अभिजीत तांगडे
- भारतीय ग्रँडमास्टर वैशालीने फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकली. आता ती जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनजुनला आव्हान देईल.
- वैशाली ही प्रज्ञानंदची थोरली बहीण…हे तिच्यासाठी विलक्षण अन्यायकारक होतं. कारण वैशालीची प्रगती आणि प्रतिभा स्वयंप्रकाशी होती.
- कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्याकडून अपेक्षित असलेले यश यावेळी वैशालीने मिळवून दिले आहे.
वैशाली रमेशबाबू म्हटल्यावर बहुतेक जण 'अरे हो... ती प्रज्ञानंदची थोरली बहीण ना' अशी प्रतिक्रिया देतात. मात्र आता ही वैशाली बुद्धिबळातही थोरली झाली आहे. भारताची पहिली बुद्धिबळ विश्वविजेती बनण्यापासून रमेशबाबू वैशाली आता केवळ एक पाऊल दूर आहे.
वैशालीचा सख्खा धाकटा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंद हा अलीकडच्या काळातला अतिशय प्रतिभावान बुद्धिबळपटू. त्याची प्रतिभा तो १२ वर्षे वयाचा असल्यापासूनच दिसू लागली होती. सुरुवातीस प्रज्ञानंद आणि नंतर गुकेश दोघेही षोडशवर्षीय होण्याआधापीसूनच बुद्धिबळविश्वात धुमाकूळ घालू लागले. त्या वेळेपासून पुढे काही काळ वैशालीची ओळख ‘प्रज्ञानंदची बहीण’ अशीच बनू लागली. हे तिच्यासाठी विलक्षण अन्यायकारक होतं. कारण वैशालीची प्रगती आणि प्रतिभा स्वयंप्रकाशी होती. पण प्रज्ञानंदच्या सावलीतून तिला बाहेर काढायला चाहते, विश्लेषक आणि काही प्रमाणात माध्यमे तयार होत नव्हती.
तो अन्याय दूर करायचा, तर स्वत: अधिक तेजाने तळपणे हाच मार्ग होता. वैशालीने तो स्वीकारला. तिची वाटचाल स्वतंत्रपणे सुरू झाली. अनेक टप्पे येत गेले. बुद्धिबळातील सर्वोच्च असा ग्रँडमास्टर किताब तिने डिसेंबर २०२३मध्ये मिळवून दाखवला. त्यावेळी ती देशातली एकूण ८४वी ग्रँडमास्टर, तरी कोनेरु हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतर तिसरीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली होती. वैशाली-प्रज्ञानंद ही ग्रँडमास्टर किताब मिळवणारी जगातली पहिलीच बहीण-भाऊ जोडीदेखील ठरली होती. प्रज्ञानंदच्या कौतुकामुळे सुरुवातीस आपल्याला अस्वस्थ वाटे आणि त्यावेळची आपली वागणूक आदर्श नव्हती, असे तिने एका मुलाखतीत प्रांजळपणे कबूल केले होते.

‘प्रज्ञानंदची बहीण’ ही ओळख आता तिने पुसून टाकली…
तर सध्याची अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की, भारतीय ग्रँडमास्टर वैशालीने फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकली आहे. 15 एप्रिल रोजी सायप्रसमधील कॅप सेंट जॉर्ज हॉटेलमध्ये झालेल्या अंतिम फेरीनंतर ती गुणतालिकेत अव्वल स्थानी होती. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना, वैशालीने अंतिम फेरीत अनुभवी रशियन खेळाडू कॅटेरिना लॅग्नोचा पराभव केला. 24 वर्षीय वैशाली कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. आता ती जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनजुनला आव्हान देईल.
बद्धिबळात जगज्जेता ठरवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यात गतविजेता थेट जागतिक लढतीस पात्र ठरतो, तर 'कैंडिडेट्स' स्पर्धेतील विजेता किंवा विजेती जागतिक विजेत्याचे आव्हानवीर होतात. या वेळची 'कैंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा' सुरू झाली त्या वेळी रमेशबाबू वैशाली हिला फारसे कोणी जमेस धरत नव्हते. ती आठ स्पर्धकांतील सर्वांत कमी मानांकन असलेली खेळाडू होती. भारतीयांच्या आशा टिकून होत्या त्या केवळ दिव्या देशमुखवर. कोनेरू हम्पीच्या माघारीची हळहळ होती. बुद्धिबळात जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी घेतली जाणारी कँडिडेट्स स्पर्धा अत्यंत अवघड मानली जाते. त्याचे कारण म्हणजे एकाहून एक सरस खेळाडू मोठ्या संख्येने यात उतरतात. एकल प्रतिस्पर्ध्यासमोर जगज्जेतेपदाच्या लढतीतील डावपेच निराळे असते नि या स्पर्धेतील डावपेच निराळे.
यंदा या स्पर्धेत वैशालीबरोबर दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी यादेखील सहभागी होणार होत्या. परंतु पश्चिम आशियातील अस्थैर्यामुळे आणि स्पर्धास्थळ युद्धग्रस्त टापूजवळील सायप्रस या देशात असल्यामुळे असुरक्षित वाटून हम्पीने माघार घेतली. त्यामुळे वैशाली आणि दिव्या यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. एकूण आठ बुद्धिबळपटूंमध्ये दोघींचे मानांकन सर्वांत खालचे होते. त्यातही वैशाली तर तळाला होती. तरीदेखील आपल्या अधिक मातब्बर बुद्धिबळपटूंना दोघींनी तोडीस तोड टक्कर दिली. वैशालीने तर मोक्याच्या क्षणी विचलित न होता खेळ उंचावून एकाहून एक सरस प्रतिस्पर्ध्याला हरवले. शेवटच्या डावात जिंकणे आवश्यक होते, त्यावेळीही वैशाली निर्धाराने खेळली.
वैशालीने कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला
प्रत्यक्ष स्पर्धेत पहिल्या पाच फेऱ्यांत चार बरोबरी आणि एक पराभव या कामगिरीमुळे तर वैशाली फार काही करू शकणार नाही, अशी अटकळच बुद्धिबळप्रेमींनी बांधली होती. मात्र नंतर चित्र बदलत गेले आणि ती विजेती झाली. याच सायप्रसमध्ये प्रज्ञानंदला सुरुवातीचा धडाका राखता आला नाही. मात्र, त्याने त्याचे शल्य बाजूला ठेवत वैशालीला साथ द्यायला सुरुवात केली. प्रज्ञानंदच्या आग्रहाखातर वैशाली 'कैंडिडेट्स' पूर्वीच्या स्विस लिग स्पर्धेत खेळली. त्यातील यशाने तिला विश्वास दिला. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात एका गुणाची आघाडी गमावल्यानंतरही ती अविचल राहिली. सुट्टीच्या दिवशी स्वतःला रिसेट केले. पुरेशी झोप आणि योग हे सूत्र पाळणारी वैशाली आव्हानास केवळ सामोरीच गेली नाही, तर तिने पारही केले. कैंडिडेट्स स्पर्धा सुरू झाल्यापासून वैशालीच्या रूपाने प्रथमच भारतीय महिलेला हे यश मिळाले आहे.

प्रज्ञानंद आणि वैशाली, ग्रँडमास्टर भावंडात थोरली
प्रज्ञानंद आणि वैशाली हे दोघं बहीणभाऊ मुळचे चेन्नईचे आहेत, ज्या शहराची 'भारतीय बुद्धिबळाची राजधानी' अशी ओळख बनली आहे. वैशालीचे वडील रमेशबाबू एका बँकेत काम करतात. तर आई नागलक्ष्मी अनेकदा वैशाली आणि प्रज्ञानंदसोबत प्रवास करते. अगदी लहान वयातच या दोघांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. ज्युनियर गटात अनेक स्पर्धा जिंकत वैशालीनं आपला दबदबा निर्माण केला होता. वैशालीनं 2012 साली 11 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील वयोगटात बुद्धिबळाचं राष्ट्रीय विजेतेपद मिळवत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सुरुवातीलाच दाखवलं.
त्याच वर्षी तिनं कोलंबोमध्ये एशियन अंडर-12 आणि स्लोव्हेनियात अंडर-12 यूथ चेस चॅम्पियनशिप या स्पर्धाही जिंकल्या. जेमतेम 14 वर्षांच्या वयात वैशालीनं मुंबईतल्या नॅशनल विमेन चॅलेंजर्स स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तो पहिला मैलाचा दगड पार केल्यावर वैशालीनं मग मागे वळून पाहिलंच नाही. हळूहळू जग तिची दखल घेऊ लागलं. 2016 साली वैशालीनं विमेन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवला. 2017 साली वैशालीनं आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ चेस विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं अभिनंदन केलं. 2018 साली ती भारतीय महिला ग्रँडमास्टर बनली, तेव्हा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदनं ट्विटरवरून तिचं अभिनंदन केलं.
कार्टूनचं वेड कमी करण्यासाठी बुद्धिबळ खेळायला लावलं आणि…?
खरं तर वैशालीचे कार्टून पाहण्याचे वेड कमी करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी तिला बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाकडे वळवलं. पण वैशालीला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कारण सराव आणि प्रवासासाठी लागणाऱ्या पैशामुळे बुद्धिबळ हा खर्चिक खेळ बनू शकतो. सुरुवातीच्या काळात तिच्याकडे संगणक नव्हता आणि खेळाचं प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा डावपेच रचण्यासाठी तिला पुस्तकांवर अवलंबून राहावं लागायचं. बुद्धिबळातली आधुनिक सॉफ्टवेअर्स आणि संसाधनांपासून सुरुवातीला ती वंचित राहिली. 2012 साली जागतिक युवा विश्वविजेतेपद मिळवल्यावरच वैशालीला स्पॉन्सरद्वारा एक लॅपटॉप मिळाला, ज्यामुळे तिचा खेळ आणखी बळकट बनला.
वैशाली आणि तिच्या भावानं स्पॉन्सर्सचं लक्ष वेधून घेतलं. आपले पालकच खरे आधारस्तंभ असल्याचं वैशाली सांगते. वैशालीचे वडील काम करायचे आणि सरावासाठीच्या आर्थिक गरजा पुरवण्याकडे लक्ष द्यायचे, तर आई वेगवेगळ्या स्पर्धांना तिच्यासोबत जायची. जगातल्या सर्वांत युवा ग्रँडमास्टर्सपैकी एक घरातच असल्यानं फार मदत झाल्याचं वैशाली सांगते. दोघं बहीणभावंडं एकत्र सराव करत नाहीत, पण अनेकदा डावपेचांवर बराच वेळ चर्चा करतात. प्रज्ञानंदचा सल्ला तिला वेगवेगळ्या स्पर्धांच्या तयारीसाठी मदत करतो.
सायप्रसमध्ये भावाला जे जमलं नाही ते बहिणीनं करून दाखवलं
सायप्रस येथील स्पर्धेत तिचे पहिले चारही डाव बरोबरीत सुटले. पाचव्या डावात चीनची झू जिनर हिच्याशी ती पराभूत झाली. झू जिनर अग्रमानांकित. स्पर्धा जिंकण्याची तिची दावेदारी सर्वाधिक प्रबळ. तरीदेखील वैशाली न डगमगता खेळत राहिली. एकामागोमाग एक डाव जिंकून आघाडीवरही गेली. पुन्हा जिनर हिच्याशी मुकाबला नि पुन्हा पराभव. यानंतर दोघी समान गुणांवर आल्या होत्या. नंतरच्या दोन डावांमध्ये किमान पराभूत होणार नाही याची खबरदारी तिने घेतलीच. शेवटचा डाव जिंकूनही दाखवला आणि दिमाखात अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत तान झोंग्यी ही चीनची आणखी एक मातब्बर खेळाडू सहभागी झाली होती. ती माजी जगज्जेती, पण तिच्या एका घोडचुकीचा फायदा घेऊन वैशालीने पहिल्या टप्प्यात सनसनाटी विजय मिळवला.

झू जिनर आणि वैशालीने या स्पर्धेत प्रत्येकी पाच डाव जिंकले, पण जिथे जिनरने चार डाव गमावले तेथे वैशाली केवळ दोनच डावांत पराभूत झाली. स्पर्धेत शेवटच्या टप्प्यापर्यंत तिचा पाठलाग करणार्या कझाकस्तानच्या बिबिसारा असौबायेवा आणि वैशालीने स्पर्धेत सर्वांत कमी प्रत्येकी दोन डाव गमावले. पण बिबिसाराने चारच डाव जिंकले, तिथे वैशालीचे पाच विजय निर्णायक ठरले. प्रत्येक फेरीत, प्रत्येक टप्प्यावर चढ-उतार अनुभव असतानाही वैशाली निश्चल राहिली. भारताची आणखी एक उदयोन्मुख बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्यासमोर ती पहिल्या टप्प्यात हरता-हरता कशीबशी बचावली. दुसर्या टप्प्यात तिने दिव्याला हरवले. दिव्या विश्वचषक विजेती आहे नि वैशालीपेक्षा अजून लहान आहे. भविष्यात तिच्यातही कँडिडेट्स जिंकून आव्हानवीर बनण्याची आणि त्याही पुढे जाण्याची क्षमता पुरेपूर आहे.
निव्वळ ग्रँडमास्टर बनणे हे वैशालीचे ध्येय नाही. कोणत्याही महत्त्वाकांक्षी बुद्धिबळपटूप्रमाणे जगज्जेतेपद हे तिचेही ध्येय आहे. त्या शीर्षस्थ लढतीपर्यंत जाण्यासाठीही अनेक टप्पे, स्पर्धा, पात्रता फेर्या असतात. वैशाली दोन वर्षांपूर्वीच अशाच कँडिडेट्स स्पर्धेत दुसर्या स्थानापर्यंत पोहोचली होती. यावेळी तिने आणखी पुढची मजल मारली. तशी अपेक्षा यावेळी प्रज्ञानंदकडून बाळगली जात होती. पण ‘वैशालीचा भाऊ’ ती पूर्ण करू शकला नाही. आता त्याला आणखी किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. कोनेरु हम्पी, द्रोणवल्ली हरिकापाठोपाठ आता वैशाली, दिव्या देशमुख या बुद्धिबळपटू स्वप्रतिभेने तळपत आहेत, महत्त्वाकांक्षेने स्वत:ला घडवत आहेत. भारताच्या पुरुष बुद्धिबळपटूंच्या बरोबरीने लखलखती कामगिरी करून दाखवत आहेत. दिव्याने अलीकडेच प्राधान्याने महिलांसाठीच्या स्पर्धांऐवजी खुल्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. जगातली पहिली महिला ग्रँडमास्टर ज्युडीथ पोल्गारने तिचे याबद्दल मनापासून कौतुक केले.
वैशाली सांगते की, सातत्यानं मिळणाऱ्या यश आणि प्रशंसेनं तिची आणखी चांगलं खेळण्याची जिद्द आणखी वाढवली. वैशालीनं स्वतः खेळात मोठं यश मिळवलं असलं, तरी ती सांगते अनेक महिला खेळाडूंना ते शक्य होत नाही, कारण त्यांना कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर भेदभावाचा सामना करावा लागतो. महिलांच्या यशाला पुरुषांच्या तोडीचं मानलं जात नाही आणि दोघांना मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतली तफावत हे त्याचंच द्योतक आहे, असं ती सांगते.
कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्याकडून अपेक्षित असलेले यश वैशालीने मिळवून दिले आहे. कुणी सांगावे, या वर्षाच्या अखेरीस पुरुष; तसेच महिलांमधील ६४ घरांचे जगज्जेते भारतीय असतील.






