना होत आहे. त्याची मी सवय करून घेतली. पण आता त्या पलीकडे जाऊन माझ्या रंगावर चर्चा होते आहे. मी स्त्री आहे आणि काळी आहे, हा पदरही त्याला आहेच, म्हणजे माझा रंग काळा असणं हा माझा मोठा दोषच आहे. काळं असणं म्हणजे त्यांच्या लेखी काहीतरी वाईट, नकारात्मक, दुबळं वगैरे असंच समीकरण आहे.
‘पण काळा रंग वाईट असं का? काळा रंग विश्वाचे अनिवार्य सत्य आहे. काळा म्हणजे सर्व काही सामावून घेणारी शक्ती. ती सर्वात प्रभावी ऊर्जा आहे. काळा हा सर्वांना खुलणारा रंग आहे. मग तो का नको? मी चार वर्षांची असताना माझ्या आईला विचारले होते की मला पुन्हा पोटात ठेवून गोरी करून जन्माला घालशील का?
मी 50 वर्षांहून अधिक काळ असाच विचार करत जगले की माझा रंग सुंदर नाही. काळा रंग म्हणजे काहीतरी वाईट या सामाजिक समजुतीचाच भाग होऊन मी जगले. गोरेपणाकडे आकर्षित झाले. गोरा रंग, गोरे मन, आणि जे काही गोरे व चांगले आहे त्यालाच श्रेष्ठ मानत राहिले. आणि मी गोरी नाही, त्यामुळे माझ्यात काहीतरी कमी आहे, असं मला कायम वाटत राहिलं.
पण मला मुलं झाली आणि माझे हे विचार बदलले. माझी मुलं त्यांचा काळा रंग कमी लेखत नाहीत. त्यात मला दिसले नाही, ते सौंदर्य त्यांना दिसतं. त्यांनी मला शिकवलं की काळा हा एक केवळ सुंदरच नाही तर अप्रतिम रंग आहे. त्यांच्यामुळंच आज मला अभिमानाने म्हणता येतं – मला काळा रंग आवडतो. मला माझ्या रंगाचा अभिमान आहे.’’
‘’मला काळा रंग आवडतो. मला माझ्या रंगाचा अभिमान आहे.’’
केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांची ही फेसबुक पोस्ट कमालीची व्हायरल झालीये… ही पोस्ट त्यांना का लिहावीशी वाटली…? तर त्याचे उत्तर इथल्या सामाजिक व्यवस्थेत दडले आहे. आजही समाज व्यवस्थेत वर्ग, जाती यांच्या आधारावर रंग-रुपाचे अंदाज व सौंदर्याचे निकष ठरवले जातात आणि बॉडी शेमिंग केली जाते. लहानपणापासूनच आपल्या मनात एक विशिष्ट आकार, रंग-रुप यांनी मढलेल्या शरीराची ओळख करून देण्यात येते. आणि म्हणूनच उद्विग्न होऊन शारदा मुरलीधरन यांना अशी पोस्ट लिहावीशी वाटते…
शारदा मुरलीधरन यांनी अलीकडेच केरळ राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी मुख्य सचिव हे पद त्यांचे पती व्ही. वेणू सांभाळत होते. सप्टेंबर महिन्यात ते निवृत्त झाले आणि ही जबाबदारी केरळ सरकारने त्यांच्या पत्नी म्हणजे शारदा मुरलीधरन यांच्यावर सोपवली. पती-पत्नी दोघेही आयएएस अधिकारी किंवा एक आयएएस आणि एक आयपीएस अधिकारी असणं यात काही नवल नाही. असे अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळातात.
मात्र, केरळमध्ये काही महिन्यांपूर्वीआगळा वेगळा आणि अभूतपूर्व क्षण पाहायला मिळाला होता. केरळमध्ये पहिल्यांदाच आपल्या पतीच्या जागी मुख्य सचिवपदी पत्नी विराजमान झाली. केरळचे मुख्य सचिव डॉ.व्ही.वेणू हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे सोपवण्यात आली.
कोण आहेत शारदा मुरलीधरन?
शारदा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामाची त्यांचे पती आणि या पदावरील पुर्वासुरी व्ही. वेणू यांच्याशी नेहमीच तुलना केली जात असते. अशी तुलना करताना ‘त्यांच्या पतीचे काम जितके पांढरे होते, तितके त्यांचे काम काळे आहे,’ अशी टिप्पणी एकाने केली होती. या कॉमेंटमुळे शारदा दुखावल्या आणि त्यांनी सुरूवातीला फक्त चार ओळींची पोस्ट फेसबुकवर लिहिली, त्यात त्यांनी म्हंटलं होतं की, ’गेली 50 वर्षे मलाही असेच वाटत राहिले आहे की माझा रंग काही फारसा चांगला नाही. खरंतर मला माझ्या रंगाचा अभिमान असायला हवा होता.’’
ही पोस्ट लिहिल्यानंतर शारदा यांनी ती त्वरित डिलीट देखील केली, परंतू अशा विषयावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे काही हितचिंतकांनी शारदा यांना लक्षात आणून दिल्याने त्यांनी पुन्हा एक सविस्तर पोस्ट लिहीली जी आता व्हायरल होतेय… शारदा मुरलीधरन यांनी याआधी अनेक महत्वाच्या पदावर काम केलेलं आहे. यापूर्वी अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन आणि आर्थिक व्यवहार) म्हणून काम पाहिलं. आता राज्याच्या मुख्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे.
एखादी स्त्री आपल्या कतृत्वाने राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंत जाते आणि तिच्याबद्दल चर्चा काय होणार तर ती काळी आहे? तिच्या कामाबद्दल, कतृत्वाबद्दल आपण बोलणारच नाही? त्यामुळे शारदा मुरलीधन यांच्या काळ्या रंगावरच्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा करणे आवश्यक आहे. 
‘पण काळा रंग वाईट असं का?
टीव्ही, इंटरनेट, सिनेमा अशा विचारसरणीला समाजात आपल्याकडून आणखी घट्ट करतात. तरुणी आणि स्त्रियांना अनेकदा म्हटलं जातं, “..काळी-सावळी आहेस, सुंदर नाहीस, वजन किती वाढलंय तुझं, शरीरावक किती केस आहेत तुझ्या, चेहऱ्याला काही लावत का नाही तू..” अशा अस्वस्थ करणाऱ्या टोमण्यांना, बोलण्याला त्यांना सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीची वक्तव्ये आपल्या समाजात रुढ असलेल्या ब्राह्मणवादी पारंपरिक मानसिकतेकडे खुणावते ज्याच्या आधारे महिलांना त्यांना हिंसा, अपमान, ताणतणाव यांचा सामना करावा लागतो.
‘डार्क इज ब्यूटीफूल’
बॉलिवूडची चतुरस्त्र अभिनेत्री नंदिता दासच्या याच विषयावरच्या अभियानाबद्दल बोलणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी नंदिता दासने ‘डार्क इज ब्यूटीफूल’ ही मोहिम राबवली होती. या अभियानामध्ये नंदिता सहभागी झाल्यापासून त्यांना तरुण मुलीकडून लाखो ईमेल्स यायला लागले. ज्यामध्ये मुलींनी आपलं मन मोकळं केल होतं. ‘डार्क इज ब्यूटीफूल’ या मोहिमेंतर्गत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्याचा उद्देश असा होता…
1. युवतीच्या मते रंग आणि सौंदर्य विषयीच्या संकल्पना जाणून घेणे.
2. युवतीच्या मते रंग आणि सौंदर्य समानच आहे ह्या विषयीचे मत जाणून घेणे.
3. युवतीच्या मते रंग गोरा असेल तरच आपण सुंदर आहोत ह्या विषयीचे मत जाणून घेणे.
4. युवतीच्या मते रंग गोरा असेल तरच आपण कोणतेही काम आत्मविश्वासणे करू शकतो ह्या विषयीचे मत जाणून घेणे. 
या सर्वेक्षणातून आलेले शोध व निष्कर्ष असे होते…
1. एकूण युवतीपैकी 15-20 वयोगटातील (44%) उत्तरदाते होते (युवती). 21-26 वयोगटातील (39.5%) होते. 26-32 वयोगटातील (16.5%) युवती होत्या.
2. एकूण 200 युवतीपैकी 49% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे गोरा रंग होय. 51% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे आकर्षक शरीरयष्टी होय. 53% युवतींच्या मते सुंदर असणे म्हणजे ब्युटी विथ ब्रेन होय. 22.5% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे सुंदर डोळे होय. 26% उत्तरदात्याच्या मते सुंदर असणे म्हणजे सुंदर असणे म्हणजे सुंदर केस होय.
3. स्वत:च्या रंगाबद्दल युवतींना काय वाटते हे जाणून घेतले असता एकूण 200 युवतीपैकी 25% युवतींना त्याचा रंग गोरा वाटतो. 63.5% युवतींना त्यांचा रंग सावळा वाटतो. तर 11.5% युवतींना त्यांचा रंग काळा वाटतो.
4. एकूण 200 युवतींना त्यांच्या रंगाबद्दल काय वाटते हे जाणून घेतले असता 25% युवतींना छान वाटते. 37.5% युवतींना वाईट वाटते. तर 37.5% युवतींना अजून गोरे असायला पाहिजे होते असं वाटते.
5. एकूण 200 युवती स्वत:चा रंग बदलावा म्हणून कोणती क्रीम वापरतात हे जाणून घेतले असता 25% युवती फेयर अँड लव्हली क्रीम वापरतात. 10% युवती पॉंन्डस व्हाइट ब्यूटी क्रीम वापरतात. 12.5% युवती अॅमवे व्हाइट इसेन्स वापरतात. 11% युवती नेविया क्रीम क्रीम वापरतात. 17.5% युवती ओरिफ्लेयम व्हाइट क्रीम वापरतात. तर 24% युवती ऑले टोटल इफेक्ट क्रीम वापरतात.
6. एकूण 200 युवतीना एका महिन्यात गोरेपणाच्या क्रीमसाठी किती खर्च करतात हे जाणून घेतले असता 15.5% युवतीना रु. 100-200/- इतका खर्च येतो. 19.5% युवतीना रु 201-300/- खर्च येतो. 21.5% युवतीना रु. 301-400/- इतका खर्च येतो. 25.5% युवतीना रु. 401- ते 500/- इतका खर्च येतो. तर 18% युवतीना रु. 501 ते त्यापेक्षा अधिक खर्च येतो.
7. एकूण 200 युवतीना त्यांच्या असलेल्या रंगामुळे कधी काही त्रास झाला का हे जाणून घेतले असता 63.5% युवतीनी त्रास झाला असे मत व्यक्त केले तर 36.5% युवतीनी त्यांना कोणताही त्रास झाला नाही असे मत व्यक्त केले.
8. एकूण 127 युवतीपैकी एकूण 9.44% युवतीना ते शाळेत असताना त्याच्यासोबत भेदभाव झाला असे सांगितले. 28.34% युवतीना ते कॉलेजमध्ये मूल-मुली चिडवतात असे सांगितले. 26.77% युवतीना त्यांच्या रंगामुळे मित्र –मैत्रिणी नाहीत. 20.47% युवतीना त्यांचे शिक्षक भेदभाव करते असे वाटते. तर 14.96% युवतीना त्यांना कोणत्याही सामाजिक उपक्रमात भाग घेता येत नाही. असे मत व्यक्त केले.
9. एकूण 200 युवतीनी रंगामुळे होणाऱ्या भेदभावामुळे 28.5% युवतीना नाही म्हणून त्रास होत असे. 32% युवतींना जीव नकोसा वाटला तर 11.5% उत्तरदाते दुखी झाले अशा भावना व्यक्त केल्या.
10. एकूण 200 युवतीच्या मते सुंदर म्हणजे गोरे आणि गोरे म्हणजे सुंदर असणे याविषयीचे मत जाणून घेतले असता 62% युवतीनी होय असे मत व्यक्त केले तर 38% युवतींनी नाही असे मत व्यक्त केले.
शारदा मुरलीधरन यांच्या फेसबुक पोस्ट वरून आणि या सर्वेक्षणावरून तरी हेच सिद्ध होतयं की, मुळात आपल्या समाजातच गोरी त्वचा असणं म्हणजे सुंदर असणं हा विचार इतका खोलवर रुजलाय की तो पुसून काढायला अजून किती दशकं जातील सांगू शकत नाही.






