लिओनार्दोची कलाक्षेत्रातील कामगिरी इतक्या वैविध्याने भरलेली आहे, की थोडक्यात परिचय अशक्य आहे. तैलरंगातील त्याच्या चित्रांनी तो अजरामर झाला आहे. 'दा विंची कोड' या गाजलेल्या पुस्तकाने जणू त्याला नव्या पिढीसाठी पुन्हा नव्याने जगासमोर आणले. मोनालिसा हे त्याचे सर्वांत गाजलेले चित्र. या चित्रावर त्याने तीन वर्षे काम केले आहे. एका बाजूला मोनालिसासारखे चित्र, तर दुसऱ्या बाजूला 'महाप्रलय' या विषयावर केलेली रेखाटने जवळजवळ अमूर्त चित्राच्या जवळ जाणारी आहेत.
धावत्या, वळणदार, गोलाकार रेषांचा उपयोग करून, त्याने वादळ साकार केले आहे. हे वादळ त्याच्या मनातले होते का? या चित्ररचना सर्वस्वी वेगळ्या आहेत. सिल्व्हर पॉइंट, म्हणजे चांदीच्या तारेचा तुकडा वापरून त्याने चित्र केली. पेन किंवा बोरू आणि शाई हे त्याचे आवडते माध्यम होते.
लिओनार्दो द विंचीच्या मृत्यूला 506 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2 मे 1519 या दिवशी त्याने जगाचा निरोप घेतला. अलीकडे लिओनार्दोवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. अनेक निरीक्षणे संशोधक नोंदवीत आहेत. नव्या संशोधनाप्रमाणे तो डाव्या हाताबरोबर उजव्या हाताचाही वापर चित्रनिर्मितीसाठी करू शकत असे. या गुणाला आपण सव्यसाची असे संबोधतो. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आणि शास्त्रीय संशोधन या बरोबरीनेच साध्यासुध्या गोष्टींमध्येही त्याला रस होता. नाटकासाठी कपडेपट, नेपथ्य इत्यादी तो करीत असे. ल्यूट नावाचे तंतुवाद्य तो उत्तम वाजवत असे. घोड्याची कवटी आणि एडक्याची शिंगे वापरून त्याने एक आगळे ल्यूट तयार केले होते. इतिहासकारांनी त्याला प्रबोधन काळाचा प्रतिनिधी मानले आहे.
आपल्याकडे गावाचे नाव आडनाव म्हणून वापरले जाते, तसेच लिओनार्दोचे जन्मगाव विंची (फ्लॉरेन्सपासून तीन मैलांवर असलेले) हे त्याच्या नावाला चिकटले आहे. हा एका तरुण वकीलाला आणि एका गरीब खेडूत बाईला झालेला विवाहबाह्य मुलगा. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे लॅटिन, गणित आणि लिहिणे-वाचणे याचे पाठ त्याने घेतले. लिओनार्दोने त्या पुढे जाऊन काही कौशल्ये दाखविली. एका लाकडी फळीवर त्याने काढलेले चित्र त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांची खात्री पटली. तो पंधरा वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला फ्लॉरेन्समधील ख्यातनाम चित्रकार व्हेरोक्कीओ याच्या स्टुडिओत शिक्षणासाठी पाठवले. 
लिओनार्दोचे चित्र कांकणभर सरस असल्यामुळे त्याच्या गुरूने कुंचला सोडला
लिओनार्दोचे काम त्याच्या गुरूपेक्षा काकणभर उजवे झाल्यावर मात्र, गुरूने पुन्हा कुंचला हाती धरला नाही, असे म्हटले जाते. लिओनार्दोने आर्नो नदीच्या खोऱ्यात फक्त निसर्गाची चित्रे केली. स्वतंत्र निसर्गचित्रे करणारा तो युरोपातील पहिला चित्रकार ठरला. पुढील दशकात त्याच्या हातून बऱ्याच कलाकृती घडल्या. फ्लोरेन्सऐवजी त्याने मिलानच्या राजाच्या दरबारात चित्रकार म्हणून नोकरी स्वीकारली. पुढे त्याने 'मॅडोना ऑन दि रॉक्स' हे प्रसिद्ध चित्र रंगविले. हे चित्र कला जगतात रचनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. अजरामर झालेले 'लास्ट सपर' हे चित्र याच काळात त्याने मिलानमध्ये पूर्ण केले. ख्रिश्चन धर्मात या अंतिम भोजनाच्या प्रसंगाला विशेष महत्त्व आहे.
'दा विंची कोड'मुळे जगविख्यात ठरले
'दा विंची कोड' या पुस्तकामुळे ते पुन्हा परिचित झाले. रेम्पेरा माध्यमात असलेले हे चित्र महत्त्वाचे मानले गेले आहे. याच बरोबरीने तो राजघराण्यातील व्यक्तीचित्रे करीत असे. मिलानच्या वास्तव्यात त्याला राजघराण्याकडून नियमित वेतन मिळाले. मन:स्वास्थ्य लाभले. त्याची सुप्रसिद्ध असलेली अभ्यास टिपणे लिहायला त्याने याच काळात सुरुवात केली. एअर स्क्रू, फ्लाइंग मशीन, पॅराशूट अशा कितीतरी नव्या कल्पना त्याने मांडल्या.
पुढे त्याच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. सीझर बोर्जिया या जुलमी सत्ताधीशाकडे त्याने लष्करी अभियंता म्हणून नोकरी धरली. याच काळात त्याने मोनालिसासारखी कलाकृती निर्माण केली. लिओनार्दोचे दोन प्रमुख शिष्य होते मेल्झी आणि सलाय. या दोघांबरोबर त्याने शरीरशास्त्र अभ्यासले. शवविच्छेदन करून मानवी शरीराची रेखाटने केली. ती महत्त्वपूर्ण मानली गेली आहेत. इतकेच काय; पण या चित्रकाराने वाहत्या पाण्यात असलेल्या जलशक्तीचाही अभ्यास केला होता.
राजकीय घडामोडींचा कलाकार व कलातत्वांवर परिणाम होत असतो. मिलानमध्ये सत्तापालट झाली आणि नव्या राजवटीने या चित्रकाराची दखल घेतली नाही. शिष्य मेल्झीच्या आश्रयाने तो राहिला. पुढे रोमच्या पोपच्या भावाने आश्रय देऊन, काही कलाकृतींचे काम दिले; परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. या परिस्थिती लिओनार्दोने स्वत:ला वनस्पतींच्या अभ्यासात गुंतवून टाकले. आत्मचित्र केले. ते बहुधा त्याच्या मोजक्याच आत्मचित्रांपैकी एक मानले जाते.
1517 साली फ्रान्सच्या राजाच्या आमंत्रणावरून तो फ्रान्सला गेला. त्याला उत्तम पैसे देण्यात आले. राहण्याची सोय करण्यात आली. जबाबदारी एकच होती, त्याने राजाबरोबर निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारायच्या. रेखाचित्रे चालू होती. त्याने आपले मृत्यूपत्र मृत्यूपूर्वी दहा दिवस आधी करून ठेवले होते. पाच हजार पानांचे लिखाण, टीपा आणि तीन चित्रे त्याने शिष्य मेल्झीवर सोपविली.
मोनालिसा… एक अजरामर कलाकृती
लिओनार्दो द विंची या प्रसिद्ध चित्रकाराची एक अजरामर कलाकृती, " मोनालिसा" ! इ. स. 1503 ते 1519 म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत हे चित्र लिओनार्दो काढत होता. 16 वर्ष… आणि तरीही त्याला ते पूर्ण झालेय असे वाटत नव्हते. आज या चित्राभोवती अनेक गोष्टींचे गूढ वलय आहे. अनेकांना ते अनमोल आणि एकमेवाद्वितीय वाटते. तर काहींना हे चित्र म्हणजे उगाचच महत्व दिलेले वाटते.
कारण हे चित्र तत्कालीन इतर चित्रांच्या तुलनेत अगदीच छोटे आहे. जेमतेम 21*30 इंच. त्यातून त्यात वापरलेले रंग अनाकर्षक, तपकिरी, काळपट रंगात रंगवलेले आहे. त्यातून मोनालिसाचा पोशाख, केशरचना वा दागदागिने यांत काहीच प्रभाव पाडणारे असे नाही. पार्श्वभूमी देखील स्पष्ट नसलेली, नीट डोळ्यात भरेल अशी नाही.
तरीही मोनालिसा या चित्राला इतके मानले जाते?
एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या बायकोचे - लिसा डेल जिओकोंडा हिचे हे पोर्ट्रेट. हे चित्र खरं तर पोर्ट्रेट काढलं गेलं ते एका लाकडावर. सर्वसाधारणात: कॅनव्हासवर चित्र काढली जातात हे आपल्याला माहीत असते. पण हे चित्र लाकडावर काढले आहे. सर्व प्रथम या लाकडावर पांढरा रंग दिला गेला. हा पांढरा रंग वरच्या सर्व रंगांमधून प्रकाशाचे किरण परावर्तित करत असतो. सर्वसाधारणत: यावर चित्राची संपूर्ण रूपरेखा आखली जाते. अन् त्यानुरूप चित्र रंगवले जाते. लिओनार्दोचे वेगळेपण इथून सुरु होते. त्याने आपल्या चित्रांच्या रूपरेखा स्टेन्सिल सारख्या पद्धतीने केवळ काही टिंबांनी आखून घेतली. अन जसजसा तो चित्र काढत गेला तस तसा तो चित्राचे तपशील ठरवत, रेखत गेला.
तसेच कोणत्याही रंगाचा एकच एक थर देण्याऐवजी त्याने अनेक पातळ अन् हलके, फिके थर देणे पसंत केले. याच मुळे मोनालिसा चित्रात एकावर एक असे किमान 30 थर आहेत. अन प्रत्येक थर इतका पातळ आहे की या सर्व 30 थरांची एकत्रित जाडी मानवी केसाच्या अर्ध्याहूनही कमी आहे. अतिशय पातळ (डायल्युट) रंग, अन अनेक थर यातून लिओनार्दो अशी काही जादू करतो कि आपल्या समोरचे चित्र चित्र न राहाता प्रत्यक्ष वास्तवासारखे उभे राहाते. यामुळे मोनालिसा आपल्याला वास्तव वाटू लागते.
रंगाचा अजून एक खेळ लिओनार्दो खेळतो. तो म्हणजे एकाच रंगाच्या विविध छटांचा वापर अतिशय कल्पकतेने तो करतो. एकाच रंगाच्या फिक्या, मध्यम, गडद अशा विविध छटांच्या वापरातून चित्राला तो बेमालूमपणे खोली (डेफ्त) देतो. एकाच वेळी एक, दोन, चार, सहा पातळ्यांवर चित्र उमटते.
समोर असणारी मोनालिसा मागचा रस्ता, नदी, पूल, डोंगर, ढग सगळे आपापल्या प्रतलावर एका मागे एक उभे असल्याचा आभास लिओनार्दो उभा करतो. इतकेच नव्हे तर मोनालीसाचे वर आलेले गाल, तळहाताच्या वरच्या बाजूचा उंचवटा, हनुवटी आणि त्या मागची मान, माने मागचे केस, कपाळावरची अतिशय झिरझिरीत ओढणी या सर्वांना तो केवळ एकाच रंगाच्या विविध छटांचा वापर करून रंगवतो. मोनालिसाची त्वचाही तो अशीच जीवंत करतो. फिकी छटा वापरून गाल वर आणतो. तर गडद छटा वापरून मानेचा भाग मागे सारतो. त्वचेबाबत आणखीन एक तपशील.
एक अतिशय पातळ, हिरव्या रंगाचा थर त्याने वापरला आहे. खरे पहाता हिरवा रंग निसर्गात सगळी कडे दिसतो; पण माणसात नाही असे म्हटले जाते. पण जर नीट बघतलेत तर आपल्या त्वचेखाली असलेल्या निळ्या धमन्यामुळे एक हिरवट छटा आपल्या त्वचेला असते. पण हे आजही अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पण लिओनार्दोने मानवी शरीराचा इतका खोलात जाऊन अभ्यास केला होता की त्वचेचे हे तपशील त्यांच्या नजरेतून अजिबात सुटले नाहीत. अन म्हणून त्याची चित्र जास्त जास्त वास्तव वाटत आली आहेत. मोनालिसाही त्याला अपवाद नाही.
मोनालिसाचे हास्य ही एक अशीच गूढ गोष्ट !
पहिल्यांदा पूर्ण चित्र बघताना, मोनालिसा हसते आहे असे वाटत नाही. जस जसे आपण तिच्याकडे निरखून बघू लागतो; तिच्या डोळ्यांकडे बघू लागतो तसतसा आभास होतो की ती हसते आहे. अन मग चमकून तिच्या ओठांकडे बघतो तेव्हा लक्षात येते की अरे ओठ तर सरळ आहेत. हसताना ओठ जसे विलग होतात वा अर्धगोलाकार वळतात तसे नाहीत. मग पुन्हा डोळ्यांकडे पाहिले की वाटतं ती हसतेय. पुन्हा ओठ, पुन्हा डोळे असं पटपट नजर वळवली तर ती अगदी छान हसतेय असा भास होतो.हे काय गौडबंगाल आहे हे कळून घ्यायचं तर मानवी शरीर रचनेचा पुन्हा विचार करावा लागतो.
एक तर हसताना गाल आणि जबड्याचे स्नायू कसे जागा बदलतात ते लक्षात घ्यावे लागते. लिओनार्डोने याचा अगदी खोलात जाऊन अभ्यास केलेला दिसतो. त्याच्या विविध डायरयांमध्ये यांच्या नोंदी सापडतात. ओठाची हालचाल आणि त्यानुरूप होणारी जबड्याची आतील स्नायूंची हालचाल यावर सचित्र टिपणं त्याने काढली आहेत. त्यातच एक चित्र मोनालिसाच्या ओठांबरहुकूम दिसते.
या हालचालींना चित्रात उतरवताना लिओनार्डोने रंगीच्या विविध छटांचा बेमालूम उपयोग करून घेतला आहे. ओठाच्या बाजूने गालावर कानाजवळ चढत जाणाऱ्या काळपट छटेचा नीट अभ्यास केला तर हे समजू शकेल. इतकेच नव्हे तर मानवाची पाहण्याची जी क्षमता आहे, डोळ्यांच्या आतली रचनाआहे; तिचाही लिओनार्दोचा अभ्यास दिसतो. आपल्या डोळ्या आतल्या पडद्यावर प्रकाश पोहचतो, तो दोन पद्धतीने. एक मध्यात अतिशय केंद्रित स्वरूपात आणि स्पष्ट, स्वच्छ. तर परिघाला - बाजूला अंधुक आणि अस्पष्ट स्वरूपात असतो. केंद्रात जास्तीत जास्त तपशील, रंग आणि सुस्पष्टता परावर्तित होत असते तर परिघाला पांढरा काळा रंग, हालचाल आणि सावली परावर्तित होत असते.
या शास्त्रीय माहितीचा उपायोग लिओने करून घेतला आहे. पाहणाऱ्याच्या नजरेच्या केंद्रस्थानी डोळे असतील तेव्हा, ओठांच्या आसपासच्या सावल्या आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या छटाच दिसतील अन त्यामुळे ओठ वक्राकार वाटतील. अन हसण्याचा आभास निर्माण होईल. परंतु जेव्हा पाहणाऱ्याच्या नजरेचा केंद्रस्थानी ओठ असतील तेव्हा ओठांचा रंग आकार हे तपशील दिसतील अने ओठांच्या आसपासच्या सावल्या आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या छटा गायब होतील अन हसणे गायब होईल.
मोनालिसा चित्रामध्ये लिओनार्दोने केलेले अफलातून प्रयोग
आज एकविसाव्या शतकात हे वाचताना सोपे वाटेलही. पण लिओनार्दोने हे चित्र काढलं आहे ते 1503-1519 या काळात. शास्त्र आणि कला यांचा इतका मनोहर मिलाप अभावानेच आढळतो. लिओच्या बहुतेक सर्व कलाकृतींमध्ये हा दिसतो. डोळ्यांबाबत अजून एक गंमत. त्याकाळी स्त्रियांच्या चित्रांमधे कधीच स्त्री समोर बघत नसे. त्या समाजाची ती प्रथा, समज होता. पण मोनालिसा मात्र आपल्या डोळ्याला डोळा लावून पहाते. अन गंमत ही की चित्रात असं वाटतं की ती डावीकडे बघते आहे. तिची बुबुळं डोळ्यांच्या डाव्या कोपऱ्यात आहेत. पण ती बघते मात्र थेट समोर. इतकच नाही तर तुम्ही जसजसे डावीकडे, उजवीकडे सरकाल तिचे तुमच्याकडे टक लावून पहाणे बदलत नाही.
त्या काळात अजून एक प्रथा होती ती म्हणजे संपूर्ण उंचीचे चित्र काढले जाई. लिओनार्दोने यातही बदल केला. तसेच चित्रासाठी जी बसण्याची पद्धत होती तीही बदलली. ताठ, काहीशी कृत्रिम पद्धत टाळून मोनालिसाला आरामात, सैलावून, सहज पद्धतीत बसवून चित्र काढले आहे. लिओनार्दोने अजून एक बदल केला तो म्हणजे त्रिकोणी रचनेच चित्राची रचना. यापूर्वी सरळसोट किंवा आडवी चित्र काढली जात. पण त्या रचनेत पाहणाऱ्याची नजर कोणत्या एका ठिकाणी केंद्रित होत नसे. त्रिकोणी रचनेत मात्र त्रिकोणाच्या वरच्या बिंदूवर नजर केंद्रित होते. मोनालिसाचे चित्रही अशाच त्रिकोणी रचनेत काढले आहे.
मोनालिसाचा पोषाख, दागिन्यांचा अभाव आणि पार्श्वभूमी ठळक नसणे हेही लिओनार्दोने पारंपरिक चित्ररचनेत केलेले बदल आहेत. या सर्वामागे चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित व्हावे, कोणत्याही इतर ठळक, आकर्षक गोष्टींनी ते ढळू नये हा हेतू होता. अन तो साध्य झाला. अजिबात उठावदार नसणारे कपडे, त्यांचे रंग, अगदी डोक्यावरची झिरझिरीत ओढणीही काळ्या रंगाची, मागे प्रचंड आवाका असलेला निसर्ग पण तो काहीसा अंधूक, अस्पष्ट. या सर्वांमुळे केवळ आणि केवळ मोनालिसाचा चेहरा हाच आपल्या नजरेच्या केंद्रस्थानी रहाते.
त्या काळात किंबहुना आजही चित्र, फोटो काढून घेताना व्यक्ती जास्तीत जास्त आकर्षक दिसेल अशी सजलेली असते. मोजके पण उठावदार दागिने, आकर्षक केशरचना, रंगीत, नव्या पद्धतीचे आकर्षक कपडे, शक्यतो रेशमी, चमकदार निवडले जातात पार्श्वभूमीवर बाग, डोंगर, आकर्षक इमारत, कोरीव खांब, रंगीत पडदे असे काही योजले जाते. पण मोनालिसामधे हे सगळे जाणीवपूर्वक टाळले आहे. का? तर केवळ मोनालिसावर लक्ष केंद्रीत रहावे, तिच्या चेहऱ्यावर रहावे म्हणून!
मोनालिसा बाबत काही इतर तपशील..
असे म्हणतात की मोनालिसाची दोन चित्र काढली गेली. 2012 मधे हे दुसरे चित्र पुढे आले. यात बरेच तपशिल सारखे आहेत शिवाय जास्तीचे काही तपशीलही आहेत, तर काही तपशील वेगळे आहेत. मुख्य या चित्रात मोनालिसाचे गूढ कमी आहे. त्या काळात एक मास्टर कलाकार अन त्याच्या हाताखाली अनेक नवीन चित्रकार, विद्यार्थी काम करत असत. अन् एकाच चित्राच्या काही प्रती निघत. असाच प्रकार याही बाबतीत झाला असावा. असेच अजून एक पण खूप तपशिल वेगळे असणारे एक चित्रही पुढे आले आहे. शिवाय रेखाचित्र स्वरुपातले एकही सापडते. पण या सर्वात मूळ मोनालिसातले गूढ हरवलेले दिसते. एका अर्थाने तत्कालिन इतर चित्रांसारखी ती दिसतात.
मोनालिसाचे चित्र काढण्याची विनंती ज्या व्यापाऱ्याने (तिच्या नवऱ्याने) त्याला हे चित्र दिले गेले नाही, कारण तं पूर्णच झाले नाही. काहींच्या मते वर उल्लेखलेले दुसरे चित्र दिले गेले. त्यामुळे त्यात दिसणारी मोनालिसा ही खरी. पण त्या चित्रादरम्यान लिओला अजून काही सूचत गेले ते त्याने आपल्या चित्रात रेखिले. अन् हे सूचणे चालूच राहिल्यामुळे तो ते चित्र रेखित राहिला, मृत्यूपर्यंत!
1911 मधे मोनालिसाचे चित्र चोरीला गेले. आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झाले असे काहीजण मानतात. पण तसे नाही. 1911 पूर्वीच्या पुढील काही गोष्टींमुळे लक्षात येईल की तत्पूर्वीही मोनालिसा तितकीच प्रसिद्ध होती.
प्रसिद्ध सेनानी नेपोलियन याने हे चित्र आपल्याकडे ठेवले होते. 1825 मधे मोनालिसाचे पहिले एनग्रेव्हिंग केले गेले होते. 1854 मधे मोनालिचाचा पहिला फोटो काढला गेला होता. 1860 ते 1867 या काळात अनेक लेख मोनालिसावर लिहिले गेले होते.
अशा रितीने अनेक कारणांमुळे एक छोटे चित्र अनेक गूढ घेऊन आज लूव्र म्युझियममधे झळकते आहे. आजही नवनव्या गोष्टी पुढे येतात, नवनवे अंदाज बांधले जातात. मध्यंतरी डिजिटल स्वरुपात मूळ मोनालिसा आणण्याचेही प्रयत्न झाले. काळानुरुप आणि वर दिलेल्यि वॉर्निशमुळे मूळ चित्र गडद झाले, काही रंग बदलले, अस्पष्ट झाले. ते सगळे प्रचंड अभ्यास करून (अगदी रंगाच्या मॉलिक्युलरमधला फरक कसा, किती झाला असेल याचा अभ्यास करून) डिजिटल स्वरुपात दूर करून लिओने काढले मूळ चित्र डिजिटल स्वरुपात आणलं गेले.
अशी ही मोनालिसा! अनेको लोकं आजही झुंडीने, रांगा लावून तिला बघायला जातात. काही निराश होतात काही खिळून बघत रहातात. पण तिला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा प्रत्येक कला रसिक मनात जपतच रहातो…
(सौजन्य - मायबोली)






