सारिका वयाच्या आठव्या वर्षांपासूनच तिच्या आईसोबत कचरा गोळा करायला जायची. शाळा शिकण्यासारखी घरची परिस्थितीही नव्हती, म्हणून शाळाच बंद झाली होती. सारिका म्हणते, “खूप लहान वयात मी माझ्या आईला आणि इतर अनेक महिलांना कागद, काच आणि भंगार गोळा करून मजुरी मिळवताना बघितलं आहे. माझी आई मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे आजारी असायची. तिच्या कामात हातभार लागावा म्हणून मीदेखील सोबत जायची, त्यामुळे अगदी लहान वयापासूनच कचऱ्याचे व्यवस्थापन हा मुद्दा किती महत्वाचा आहे हे मला ठाऊक आहे.’’
पुण्यातील सारिका कराडकर या कचरावेचक आहेत आणि अभिमानाची बाब म्हणजे आज त्याच सारिकाची अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या Elective Congress of the International Alliance of Waste Pickers च्या परिषदेसाठी निवड झाली होती. 1 ते 5 मे या कालावधीत अर्जेंटिनामध्ये संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत ब्राझील, कोलंबिया, घाना, इंडोनेशिया, फिलिपाइन्स यांसारख्या 33 देशातील कचरा वेचकांचे 89 प्रतिनिधी सहभागी झाले होते. आणि त्यात फक्त नववीपर्यंत शिकलेल्या परंतू कचरा व्यवस्थापनात मोलाचे काम करणाऱ्या सारिका कराडकर यांची निवड झाली होती. परिषदेमध्ये कचरावेचक महिलांचे योगदान आणि संघर्ष यावर जागतिक स्तरावर अधोरिखित करण्यात आले. कचरावेचकांच्या बाबतीत ठराव, धोरणे, कचरा क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. कचरावेचकांच्या जागतिक युतीसाठी सर्वोच्च निर्णय घेणारे प्राधिकरण म्हणून संस्थेने कचरा वेचक नेतृत्वाची निवड केली.

पुण्यातील कचरावेचकांची कामाची पद्धत, कचरा व्यवस्थापन यावर सारिका यांनी परिषदेत प्रकाश टाकला. सुरुवातीला कचरावेचकांना तुच्छतेची वागणूक दिली जात होती. टाकून दिलेल्या कचऱ्याप्रमाणे वागणूक दिली जात होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून कचरावेचक महिलांच्या कामामध्ये लोकांच्या दृष्टीकोनामध्ये खूप बदल झाला आहे. एकप्रकारे ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ आणि ‘स्वच्छ’ संस्थेमुळे कचरावेचक महिलांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. माझ्यासारख्या हजारो कचरावेचक महिलांचे कामामुळे परिवर्तन झाल्याचं सारिका सांगतात.
सारिका कराडकर या कोथरूड भागात राहतात. सारिका आणि त्यांचे पती दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात. सारिका यांची आई कचरा वेचक म्हणून काम करत होत्या. सारिका या शाळेत असतानाच आईसोबत कचरा गोळा करायला जात होत्या. शाळा शिकण्यासारखी घरची परिस्थितीही नव्हती. नववीत त्यांनी शाळा बंद केली. तेव्हापासून आजपर्यत कचरावेचक म्हणून काम करतात. सारिका म्हणाल्या, ‘‘खूप लहान वयात मी माझ्या आईला आणि इतर अनेक महिलांना कागद, काच आणि भंगार गोळा करून मजुरी मिळवताना बघितलं आहे. मी माझ्या आईसोबत जात असे. कारण ती मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे आजारी असायची. तिच्या कामात हातभार लागावा. त्यामुळे आठवड्यातून एकदा शाळेत जायला मिळत होतं. अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे कसंतरी नववीपर्यंत शिक्षण घेतलं. दहावीपर्यत शिक्षणसुद्धा घेता आलं नाही. शिक्षण नसताना कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि ‘स्वच्छ’ या संस्थेने माझी कचरावेचक प्रतिनिधी म्हणून परिषदेसाठी निवड केली. माझ्यात आतापर्यतचे कचरावेचक म्हणून झालेले परिवर्तन, पुण्यातील कचरावेचकांचा गेल्या तीन दशकांतील बदलत चाललेला जीवनप्रवास आणि कचरावेचकांची सामूहिक कृती व्यक्त करण्याची संधी मिळाली. मला परिषदेसाठी जायचं होतं. त्यासाठी थोडंफार इंग्रजी येणं गरजेचं होतं. कागद काच पत्रा, स्वच्छ संस्थेने मूलभूत इंग्रजी शिकता यावंं, म्हणून मदत केली. त्यामुळे परिषदेमध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये एक तासभर सादरीकरण देऊ शकले.’

या आंतरराष्ट्रीय परिषदेत सारिकाला कचरावेचकांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी मिळाल्यावर, कचरावेचक महिलांनाच प्रवास, कामाची पद्धत, त्यांचा प्रवास मांडण्यासाठी महिलांनी एकमताने सारिकाची निवड केली. परिषदेमध्ये सारिकाने पुण्यातील कचरावेचकांनी पुढाकार घेतलेल्या प्रेरणादायी आणि अद्वितीय कचरा व्यवस्थापन प्रणालीवर प्रकाश टाकला. एकेकाळी इतरांनी टाकून दिलेल्या कचऱ्याप्रमाणेच कचरावेचकांनी अवस्था होती. आज त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान परत मिळवला आहे आणि कचरा उचलणे हा एक सन्माननीय व्यवसाय असल्याचं त्यांनी नमूद केलं.
कोरोना काळातील आठवणी जाग्या करताना…
कोरोना काळातील काही गोष्टी सांगताना सारिका म्हणाल्या, “कोरोना काळात जो कचरा निर्माण होत होता, त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. त्यासाठी कचरा व्यवस्थापन खूप महत्त्वाचं होतं. ते करत असताना स्वतःची काळजी घेणं एक रिस्क होती. मास्क, हातात हातमोजे कचरा गोळा केला, तरी शेवटी कोरोना झाला. त्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावं लागलं. माझ्यामुळे माझ्या नवऱ्यालाही कोरोना झाला. त्यावेळी खूप अवघड परिस्थिती होती. त्या परिस्थितीतही आम्ही आमचं काम केलं. माझा गर्भपात झाला होता. त्यावेळी माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली. स्वतःची नोकरी सोडून पूर्णवेळ माझी काळजी घेतली. त्यांच्यामुळेच नेपाळ आणि इंडोनेशियामधील कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन कचरावेचकांच्या समस्या मांडता आल्या. तसेच अर्जेंटिनामध्ये झालेल्या परिषदमध्ये सहभागी झाले.

जगभरातील कचरावेचकांसाठी आशेचा किरण
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीचे आदित्य व्यास यांनी परिषदेमध्ये सारिका सोबत संवाद साधला, ते म्हणाले, ‘’Elective Congress of the International Alliance of Waste Pickers परिषदेतील आमचा सहभाग जगभरातील कचरावेचकांसाठी आशेचा किरण आहे. अर्थपूर्ण बदल घडविण्यासाठी तळागाळातील चळवळीचं सामर्थ्य दाखवून देतो. सारिका सारख्या हजारो महिलांच्या कहाण्या समाजातील उपेक्षित महिलांसाठी ताकद बनू शकते.’’
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतविषयी
पुणे शहरातील कचरा वेचक महिलांना संघटित करून स्थापन केलेली संस्था म्हणजे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत. शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे तेरा हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी कचरावेचक महिलांची संख्या साठेआठ हजारांच्या घरात आहे. कचरा वेचण्याचा कामाबरोबर त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करणारी संस्था आहे.

इंटरनेशनल अलायंस वेस्ट पिकर्स
इंटरनेशनल अलायंस वेस्ट पिकर्स (आयएडब्ल्यूपी) हा आंतरराष्ट्रीय संघ आहे. इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्स परिषद ही कचरावेचकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 34 देशांमधील 4,60000 पेक्षा जास्त कामगारांचे प्रतिनिधित्व करतो. 2008 मध्ये बोगोटा, कोलंबिया आयोजित कचरावेचकांनी प्रथम विश्व संमेलनानंतर एक नेटवर्किंग प्रक्रिया केली होती. बोगोटा वेस्टद्वारे आयोजित या पहिल्या जागतिक कार्यक्रमात तीसहून अधिक देशांचे कचरावेचक संघटना आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.





