टीम बाईमाणूस
- नॉर्वेमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न दिल्याने वाद.
- नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांच्या प्रश्नानंतर भारतीय परराष्ट्र अधिकाऱ्यांनाही कठोर सवालांचा सामना.
- ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये भारताच्या १५७व्या क्रमांकाचा उल्लेख करत पत्रकारांची भूमिका स्पष्ट.
- “मी कोणत्याही प्रकारची विदेशी गुप्तहेर नाही,” म्हणत हेले लिंग यांनी ऑनलाईन आरोप फेटाळले.
- या घटनेवरून राहुल गांधींची मोदींवर टीका; “साध्या प्रश्नांपासूनही पंतप्रधान घाबरतात” असा आरोप.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्यादरम्यान नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार निवेदानावेळी माध्यमांशी कोणताही संवाद न साधल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नॉर्वेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देता पंतप्रधान पुढे निघून गेल्याने, परराष्ट्र मंत्रालयाच्या नंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय अधिकाऱ्यांना तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला.
पत्रकारांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत विचारले की, पंतप्रधानांनी जगातील सर्वात स्वतंत्र माध्यम व्यवस्था असलेल्या देशात (नॉर्वे) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे का दिली नाहीत? पंतप्रधान मोदी सध्या त्यांच्या पाच देशांच्या युरोप दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात नॉर्वेमध्ये असून, संयुक्त अरब अमिराती (युएई), नेदरलँड्स आणि स्वीडनला भेट दिल्यानंतर ते ओस्लो येथे पोहोचले होते आणि १९ मे रोजी ते इटलीला रवाना होणार आहेत.

ही मूळ घटना ओस्लो येथील शासकीय अतिथीगृहात घडली, जिथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपली विधाने पूर्ण केली. यानंतर, 'दागसाविसेन' या वृत्तपत्राच्या भाष्यकार आणि पत्रकार हेल लिंग स्वेन्ड्सन यांनी उभे राहून थेट प्रश्न विचारला,
"पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यम व्यवस्थेकडून काही प्रश्न का घेत नाही?"
मात्र, पंतप्रधान मोदींनी या प्रश्नाचे कोणतेही उत्तर न देता तिथून थेट काढता पाय घेतला. या घटनेनंतर हेल लिंग यांनी सोशल मीडियावर लिहिले की,
‘’प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर आहे; त्यामुळे आपल्यासोबत सहकार्य करणाऱ्या जागतिक नेत्यांना प्रश्न विचारणे हे आमचे कर्तव्य आहे.’’
परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका: भारतात प्रेस स्वातंत्र्य
या चघटनेनंतर भारतीय दूतावासाने हेल लिंग यांच्यासह इतर पत्रकाराना रात्रीच्या अधिकृत ब्रीफिंगला आमंत्रित केले, जिथे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज आणि या पत्रकारादरम्यान तीव्र शाब्दिक चकमक उडाली. सचिव सिबी जॉर्ज यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांचे समर्थन करताना सांगितले की, अनेक परदेशी निरीक्षक भारताची अथांग व्याप्ती आणि लोकशाहीची गुंतागुंत न समजून घेता केवळ काही अज्ञानी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) अहवालांवर आधारित मते बनवतात. त्यांनी स्पष्ट केले की, भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान करते आणि देशात शेकडो टीव्ही चॅनेल्स व स्वतंत्र माध्यम व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.
परदेशी पत्रकाराला उत्तर देताना सीबी जॉर्ज म्हणाले, "भारतातील माध्यमांची ताकद काय आहे, याची तुम्हाला कल्पना नाही. रोज संध्याकाळी आमच्याकडे किती ब्रेकिंग न्यूज येतात, किती चर्चा रंगतात हे तुम्हाला माहिती आहे का? एकट्या दिल्लीतच इंग्रजी, हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील किमान 200 हून अधिक टीव्ही चॅनेल्स चोवीस तास सुरू असतात. लोकांना भारताच्या विशाल व्याप्तीचा अंदाजच नाही. ते एखाद्या कुठल्यातरी अज्ञानी NGOचा एक-दोन अहवाल वाचतात आणि थेट येऊन भारतावर प्रश्न उपस्थित करतात."
(पत्रकार हेल लिंग स्वेन्ड्सन)
परराष्ट्र सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची बाजू मांडताना जागतिक व्यासपीठावर खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.
- "आम्ही जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक-षष्ठांश (1/6) आहोत, पण आम्ही जगाच्या समस्यांचा एक-षष्ठांश भाग मात्र नक्कीच नाही."
- "आमच्याकडे एक मजबूत संविधान आहे, जे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांची हमी देते. जर कोणाच्याही अधिकारांचे उल्लंघन झाले, तर त्यांना थेट न्यायालयात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे."
- "आम्ही समानता आणि मानवी अधिकारांवर विश्वास ठेवतो. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच आम्ही देशातील महिलांना मतदानाचा अधिकार दिला. जगातील अनेक विकसित देशांना त्यांच्या महिलांना हा अधिकार देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक दशके वाट पाहावी लागली होती."
- "मानवाधिकारांचे सर्वात मोठे आणि जिवंत उदाहरण काय आहे? तर सरकार बदलण्याचा अधिकार, गुप्त मतदानाचा अधिकार! भारतात हेच घडत आले आहे आणि आम्हाला आमच्या लोकशाहीचा सार्थ अभिमान आहे."
(सिबी जॉर्ज)
“मी कोणत्याही प्रकारची विदेशी गुप्तहेर नाही,” - पत्रकार हेले लिंग
दरम्यान नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारला, त्यावरून त्यांच्या हेतूबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही लोकांनी आरोप केला की, भारताशी संबंधित मुद्द्यांवर पाश्चात्य माध्यमांचा एक वर्ग नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. पत्रकार हेले लिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सलग अनेक पोस्ट शेअर करत आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये नॉर्वेच्या अव्वल क्रमांकाचा आणि भारताच्या १५७व्या क्रमांकाचाही उल्लेख केला. तसेच, सत्तेत असलेल्या व्यक्तींना प्रश्न विचारणं हेच पत्रकारितेचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या वक्तव्यांनंतर झालेल्या टीका आणि ऑनलाईन हल्ल्यांना उत्तर देताना हेले लिंग यांनी. “मी कोणत्याही प्रकारची विदेशी गुप्तहेर नाही,” असं ठामपणे सांगत स्वतःवरील आरोप फेटाळून लावले.
पत्रकार हेले लिंग यांनी म्हटलं की, पत्रकारिता अनेकदा संघर्षपूर्ण असू शकते आणि पत्रकारांची जबाबदारी म्हणजे आधीपासून तयार केलेली उत्तरं स्वीकारण्याऐवजी थेट उत्तरांची मागणी करणं होय. सार्वजनिक व्यक्ती प्रश्नांची उत्तरं देणं टाळत असतील, तर अधिक स्पष्ट उत्तर मिळवण्यासाठी पत्रकार त्यांना मध्येच थांबवून पुन्हा प्रश्न विचारू शकतात.

राहुल गांधी यांची जोरदार टीका
या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भारतातही तीव्र राजकीय पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार हेल लिंग यांची पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "जेव्हा लपवण्यासारखे काही नसते, तेव्हा घाबरण्याचेही काही कारण नसते. जगासमोर जेव्हा एका दबावाखाली असलेल्या पंतप्रधानांना काही साध्या प्रश्नांपासून घाबरून पळताना पाहिले जाते, तेव्हा भारताच्या प्रतिमेचे काय होते?" राहुल गांधींच्या या थेट टीकेमुळे या मुद्द्यावरून देशांतर्गत राजकारण कमालीचे तापले आहे.






