गडचिरोली जिल्ह्याचा एटापल्ली तालुका पुन्हा एकदा हादरला आहे… दोन दिवसांपूर्वीच एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह एका पुरुषाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच सोमवारी 60 वर्षाच्या एका वृद्धाला जादूटाेण्याच्या संशयावरून गावातील समाज मंदिराच्या मांडवात बांधून लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आराेपींनी गरम सळईचे चटके वृद्धाच्या शरीराला देत साेडून दिले.
दलसू मुक्का पुंगाटी (60 वर्षे) रा. जांभिया, असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जांभिया हे गाव गट्टा पाेलिस मदत केंद्रापासून अवघ्या 2 किमी अंतरावर आहे. दलसू पुंगाटी यांना बेदम मारहाण हाेत असल्याचा प्रकार गट्टावरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिला. एटापल्लीत आल्यानंतर त्याने चाैकातील पाेलिस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. गावातील इतर लोकांनी पुंगाटी यांचे दोन्ही हात बांधून त्यांना अडीच किलोमीटर पर्यंत मारत मारत गावापासून दूर नेले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याच्या याच एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह एका पुरुषाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे महिलेला जाळणाऱ्या आरोपींमध्ये तिचा पती, मुलगा आणि इतर कुटुंबीयांचाही समावेश होता. जमनी देवाजी तेलामी असं 57 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर या महिलेबरोबर आणखी एका व्यक्तीला जाळण्यात आलं त्यांचं नाव देवू कटिया अतलामी असून त्यांचं वय 57 वर्ष होतं. गडचिरोली – छत्तीसगडच्या सीमेजवळ एटापल्ली तालुक्यात बरसेवाडा या अतिशय दुर्गम भागामध्ये या प्रकार घडला आहे. या भागात माडिया आदिवासी राहतात. त्यांच्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे प्रकार घडतात.
राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये हे जे घडतेय ते सारे भयंकर, चिंताजनक आहेच. शिवाय या सगळ्या घटना पाहून आपण कोणत्या विकासाच्या, एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो, असा प्रश्न पडतो. त्यासोबतच अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची मुक्तता करण्याचे, त्या दलदलीतून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हान किती मोठे आहे, याचीही कल्पना यानिमित्ताने येते. बारसेवाड्याच्या घटनेला आणखी एक कंगोरा म्हणजे एरव्ही जातबांधव व भगिनींच्या वैयक्तिक अधिकारांमध्ये नाक खुपसणाऱ्या अंधश्रद्ध जातपंचायती आता जादूटोण्याच्या संशयावरूनही निरपराधांचे जीव घ्यायला लागल्या आहेत. त्याचे कारण हे की, रानावनात राहणाऱ्या, दारिद्र्यात खितपत पडलेल्या या निरक्षर माणसांपर्यंत नव्या जगाचे वारे पोहोचलेले नाही. अवतीभोवती, राज्यात-देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला शिक्षणाचा प्रसार त्यांच्या झोपड्यांमध्ये झिरपलेला नाही. शिक्षणामुळे आणि त्यातही विज्ञानामुळे तयार होणारा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक, आजार व मृत्यूमागील कार्यकारणभाव यापासून ते दूर आहेत.

अरण्य प्रदेशात, निसर्गाच्या सानिध्यात आपण कोणत्या तरी सहाय्यकारी शक्तीमुळे जिवंत आहोत आणि अशाच कुठल्या तरी विनाशकारी शक्तीमुळे आपल्यावर संकटे येतात, माणसे आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक अंधश्रद्धांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. हा पगडा वैयक्तिक असतो तेव्हा कुटुंबातल्या, समाजातल्या विवेकवादी मंडळींकडून सुधारणा घडवली जाऊ शकते. लोकशिक्षणाची कवाडे खुली असतात. परंतु, अंधश्रद्धेला जेव्हा समूहाच्या मानसिकतेचे स्वरूप येते तेव्हा झपाटलेल्या झुंडी तयार होतात. या झुंडीचा अधिक राग खेड्यातल्या, पाड्यावरच्या शिकलेल्या मंडळींवर, विशेषत: सुशिक्षित महिलांवर असतो. कारण, आधुनिक जगाचे दर्शन तसेच अनुभवातून शिकलेल्यांचा विवेक जागा झालेला असतो. ते इतरांनाही सुधारण्याचा प्रयत्न करतात. झुंडीला मात्र ते अजिबात नकोसे असते. त्यातून होणाऱ्या अघोरी कृत्यावेळी त्यात सहभागी झालेल्या कोण्या एकाच्या मनात चुकीचे भान आले तरी तो उघडपणे बोलू शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर तोदेखील झुंडीच्या रागाचा बळी ठरण्याची शक्यता असते.
या अंधश्रद्धांमागील कारण असे सांगितले जाते की, आदिवासी भागात काही वर्षांपूर्वीपर्यंत दवाखाने नव्हते. त्यामुळे एखाद्या देवाला बळी देऊन, विशिष्ट रीतिरिवाज पाळल्याने, तसेच जंगलातल्या झाडपाल्याची औषधांनी आजार बरे होऊ शकतात, या समजुतीवर आदिम जमातीचा ठाम विश्वास बसला आणि तो परंपरेने त्यांच्यात झिरपला. कधी होडी, वाद्ये, भिंती यांवर काढलेल्या आकृत्यांमुळे आपले संरक्षण होते, या आकृत्या चेटकिणींना पळवून लावतात, अशीही समजूत पाहायला मिळते. धर्माच्या माध्यमातून माणूस आदिम काळापासून आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. देव, राक्षस, भूतात्मे, मृतात्मे व आत्मे हे मानवी जगात हस्तक्षेप करतात, असा आदिवासींचा समज असून त्या अज्ञात शक्ती आणि माणूस यांच्यातील दुवे म्हणजे जादूगार, मांत्रिक, चेटकीण, देवऋषी.

महाराष्ट्रात 2013 साली अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा पारित झाला. कायदा येऊन 11 वर्ष उलटली तरीही जादूटोण्यावरून जीव घेण्याच्या घटना अजूनही घडत आहेत, यासाठी सरकार जबाबदार असल्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने म्हटले आहे.
गडचिरोली किंवा नंदुरबारमधील घटनांकडे असे इतक्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. सातपुड्याच्या पश्चिम टोकावरच्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव किंवा अक्कलकुवा तालुक्यात भयंकर डाकीण प्रथा आहे. ती हाणून पाडण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच प्रशासनाने काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. त्यामुळे डाकीण समजून महिलांचे बळी घेण्याच्या, त्यांच्या छळाच्या घटना कमी झाल्या आणि समाजप्रबोधनाचे प्रयत्नही शिथिल झाले. आताच्या घटनांमुळे प्रबोधनाची गती-शक्ती दोन्ही वाढविण्याची गरज आहे. मागास, निरक्षर, दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून घडणाऱ्या या घटना म्हणजे समाजाचा अंधारलेला कोपरा आहे. त्याबद्दल नुसतेच हळहळून, संताप व्यक्त करून किंवा ‘छे, किती बुरसटलेले लोक’ म्हणून नाक मुरडण्याने भागणार नाही. तो अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने लोकप्रबोधनाचा, लोकशिक्षणाचा दिवा पेटविण्याची गरज आहे.






