Skip to main content

समस्त दलितांची माफी मागण्याचा निर्णय बालेन शाह यांनी का घेतला? नेपाळमध्ये आजही प्रखर जातीयवाद

Shantanu Khuje
01 Apr 2026
16 views
समस्त दलितांची माफी मागण्याचा निर्णय बालेन शाह यांनी का घेतला? नेपाळमध्ये आजही प्रखर जातीयवाद

शंतनू खुजे


  • नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी समस्त दलितांची जाहीर माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पारंपरिक हिंदू जातिव्यवस्था आणि १८५४ च्या ‘मुलुकी ऐन’ या कायद्याअंतर्गत दलितांना अस्पृश्य मानले जात होते. त्यामुळे त्यांना पाण्याचे स्रोत, मंदिरे, शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक संबंध यांपासून दूर ठेवण्यात आले.
  • नेपाळच्या एकूण लोकसंख्येत सुमारे १३ टक्के दलित आहेत. रोजगाराच्या संधींमध्ये असमानता, सामाजिक बहिष्कार आणि हिंसाचाराच्या घटना अद्याप सुरू असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे.


नेपाळच्या डोंगररांगांमध्ये सकाळ उगवते तेव्हा प्रकाश हळूहळू खेड्यांच्या छपरांवर पसरत जातो, धुक्याच्या आवरणातून घरं, पायवाटा आणि विखुरलेली माणसं स्पष्ट होत जातात. अशाच एका गावात, पाण्याच्या सार्वजनिक नळाजवळ पोहोचण्याआधीच थांबलेली एक स्त्री दिसते. तिच्या हातात रिकामा हंडा आहे, पण तिच्या पावलांना एक अदृश्य मर्यादा अडवते. ती मर्यादा कोणत्याही भिंतीने बांधलेली नाही, कोणत्याही फलकावर लिहिलेली नाही, पण ती इतकी ठोस आहे की त्या नळापर्यंत पोहोचणं तिच्यासाठी अजूनही निषिद्ध आहे. “मी इथून पाणी घेतलं, तर गावात भांडण होईल,” ती शांतपणे सांगते. “आमच्यासाठी वेगळा नळ आहे.” 


ही केवळ एका स्त्रीची कहाणी नाही तर ही नेपाळमधील लाखो दलितांची दररोजची वास्तविकता आहे.


अशा वेळी, जेव्हा नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी देशातील दलितांवर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाबद्दल माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा हा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे येतो. सरकारने आपली चूक मान्य केली, पण समाज बदलायला तयार आहे का? माफी ही एक राजकीय कृती असते, एक प्रतीकात्मक क्षण असतो, पण जात ही केवळ कायद्यांमध्ये किंवा घोषणांमध्ये अस्तित्वात नसते; ती लोकांच्या मनात, त्यांच्या वर्तनात, त्यांच्या रोजच्या व्यवहारात जिवंत असते आणि नेपाळमध्ये ही जात अजूनही श्वास घेत आहे.. अनेकदा निर्दयपणे, अनेकदा अदृश्यपणे, पण सातत्याने.


User Image


नेपाळचे नवे पंतप्रधान समस्त दलितांची माफी मागणार


पण तरीही नेपाळ सरकारच्या या कृतीचे स्वागत करायलाचं हवं. बलेंद्र (बालेन) शाह यांनी गेल्या आठवड्यात नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. वयाच्या 35 व्या वर्षी, बालेन हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. खासदार म्हणून शपथ घेण्याच्या काही तास आधी, त्यांनी एका रॅप गाण्याच्या माध्यमातून आपला पहिला संदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार, व्यवस्थेतील बदल आणि तरुणाई या विषयांवर भाष्य केले. आपल्या गाण्यात त्यांनी म्हटले आहे की, एकता हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे आणि यावेळी इतिहास घडत आहे.


आपल्या या ‘रॅप’मधील विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी बालेन शाह लगेच कामाला लागले असून पंतप्रधान होताच त्यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याचे जगभरातून स्वागत करण्यात येत आहे. 


पुढील १५ दिवसांत राज्याच्या वतीने दलितांची औपचारिक माफी


नेपाळ सरकारने दलित आणि ऐतिहासिकदृष्ट्या बहिष्कृत समुदायांबद्दल औपचारिक माफी मागण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय सुधार अजेंड्याला मंजुरी देताना सरकारने राज्य, समाज आणि धोरणात्मक रचनेतून दलित समुदायांवर शतकानुशतके झालेल्या अन्याय, भेदभाव आणि संधी हिरावून घेण्यासंबंधी अधिकृत कबुली दिली आहे. या निर्णयानुसार पुढील १५ दिवसांच्या आत राज्याच्या वतीने औपचारिक माफी जाहीर केली जाणार आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या निर्णयाला शासनसुधारणेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. सरकारच्या भूमिकेमुळेदलित समुदायांना न्याय, समानता आणि आर्थिक-सामाजिक उन्नतीच्या दिशेने नवी संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


नेपाळमध्ये दलित समुदायांवर ऐतिहासिकदृष्ट्या गंभीर भेदभाव झाला आहे. पारंपरिक हिंदू जातिव्यवस्था आणि १८५४ च्या ‘मुलुकी ऐन’ या कायद्याअंतर्गत दलितांना अस्पृश्य मानले जात होते. त्यामुळे त्यांना पाण्याचे स्रोत, मंदिरे, शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक संबंध यांपासून दूर ठेवण्यात आले. १९६३ मध्ये अस्पृश्यता कायदेशीररित्या रद्द करण्यात आली आणि संविधानात समानतेची हमी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात आजही दलित समुदाय भेदभाव, हिंसा आणि सामाजिक बहिष्काराला सामोरे जात आहेत.


नेपाळमध्ये दलितांची स्थिती नेमकी कशी आहे?


नेपाळच्या एकूण लोकसंख्येत सुमारे १३ टक्के असलेल्या दलित समुदायाचे संसदेतील प्रतिनिधित्व केवळ ५.८ टक्के आहे. रोजगाराच्या संधींमध्ये असमानता, सामाजिक बहिष्कार आणि हिंसाचाराच्या घटना अद्याप सुरू असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’ आणि अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालांमध्ये या व्यवस्थात्मक विषमतेचा स्पष्ट उल्लेख आढळतो.


सरकारच्या या निर्णयाचे दलित नेते, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. त्यांनी याला सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हटले असून, जाहीर करण्यात येणाऱ्या सुधार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही केली आहे.


नेपाळचा इतिहास हा विविधतेचा इतिहास आहे, पण या विविधतेच्या पाठीमागे एक कडक, श्रेणीबद्ध सामाजिक रचना उभी आहे. १८व्या शतकात संस्थात्मक स्वरूप घेतलेली आणि १८५४ मध्ये ‘मुलुकी ऐन’द्वारे कायदेशीर रूप मिळालेली जातव्यवस्था केवळ एक सामाजिक संकल्पना राहिली नाही; ती राज्याच्या संरचनेत, प्रशासनात आणि सांस्कृतिक व्यवहारात खोलवर रुजली. या व्यवस्थेत दलित, ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं त्यांना सर्वात खालच्या स्तरावर ठेवले गेले. आज ते नेपाळच्या लोकसंख्येच्या सुमारे १३ टक्के आहेत, पण त्यांच्या संख्येपेक्षा जास्त ठळक आहे त्यांची अनुपस्थिती… सत्तेत, धोरणनिर्मितीत आणि संसाधनांच्या वाटपात.


ही अनुपस्थिती केवळ आकड्यांमध्ये दिसत नाही, ती रोजच्या जीवनात अनुभवावी लागते. नेपाळमधील अनेक भागांमध्ये अजूनही ‘पाणी न चाल्ने जात’ ही संकल्पना वापरली जाते.  ‘पाणी न चाल्ने जात’ म्हणजे दलितांनी स्पर्श केलेलं पाणी अपवित्र मानलं जातं. त्यामुळे त्यांना वेगळे पाण्याचे स्रोत वापरावे लागतात, वेगळ्या वस्तीमध्ये राहावं लागतं आणि अनेकदा मंदिरं, घरे, सार्वजनिक ठिकाणं यांच्यापासून दूर ठेवले जातं. शहरांमध्ये या गोष्टींचं रूप बदललेलं दिसतं. लोक एकत्र काम करतात, बोलतात, कधी कधी खातातही, पण जसं एखादं लग्न, धार्मिक विधी किंवा कौटुंबिक कार्यक्रम येतो, तशी  जात पुन्हा स्पष्ट होते. कुठे बसायचं, कुठे जेवायचं, कोणाच्या स्वयंपाकघरात प्रवेश आहे, या सगळ्या गोष्टी अदृश्य नियमांनी ठरवल्या जातात.


User Image


दलित अत्याचारांच्या भयावह घटना


नेपाळच्या पोखरा–३२ मधील मालमुल येथे राहणारे सान्ता बहादुर चन्दारो (बिश्वकर्मा) २१ फेब्रुवारी रोजी आपल्या शेजारी काशीराम घिमिरे यांच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. लग्नाच्या जेवणासाठी ते रांगेत उभे असताना, शेजारीण सावित्री बराल शांतपणे त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, “तुम्ही रांगेत उभं राहू नका. मी तुम्हाला ताटात जेवण आणते, आपण बाजूला बसून खाऊ.”


या शब्दांमागचा अर्थ चन्दारो यांनी लगेच ओळखला. तो ‘आदर’ नव्हता, तर ‘अंतर’ ठेवण्याचा एक सभ्य वाटणारा प्रयत्न होता. अपमानित झाल्याची भावना मनात दाटून आली आणि त्यांनी ते आमंत्रण नाकारत सरळ घरी परतण्याचा निर्णय घेतला.


या घटनेच्या केवळ दोन दिवसांनंतर, २३ फेब्रुवारीला, पश्चिम नेपाळातील सुर्खेत जिल्ह्यातील गुर्भाकोट नगरपालिका ६, बडाखोली येथील १६ वर्षांची इनिशा बीके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिच्या कुटुंबियांच्या मते, इनिशाचा गैर-दलित प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारले. पोलिसांच्या प्राथमिक अहवालातही बलात्कार आणि हत्येची नोंद आहे.


३० ऑगस्ट २०११ रोजी दैलेख जिल्ह्यात घडलेली घटना याचं भीषण उदाहरण आहे. सांता बहादुर दमै यांच्या मुलाने राजकुमारी शाही या तथाकथित उच्चवर्णीय मुलीशी लग्न केल्यामुळे, सेते दमाई यांच्यावर कुकुरीने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.


जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता कायदा असूनही…?


१ जून २०११ रोजी नेपाळ सरकारने ‘जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता (गुन्हे व शिक्षा) कायदा’ लागू केला. या कायद्याने जातीय भेदभावाला गुन्हा घोषित करत कठोर शिक्षेची तरतूद केली. पण कायदा अस्तित्वात येऊन पंधरा वर्षे उलटून गेली, तरी वास्तव फारसं बदललेलं नाही. आजही दलितांना भेदभावाचा सामना करावा लागतो. कधी तो सामाजिक बहिष्काराच्या स्वरूपात, तर कधी उघड हिंसेच्या रूपात. 


या अदृश्य नियमांचा परिणाम आर्थिक आणि सामाजिक जीवनावर खोलवर होतो. नेपाळमधील सुमारे ४२ टक्के दलित लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. शिक्षणाच्या संधी मर्यादित, नोकऱ्यांमध्ये भेदभाव, आणि सरकारी यंत्रणेत प्रतिनिधित्वाचा अभाव या सगळ्या गोष्टी मिळून दलितांना एका अशा चक्रात अडकवतात, जिथून बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. एखादा तरुण शिक्षण घेऊन शहरात पोहोचला, तरी त्याची जात त्याच्या आधी पोहोचते. 


भेदभावाचा हा अनुभव केवळ सामाजिक नाही, तो शरीरावर आणि मनावरही परिणाम करतो. दलित समुदायांमध्ये कमी आयुर्मान, जास्त बालमृत्यू दर आणि मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. पण मानसिक आरोग्याबद्दल बोलणं अजूनही समाजात स्वीकारार्ह नाही; त्यामुळे अनेकजण आपली वेदना दाबून ठेवतात, आणि ती हळूहळू आतून कुरतडत राहते.


नैसर्गिक आपत्तीमध्ये दलितांना सापत्न वागणूक


या सगळ्या परिस्थितीचा सर्वात क्रूर चेहरा नैसर्गिक आपत्तीच्या काळात दिसतो. २०१५ च्या भूकंपानंतर, जेव्हा संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला होता, तेव्हा मदतीचं वितरणही समान नव्हतं. अनेक अहवालांनुसार, दलित कुटुंबांना जाणीवपूर्वक मदतीपासून दूर ठेवण्यात आलं, जरी त्यांचं नुकसान सर्वाधिक झालेलं होतं. कोविड-१९ महामारीच्या काळातही असंच चित्र दिसलं. उपचार, लसीकरण आणि आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात दलितांना अडथळे आले. संकटाच्या काळातही जात ही ओळख त्यांच्या मागे लागलेलीच राहते, जणू काही ती त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे.


या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसून येते ती म्हणजे, दंडमुक्ती. अनेकदा पोलीस तक्रारी नोंदवत नाहीत किंवा त्या गंभीरपणे घेतल्या जात नाहीत. कायदे अस्तित्वात आहेत. १९९० च्या संविधानातील तरतुदी, २०११ चा ‘कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन अँड अनटचेबिलिटी’ कायदा असे कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी अत्यंत कमकुवत आहे. कायदे कागदावर आहेत, पण त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय बांधिलकी कमी पडते.


याचबरोबर, ‘हलिया’सारख्या बांधकाम मजुरीच्या प्रथा अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. जरी त्या अधिकृतपणे बंद करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक दलित अजूनही अशा व्यवस्थेत अडकलेले आहेत, जिथे त्यांना अमानुष कामं करावी लागतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी मिळत नाही. पुनर्वसनाच्या योजना अस्तित्वात आहेत, पण त्या अत्यंत मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचतात.


User Image


दलित महिलांचे दुहेरी शोषण


या संपूर्ण संरचनेचा सर्वात जास्त परिणाम दलित महिलांवर होतो. त्या केवळ जातीय नव्हे, तर लैंगिक आणि आर्थिक शोषणाच्याही केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या आयुष्यात जमीन, संपत्ती किंवा निर्णयक्षमतेवर त्यांचा हक्क अत्यंत मर्यादित असतो. मानव तस्करी, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीची वेश्याव्यवस्था या सगळ्या गोष्टी त्यांच्या वास्तवाचा भाग बनतात. नेपाळमध्ये दलित स्त्रियांचं वास्तव हे केवळ जातीय भेदभावापुरतं मर्यादित नाही; ते अनेक स्तरांवरच्या हिंसा, उपेक्षा आणि अदृश्यतेच्या जाळ्यात अडकलेलं आहे. जात आणि लिंग या दोन्ही ओळखींच्या संगमावर उभ्या असलेल्या दलित स्त्रिया दुहेरी नव्हे, तर अनेक पटींनी वाढलेल्या असमानतेचा सामना करत आहेत.


राष्ट्रीय दलित आयोगाच्या आकडेवारीनुसार, दलित स्त्रियांनी नोंदवलेल्या तक्रारींपैकी तब्बल ४६.५५ टक्के प्रकरणं ही लिंगाधारित हिंसेशी संबंधित आहेत. त्याच वेळी, या तक्रारींपैकी ३३.३३ टक्के प्रकरणांमध्ये थेट जातीय भेदभावाची छाया दिसून येते. विवाहानंतर सोडून देणे, मुलांच्या जन्मनोंदी किंवा नागरिकत्व नाकारणे, कुटुंबाकडून बहिष्कार या समस्या केवळ वैयक्तिक नाहीत, तर सामाजिक संरचनेत खोलवर रुजलेल्या भेदभावाचं प्रतिबिंब आहेत.


पोलीस नोंदीही या वास्तवाची पुष्टी करतात. मागील १५ महिन्यांत ११.५४ टक्के दलित स्त्रियांनी हिंसेचा अनुभव घेतल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्याच कालावधीत नोंदवलेल्या एकूण घटनांपैकी ११.३४ टक्के प्रकरणं दलित स्त्रियांची आहेत. मात्र, केवळ टक्केवारीपेक्षा या संख्यांचा सामाजिक संदर्भ अधिक बोलका आहे. ‘वूमेन्स रिहॅबिलिटेशन सेंटर’ (WOREC), नेपाळच्या नोंदी सांगतात की देशातील हिंसाचारग्रस्त महिलांपैकी सुमारे २७ टक्के महिला दलित आहेत. हा आकडा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत disproportionately जास्त आहे.


ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान WOREC ने नोंदवलेल्या ३४५ हिंसाचाराच्या घटनांमध्ये तराई भागातील चार दलित महिलांच्या हत्यांचाही समावेश होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, हिंसेच्या बळींपैकी सुमारे १० टक्के महिला दलित आहेत. INSEC या संस्थेच्या आकडेवारीनुसार, हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांपैकी २२.५८ टक्के महिला दलित समुदायातील आहेत.


ही आकडेवारी केवळ संख्या नसून, एक पद्धतशीर वास्तव दाखवते की दलित स्त्रिया त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात हिंसेच्या कचाट्यात अडकलेल्या आहेत. तरीही, माध्यमांमध्ये या विषयाचं प्रतिबिंब अत्यल्प दिसतं. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, एकूण मीडिया कव्हरेजपैकी केवळ सुमारे ११ टक्के बातम्या जातीय भेदभावाच्या मुद्द्याला स्पर्श करतात.


शिक्षण आणि राजकीय क्षेत्रात पुरेसे प्रतिनिधित्व नाही


शिक्षणाच्या क्षेत्रातही ही विषमता ठळकपणे दिसून येते. २०२२ च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ३९ टक्के दलित महिला निरक्षर आहेत. तराई भागात ही स्थिती आणखी गंभीर आहे. मधेसी दलित महिलांपैकी ३१.६ टक्के महिलांनी कधीही शाळेचं तोंड पाहिलेलं नाही. तराईत एकूण दलित महिलांमधील निरक्षरतेचं प्रमाण ५५.९ टक्के आहे, तर डोंगराळ भागात ते २९.९ टक्के आहे.


मालमत्तेच्या हक्काच्या बाबतीतही त्यांची स्थिती कमकुवत आहे. फक्त १५.७ टक्के दलित महिलांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नोंदलेली आहे. राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीतही हा प्रवास अपुरा आणि अस्थिर राहिला आहे. २००७ मध्ये प्रथमच अंतरिम संसदेत सहा दलित महिलांना स्थान मिळालं. २००८ मध्ये हा आकडा २५ वर पोहोचला, पण त्यानंतर तो सातत्याने घटत गेला. २०१४ मध्ये २२, २०१८ मध्ये १४ आणि २०२३ मध्ये केवळ आठ दलित महिला संसदेत पोहोचल्या. आजवर केंद्र सरकारमध्ये एकाही दलित महिलेला कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही.


User Image


लैंगिक हिंसेच्या संदर्भातही हीच असमानता दिसते. WOREC च्या आकडेवारीनुसार, नेपाळमधील बलात्काराच्या बळींपैकी सुमारे ७ टक्के महिला दलित आहेत. जागतिक बँकेनेही आपल्या अहवालात नमूद केलं आहे की, जातीय भेदभाव आणि लिंगभेद या दुहेरी दडपणामुळे दलित महिलांना घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अधिक हिंसेला सामोरं जावं लागतं. म्हणजेच, नेपाळमधील दलित स्त्री ही केवळ ‘दलित’ म्हणून नाही, तर ‘स्त्री’ म्हणूनही वंचित आहे आणि या दोन ओळखींच्या संगमावर उभी राहून ती अजूनच खोल अन्यायाच्या गर्तेत ढकलली जाते.


आशेचा किरण


तरीही, या अंधारात काही आवाज उठताना दिसतात. नेपाळ, भारत आणि भूतानमधील नेपाळी दलित समुदायांनी एकत्र येऊन आपली ओळख, आपला इतिहास आणि आपला अभिमान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘कामी’, ‘दमाई’, ‘सार्की’ ही नावं जी कधीकाळी अपमानास्पद मानली जात होती, ती आता अभिमानाने उच्चारली जात आहेत. खुकुरीसारख्या प्रतीकांमागे असलेल्या कारागिरांची ओळख पुन्हा पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. हा लढा केवळ हक्कांसाठी नाही, तर सन्मानासाठी आहे, स्वतःला ‘कमी’ समजण्याच्या मानसिकतेविरुद्ध आहे.


या पार्श्वभूमीवर, नेपाळच्या पंतप्रधानांची माफी ही एक महत्त्वाची, पण अपुरी पायरी वाटते. ती इतिहासाची कबुली आहे, पण भविष्याची हमी नाही. कारण जोपर्यंत त्या डोंगराळ गावातील स्त्री निर्भयपणे सार्वजनिक नळ उघडू शकत नाही, जोपर्यंत एखाद्या तरुणाला आपल्या नावामुळे लाज वाटत नाही, जोपर्यंत एखाद्या मुलीला आपल्या सन्मानासाठी जीव द्यावा लागत नाही, तोपर्यंत माफीचा अर्थ मर्यादित राहणार आहे.


नेपाळमधील दलितांची कहाणी ही केवळ एका देशाची कहाणी नाही; ती संपूर्ण दक्षिण आशियातील जातीय वास्तवाचं प्रतिबिंब आहे. आणि कदाचित म्हणूनच, या कहाणीचा शेवट अजून लिहिला गेलेला नाही. तो दररोज लिहिला जातो, पाण्याच्या नळाजवळ थांबलेल्या स्त्रीच्या पावलांमध्ये, आपली ओळख लपवणाऱ्या तरुणाच्या शांततेत, आणि “आता पुरे” असं म्हणत पुढे येणाऱ्या नव्या पिढीच्या आवाजात.


आता प्रश्न इतकाच उरतो, माफी नंतर काय?


Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...