टीम बाईमाणूस
- पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले तारपावादक भिकल्या धिंडा आजही अतिशय गरिबीत आयुष्य जगतात…
- त्यांची हलाखीची परिस्थिती असून मुलं आणि नातवंडाना कायमस्वरुपी नोकरी देण्याची विनंती भिकल्या धिंडा यांनी केली आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आपल्याला खूप आनंद झाल्याची भावना भिकल्या धिंडा यांनी व्यक्त केली असली तरी कुटुंबामध्ये कायम रोजगाराचे साधन किंवा नोकरी उपलब्ध नसल्यामुळे आमची हलाखीची परिस्थिती असून आपली मुले आणि शिक्षण घेणाऱ्या नातवंडांना कायमस्वरूपी रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांचे नातू जगदीश धिंडा यांनी शासनाकडे केली आहे.
आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या 'तारपा' वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा 'पद्मश्री' पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ते 'तारपा' या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या माध्यमातून वारली संस्कृतीची सेवा करत आहेत. त्यांच्या या निस्सीम सेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. भिकल्या धिंडा () यांचे नाव पद्म पुरस्कारांच्या यादीत झळकताच त्यांच्या गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. "हा केवळ भिकल्या दादांचा सन्मान नसून, हा संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा आणि कष्टकरी कलाकारांचा सन्मान आहे," अशा भावना स्थानिक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.
आजही भिकल्या धिंडा अतिशय गरीबीत जीवन जगत आहेत.
भिकल्या धिंडा यांनी आपले संपूर्ण आयुष्य तारपा वादन आणि तारपा नृत्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी खर्ची घातले आहे. त्यांना आतापर्यंत विविध संघटना आणि संस्था यांच्याकडून २० पेक्षा अधिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या घराच्या भिंती मिळालेले पुरस्कार आणि सन्मानचिन्हाने भरून गेल्या आहेत. मात्र स्वतः भिकल्या धिंडा आणि त्यांचे कुटुंबीय आज ही अतिशय गरीबीत जीवन जगत आहेत.
भिकल्या लाडक्या धिंडा हे आपली पत्नी ताई, दोन मुलगे यशवंत आणि चंद्रकांत व आठ नातवंडे मिळून एकत्र कुटुंबात राहतात. संपूर्ण कुटुंबाकडे एक एकर आठ गुंठे जमीन असून पावसाळ्यामध्ये भाताचे उत्पन्न घेऊन संपूर्ण वर्षभर त्यावर गुजराण करतात. भिकल्या धिंडा यांना सरकारकडून वृद्ध कलावंत योजनेमधून महिन्याला पाच हजार रुपयांचे अनुदान मिळते, मात्र त्यांची दोन्ही मुले कायमस्वरूपी रोजगार नसल्यामुळे तुटपुंज्या रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार आणि मुलांच्या शिक्षणाचा भार उचलत आहेत. तारपा वादक भिकल्या धिंडा यांना वर्षभरापूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता, त्यामुळे त्यांच्या हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र वृद्धावस्था आणि शारीरिक व्याधींचा बाऊ न करता ते अनेक कार्यक्रमांमध्ये तारपा वादन करून कलेच्या प्रचार प्रसारासोबत नागरिकांची करमणूक करीत आहेत
माझ्या नातवंडांना कायमस्वरुपी नोकरी द्या - भिकल्या धिंडा
भिकल्या लाडक्या धिंडा यांना अतिशय प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व स्तरातील अनेक मान्यवर व्यक्तीनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. समाज माध्यमांवर देखील त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू रानी जाखड, आदिवासी विकास प्रकल्प जव्हार च्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी भिकल्या धिंडा यांच्या वाळवंडा येथील घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आपल्याला खूप आनंद झाल्याची भावना भिकल्या धिंडा यांनी व्यक्त केली, मात्र कुटुंबामध्ये कायम रोजगाराचे साधन किंवा नोकरी उपलब्ध नसल्यामुळे हलाखीची परिस्थिती असून आपली मुले आणि शिक्षण घेणाऱ्या नातवंडांना कायमस्वरूपी रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांचे नातू जगदीश धिंडा यांनी शासनाकडे केली आहे.






