(सागरिका किस्सू)
एका तथाकथित मृत युवकाला स्टेजवर आणलं जातं. जीन्स आणि ब्लेझर घातलेला एक माणूस त्या युवकाच्या कपाळाला स्पर्श करतो, त्याच्या कानात काहीतरी पुटपुटतो आणि मृत युवक जीवंत होतो. जमलेले लोक ओरडतात, ‘हालेलुईया!’
चार वर्षांपूर्वी जालंधरच्या ताजपूर गावाचा पादरी बजिंदर सिंह याच्याशी सुनीता कुमारीची भेट याच कार्यक्रमात झाली होती. सुनीता उत्तर प्रदेशची एक भंगार गोळा करणारी मुलगी होती व मैत्रिणीसोबत प्रेक्षकांत उभी होती. सुनीता, त्यांची दोन मुलं आणि इतर शेकडो बायका त्यानंतर निरंतर अशा कार्यक्रमांत सामिल होत आहेत. बजिंदर सिंह त्यांच्यासाठी फक्त पादरी नाहीतर ‘पापा’ आहेत. 
‘मेरा येसू’ फेम पापा बजिंदर सिंह बलात्कार प्रकरणात दोषी
पण 42 वर्षीय पापा बजिंदर सिंह आता अडचणीत आले आहेत. 2018 मध्ये जीरकपूर येथील एका महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तिला मारहाणही झाली होती. पापाला तेव्हा अटक झाली पण जामिनही मिळाला. आता याच प्रकरणात पुन्हा गैर-जामीन वारंट काढण्यात आलं आणि आज झालेल्या एका सुनावणीत मोहाली जिल्हा न्यायालयाने त्या 8 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात पाद्री बजिंदर सिंगला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात न्यायालय आता 1 एप्रिल रोजी निकाल देणार असून न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी पापाला न्यायालयीन कोठडीत घेतले आहे.
न्यायालयाचा निर्णय येताच पीडितांमध्ये आनंदाची लाट पसरली. पीडितांनी सांगितले की, आज त्यांना न्याय मिळाला आहे. आजपर्यंत ही लढाई लढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मोहाली न्यायालयाने आज बर्जिंदरची शिक्षा जाहीर केलेली नाही. यासाठी 1 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाने पास्टर बजिंदरला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पीडितीने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्यावर विविध प्रकारचे दबाव आणण्यात आले. आम्हाला धमक्या देण्यात आल्या. पापाने स्वतः 6 महिने तुरुंगात काढले आहेत. परंतु सरकार आणि जनतेच्या सहकार्याने अखेर आम्हाला न्याय मिळाला आहे. देवाने पाद्रीला त्याच्या दुष्कृत्यांसाठी शिक्षा दिली आहे. आता आम्हाला फक्त एवढंच वाटतं की त्याला सर्वात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून तो भविष्यात असे पाप करण्याचा प्रयत्न करू नये.
या आरोपाशिवाय पादरी बजिंदर सिंहवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. कपूरथळाच्या 22 वर्षीय मुलीनं त्याच्यावर लैंगिक शोषण व पाठलागाचे आरोप केले आहेत. बाधित मुलीनं तक्रार केलीय की पापानं तिचा मिनिस्ट्रीच्या वर्शिप टीममध्ये समावेश झाल्यानंतर थेट संपर्क सुरू केला आणि लैंगिक शोषण केलं.
… पण तरीही पापाच्या लोकप्रियतेने कळस गाठला, बॉलिवूडदेखील सहभागी
इतकं असूनही या सर्वांचा पापाच्या समर्थकांवर काही परिणाम पडलेला नाही. त्यांनी पापाच्या समर्थनासाठी मोर्चे काढले, आंदोलन केलं. पापा त्यांच्यासाठी एक चमत्कारी हिलर, येशू आहे ज्याची इमेज लोकांना चमत्कारानं बरं करण्याची आहे व सोशल मीडियावर ती फोफावली आहे. पापाच्या कार्यक्रमांत तुषार कपूर, चंकी पांडे, सुनील शेट्टी, अरबाज खान, महिमा चौधरी, राखी सावंत सारखे तथाकथित सेलिब्रिटीही सामिल झाले आहेत.
2024 मध्ये ताजपूर येथे ख्रिसमस कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूडचे कलाकार गेले होते व पापानं त्यांचं भविष्यही सांगितलं. लोकांचा त्याला पाठींबा आहे त्यामुळे आता नेतेही त्याच्या मागे लागले आहेत. पादरी बजिंदर सिंह मिनिस्ट्रीच्या युट्यूब चॅनेलचे 3.12 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत व इन्स्टाग्रामवर 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 
पापाची लोकप्रियता भारतातील तथाकथित धर्मगुरूंइतकीच आहे. ताजपूरचे लोकं त्याच्यात आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम याच्यात समानता बघतात. लोकं म्हणतात की, पापाचीही बाबाप्रमाणे हालत होणार आहे. पापानं मागील काही वर्षांत पंजाबसोबतच युपी, बिहार इथं आपल्या समर्थकांची एक कट्टर सेना तयार केली आहे. ते पापावरचे आरोप खोटे असल्याचे सांगतात आणि त्याच्या भूक्कड चमत्कारांचे व्हिडीयो व्हायरल करतात. ताजपूरचे लोकं म्हणतात की, आता इथं पूर्वीसारख्या मोठ्या सभा होत नाहीत. 5 मार्चच्या सभेत जेमतेम 300 लोक आले होते. एका बॅरीकेडमुळे स्टेजपासून लोक वेगळे झाले होते. येशूची गाणी गायली जात होती.
“जब से तू मिल गया है मसीह नासरी और ख्वाहिश नहीं कुछ पाने की”
अशा वातावरणात काळा ब्लेझर आणि जीन्स घातलेला एक उंच, सडपातळ माणूस येतो जो पापासारखाच दिसतो. हा पादरी रवींदर सिंह आहे, पापाचा मोठा भाऊ, बडे पापा. रवींदर भावाप्रमाणे लोकप्रिय नाही पण बजिंदरचा गुरू म्हणून लोकं त्याला मान देतात. त्याचे समर्थक म्हणतात की, बडे पापा प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत पण तेही शक्तीशाली चमत्कारी पुरुष आहे.
|
संबंधित लेख वाचा: |
हालेलुईया… असं म्हणताच मृत युवक चक्क जिवंत
रवींदर हातात माईक घेतो आणि ओरडतो, “हालेलुईया! तुझा विश्वासच तुला बरं करेल.” लोकांच्या गर्दीतून एक महिला साधक समोर येते, तिचं शरीर हलत असतं, तिचा चेहरा विकृत आहे, डोळे वरती लागलेले आहेत. ती जमिनीवर बसते आणि सापाप्रमाणे तिचे हात डोलू लागतात. तिच्या तोंडातून फुत्कार बाहेर पडतात.
रवींदर ओरडतो, “सारा वाईटपणा बाहेर येईल. तुझ्यातला साप बाहेर येईल. बाहेर ये सापा, बाहेर ये वाईटा!” ती बाई आणखी हिडीसपणे जमिनीवर लोळू लागते. एक सेक्युरीटी महिला तिच्या शरीरावर दुप्पटा ओढून तिचं शरीर झाकू लागते. पण ती परत जाताच ती बाई आणखी वेगानं लोळू लागते. आता रवींदर स्टेजवरून उतरतो आणि लोकांकडे जातो. लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो. तिथल्या साऱ्या बायका एक-एक करून आधीच्या बाईप्रमाणे जमिनीवर लोळू लागतात, रडू लागतात.
रवींदर बुधवारी शेकडो लोकांसाठी सभा घेतो. रविवारीही एक वेगळी सभा असते. यावेळी मिनिस्ट्रीतील हजारो लोक गावात येतात. बजिंदर यात सहभाही होत असतो. पंजाबच्या कानाकोपऱ्यातून लोक या सभेसाठी ताजपूरला येतात. या छोट्या गावात त्यांची गर्दी होते. ताजपूरच्या स्थानिकांसाठी मिनिस्ट्रीच्या या सभा म्हणजे दोन भावांच्या कौटुंबिक व्यापारापेक्षा जास्त काही नाही.
जे अशा, उपचार व आरोग्याच्या शोधात येणाऱ्या सामान्य लोकांच्या दयनीय परिस्थितीचा फायदा उचलून पैसे कमावतात. संपूर्ण गाव हताशपणे हा सारा तमाशा बघत उभा असतो. ताजपूरच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंह यांच्या प्रतिमा आहेत. इथून एक मध्यम आकाराचा रस्ता घरांच्या गर्दीतून एका गुरूद्वारासमोरील मैदानाकडे जातो जिथं मिनिस्ट्री आहे. रविवारी हा रस्ता बजिंदरच्या समर्थकांनी भरलेला असतो. लोकांना आता रविवारची धास्ती वाटू लागली आहे. 
पापासाठी बाहेरून येणाऱ्या लाखो भक्तांचा गावाला प्रचंड त्रास
55 वर्षीय मदन लाल, पंच, सरपंच आणि पोलिसांकडे गेले आहेत पण या पादरी भावांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. लाल म्हणतात की त्यांना आता रविवारी घराबाहेर पडण्याची भीति वाटते. लाल सांगतात, “रविवारी या गावात लाखभर लोकं येतात. बस, ऑटोरिक्षा, कारमध्ये बसून. असं वाटतं की त्यांनी आमच्या गावावर चढाई केली आहे. आम्ही ताकीद देऊनही ते इथल्या गुरूद्वारातील बेसिनमध्ये लघवीही करतात.”
गावच्या सरपंच सरबजीत कौर आहेत, ज्या सांगतात की गावात दलितांची वस्ती जास्त आहे व ते आंबेडकरांना मानतात. गावातून कोणी चर्चमध्ये जात नाही. बाहेरचे लोकच इथं मिनिस्ट्रीत येतात. कौर सांगतात की मिनिस्ट्रीच्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी गावात सगळीकडे मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेले पोस्टर्स, बॅनर्स लागतात. कौर सरपंच झाल्यानंतर बजिंदरने त्यांना ट्रॅक्टर देऊन त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं होतं पण कौर यांनी त्याला नकार दिला. आणखी एक पंच सांगतात की मिनिस्ट्रीच्या भवताली एक लहानशी स्थानिक अर्थव्यवस्था तयार झाली आहे.
बाहेरगावचे लोक इथं येतात, इथल्या खोल्या भाड्यानं घेऊन राहतात. मिनिस्ट्री एका स्मशानाच्या जवळ आहे जिथली जागा विराण पडली होती. पण आता तिथं सारं काही बदललं आहे. पंच सांगतात, “इथं खोल्यांचं भाडं आधी दिवसाला १०० रुपये होतं. आता ते 500 रुपये आहे. इथं ज्यांची घरं आहेत ते आता इथं राहत नाहीत. ते पापाच्या समर्थकांना आपली घरं भाड्यानं देत आहेत.”
एक गावकरी प्रदीप सिंह सांगतात की, चर्च-कम-मिनिस्ट्री १० वर्षांपूर्वी झाली होती. ही जमीन कॅनडाच्या एका एनआरआयची होती. जेव्हा ती विकली गेली तेव्हा कोणाला माहिती नव्हतं की इथं चर्च उभारलं जाईल म्हणून. एक पंच सांगतात की, पापाकडे पैसा आहे, सत्ता आहे, लोकं आहेत त्यामुळे कोणी त्याच्याविरोधात बोलू शकत नाही. माजी सरपंच म्हणाले की जेव्हा गावकरी त्यांच्या विरोधात काही बोलतात तेव्हा त्यांना धमकावण्यात येतं. कोणी आमचं काही बिघडवू शकत नाही कारण आमच्याकडे पैसा आहे, लोकं आहेत, सत्ता आहे असं ते गावकऱ्यांना सांगतात.
दोन वर्षांपूर्वी इन्कम टॅक्सवाल्यांची पापाच्या चर्चवर धाड
2023 मध्ये आयकर विभागानं जालंधर व मोहाली येथील बजिंदरच्या चर्च ऑफ विजडम अँड ग्लोरी मिनिस्ट्री तसेच घरावर छापा मारला होता. रविवारच्या सभेतच बजिंदरच्या प्रार्थनांच्या बदल्यात लोकांकडून पैसा गोळा केला जातो. पंच सांगतात की, आम्ही अनेकांशी बोललो आहोत जे सांगतात की त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले पण त्यांना ते बरे करू शकले नाहीत. एका गावकऱ्यानं म्हटलं की मिनिस्ट्रीत गंभीर आजारानं ग्रस्त काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. अशावेळी त्यांच्या नातेवाईकांना जेवण, राशन, काही पैसे देण्याच्या बोलीवर मृतदेह चुपचाप घेऊन जायला सांगण्यात येतं. बाकी शवांचं काय होतं ते कोणाला माहिती नाही. 
कोण आहे हा पापा बजिंदर सिंह…?
बजिंदर एका रात्रीत लोकप्रिय झाला नाही. त्यानं पादरी झाल्यावर घरोघरी जाऊन प्रचार केला. लोक म्हणतात की, बजिंदर स्वतःचा परिचय करून द्यायचा आणि येशूचा प्रचार करायचा. त्यानं सोशल मीडियाचाही वापर केला. यातून त्याचे फॉलोअर्स वाढत गेले. लोकं येऊ लागले तसे बजिंदरने आपल्या खोट्या चमत्कारांचे व्हिडीयो पोस्ट करणं सुरू केलं. यातून देशभरातून त्याचे समर्थक वाढू लागले. ताजपूर पासून 1500 किमी दूर बिहारमधील पटना येथील एका तरुणाला बजिंदरचे व्हिडीयो पाहून धीर मिळाला.
तो पायाच्या आजारानं ग्रस्त होता. ही एप्रिल 2024 ची गोष्ट आहे. हा तरुण सोनू कुमार आपल्या लहान भावाकडे, धीरज कुमारकडे लंगडत गेला आणि म्हणाला की काहीही कर आणि मला पापाकडे घेऊन चला. धीरज सांगतो, “दादा म्हणाला की मला एकदा बजिंदर सिंहाकडे घेऊन चल. मी तसाही मरणारच आहे. जर तेही मला बरं करू शकले नाहीत तर मी नंतर काही मागणार नाही.” सोनूचा डावा पाय एका असाध्य आजारानं ग्रासलेला होता आणि डॉक्टरांनी तो बरा होण्याची आशा सोडली होती.
धीरज आपल्या भावाला घेऊन दुसऱ्या दिवशी ताजपूरला आला. एक खोली त्यानं भाड्यानं घेतली ज्याचं भाडं दिवसाला 100 रुपये होतं. मिनिस्ट्रीत त्यांना मोफत जेवण मिळायचं. चमत्कार होईल म्हणून ते रोज प्रार्थना सभेत जायचे. मग मिनिस्ट्रीत मिळणारं एका साध्या बाटलीतलं मलम त्यांना मिळालं. सोनूनं ते आपल्या पायाला लावलं आणि काही दिवसात त्याच्या परिस्थितीत सुधार होऊ लागला. धीरज सांगतो, “हा एक चमत्कार होता. मी आपल्या भावाला बरं होताना रोज बघत होतो. मी 20 दिवसांनी पटनाला परतलो. दादा, 40 दिवसांनी परतला. स्वतः चालत.”
मागील वर्षभरात धीरज पटनातील आपल्या गावातून सहा कुटुंबांना बजिंदरकडे घेऊन आला आहे. तो म्हणतो की, मी नावानं आणि धर्मानं हिंदू आहे पण मनातून ईसा मसिहचा फॉलोअर आहे. बजिंदरच्या समर्थकांमध्ये गरीब तसेच मध्यम वर्गातील अनेक समर्थक आहेत. मिनिस्ट्रीच्या बाहेर पंजाब पोलिसचा एक अधिकारी पहारा देत असतो. तो सांगतो की बजिंदर सिंह यांच्या चमत्कारामुळे मी आजीवन त्यांच्याप्रती वचनबद्ध झालो आहे. पंजाब प्रशासनाचे एक सरकारी अधिकारी सांगतात की ते एकदा एका कार्यक्रमाला गेले होते.
तिथं दोन्ही भावांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या पोटात रक्ताची गाठ आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सर्जरी करावी लागेल. “मला आधी ती सारी बकवास वाटली. पण दुसऱ्या दिवशी माझ्या लघवीतून रक्त येऊ लागलं. माझी तब्येत अचानक बिघडली. मला सर्जरीसाठी न्यावं लागलं. त्यानंतर मी रोज रविवारी मिनिस्ट्रीत येत आहे.” मंजीत सिंह याला सामाजिक-राजकीय अपयश म्हणतात आणि वैज्ञानिक विचार विकसीत करण्यावर भर देतात. ते असंही म्हणतात, “जेव्हा राजकीय नेतेच अशा चूकीच्या विचारांना मजबूत करत असतील तर हे कसं शक्य होणार? तेच जर महाकुंभ मध्ये आपले पाप धुण्यासाठी आंघोळी करत असतील व इतरांनाही त्यासाठी आग्रह करत असतील तर अशा समाजात वैज्ञानिक विचारसरणी कशी रुजेल?”
सोशल मीडियावर अनेक चमत्कारिक व्हिडियो
बजिंदरच्या इन्स्टाग्राम पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहे आणि ते आधी व नंतरच्या बदलाच्या कथांनी भरलेलं आहे. कोणी एक माणूस कुबड्या घेऊन चालण्यासाठी संघर्ष करतोय आणि बजिंदर येऊन त्याला स्पर्श करताच, मागे विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि तो माणूस कुबड्या फेकून चालायला लागतो. मग तो आपण आता बरे झाल्याची घोषणा करतो. अख्खं पेज अशाच व्हिडीयोंनी भरलेलं आहे आणि बॅकग्राऊंडला ‘मेरा येशू, मेरा येशू’ हे गाणं वाजत असतं. वर उल्लेखीत व्हिडीयोला 3000 हून जास्त लाईक्स आहेत व 146 कॉमेंट्स आहेत. त्यात ‘हालेलुईया’ आणि ‘आमिन’ जास्त आहेत. सारे बजिंदरच्या चमत्कारांची प्रशंसा करतात.
पूर्वी हे चमत्काराचे व्हिडीयो नव्हते. तेव्हा बजिंदर आपली कथा लोकांना सांगायचा. मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरील ‘मेरे बारे में’ सेक्शन मध्ये ही कथा आहे. सिंह यात दावा करतो की त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील सरकारी नोकरीही करायचे. आठवीत असताना बजिंदरला काही वाईट शक्तींमुळे त्रास झाला व ते चिडचीडे झाले पण या वाईट शक्ती कोणत्या होत्या त्याविषयी तो काही सांगत नाही. त्याला 18 महिने तुरुंगात राहावं लागलं होतं आणि त्यानं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. पण पेपरमध्ये आलेल्या बातम्या सांगतात की एका पादरीची हत्या केल्याच्या आरोपाखाली बजिंदरला ही शिक्षा झाली होती.
बजिंदर सांगतो, “मी तुरुंगात डिप्रेशनमध्ये गेलो आणि मरायचा विचार करू लागलो. रात्री मला खूप भीति वाटायची. मी अनेक देवांची प्रार्थना केली पण मला आराम पडला नाही. मग कोणीतरी मला बायबल दिलं.” बजिंदरचा दावा आहे की तुरुंगात त्याला मग एक पादरी भेटला ज्यानं त्याच्यासाठी प्रेयर केली त्यानंतर त्यानंही विश्वास ठेवणं, प्रेयर करणं आणि व्रत ठेवणं सुरू केलं. “देव माझ्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला की तू सुटला आहेस आणि यापुढे तू माझी सेवा करशील आणि मी लगेच सुटलो.”
अमृतसर भाजप जिल्हा कार्यकारीणी सदस्य बलजीत सिंह याच्यासाठी हे सारे आरोप पादरी बजिंदरला बदनाम करण्यासाठी झाले आहेत असं वाटतं. त्याचीही इतरांसारखीच एक कथा आहे. त्याला जपानमधून डिपोर्ट करण्यात आलं होतं. त्याचा सारा पैसा बुडाला होता. 25 लाखाचं कर्जही झालं होतं. तेव्हा त्याची भेट बजिंदरशी झाली आणि ज्यानं भविष्यवाणी केली की त्याचं नशिब बदलेल. दोन वर्षांत बलजीतनं आपलं सारं कर्ज फेडलं आणि आता तो अमृतसर मध्ये आरामात राहतोय. 
जेव्हा त्याला पापावरील आरोपांविषयी समजलं तेव्हा त्यानं पार्टीचं काम सोडलं आणि तो मिनिस्ट्रीत आला. पण तेव्हा पापा नेपाळला गेला होता. तो मग रविंदरला भेटला. आता तो पापाच्या येण्याची वाट बघतोय. शिख धर्माचा बलजीत स्वतःला ईसाई म्हणवतो पण पार्टीच्या प्रचारात तो जय श्रीरामचे नारेही लावतो. तो हसत म्हणतो, “माझ्या तोंडात राम आहे पण मनात येशूच आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






