- अभिजीत तांगडे
- गेल्या काही वर्षांमध्ये केवळ राखणदारींच्या कामापुरतं मर्यादित न राहता कष्ट करण्याची तयारी आणि त्यासाठी हवी असलेली कौशल्य असल्यानं विविध क्षेत्रांमध्ये नेपाळी कामगारांची संख्या वाढली. कोकणातल्या आंबा व्यवसायामध्ये हेच झालं आहे.
- आंबा सिजनमध्ये 50 हजारपेक्षा नेपाळी नागरिक कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येतात.
- आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा नाईलाज आहे कारण त्यांना कोकणातील श्रीमंत आंबा शेती टिकवायची असेल तर या नेपाळी कामगारांशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्र हे भारतातील झपाट्याने विकसीत होणारे राज्य आहे. महाराष्ट्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. यामुळे फक्त भारतातील विविध राज्यांमधून नाही तर परदेशातूनही लोक रोजगारासाठी येतात. या प्रक्रियेत असाही एक देश आहे ज्या देशातील कामगारांना ना पासपोर्टची अट, ना व्हिसाची… फक्त व्होटर ID दाखवायचं आणि सीमा पार करायची… हे नागरीक देशाच्या कोणत्याही भागात न जाता थेट पोहचतात कोकणात, चार-चार महिने काम करतात, लाखो रुपये कमावतात आणि पुन्हा आपल्या देशात जातात. कोणत्या देशाचे आहेत हे कामगार आणि ते कोकणातच का काम करतात…?
कोकणात कामासाठी येणारे हे लोक भारताच्या शेजारचादेश असलेल्या नेपाळचे नागरीक आहेत. नेपाळी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नाही. व्होटर आयडी किंवा कोणतेही ग्राह्या ओळखपत्र दाखवून भारतात सहज प्रवेश मिळतो. याचं कारण आहे भारत आणि नेपाळमध्ये 1950 ला झालेला करार.
या कराराच्या विविध तरतुदींपैकी एक आहे की या देशाच्या नागरिकांना काम करण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही. इथल्या सीमा या 'पोरस' आहेत आणि त्यामुळे त्या ओलांडून कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एकेकाळी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेपाळी नागरिक वॉचमनचे काम करायचे. मुंबईत तर अनेक ठिकाणी आपल्याला नेपाळी वॉचमन पहायला मिळतात. भारतीय रुपयाचे नेपाळमध्ये मूल्य अधिक आहे. यामुळे अनेक नेपाळी रोजगारासाठी भारतात येतात.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये केवळ राखणदारींच्या कामापुरतं मर्यादित न राहता कष्ट करण्याची तयारी आणि त्यासाठी हवी असलेली कौशल्य असल्यानं विविध क्षेत्रांमध्ये नेपाळी कामगारांची संख्या वाढली. कोकणातल्या आंबा व्यवसायामध्ये हेच झालं आहे.
पूर्वी राखणदारीसाठी नेपाळी नागरिकच येतच होते. पण जशी कामाची गरज निर्माण झाली तशी आपल्या प्रांतातून, नातेवाईकांमधून, मित्रांमधून या प्रकारच्या नेटवर्कमधून येणाऱ्यांचा ओघ वाढत गेला. वर्षातून चार महिने 50 हजारपेक्षा जास्त नेपाळी नागरिक कोकणात येतात. आंबा सिजनमध्ये आंबा बागेत काम करण्यासाठी हे नेपाळी नागरिक कोकणात येतात.
फक्त वॉचमन म्हणूनच नाही तर मिळेल ते काम हे नेपाळी नागरिक करतात. यामुळेच या नेपाळी नागरिकांना कोकणात चांगलीच डिमांड आहे. आंबा सिजनमध्ये 50 हजारपेक्षा नेपाळी नागरिक कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येतात.
गावची लोकसंख्या 600, मात्र त्यातले 300 आहेत नेपाळी
या संदर्भात ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’चे संजय यादवराव म्हणतात की, एका नेपाळी कामगाराचा पगार सरासरी 15000 रुपये म्हणजे महिना 45 लाख आणि सहा महिन्यात दोन कोटी सत्तर लाख रुपये पगार नेपाळी देवगड मधल्या एका छोट्या गावातून घेऊन जातात.
असे फक्त देवगड, राजापूर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांमध्ये एक लाखाहून अधिक नेपाळी सहा महिने कोकणात येऊन राहतात ते आले नाहीत तर कोकणातील आंबा शेती बंद पडेल अशी आजची स्थिती आहे, कारण कोकणात राहिला माणसे नाहीत.दरमहा दीडशे कोटी म्हणजे जवळपास 900 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न कोकणातील या तीन तालुक्यातून नेपाळला जाते.
यादवराव या मागचे आर्थिक गणित स्पष्ट करताना सांगतात की, ही नेपाळी तरुणांवर टीका नाही, कोकणात येऊन ही मुलं प्रचंड परिश्रम करतात. बागांमध्ये राहतात, बागांची काळजी घेतात, खते घालतात, फवारण्या करतात, आंबे काढतात, पॅकिंग करतात आणि मग कोकणाबाहेरील दलाल हे आंबे विकतात. आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा नाईलाज आहे कारण त्यांना कोकणातील श्रीमंत आंबा शेती टिकवायची असेल तर या नेपाळी कामगारांशिवाय पर्याय नाही.

कोकणातील तरुण आता कोकणात राहत नाहीत. दहा टक्के तरुण सुद्धा कोकणात राहायला तयार नाहीत, ते सर्व मुंबई-पुण्यात येतात, यातले 80 टक्के बारा पंधरा हजार फार फार तर 20000 रुपयांची महिना नोकरी घेऊन कळवा किंवा दिवा डोंगरावर झोपडपट्टीमध्ये राहतात.
मग त्याची पत्नी छोटी मोठी काम करते मुलांची काळजी घ्यायला आई सुद्धा येते, सगळं कुटुंब मिळून ३०/४० हजार रुपये महिना कमावतो, कळवा दिवा नालासोपारा डोंगरावर झोपडपट्टी मध्ये भाड्याने खोली घेणं आणि कसेबसे आयुष्य घालवणे, शिमग्याला आणि गणपतीला चाकरमानी भाऊ म्हणून कोकणात जाणं ही कोकणची जीवनपद्धती झाली आहे .
हे तरुण दररोज जीवावर उदार होऊन कळवा ते सीएसटी आणि नालासोपारा ते चर्चगेट प्रवास करतात. आता तर कोकणातील माणसे वेगाने नालासोपारा वसई पालघरच्या दिशेने आणि कळवा दिवा बदलापूर कर्जतच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोकण रिकामे झाले आहे.
आंबा बागेत नेपाळी कामगारांना मोठी मागणी
कोकणातील गावं ओस पडली आहेत. कोकणातील सर्व तरुण मंडळी नोकरीसाठी मुंबईची वाट धरातात. यामुळे गावात शिल्लक राहिली आहेत ती फक्त वृद्ध माणसं. आंबा हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. साधारण जानेवारी फेब्रुवारीपासून आंब्याला मोहोर येतो. यामुळे जानेवारीपासून खऱ्या अर्थाने कोकणात आंबा सिजनची लगबग सुरु होते.
कोकणात हापुस आंब्याच्या बागांमध्ये हजारो नेपाळी नागरीक काम करतात. कोकणातील आंबा व्यवसाय देशातील कोट्यावधीची उलाढल करणारा व्यवसाय आहे. कोकणात हजारो आंबा बागायतदार आहेत. एक एकाच्या बागेत हजारो आंब्याची कलमं आहेत. कोकणात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. मात्र, आंबा बागेत काम करण्यासाठी माणूस मिळत नसल्याने कोकणी माणसाला नेपाळी माणसावर अंवलबून राहावे लागत आहे.
जानेवारी फेब्रुवारीपासून आंब्याला मोहोर यायला सुरुवात झाली की आंबा बागायतदारांसमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते बागेची माकडं तसेच जनावरांपसून राखण करणं. यामुळे सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळी अंधार पडेपर्यंत बागेत थांबून राखण करण्याची गरज असते. कोकणात राखणादारीसाठी माणूस मिळत नाही. यामुळे खास आंबा बागांची राखणदारी करण्याच्या कामासाठी नेपाळी नागरिक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येतात.
नेपाळी नागरीकांना कोकणी माणूस किती पगार देतो?
फेब्रुवारीपासून खरी लगबग सुरु होते. राखणादारीपासून ते फवारणी अशी सर्व कामं हे नागरीक करतात. हे नेपाळी राखणदारीसह आंबा काढणी, आंबा भरणी अशी अनेक कामं करतात. कोकणातील आंबा बागायतदार या नेपाळी नागरिकांना महिन्याला 10 ते 20 हजार रुपये पगार देतात.

आंबा सिजनमध्ये कोकणात राहून हे नेपाळी नागरिक 50 ते 80 हजार रुपयांची कमाई करतात. यांच्या राहण्याची व्यवस्था हे आंबा बागायतदारच करतात.जून महिन्यात आंबा सिजन संपेपर्यंत नेपाळी आंबा बागेत काम करतात. चार महिन्यात चांगली कमाई करुन हे नेपाली पुन्हा आपल्या देशात जातात.
पोलिसांची स्थानिक पातळीवर नोंदणी सुरू
भारतात येणारे बहुतांश स्थलांतरित नेपाळच्या सीमेलगतच्या तराई म्हणजे सपाटीच्या प्रदेशातले आहेत. कोकणात येणारे नेपाळी नागरिक हे मुख्यत्वे कैलाली या परिसरातले आहेत. एकेकाळी वेठबिगारीच्या विळख्यात अडकलेल्या या प्रदेशात आजही आर्थिक उत्पन्नाची साधनं कमी आहेत.
कैलाली हा नेपाळच्या उत्तरेकरच्या प्रदेशातला एक जिल्हा आहे. तो बहुआयामी गरीबी निर्देशांकात, म्हणजे शिक्षण, आरोग्य, उत्पन्न, याबाबत नेपाळमधला क्रमांक दोनचा गरीब प्रदेश आहे. इथून जे लोक स्थलांतर करतात ते आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातले आहेत. इथे थारोस ही मूलनिवासी जमात आहे. अगदी अलिकडे काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वेठबिगारीमध्येही ते अडकले होते. हे स्थलांतरही मुख्यत्वे त्यांच्या आर्थिक स्थितीशी जोडलेलं आहे.
‘बीबीसी’ने याच विषयावर सखोल रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. इतक्या मोठ्या संख्येने नेपाळी कामगार कोकणात येत असल्याने कायदा-सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालाय. नेमके किती नेपाळी नागरिक कोकणात आहेत?

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून हा आकडा 50 हजार ते 1 लाख असा बऱ्याचदा सांगितला जातो. पण आता पोलिसांनी स्थानिक पातळीवर नोंदणी सुरू केली आहे. त्याची कारणं अनेक आहे. काही अघटित घडलं तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या सगळ्या कामगारांची माहिती प्रशासनाकडे असायला हवी म्हणून आता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पातळीवर ही नोंदणी आवश्यक केली आहे.
नेपाळी कामगारांना कामावर ठेवणारे बागामालक आणि मत्स्य व्यावसायिक यांनी ही नोंदणी पोलिसांकडे करणं आवश्यक आहे. पण अद्यापही सगळ्यांची नोंदणी होत नसल्यानं एकूण निश्चित आकडा तिथेही नाही.
"या नेपाळी नागरिकांची काहीही माहिती आपल्याकडे नसल्यानं आम्ही एक 'मैत्री' नावाचं अॅप तयार केलं आहे आणि त्यात नाव, मूळ गांव, तिथला संपर्क क्रमांक, पत्ता, कोणामार्फत इथे आले, कुठे काम करतात अशी वैयक्तिक माहिती भरणं अपेक्षित आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये 5590 जणांची नोंद झाली आहे. परंतु हा आकडा निश्चित कमी आहे. आमचा असा अंदाज आहे की पंधरा हजारांहून अधिक नेपाळी नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात काम करतात,"
अशी माहिती रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी 'बीबीसी'शी बोलताना दिली आहे.






