महाराष्ट्र राज्य लॉटरी... यश आज नाही तर उद्या…' आणि 'नशिबाला संधीची आवश्यकता असते…' गेल्या साडेपाच दशकांपासून ही जाहिरात महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक घराघरात पोहचलेली आहे. ही जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीची…अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके करोडो लोकांनी या लॉटरीची तिकिटे काढली असतील. अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके करोडो लोकांनी या लॉटरीची तिकिटे काढली. काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली.
मात्र आता यापुढे या लॉटरीत सहभागी होता येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार अशा बातम्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत, अलीकडच्या काळात तर अधिकच… तसे झाले तर या निर्णयामुळे 20 हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे आणि म्हणून लॉटरी बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवला जातोय.
गेल्या 30 ते 40 वर्षांपासून विक्रेते लॉटरी विक्री करत आहेत. इतकी वर्षे याच लॉटरी विक्रीच्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचं पालन पोषण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट विक्रीतून साधारण 15 टक्के इन्सेंटिव्ह शासनाच्या वतीने या विक्रेत्यांना मिळतो. मात्र, आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार असल्यानं त्यांचे उत्पन्न देखील कमी होईल. काहींचं उत्पन्न तर पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे हे सर्व विक्रेते चिंतेत आहेत.
अधिवेशनात लॉटरीचा मुद्दा गाजला
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी महाराष्ट्र राज्य लॉटरी या विषयावर सभागृहात चर्चादेखील झाली. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. महाराष्ट्र राज्य लॉटरी नियमितपणे सुरू आहे, असे लेखी उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेते चिंतेत आहेत. त्याचा फटका 20 हजारांहून जास्त मराठी कुटुंबांना बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्यास तो रद्द करावा, अशी मागणी सदस्य सुनील शिंदे यांनी केली होती.
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या हालचाली वारंवार का सुरू असतात?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जरी लॉटरी व्यवसाय बंद करणार नाही अशी ग्वाही दिली असली तरी लॉटरी विक्रेत्यांवार टांगती तलवार सतत असणारच आहे. कारण सरकारच्या मते हा धंदा तोट्यात सुरू आहे. विक्रेत्यांना कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर 28 टक्के जीएसटी राज्य सरकारला भरावा लागतो. मोठा आस्थापना खर्चही येतो. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव सरकार वेळोवेळी मांडत असते. दुसरीकडे लॉटरी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे की लॉटरीची तिकिटे इतर राज्यांमध्ये विकण्यास अनुमती दिली तर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू ठेवायची तर तिच्यापासूनचे उत्पन्न कसे वाढविता येईल, याचा अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी करण्यासाठी माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात येणार आहे. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. 2023-24 मध्ये तीन कोटी रुपयांहून अधिकचा तोटा झाला होता.
लॉटरी बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली होती. केरळमधील राज्य लॉटरी मोठ्या नफ्यात आहे. तेथील तसेच काही राज्यांमधील सरकारी लॉटऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आमदारांची एक समिती दौरा करील. लॉटरी अधिक व्यवहार्य करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सरकारला अहवाल देईल.
महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात का झाली होती?
महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून होणारी जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी, राज्याच्या वित्त विभागानं या लॉटरीची सुरुवात केली होती. ही राज्य संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठं बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्नं साकार करण्याची संधी देते.
लॉटरी विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषी क्षेत्र आदींसाठी होतो, असं महाराष्ट्र लॉटरी विभागाच्या वतीनं सांगण्यात येतं. त्याचप्रमाणं लॉटरीची विक्री करणं हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झाला आहे, असंही लॉटरी विभाग सांगतो.
लॉटरीची सोडत कशी असते?
महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आजपर्यंत अनेक विजेत्यांचे जीवन आनंदी केले आहे. गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि 5 व्यक्ती कोट्यधीश झाल्या आहेत. प्रत्येक सोडत जाहीरपणे पंच मंडळासमोर होते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. यातून सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आपलं ब्रिदवाक्य 'गौरवशाली आणि विश्वासार्ह' सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. प्रत्येक आठवड्यात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्य सोडती असतात. यामध्ये प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होतात.
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. 20 हजार लॉटरी विक्रेत्यांवर त्यामुळे गदा येणार आहे. सरकारने दर हा निर्णय घेतला तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेच्यावतीने विलास सातार्डेकर म्हणतात की, आकर्षक जाहिराती, अद्ययावत प्रचार यंत्रणा, सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरस्कार, बक्षिसे, परराज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीसाठी प्रयत्न, असे काही उपाय केल्यास लॉटरीची विक्री वाढू शकते. मात्र, शासन त्याऐवजी लॉटरी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, तर विक्रेते सहकारी तत्त्वावर लॉटरी चालविण्यास तयार आहेत. बंद करण्यापेक्षा विक्रेतेच संचालकांच्या भूमिकेत शिरतील. त्यासाठी 'एक पर्याय' उपलब्ध आहे.विक्रेत्यांना विश्वासात घेऊन सरकारनं उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घ्यावी.
महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणतात की, "सरकारकडे अनेक योजनांवर वायफळ खर्च करण्यासाठी पैसा आहे. मात्र हेच सरकार महसूल मिळवून देणारी लॉटरी योजना बंद करायचा विचार करत आहे. 1995 लाही अशाचप्रकारे सरकार लॉटरी योजना बंद करण्याचा विचार करत होतं. सरकारला लॉटरी जुगार वाटतो, मात्र हा आमचा रोजगार आहे. यावर हजारो लोक अवलंबून आहेत. त्यामुळे लॉटरी बंद करू नये, अन्यथा आम्ही याला तीव्र विरोध करू."






