“लहान असताना माझे वडील माझं शोषण करायचे. ते मला मारत असत, तेव्हा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. ते घरी यायचे तेव्हा मला फार भीती वाटायची. मी लहान होते, अनेकदा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. रात्रभर मी याची प्लानिंग करायची की, महिलांना त्यांचे अधिकार कसे मिळवून द्यायचे, महिलांचे, लहान मुलांचे शोषण करणाऱ्यांना कशा पद्धतीने अद्दल घडवायची.’’
गेल्या वर्षी असे खळबळजनक वक्तव्य केल्यामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर स्वाती मालीवाल कायमच प्रकाशझोतात राहू लागल्या. त्यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन, जामा मशिदीत महिलांना बंदी या फतव्या विरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांच्यावर झालेले हल्ले यामुळे स्वाती मालीवाल नेहमीच बातम्यांचा विषय होत्या. आता गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल पुन्हा एकदा हेडलाईनच्या विषय ठरल्या आहेत आणि त्यामगचे कारण आहे दिल्लीचे एलजी (नायब राज्यपाल) व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकण्याचे…

दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले
दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर नायब राज्यपालांनी 2017 मध्ये महिला आयोगाच्या बेकायदेशीर नियुक्ती आणि अनियमिततेच्या मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. समितीने 2 जून 2017 रोजी अहवाल सादर केला. समितीचे असे मत होते की, अशा प्रकारे निर्माण केलेली 223 पदे आणि महिला आयोगाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनियमित होती. कारण ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन केले गेले नाही आणि नायब राज्यपालांचीही मंजुरी घेतली नव्हती. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने डीसीडब्ल्यू नियम तरतुदींचे उल्लंघन केले.
नोकरी गेलेल्यांमध्ये बलात्कार आणि ॲसिड हल्ला पीडितांचा समावेश
स्वाती मालीवाल यांनी मात्र हे एक तुघलकी फर्मान असल्याचे सांगून ज्या 223 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून तत्काळ काढण्यात आले आहे त्यापैकी अनेकजणी या बलात्कार पीडित आणि ॲसिड हल्ला पीडित होत्या असे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या आदेशाला तुघलकी हुकूम असल्याचे सांगत त्यांनी महिला आयोगात 90 कर्मचारी आहेत, मात्र केवळ आठ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना हटवल्यास आयोगाला टाळे ठोकले जाईल. सरकारने कर्मचारी द्यावेत, मात्र महिला आयोग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये, मी जिवंत असेपर्यंत दिल्ली महिला आयोग बंद पडू देणार नाही. तुम्ही मला तुरुंगात टाकले तरी मी महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नायब राज्यपालांच्या या निर्णयामुळे दिल्ली महिला आयोगात काम करणाऱ्या ॲसिड हल्ला पीडित मोहिनीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मोहिनी म्हणतात की, ॲसिड हल्ल्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालं होतं, परंतू दिल्ली महिला आयोगात नोकरी मिळाल्याने माझ्यात आत्मविश्वास आला आणि मी माझ्या स्वत:च्या पायावर उभी राहू शकली. आयोगाच्या ॲसिड हल्ला पीडित विभागाची जबाबदारी स्वाती मालीवाल यांनी माझ्यावरच सोपवली होती. ज्यांनी हे दु:ख भोगलयं त्या महिलाच या विषयावर अधिक चांगलं काम करू शकतील असा मालवीय यांना विश्वास होता.

कोण आहेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल?
स्वाती मालीवाल या आप पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार असून सध्या त्या दिल्ली महिला आयोगाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. पेशाने इंजिनियर असलेल्या स्वाती मालीवाल यांनी यापूर्वी तीनवेळा दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविले होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामध्ये स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या कोअर टीममध्ये होत्या.
अलीकडेच त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जाणून घेतल्याचा दावा केला होता. तेव्हा त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, “रात्री उशिरा त्या दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेत होत्या. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने त्यांचा विनयभंग केला. त्यांनी त्याला पकडले असता कारच्या आरशात हात पकडून चालकाने त्यांना फरफटत नेहले. सुदैवाने माझे प्राण वाचवले. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थिती काय असेल याची कल्पना करा.” असे ट्वीट मालीवाल यांनी केले होते.

पॉक्सो कायद्यात बदल करण्यासाठी 10 दिवसांचे उपोषण
2018 मध्ये स्वाती मालीवाल उपोषणाला बसल्या होत्या. अल्पवयीन मुलींवर वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वटहुकुमाद्वारे पोक्सो कायद्यात बदल केला होता आणि त्याला राष्ट्रपतींनीही मंजूरी दिली होती. या वटहुकूमानंतर बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पॉक्सो कायद्यात बदल करण्यात यावा यासाठी दिल्लीत महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाटावर स्वाती मालीवाल यांनी 10 दिवसांनंतर आपले उपोषण सोडले होते. लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, बलात्कारांच्या खटल्यांसाठी देशात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना व्हावी, खटला लवकरात लवकर संपवणे तसेच बलात्कार प्रकरणांमध्ये चौकशीसाठी अतिरिक्त यंत्रणा उभारणे. या सर्व मागण्यांवर तीन महिन्यांत कार्यवाही सुरु न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जामा मशिदीच्या आदेशाविरुद्ध नोटीस
गेल्या वर्षी दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा मुलींच्या समुहाला प्रवेश बंद करण्यात आला होता. यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी मशीद प्रशासनाला नोटीस पाठवली होती. जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशबंदी हा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात मशिदीच्या इमामांना महिला आयोग नोटीस बजावत आहे. महिलांना प्रवेश नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही. महिलांना मशिदीमध्ये प्रवेश न देणं असंवैधानिक आहे. भारतामध्ये तालिबानी आदेश/निर्णय चालणार नाहीत, अशी भूमिका मालीवाल यांनी त्यावेळी घेतली होती.

वडील लैंगिक शोषण करायचे…
गेल्या वर्षी दिल्लीतील महिला आयोगाच्या एका कार्यक्रमात स्वाती यांनी आपल्या वेदना जगजाहीर केल्या होत्या. स्वाती म्हणाल्या, ‘माझे वडील माझे लैंगिक शोषण करायचे हे मला अजूनही आठवते. ते घरी यायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची. कित्येक रात्री मी पलंगाखाली घालवल्या माहीत नाही. मी भीतीने थरथर कापत असे. अशा सगळ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी काय करावं, असा विचार त्यावेळी मनात यायचा.
मी कधीच विसरू शकत नाही की माझ्या वडिलांना इतका राग यायचा की ते माझे केस पकडून मला भिंतीवर आदळायचे, रक्त वाहत राहायचे, मला खूप त्रास व्हायचा. त्या तळमळीमुळे मनात एकच विचार चालू होता की या लोकांना धडा कसा शिकवायचा. माझ्या आयुष्यात माझी आई, माझी मावशी, माझे मामा आणि आजी आजोबा नसते तर मला वाटत नाही की मी त्या बालपणीच्या आघातातून बाहेर पडू शकले असते. तुमच्यामध्ये येऊन इतकी मोठी कामे करू शकले नसते.
माझ्या लक्षात आले आहे की, जेव्हा खूप अत्याचार होतात तेव्हा मोठे बदलही होतात. त्या अत्याचारामुळे तुमच्यात एक आग पेटते, जर तुम्ही ती योग्य ठिकाणी ठेवली तर तुम्ही महान गोष्टी करू शकता. आज आपण सर्व पुरस्कार विजेते पाहतो (ज्या कुणाला पुरस्कार मिळाला आहे), त्यांची एक कथा आहे. ते लोक आपल्या आयुष्याशी लढायला शिकले आणि त्या समस्येवर मात करायला शिकले. आज आपल्यासोबत अशा अनेक सशक्त महिला आहेत, ज्यांनी आपल्या समस्यांचा खंबीरपणे सामना केला आहे.






