(संजना खंडारे)
आघाडीचा दिग्दर्शक पा. रंजिथ याने चेन्नई येथे "पी.के. रोज़ी फिल्म फेस्टिवल" आयोजित केलाय. एप्रिल महिना हा सर्व जगभरात 'दलित हिस्ट्री मंथ' म्हणून ओळखला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म याच महिन्यात झाला म्हणून या महिन्याला 'दलित हिस्ट्री मंथ' म्हटलं जातं. दलितांचा संघर्ष आणि कठोर परिस्थितीत झगडून त्यावर मात केलेल्या वंचित समुदायातील नायक-नायिकांची आठवण म्हणून दलित हिस्ट्री मंथ साजरा केला जातो. याच 'दलित हिस्ट्री मंथ'च्या निमित्ताने हा फेस्टिव्हल सुरू आहे.
पी. के. रोझी ही मल्याळम सिनेमातील पहिली अभिनेत्री नव्हती तर ती दलित समाजातून आलेलीच पहिली अभिनेत्री होती आणि म्हणूनच तिच्या नावाने हा फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पी. के. रोझीचा 'विगतकुमारन' नावाचा जो एकमेव मल्याळी सिनेमा तोच या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवता येत नाही कारण 1928 मध्येच जातीयवादी समाजकंटकांनी या चित्रपटाच्या वेळी थिएटरवर तर हल्ला केलाच होता शिवाय सिनेमाच्या सगळ्या कॉपी जाळून टाकल्या होत्या.
रोझी हे केवळ एका अभिनेत्रीचं नाव नाही तर ते कलेप्रती समर्पित जीवनाचं नाव आहे. आपल्या कामावर, कलेवर प्रेम असेल तर महिला काय काय सोसतात, सोसलं याचं ते उदाहरण आहे. पी.के रोझीचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यावेळी तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम म्हणून ओळखलं जात असे. अत्यंत गरीब घरातल्या आणि गवत कापून गुजराण करणाऱ्या रोजीला सुरुवातीपासूनच अभिनयाची आणि नृत्याची आड होती.
तिचे आई-वडील पुलिया जातीचे होते. त्यांनी तिचे नाव राजम्मा ठेवले होते. दलित कुटूंब, परिस्थिती गरीब. त्यात रोझी लहान होती तेव्हाच वडील गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. रोझीने लहान वयातच अभिनय आणि लोकनृत्य-नाटक शिकून घेतलं. मात्र तो एक असा काळ होता जिथे दलितांना साधा मंदिरात प्रवेश नव्हता तिथे या रुपेरी पडद्यावर प्रवेश मिळणे म्हणजे अशक्यच… मात्र रोझी तिथवर पोहोचलीच.
केवळ दलित अभिनेत्री असल्याने घराला लावली आग
पी.के रोझीने 1928 साली 'विगाथाकुमारन' या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेसी डॅनियल्स यांनी केले होते. या चित्रपटात रोजीने ‘सरोजिनी’ नावाच्या उच्चवर्णीय नायर महिलेची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या सिनेमात रोझी मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी लोकांचा अभिनयक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता.
पण तरीही पी.के रोझीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. मल्याळम सिनेसृष्टीतील ती पहिली महिला अभिनेत्री होत्या. त्यावेळी महिलांना अभिनय करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे तिचा हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा तिचं घर जाळण्यात आलं होतं. पहिल्याच सिनेमात उच्चवर्णिय तरुणीची भूमिका केली म्हणून तिच्या सिनेमावर दगडफेक झाली. सिनेमाच्या पहिल्या शोला देखील तिला कुणी बोलावले नाही.
हा चित्रपट उच्चवर्णीय लोकांनी पाहण्यास नकार दिला होता. जर पीके रोझी प्रेक्षकांमध्ये बसली तर ते चित्रपट पाहणार नाहीत, अशी अट प्रेक्षकांनी घातली. स्क्रिनिंगच्या वेळीही बरीच तोडफोड झाली. निषेधाची आग रोझीच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिच्या घराला आग लावण्यात आली. यानंतर पीके रोझी यांनी केरळ सोडले.
![]()
हे लेख पण वाचा : १) सेन्सॉर बोर्डाला ‘संतोष’मध्ये असं काय खटकलं की, थेट सिनेमावर बंदीच घातली…? २) ग्रामीण जातीसंबंध समजण्यासाठी ‘पिंजरा’ पुन्हा नव्या चष्म्यातून बघणे आवश्यक आहे… |
मृत्यूनंतर जगाला महत्व कळाले
घराला आग लागल्यानंतर पी.के रोझी स्वत:चा बचाव करत थेट तामिळनाडूमध्ये पोहोचली. त्यादरम्यान पीके रोझीच्याआयुष्यात नवा ट्विस्ट आला. तिने ट्रक ड्रायव्हर केशवन पिल्लईसोबत लग्न केलं. नंतर रोझीने लोकनाट्यात काम करायला सुरुवात केली, तिने तिचं नाव राजम्मा वरून रोजम्मा केले. पुढील आयुष्य शेती करत दिवस काढले. तिला 2 मुलं होती. एकाचे नाव पद्मा तर दुसऱ्याचे नागप्पन.
मात्र, त्यांना आपली आई अभिनेत्री होती याची कल्पना नव्हती. पी.के रोझी त्याकाळी लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा एकही फोटो गूगलकडे नाही. पी.के रोझीला सिनेमांची, अभिनयाची आवड असली तरी अभिनेत्री म्हणून समाजाने कधीही स्वीकारलं नाही.
पण तरीही मल्याळम सिनेसृष्टीतील पहिल्या महिला म्हणून पी.के रोझीची ओळख आहे. पी.के रोझीने महिलांना अभिनय क्षेत्रात काम करता यावं यासाठी आवाज उठवला आहे. महिलांना परफॉर्मिंग आर्टमध्ये काम करण्यासाठी संधी मिळवून दिली आहे.
तिचा मृत्यू 1988 साली झाला. यानंतर 1988 मध्ये लेखिका वेणू अब्राहम यांनी मल्याळम सिनेमाची पहिली अभिनेत्री पीके रोझीवर एक कादंबरी लिहिली. त्यानंतर 2013 मध्ये याच कादंबरीवर कमलचा 'सेल्युलॉइड' नावाचा चित्रपट आला, ज्यामुळे पीके रोझीच्या योगदानाबद्दल आणि तिच्या संघर्षांबद्दल समाजाला कळले.
मल्याळम सिनेमाचा काळा अध्याय…
पी.के रोझीने 1928 साली ज्या 'विगाथाकुमारन' या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं त्या चित्रपटाचे दिग्दर्शन जोसेफ चेल्लैया डॅनियल्स यांनी केले होते. त्यांना मल्याळम सिनेमाचे जनक म्हटलं जायचं….
'विगाथाकुमारन' या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन. छायांकन, एडिटिंग आणि अभिनय या साऱ्या बाजू जे. सी. डॅनियल यांनीच सांभाळल्या होत्या. केरळच्या "द ट्रावनकोर नेशनल पिक्चर्स" या पहिल्या फिल्म स्टुडिओची स्थापनादेखील त्यांनीच केली होती.
'विगाथाकुमारन' चित्रपटासाठी जे. सी. डॅनियल यानी आपली 108 एकर जमिन विकून चार लाख रुपये जमा केले. मात्र जातीयवादी लोकांनी हा सिनेमा पहिल्या शोनंतरच प्रदर्शित होऊ दिला नाही आणि जे. सी. डॅनियल प्रचंड कर्जात बुडाले.
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची फरफटच झाली आणि 1975 साली त्यांचे निधन झाले. डॅनियल खरंतरं एक सुखवस्तू कुटुंबातील होते. परंतु, विगतकुमारनचं अपयश आणि त्यानंतरही चित्रपट तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळं ते आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले.
1960 च्या दशकात इतिहासकार आणि पत्रकार चेलंगाट्ट गोपाळकृष्णन यांनी त्यांचे योगदान समाजासमोर आणले. चेलंगाट्ट यांनी डॅनियल यांना मल्याळम सिनेमाचे जनक म्हणून मान्यता मिळवून दिली.






