निकिता रंजना अशोक सातपुते
- पिंक चड्डीला, निषेधाच्या प्रतीकात रुपांतरित करून कोणे एकेकाळी पिंक चड्डी चळवळीने, नैतिक अत्याचाराच्या मूर्खपणाला आव्हान दिले होते.
- 'पिंक चड्डी कॅम्पेन' हे टायटल त्या सर्व महिला आणि पुरुषांना सणसणीत उत्तर होते जे स्त्रियांच्या स्वातंत्र्याला संस्कृतीविरुद्ध असलेला मोठा गुन्हा समजत होते.
- काय आहे पिंक चड्डी चळवळ? ती घडण्यामागील पार्श्वभूमी काय होती?
‘पिंक चड्डी' हा स्त्रीलिंगी असलेला शब्द पहिल्यांदा आपल्या कानावर पडल्यावर आपल्याला काय वाटतं बरं ? एक बायकी वस्तू, परिधान करण्याव्यतिरिक्त या क्षुल्लक गोष्टीचा असा काय उपयोग होऊ शकतो? हा आता काहींसाठी हा चेष्टेचा किंवा विनोदाचा विषय होऊ शकतो. पण याच एका क्षुल्लक वाटणाऱ्या पिंक चड्डीला, निषेधाच्या प्रतीकात रुपांतरित करून कोणे एकेकाळी पिंक चड्डी चळवळीने, नैतिक अत्याचाराच्या मूर्खपणाला आव्हान दिले होते. असे आव्हान जे विनोदाची झालर असलेल्या धाडसी आव्हांनापैकी एक होते. या पिंक चड्डी कॅम्पेनने माध्यमांमध्ये हेडलाईन्स दिल्या.
इतकेच नाही तर या कॅम्पेनने फक्त निषेधापुरतेच मर्यादित न राहता निषेधाच्या क्षेत्राबाहेर सुद्धा स्त्री स्वातंत्र्यावर चर्चा घडवल्या. 'पिंक चड्डी कॅम्पेन' हे टायटल त्या सर्व महिला आणि पुरुषांना सणसणीत उत्तर होते जे स्त्रियांच्या स्वातंत्र्याला संस्कृतीविरुद्ध असलेला मोठा गुन्हा समजत होते. या चळवळीसाठी गुलाबी याच रंगाची जाणीवपूर्वक निवड केली होती. कारण 'हा रंग म्हणजे स्त्रीत्व आणि तुच्छतेशी संबंधित जोडला गेलेला रंग', अशी समाजातील काही सो कॉल्ड घटकांच्या अज्ञानी विचारसरणीला सुद्धा या चळवळीद्वारे सडेतोड उत्तर द्यायचे होते. जे या चळवळीने दिले सुद्धा. या पिंक चड्डी कॅम्पेनला फेब्रुवारीमध्ये सोळा वर्ष पूर्ण होतील.

काय आहे पिंक चड्डी चळवळ? ती घडण्यामागील पार्श्वभूमी काय होती?
स्त्रियांनी आपल्याला हवे तसे कपडे घालणे, पार्टी करणे यासारख्या गोष्टी आजही समाजाला मान्य नाही. जर स्त्रीने हे स्वातंत्र्य उपभोगण्याचे धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला तर तिला असंख्य टीकेला सामोरे जावे लागते. असेच एक अन्यायकारी उदाहरण कारण ठरले होते, भारतभरात गुलाबी रंगाची लाट पसरण्याचे. कर्नाटकातील मंगळुरुमध्ये महिलांना झालेल्या मारहाणीच्या त्रासदायक घटनेतून या 'पिंक चड्डी मुव्हमेंट'चा जन्म झाला.
फेब्रुवारी 2009 मध्ये मंगळूरमधील अम्नेशियाः द लाउंज या पबमधे आलेल्या तरुणींवर प्रमोद मुथालिक यांच्या नेतृत्वाखालील श्री राम सेना या कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटनेमधील सदस्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुलींना जबर मारहार करण्यात आली. भारतीय संस्कृतीचे कॉकटेल पिण्याच्या वेडापासून रक्षण करण्यासाठी केलेल्या या हल्ल्यावर, एका वृत्तसंस्थेने प्रकाश टाकला. त्यामुळे या प्रकरणावर अनेक चर्चा घडून आल्या. एकीकडे मुली आरोप करायल्या घाबरत होत्या तर दुसरीकडे हल्लेखोर जामिनावर सुटण्याच्या तयारीत होते.
या हल्लाचर्चा पूर्णविराम घेऊ पाहत होत्या तोच या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या मुथालिक यांनी आणखी एक घोषणा केली. श्री राम सेनेचा गट 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला सर्वांवर नजर ठेऊन असेल. जर आम्हाला कोणी अविवाहित जोडपे हा दिवस साजरा करताना दिसले तर आम्ही या जोडप्यांवर हल्ला करु. इतकेच नाही तर त्यांना मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून देऊ. कारण अविवाहितांनी सार्वजनिक ठिकाणी हा दिवस साजरा करणे हे हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध आहे.
व्हॅलेंटाईनला जोडपी दिसली तर…?
या अशा घटनांमुळे मंगळूरुरमध्ये दिवसेंदिवस हिंदू संस्कृतीच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणाऱ्या पितृसत्ताक, दमनवादी लोकांची दहशत वाढतच चालली होती. मुलींनी पबमध्ये जाणे 'अस्वीकार्य' असल्याचे घोषित करुन त्यांना मारहाण करणाऱ्या श्री राम सेनेसारख्या बनावट राष्ट्रवादी संघटनांना मुहतोड जवाब देणे गरजेचे होते. येऊ घातलेला व्हॅलेंटाइन्स डे जोरदार पद्धतीने साजरा होण्यासाठी आणि पबमधील तरुणींवर झालेल्या हल्ल्याविरुद्धच्या अराजकतेचा प्रतिकार करण्यासाठी स्त्रियांचा एक ग्रुप पुढे आला. हा ग्रुप होता मिहिरा सूद, ईशा मनचंदा, जसमीन पठेजा आणि तहलका मॅगेजीनची पत्रकार निशा सुसान यांचा.

या ग्रुपने रस्त्यावर उतरून निषेध न करता क्रिएटिव्हिटीला प्राधान्य दिले. ज्यामुळे ही चळवळ देशभर प्रसिद्ध तर झालीच पण हा निषेध व्यक्त करण्याच्या कृतीला हजारोंचा सहभाग लाभला. निशा सुसान यांच्या ग्रुपने फेसबुकवर 'कन्सोर्टियम ऑफ पब-गोइंग, लूज अँड फॉरवर्ड वुमन' असे नाव असलेला एक ग्रुप तयार केला. आणि या ग्रुपवर पबमधील मुलींवर झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून आम्ही 'पिंक चड्डी कॅम्पेन' हे कॅम्पेन रन करत आहोत अशी माहिती दिली.
त्यासाठी आम्ही प्रमोद मुथालिक यांच्या श्री राम सेनेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर गुलाबी चड्डी पाठवत आहोत. आम्ही आपल्याला अवाहन करतो की या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्हीही या पत्त्यावर गुलाबी चड्डी पाठवून येणारा लव्ह डे साजरा करा. असे सांगून त्यांनी या मेसेजसोबत मुथालिक यांच्या कार्यालयाचा पत्ता जोडून दिला होता.
… आणि 'पिंक चड्डी कॅम्पेन'ला अशी सुरुवात झाली
त्यांच्या या ग्रुपमध्ये पहिल्या दिवशी फक्त 500 सदस्य होते. पण सोशल मीडियावर हे आवाहन इतके गाजले की आठवडाभरातच या ग्रुपमधील सदस्यांची संख्या 500 वरून 30 हजारांपर्यंत गेली. उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटाच्या विरोधात अहिंसक मार्गाने निषेध करण्यासाठी हाती घेतलेली ही मोहीम चांगलीच यशस्वी झाली. फक्त डिजिटलीच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा. मुथालिक यांच्या कार्यालयावर रोज शेकडो गुलाबी चड्डीचे पार्सल येऊ लागले. मुथालिक यांच्या कार्यालयामधील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचे रोजचे काम फक्त एवढेच होते की रोज हजारो गुलाबी चड्ड्यांची विल्हेवाट लावणे. या चळवळीला भारतभरातून इतका प्रतिसाद मिळत होता की गुलाबी चड्डी ही पोस्ट ऑफिस आणि मुथालिक यांच्या डोकेदुखीच कारण ठरली.
मीडिया रिपोर्टनुसार या चळवळीत सुमारे 35 हजार गुलाबी अंडरवेयर मुथालिक यांच्या कार्यालयात पाठवण्यात आल्या होत्या. 'पिंक चड्डी कॅम्पेन' या चळवळीला भारतभरातून पार्सल आले. पार्सल पाठवणारी व्यक्ती आपल्या शहरातून, आपल्या वेळेनुसार निषेध व्यक्त करण्यासाठी फक्त एक गुलाबी चड्डीचे पार्सल पाठवून या चळवळीत सहभागी होत होती. निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा चळवळीत सहभागी होण्यासाठी कुठल्याही रस्त्यावर उतरण्याची गरज नव्हती हे या आधुनिक चळवळीचे वैशिष्ट्य होते. सोशल मीडियामुळे एका छोट्या स्वरुपाच्या निषेधापासून सुरु झालेला हा निषेध देशभर पसरला.

श्रीराम सेनेच्या कार्यालयात रोज हजारो गुलाबी चड्ड्या यायच्या
"आम्हाला हे कपड्यांचे सुंदर पार्सल पाठवून मजा आली. कदाचित आम्ही हे उचलेले पाऊल आम्हाला दोषी ठरवेल. कट्टर हिंदुत्ववाद्यांनी आमच्यावर आम्ही वाईट कुटुंबाचे असल्याचा आरोप केला. त्यांना अजूनही असे वाटते की हा निषेध पार्टी गर्ल्सनी पार्टी गर्ल्ससाठी चालवलाआहे. पण आम्ही भारतीय संस्कृतीच्या कल्पनेच्या नावाखाली हिंसाचार संपवण्याची गरज असल्याच्या भावनेतून ही चळवळ सुरु केली. आमच्या ग्रुपला अशा कित्येक सदस्यांनी साइन अप केले ज्यांना व्हॅलेंटाईन डे किंवा पबमध्ये जाण्यात रस नव्हता, पण तेही या भावनेशी सहमत झाले. शिवाय दिल्लीतील एका 75 वर्षाच्या महिलेने आम्हाला चड्डी पाठवल्या. एका बॉलीवूड गीतकाराने गुलाबी रंगाच्या चड्डीच्या सन्मानार्थ एक कविता लिहिली. अशा सगळ्यांसाठी आम्ही आभारी आहोत. आम्हाला प्रतिउत्तर देण्यासाठी श्री राम सेनेने "आम्ही तुम्हाला गुलाबी साड्या पाठवू" असे म्हटले. ज्यावर उत्तर देताना "आम्ही त्या अभिमानाने घालू" असे आम्ही त्यांना म्हणालो. जेव्हा आपण अशा एखाद्या विकृतीवर भाष्य करतो तेव्हा बलाढ्य व्यवस्थाही आपल्याला घाबरते."
अशी प्रतिक्रिया या चळवळीच्या कार्यकत्या आणि तहलका मासिकाच्या पत्रकार निशा सुसान यांनी व्यक्त केली होती.
पिंक चड्डी कॅम्पेन या चळवळीचे परिणाम काय झाले ?
या चळवळीला देशांतर्गत प्रसिद्धी आणि यश मिळाले. भारतातील माध्यमांनी पिंक चड्डी कॅम्पेनला प्रसिद्धी तर दिलीच शिवाय हा मुद्दा लावून धरत अनेक चर्चा घडवून आणल्या. बहुतेक प्रेस रिपोर्ट्सनी निदर्शकांना प्रोत्साहन दिले. मुथालिक यांनी व्हॅलेंटाईन डे साठी दिलेली हिंसाचाराची धमकी मागे घेतली. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांवर हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी पोलिस कोठडीत टाकण्यात आले. या चळवळीचा परिणाम लक्षणीय होता. या चळवळीमुळे महिलांच्या हक्क आणि स्वातंत्र्यांबद्दल महत्त्वाच्या चर्चाना सुरुवात झाली. कशाप्रकारे एक डिजिटल प्लॅटफॉर्म लोकांचा आवाज बनू शकतो आणि त्यांना एखादा हेतू साध्य करण्यासाठी एकत्रित आणू शकतो हे या चळवळीने त्याकाळात दाखवून दिले.
या चळवळीवर अनेक लोकांमध्ये मतभेद सुद्धा होते. जसे की प्रसिद्ध लेखिका, पत्रकार आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी या चळवळीवर आक्षेप घेत विकृतांना अंतर्वस्त्रे पाठवणे हे महिलांसाठीच खूप अपमानजनक आहे असे म्हटले. तर यावर पत्रकार अमित वर्मा यांनी मात्र घोष यांच्या वक्तव्याचे खंडन करून या मोहिमेचे समर्थन केले. या चळवळीचे जाहिरात आणि सिनेमा क्षेत्रातही पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. जसे की सामाजिक जीवनाशी निगडित वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध बटर ब्रँड अमूलने गुलाबी चड्डी असलेले बिलबोर्ड लावले. ज्याची टॅगलाईन होती "पिंक चड्डी येल्लो बडी".
या चळवळीवर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'बुद्धा इन ए ट्रैफिक जाम' हा सिनेमाही आला. सिनेमातील प्रोटेस्टची थीम ही पिंक चड्डी कॅम्पेन मधून घेऊन चड्डी ऐवजी ब्रा हे प्रतीक म्हणून वापरले होते. सिनेमाचा हिरो 'वुमन लूज पब गोइंग' या ग्रुप मार्फत सोशल मीडियावर ब्रा पाठवण्याचे आवाहन करतो आणि आपल्या मैत्रिणीवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देतो. या सिनेमामध्ये उघडपणे मुथालिक यांचा फोटो वापरला आहे. गांभीर्य आणि विनोदाचे मिश्रण असलेल्या पिंक चड्डी चळवळीने हे दाखवून दिले की दडपशाही विचारांना दिले जाणारे आव्हान हे क्रिएटिव्ह आणि आकर्षक पद्धतीनेही देता येऊ शकते. या चळवळीने हे सिद्ध केले की प्रतिकार अनेक रूपे करता येऊ शकतो.

मद्यपान करणे हे वाईटच आहे पण ते करण्यासाठी जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेतला जातो तेव्हा मात्र ठराविक जेंडरसाठीच हे व्यक्तिस्वातंत्र्य खुले असल्याचे दिसून येते. भारतातील जेंडर बायसचे प्रमाण पाहता स्त्रीचे हे व्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा नाकारले जाते. भूतकाळापासून 'भारतीय स्त्रीत्व' या कल्पनेमुळे संस्कृती जपण्याचा भार जणू बाईला जन्मासोबतच फ्री मिळतो. आणि हाच दृष्टिकोन महिलांना सांस्कृतिक अस्मितेचे रक्षणकर्ते म्हणून पहायला भाग पाडतो. मंगळूरमधील पबमध्ये महिलांवर झालेला हल्ला याच खोलवर रुजलेल्या कल्पनेतून झाला. श्री राम सेनेसारख्या रुढीवादी संघटनेला पबमध्ये जाणाऱ्या मुलींनी अस्वस्थ केले कारण या मुलींनी दमणवाद्यांनी आखून दिलेल्या भारतीय स्त्रीत्वाच्या 'लक्ष्मण रेषे'ला ओलांडले.
याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पिंक चड्डी चळवळीला धाडसी चळवळ म्हणावे लागेल कारण एका अतरंगी वस्तूचा वापर करून महिलांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक रेष अस्पष्ट करण्याचा एक अमिट दृष्टिकोन समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. हे देखील विचारात घ्या की ही अतरंगी वस्तू एक स्त्रीलिंगी वस्तू होती. जिला पब्लिक प्लेस मध्ये वाळू घालणे हे देखील स्त्रीला आजही जड जाते. पिंक चड्डी चळवळ ही केवळ विरोधकांना अंतर्वस्त्रे पाठवण्याची शारीरिक कृती नव्हती तर तो एक वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियमांबद्दल भाष्य करणारा सामाजिक संदेश होता. असा संदेश ज्याला भारतात पिंक चड्डी चळवळीने खोलवर रुजवला.
या चळवळीत भारतीय महिलांनी एका सर्वसाधारण पण धाडसी कृतीद्वारे स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी आणि रुढिवादाच्या नियमांना आव्हान देण्यासाठी चातुर्य आणि विनोदाचा वापर केला. समाजाला मान्य नसलेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या विरुद्धच्या लढाईत क्रिएटिव्हिटीयुक्त निषेधाच्या शक्तीचा पुरावा असेल ही गुलाबी चड्डी चळवळ. या आर्टिकलमधून कुठल्याही व्यसनाचे समर्थन करण्यात आलेले नाही पण व्यसनासंबंधित जेंडरनुसार लावलेल्या चारित्र्याच्या निकषांवर मात्र प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की सआदत हसन मंटो म्हणतात "सिगरेट पीने से औरत के भी फेफड़े ही खराब होते हैं, किरदार नहीं.!"






