बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. छत्रपती शिवाजीराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेचा पाया घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली. कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर आण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी होते. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते. ते अत्यंत मानवतावादी होते. कर्मवीरांनी शिक्षण संस्था उभारून पैसा कमावला नाही, परंतु स्वतःच्या कमाईचा सर्व पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईनी मंगळसूत्रासह सर्व दागिने गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोडले. म्हणूनच आण्णांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते. त्यांचे संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रातिसिंह नाना पाटील यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका नाट्यमय प्रसंगाची आठवण आम्ही करून देत आहोत. भाऊरावांनी त्यांच्या काळात दोनदा आत्महत्येचा प्रयत्न का केला होता याची ही कहाणी…

11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक कार्यकर्त्यांची सभा होऊन ‘श्री शाहू सत्यशोधक समाज’ स्थापन करण्यात आला आणि याच सभेत भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आण्णासाहेब लठ्ठे यांची उपाध्यक्षपदी निवड केली. असे असतानाच 1910 पासूनच कोल्हापूर दरबारातील दोन गटांत हेवेदावे सुरू झाले होते.
पहिला गट सनातनी, सरंजामी विचारांचा आणि प्रतिष्ठित मराठ्यांचा होता. या गटाचे नेतृत्व खंडेराव गायकवाड करीत होते, तर दुसरा गट नवशिक्षित तरुणांचा, शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण करणाऱ्या तरुणांचा होता. या गटाचे नेतृत्व भास्करराव जाधव यांच्याकडे होते. गायकवाड गटास सरदार, वतनदार धनाढ्य जैन व्यापारी यांचा पाठिंबा होता तर जाधव गटात आण्णासाहेब लठ्ठे, महादेवराव डोंगरे, खंडेराव बागल, बाबुराव यादव, भास्करराव जाधव अशा मध्यमवर्गीय सत्यशोधकांचा समावेश होता.
महाराजा एडवर्ड आणि महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्यांना डांबर फासले
या पार्श्वभूमीवर 14 फेब्रुवारी 1914 रोजी कोल्हापुरात महाराजा एडवर्ड आणि महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्यांना डांबर फासण्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्येही उमटले आणि शाहू महाराजांच्या स्थानास व प्रतिष्ठेस धक्का बसला. गुन्हेगाराला शोधून काढणाऱ्यास पाच हजारांचे इनाम शाहूंनी जाहीर केले. डांबर प्रकरणाच्या आधी, शाहू महाराजांचे आणि सत्यशोधक समाजातील पुढाऱ्यांचे संबंध अतिशय चांगले होते. परंतु महाराजांनी स्थापन केलेल्या वैदिक शाळेची जबाबदारी भास्करराव जाधव, लठ्ठे यांनी नाकारली त्यामुळे महाराजांचा रोष ओढवून घेतला होता. याचा फायदा घेत गायकवाड गटाने महाराजांना डांबर फासण्याचे काम सत्यशोधकांनी केल्याची चुकीची बातमी दिली आणि चुकीचा खटला सुरू करून कटकारस्थाने करण्यास कल्लप्पा भरमप्पा निटवेशास्त्री यांनी सुरुवात केली.

भाऊराव गरजले, अण्णा तुमच्या धमकावणीने मी गुरुद्रोह करणार नाही!”
साताऱ्यात असलेल्या भाऊराव पाटलांना तार करून कोल्हापुरात बोलावण्यात आले. साक्षीदार म्हणून भाऊराव पाटील यांनी लठ्ठे यांच्याविरोधात साक्ष देण्याची योजना निटवे यांनी भाऊरावांना सांगितली. कोल्हापुरात जैन वसतिगृहात असताना लठ्ठे यांनी भाऊराव पाटील यांना बेशिस्तीच्या कारणास्तव हकालपट्टी केली होती. त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असे निटवेशास्त्री सांगत होते. सर्व विचारांती भाऊराव पाटील यांनी निटवेशास्त्री यांना उत्तर दिले,” अण्णा तुमच्या धमकावणीने मी गुरुद्रोह करणार नाही हे पक्के लक्षात ठेवा!” यानंतर निटवे यांनी भाऊराव पाटील यांनी आपली प्रेस जाळल्याचा आणि हजार रुपये चोरीचा चुकीचा आरोप भाऊराव पाटील यांच्यावर केला.
त्यांना अटक करण्यात आली. डांबर प्रकरणात भाऊराव पाटील हेच प्रमुख आहेत असे भासविले. खटला सुरू झाला. कोल्हापूर संस्थानातील पोलिसांनी भाऊरावांनी कबुली द्यावी यासाठी अतोनात छळ केले. साक्षीदार म्हणून साताऱ्यात भाऊराव पाटील ज्यांच्या घरात राहतात त्या अंबुबाई मुद्रावळे यांना उभे केले. मात्र अंबुबाई यांनी खोटी साक्ष देण्यास नकार दिला. साक्षीदार शोधण्यासाठी रा.ह.पागे या सीआयडी अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्याने साताऱ्यातील गणपत मांग याला कोर्टात उभे केले. समोर भाऊराव पाटील यांना पाहताच तो त्यांच्या पाया पडला. खोटी साक्ष देण्यास नकार दिला .कारण त्याच्या पोराला मांगवाड्यात जाऊन कर्मवीरांनी शिकवले होते.

विहिरीत उडी मारून आणि रॉकेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
या सबंध खटल्यात शारीरिक छळाला कंटाळून बाहेर जाण्याचे निमित्त करून भाऊरावांनी विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला.
मात्र विहिरीत बराच गाळ असल्याने ते वाचले. त्यानंतर दुसऱ्या वेळेस रॉकेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातूनही वाचले. डांबर प्रकरणात साक्षीअभावी खटला सिद्ध होत नाही हे पाहून भाऊरावांना आत्महत्या करण्याच्या आरोपात खटला भरण्यात आला. त्यात ते निर्दोष सुटले. मग दुसऱ्या आत्महत्या करण्याच्या आरोपाखाली खटला भरला. त्यात त्यांना शिक्षा झाली. भाऊराव पाटील तुरुंगात असताना शाहू महाराजांच्याकडे त्यांच्या मातोश्री गंगाबाई यांनी विनंती केली. महाराजांनी त्यांना चांगला वकील देण्यास सांगितले आणि त्यांच्यासाठी सर्व शिध्याची व्यवस्था केली गेली. अखेर भाऊरावांची सुटका झाली.






