आपल्या लग्नाच्या दोन महिन्यांआधी दिल्लीची डॉक्टर सोनाली सैनी आपल्या मित्रांसोबत गोव्याला गेली होती. तिथून ती घाबरलेली परतलेली आणि लग्नाविषयी तिला चिंता वाटू लागली. तिनं आपलं लग्न रद्द केलं. तिनं कोणाचंच ऐकलं नाही. त्याचवेळी एका प्री-मॅरेज कौन्सिलरने येऊन हे लग्न वाचवलं. “माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं असं नव्हतं. पण मी इतकी घाबरले होते की लग्नाची कल्पनाच मला सहन होत नव्हती. आम्ही दोघेही खूपच वेगळे होतो. त्यामुळे लग्न टिकेल की नाही याची मला चिंता लागली होती,” सैनी सांगते. तिने 20 मुलाखती आणि 40 तास समुपदेशनावर घालवले त्यानंतरच ती लग्नाला तयार झाली.
लग्नपूर्व समुपदेशन आता लग्नातील नवी प्रथा बनत आहे. संगीत, भारी कपडे, मेंदी-हळद आणि आता समुपदेशनही. नव्या पिढीत लग्नाविषयी चिंता स्पष्टपणे दिसून येतात. घरच्यांचं ऐकून लग्न केल्यानं आपण सुखी होऊ यावर त्यांचा विश्वास नाही. मानसतज्ज्ञ आणि थेरपिस्ट, ‘जेन झेड’ पिढीला आता लग्नाविषयी तयार करत आहेत. उदा. प्रश्न सोडवणे, वागण्या-बोलण्याची पद्धत, आशाअपेक्षा समजून घेणं आणि एकत्रितपणे अडचणींना सामोरं जाणं इत्यादी.
लग्नाच्या बाजारात आता नवीन ट्रेंड… ‘प्री-मॅरेज कौन्सिलिंग’
पर्सनालिटी एसेसमेंट टेस्ट, सिंगल सेशन कौन्सिलिंग आणि कॉन्फिडन्स बिल्डींग अभ्यास अशा अनेक गोष्टी थेरपिस्ट करत आहेत आणि जोडप्यांना त्यांची नातं टिकवण्यासाठी मदत करत आहेत. भारतीय लग्न बाजारातील हा एक महत्त्वाचा व्यवसाय होत चालला आहे. जे लग्नपूर्व उत्सवी समारंभ आणि लग्नोत्तर कठोर वास्तव यांच्यातला तोल सांभाळण्याचं काम करत आहेत.
“ही अजून नवी गोष्ट आहे. पण अनेक लोक याचा उपयोग घेत आहेत. अडचणी सोडवण्यावरच याचा भर नसतो. लग्न ही कठीण गोष्ट असते आणि आम्ही जोडप्यांना यासाठी तयार करत असतो,” रिचा होरा सांगतात ज्या दिल्लीत लग्नपूर्व प्रशिक्षिका आहेत. सैनीने तीन वर्ष अनमोल आनंद सोबत डेटींग केली होती. लग्नाचा निर्णय घेण्याआधी दोघांनाही आपल्या वेगवेगळ्या स्वभावाची जाणीव होती. एक भावनिक तर दुसरा व्यावहारीक होता. “समुपदेशनाने त्यांना एकमेकांना समजून घेण्यास मदत केली. जोडप्यांना त्यांच्या मूळ भावना आणि अपेक्षा ओळखण्यासाठी मदत होते. आयुष्याचे उद्देश, करियरच्या आकांक्षा, आर्थिक नियोजन, मुलांचं संगोपन यात त्यांना मदत होते. संवादाचे महत्त्व वाढवून संभावित धोक्याच्या जागा कमी करता येतात, वास्तविक अपेक्षा ठरवून भावनात्मक बंध मजबूत करता येतात,” असे डॉ. प्रेरणा कोहली सांगतात ज्या क्लिनीकल सायकोलॉजिस्ट आणि माईंडट्राईब हेल्थकेयर संचालक आहेत.
आनंद सांगतो, “मी तिची गोव्याहून परत येण्याची वाट बघत होतो. त्यानंतर आम्ही लग्नाची खरेदी करणार होतो. पण आल्यावर तिनं लग्नासाठी नकार दिला. मला खूप राग आला.” दोघेही एकमेकांशी फोनवर तासनतास बोलायचे. पण त्यात भांडणंच असायचं. ती वाढत गेली आणि आनंदची खात्री झाली की त्यांचं लग्न होणार नाही. दोघांच्या घरच्यांनी मग एकत्र बसून लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि त्यावर बराच खर्च झाला होता. बाकी बुकींग्सही झाल्या होत्या. आनंद सांगतो, “मी तेव्हा सोनालीशी बोललो आणि म्हटलं की आपण एकदा प्री-मॅरेज कौन्सिल करून बघू. त्या प्रक्रियेत आम्हाला एकमेकांविषयी खूप काही शिकायला मिळालं. त्याने आम्हाला एक दुसऱ्यांविषयी समजायला मदत केली. मी भावनिक आहे आणि ती व्यावहारीक आहे. आता आम्ही एकमेकांच्या असण्याचा आदराने स्वीकार केला आहे.”
लग्न ठरलेल्या जोडप्यांना समुपदेशनाने एकमेकांना समजून घेता येतं…
कोहली म्हणतात की लग्नपूर्व समुपदेशन हे संभाव्य अडचणींचा सामना करणं आणि जोडप्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधून त्यांना भावनिकरित्या एक होण्यासाठी मदत करतं. आनंद आणि सोनाली यांची आधी वैयक्तिक व नंतर एकत्रित सेशन्स झाली. त्यात त्यांनी आपल्या गरजा, अपेक्षा, भीती यावर चर्चा केली. आनंद सांगतो, “मी आधी आपल्या पद्धतीने बोलायचो. आता तसं नाही करत. तिला बोलायची संधी देतो. तिचं मत विचारतो. मगच पुढे जातो.” आता त्यांची भांडणं कमी झाली आहेत आणि लग्न ठरल्याप्रमाणे होणार आहे. पण नेहमीच असा सुखद अंत होत नाही. काही जोडपी अलगही होतात.
कोहली सांगतात, “कौन्सिलिंगच्या वेळी मोठी विसंगती, गंभीर अडचण, चिंता बाहेर येऊ शकते. मी अशा गोष्टी लपवत नाही. त्यावर विचार करायला त्यांना सांगते. काही वेळेस जोडप्यांना वाटतं की ते कदाचित एकमेकांसाठी योग्य नाहीत. त्यावेळी त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मी मदत करते.” कोहलींनी एका अभ्यासाचा आधार देत सांगितलं की प्री-मॅरेज कौन्सिलिंगमुळे घटस्फोटाची शक्यता कमी होते. समुपदेशन न करणाऱ्या विवाहित जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ५० टक्के असते. तर समुपदेशन घेणाऱ्या जोडप्यांमध्ये हेच प्रमाण २० टक्के किंवा त्याहून कमी असतं.
रिचा होरा यांचे कामाचे दिवस व्यस्त असतात. आठ वर्षांपूर्वी त्यांनी समुपदेशनाचं काम सुरू केलं तेव्हा ते मोफत असायचं. महिन्यात एक-दोन जोडपी त्यांच्याकडे यायची. आता रोज सहा-सात जोडपी त्यांच्याकडे येतात. होरा त्यांच्यासाठी “know your partner” ही पद्धत वापरतात. जोडप्यांना त्या त्यांच्या भीतिविषयी विचारतात. त्यांच्या स्वभाविषयी जाणून घेतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात. वाढते घटस्फोट, प्रेमभंगाची भीती, लग्न विफल होण्याची भीती यामुळे अनेक जोडपी समुपदेशनासाठी येत आहेत.
घटस्फोट, प्रेमभंग, लग्न विफल होण्याची भीती
होरा सांगतात, “लोकांना याची भीती वाटते की लग्नानंतर त्यांचा जोडीदार बदलेल. समाजात लग्नाचं महत्त्व खूप वाढवून ठेवलं आहे. पण लग्न ही कठीण प्रक्रिया असते. त्यासाठी तयार असण्याची गरज असते. तुम्ही पूर्ण माहिती घेऊन यात उतरायला हवं. समुपदेशनाने तुम्हाला याची माहिती व ज्ञान मिळतं की तुम्ही कुठे जाणार आहात आणि तुमच्या जगण्याला कोणत्या दिशेनं न्यायचं आहे. निष्ठा, पैसा आणि कुटुंब नियोजन याविषयी जोडप्यांना बोलायचं असतं. लग्नानंतर आपल्यातील प्रेम कमी होईल अशीही अनेकांना भीती असते. आपल्याला काम करू दिलं जाईल की नाही अशी बायकांना भीती असते. समुपदेशनात या सर्व गोष्टींवर बोललं जातं.”
लग्नात मोठे विवाद नसतात. रोजच्या जगण्यातील गोष्टी असतात. लग्नाआधीच्या अपेक्षा आणि हनिमून फेज उलटल्यावर जे काही समोर येईल त्याचा सामना करण्यासाठी याने मदत होते. होरा सांगतात की लग्नाआधीच्या अपेक्षा लग्नानंतर लगेच बदलून जातात. दोघेही या विचाराने स्वस्थ बसतात की आता आपण एकत्रच राहणार आहोत. त्यामुळेच अनेकांना आपले जोडीदार बदलले आहेत असं वाटतं. समुपदेश जोडप्यांना एकाच पातळीवर घेऊन येतात. ज्यामुळे संभाव्य भांडणं कमी होतील. जोडी कौन्सिलर शान सिंह सांगतात, “समुपदेशनात आम्ही सांगतो की एकमेकांसोबत पैसा, कुटुंब, मुले यांच्यात ताळमेळ कसा बसवायचा ते. सामान्य गोष्टी असतात. मुलं किती पाहिजेत, दोघांच्या आई-वडिलांची भूमिका काय असेल आणि ते कुठे राहतील वगैरे.”
‘प्री-मॅरेज कौन्सिलिंग’साठी बराच पैसा मोजावा लागतो
लग्नपूर्व समुपदेशन काही स्वस्त नाही. होरा यांचा 12 ते 20 सेशन्सचा कोर्स 25 हजारापासून सुरू होतो. कोहली अर्ध्या तासासाठी 5 हजार रुपये घेतात. सैनी आणि आनंद यांनी 20 सेशन्स केले ज्याची किंमत प्रती सेशन 1500 रुपये होती. कोहली म्हणतात, “भारतीय लग्नावर लाखो रुपये खर्च होतात. तुलनेत कौन्सिलिंगवर फार कमी खर्च होतो. पण त्याचे परिणाम चांगले मिळतात- कमी संघर्ष, चांगला संवाद आणि लग्न टिकण्याची हमी.” तरीही अनेक लोक इतका पैसा खर्च करायला कचरतात. होरा याला नात्यातील गुंतवणूक म्हणतात. पण हा विचार शहरी भारतात आता कुठे रुजत आहे. “भारतात अशा सेवेसाठी पैसे खर्च करणं सामान्य गोष्ट नाही.
काही लोक याला जास्तीचा खर्च समजतात. पण तरीही याला प्रतिसाद मिळतोय. मुली यासाठी जास्त तयार आहेत आणि खर्च करायला घाबरत नाहीत,” सिंह सांगतात. सिंह ग्राहकांच्या गरजेनुसार आपल्या सेवा बदलतात. होरा पण त्याच प्रकारे काम करतात. जोडपे ठरवतात की त्यांना कशाची गरज आहे. “काही लोक दोन वर्षांपासून माझ्याकडे येत आहेत तर काही चार सत्र माझ्याकडे आलेत. त्यांना समाधान मिळालं,” होरा सांगतात. सोनाली आणि आनंद यांच्यासाठी पैसे खर्च करणं योग्य ठरलं. त्यांची चिंता मिटली. आता त्यांना लग्नाची उत्सुकता आहे. सोनाली सांगते, “माझा विश्वास बसत नाही की महिन्याभरा पूर्वी मी या लग्नातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती म्हणून. आता मी माझ्या लेहंग्यासाठी मॅचिंग बांगड्या शोधत आहे. सगळेच म्हणतात की लग्न कठीण असतं पण मी या युद्धासाठी आता तयार आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






