(विकास कुमार)
महाकुंभ 2025 समाप्त झाला... त्याच्या यशाच्या कहाण्या सांगितल्या जात आहेत. अगदी उत्तरप्रदेश विधानसभेपासून संसदेपर्यंत आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळेच या महाकुंभाचे गुणगान गात आहेत. पण याच यशस्वी कहाण्यांमध्ये आणखीदेखील कहाण्या आहेत ज्या लोकांपर्यंत, प्रशासनापर्यंत आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहचत नाहीयेत.
आईच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी तो 15 दिवसांपासून भटकतोय…
त्या मुलाची कहाणीही ऐकायला पाहिजे जो 15 दिवसांपासून प्रयागराज मध्ये वणवण फिरतोय. त्याला सिद्ध करायचं आहे की त्याची आई 29 जानेवारीच्या चेंगराचेंगरीत झुंसी नाही तर संगम नोजवर निधन पावली होती. कुंभमेळ्याची अजय सिंहचीदेखील एक कहाणी आहे, त्याला चिंता आहे की सरकार त्याला त्याच्या वडिलांचा मृत्यू दाखला देईल की नाही याची. कारण नुकसान भरपाई नसली तरीही दाखल्याच्या आधारे त्याला त्यांच्या बँकेतून विम्याचे दोन लाख रुपये मिळू शकतात. बिहारच्या मंटू कुमारला माहितीच नाही की त्याची आई द्रौपदी देवी जीवंत आहे की मेली आहे? 
आई संगम नोजच्या चेंगराचेंगरीत केली तरी तिचा मृत्यू झुंसीत झाल्याचे का सांगतात?
मुख्यमंत्री आदित्यनाथ विधानसभेत म्हणाले की, मृतकांच्या घरच्यांची इच्छा होती त्यामुळे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं नाही. पण मृतकांच्या घरचे काही वेगळंच सांगतात. 29 जानेवारीला रत्नेश मिश्रा याची आई कला यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घरी पाठवते वेळी सांगण्यात आलं की आठवड्यात त्यांना मृत्यू प्रमाणपत्र मिळून जाईल. पण महिना उलटल्यावरही काही झालं नाही म्हणून रत्नेश प्रयागराजला आला. हॉस्पिटल, डॉक्टर, अधिकाऱ्यांना भेटत राहिला पण काही झालं नाही. ‘द क्विंट’शी बोलताना तो म्हणतो की त्याची आशा आता नाहीशी होत आहे.
सगळेच अधिकारी त्याला इकडे-तिकडे पाठवत आहेत, पण मृत्यूचा दाखला कुठेच भेटत नाही. अधिकारी म्हणतात की, कला देवीचा मृत्यू झुंसीला झाला तर रत्नेश म्हणतोय की आईचा मृत्यू संगम नोजवर झालाय. त्यावेळी आईसोबत असलेले लोक साक्ष द्यायला तयार आहेत पण अधिकारी काही एक ऐकायला तयारच नाहीत. चेंगराचेंगरीच्या वेळी कला देवीसोबत त्यांची बहिण होती. बहिणीचा हात सुटला तो नंतर मिळालाच नाही. रत्नेशला हे समजत नाहीये की आईचा मृत्यू संगम नोज इथे झालाय तर अधिकारी झुंसीचं नाव का घेत आहेत?
याच प्रश्नावर ‘द क्विंट’ने ऑफिस सुपरिटेंडेंट डॉक्टर अश्वनी यादव यांना उत्तर मागितलं. ते म्हणाले की त्यांनी 30-32 मृत्यूचे दाखले दिले आहेत. लोकांना काही गैरसमज होत आहे. आमच्याकडे हॉस्पिटलचे रेकॉर्ड आहेत. पण लोकांना वाटतंय की काही नुकसान भरपाई मिळावी, म्हणून त्यांना मृत्यू संगम नोजवर झालेला हवा आहे.
मृत्यूचा दाखला जोवर नाही तोवर विम्याचे पैसेदेखील नाही
रत्नेश मिश्रा प्रमाणे अजय सिंहही काळजीत आहे. 29 जानेवारीला त्याचे वडील दया शंकर सिंह यांचा मृत्यू झाला होता. तो मृत्यूच्या दाखल्यासाठी प्रयागराजला गेला. त्याला सांगण्यात आलं की, महाकुंभ संपल्यानंतर ते मिळेल. 11 मार्च उलटल्यावरही त्याला दाखला मिळालेला नाही. वडिलांचं शव ज्यात गुंडाळलं होतं त्या कापडावर ५७ हा आकडा लिहिलेला होता. वडिलांचा विमा होता पण मृत्यूचा दाखला नसल्यानं तो मिळणं कठीण आहे. सरकारी नुकसान भरपाईविषयी सरकारी अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. 
गोरखपूरचे सिकंदर निषादही मृत्यू दाखला आणि नुकसान भरपाईसाठी वाट बघत आहेत. त्यांची आई नगीना देवी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अधिकाऱ्यांनी भरपाईविषयी आश्वासन दिलं होतं. घरी डीएम साहेब व संसद प्रतिनिधीही आले होते. संसद सदस्य रवि किशन यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. पण त्यानंतर काहीही झालं नाही.
सिकंदर सांगतात, “भरपाई राहू द्याच, दाखलाही मिळालेलं नाही. 29 जानेवारीला झुंसीच्या सेक्टर नंबर 18 इथे सकाळी 8 वाजता चेंगराचेंगरी झाली होती. आई आंघोळ करून येत होती. तेव्हा कल्पवृक्ष दाराजवळ ही घटना घडली. मी 16 फेब्रुवारीला दाखल्यासाठी प्रयागराजच्या कँपला गेलो तेव्हा तिथं लोकल डॉक्टर उपस्थित होते. ते म्हणाले की अशी काही दुर्घटना घडलीच नाही. मी रागानं त्यांना विचारलं की असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, दाखला मिळून जाईल.”
नुकसान भरपाईवरून युपी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
नुकसान भरपाई कोणाला मिळणार यावरून मोठा प्रश्न आहे. संगम नोज, झुंसी तसेच इतर भागातही चेंगराचेंगरीत लोक मारले गेले. पण कुंभ अधिकारी विजय आनंद यांनी सांगितलं की समिती स्थापन करण्यात आली आहे. मृत्यूच्या कारणांची तपासणी केली जात आहे. त्याच्या आधारेच पुढची कारवाई केली जाणार आहे.
जर मृत्युचं कारण स्टँपेड (चेंगराचेंगरी) असेल तर झुंसीच्या मृतकांच्या कुटुंबियांनाही नुकसान भरपाई दिली जाईल. पण मृत्यू नैसर्गिक कारणानं झाला असेल तर मिळणार नाही. झुंसी विषयी आनंद सांगतात, “झुंसी इथं काय घडलं ते एसआयटी अहवालातून पुढे येईलच. अजून असे पुरावे मिळाले नाहीत की तिथं चेंगराचेंगरी झाली होती. संगम नोज इथे तसं झालं होतं. त्याची प्रमाणपत्रं लोकांना देण्यात आली. नुकसान भरपाईही देण्यात आली.”
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणतात पोस्टमॉर्टेम न करण्याची कुटुंबियांचीच इच्छा होती
युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ विधानसभेत म्हणाले होते, “संगम नोजवर 30 भक्तांचा मृत्यू झाला. जो इथं येतो त्याची एक परंपरा असते. लोकांची एक श्रद्धा असते. लोकांची काही मान्यता असते. अनेकांनी म्हटलं की साहेब, पोस्टमॉर्टेम करू नका. घटना घडलेली आहे. आम्हाला केवळ पंचनामा करून द्या. यात कुटुंबियांची सहमती होती. जे काही झालं ते मॅजिस्ट्रेट समोर झालं, प्रशासनासमोर झालं, कुटुंबियांच्या समोर झालं.” 
पण कुटुंबियांचं म्हणणं काही वेगळं आहे. रत्नेश मिश्रा व अजय सिंह यांचा आरोप आहे की मृतदेह ताब्यात घेताना, जेव्हा त्यांनी पोस्टमॉर्टेमचा उल्लेख केला तर अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला. अजय सिंह सांगतात, “29 जानेवारीच्या चेंगराचेंगरीत माझे वडील मारले गेले. मी मृतदेह घ्यायला गेलो तेव्हा पोस्टमॉर्टम करायला तिथल्या अधिकाऱ्यांना म्हटलं. ते म्हणाले की असा कोणताही आदेश मिळालेला नाही. तुम्ही डेड बॉडी घेऊन जा. आम्ही पंचनामा करतोय. पंचनामा झाल्यावर त्यांनी डेड बॉडी आम्हाला दिली.”
मंटू कुमारची आई 19 दिवसांपासून ‘लापता’ आहे…
महाकुंभ इथे अनेक लोक हरवलेही आहेत. महाकुंभ इथे ‘हरवले-सापडले’ केंद्रात आपल्या लोकांना शोधण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती तिथं आता सन्नाटा पसरला आहे. पण तिथल्या भिंतीवर लागलेली पोस्टर्स साक्ष देत आहेत की अनेक लोक आपल्या नातेवाईकांची घरी परतण्याची वाट बघत आहेत. काही पोस्टर्सवर बक्षिस देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. खाली फोन नंबर्स दिलेले आहेत. यापैकी एक आहेत बिहारचे मंटू कुमार, ज्यांची आई द्रौपदी देवी 14 फेब्रुवारीला हरवली होती. त्यांनी केंद्रात त्याची माहिती दिली पण काही झालं नाही. एफआयआरही नोंदवण्यात आली नाही. 20 दिवस त्यांनी स्वतःच शोध घेतला. पोस्टर लावले. त्यांना अजून माहिती नाही की त्यांची आई जीवंत आहे की मृत आहे ते. 
युपी सरकारनेही हरवलेल्या लोकांची छायाचित्रं जाहिर केली. त्यांची संख्या 25 ते 28 इतकी आहे. पण नक्की किती लोक हरवले याची माहिती मिळालेली नाही. विजय आनंद सांगतात की डिजीटल लॉस्ट अँड फाऊंड डाटा आम्ही लोकांना दिलेला आहे. “ज्या लोकांनी तक्रार केली होती त्या सर्वांचे टिकेट्स क्लोज झाले आहेत. कोणी हरवले असेल तर त्याची माहिती आम्ही डिस्पले करतो की ते मिळावेत. हा काही पूर्ण डाटा नाही. फक्त माहिती आहे. आम्ही कधी पूर्ण माहिती देण्याचा दावा केलेला नाही. जे मिळत नाही त्यांची फक्त माहिती आम्ही इथं देतो. नक्की किती लोक महाकुंभ इथे हरवले आणि त्यापैकी किती सापडले याची माहिती पब्लिक डोमेनकडे नाही.”
18 मार्च पर्यंत मिश्रा, सिंह आणि निषाद यांना मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात. महाकुंभमध्ये कोण चेंगराचेंगरीत मेलं आणि कोण नैसर्गिकपणे मेलं हे कसं समजणार? जर घटना घडली तेव्हा पोस्टमॉर्टेम करण्यात आलं नाही तर मग ‘कॉज ऑफ डेथ’ कसं कळणार? हे समजून चालायचं का की झुंसीत जे लोक मेले ते नैसर्गिक कारणांनी मेले, चेंगराचेंगरीत मेले नाहीत? जर याचं उत्तर होय असं आहे तर रत्नेश मिश्रा, सिंह आणि निषाद यांच्या मृत नातवाईकांच्या मृतदेहाचे फोटोही एकदा बघा आणि सांगा की ते नैसर्गिक कारणाने मेलेले दिसतात का? यांच्याशिवाय मंटू कुमार सारखे अनेक लोक आहेत ज्यांचे नातलग हरवले आहेत, अजून त्यांचा शोध सुरूच आहे. ज्यांना आशा आहे आणि प्रतिक्षा आहे. आशा आहे की त्याची आई जीवंत असेल आणि प्रतिक्षा आहे की ती कधीतरी घरी परत येईल याची.
(सौजन्य - द क्विंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






