विठ्ठल साबळे
- राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले
- कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
- तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका शिरविरहित आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहापासून सुरू झालेली तपासाची कहाणी आज राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. ज्या तरुणीचा खून झाल्याचा दावा पोलिसांनी केला, तिच्या हत्येप्रकरणी एका आदिवासी कुटुंबातील वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये पाठविण्यात आले. मात्र महिनाभरानंतर तीच तरुणी जिवंत अवस्थेत पोलिस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण तपासाचा पाया कोसळला.
या प्रकरणाला आणखी गंभीर बनवणारी बाब म्हणजे आरोपी ठरवण्यात आलेले बाप लेक हे आदिवासी समाजातील असल्याचे समोर आले आहे. आधीच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबावर खुनासारखा गंभीर गुन्हा लादला गेला. या एका घटनेने केवळ पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटीच उघड केल्या नाहीत, तर तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे…
नेमकी घटना काय
या प्रकरणाची सुरुवात २६ एप्रिल रोजी झाली. जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात एका महिलेचा शिरविरहित आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी विद्रूप होती की ओळख पटविणे अशक्य होते. परिसरात खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू झाला आणि त्याच वेळी मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका बेपत्ता तरुणीची माहिती समोर आली.
ही तरुणी होती शिवानी कलमेकर. शिवानी काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्यासोबत अरुण दादू कलमेकर नावाचा तरुणही बेपत्ता असल्याची नोंद होती. तपासादरम्यान पोलिसांनी राजुरा शिवारात सापडलेल्या मृतदेहाचा संबंध शिवानीशी जोडला. मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने संपूर्ण ओळख पटण्यापूर्वीच तपासाची दिशा एका निष्कर्षाकडे वळली. पोलिसांनी मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज व्यक्त केला आणि त्यानुसार पुढील तपास सुरू झाला.

त्यानंतर या प्रकरणाला आणखी नाट्यमय वळण मिळाले. पोलिसांनी शिवानीच्या वडिलांवर आणि भावावर संशय व्यक्त केला. कथित कौटुंबिक वाद, मुलीच्या संबंधांना विरोध आणि त्यातून हत्या झाल्याचा तपासाचा सिद्धांत पुढे आणण्यात आला. काही दिवसांतच शिवानीचे वडील बापूराव कलमेकर आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. समाजात त्यांची प्रतिमा आरोपी म्हणून उभी राहिली. गावात चर्चा सुरू झाली. कुटुंबावर मानसिक आणि सामाजिक दबाव वाढला.
जिवंत शिवानी समोर आली अन् तपासाचा संपूर्ण पाया कोसळला
दरम्यान, पोलिसांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे चित्र निर्माण केले होते. परंतु या संपूर्ण तपासाचा पाया ज्या अंदाजावर उभा होता, तोच अंदाज काही दिवसांत कोसळणार आहे याची कल्पना कोणालाही नव्हती.
यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल कि, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील प्रकरण हे राज्यातील तपास यंत्रणेच्या बेफिकीर आणि अनियंत्रित कारभाराचे गंभीर उदाहरण आहे. एका आदिवासी कुटुंबातील वडील आणि मुलाला स्वतःच्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र संबंधित तरुणी जिवंत समोर आल्यानंतर पोलिसांचा तपास पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
गरीब, वंचित आणि आदिवासी समाजातील नागरिकांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे...

२८ मे रोजी अचानक घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. शिवानी कलमेकर ही तरुणी स्वतः जिवंत अवस्थेत पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी जिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, तीच मुलगी प्रत्यक्षात समोर उभी होती. एका क्षणात संपूर्ण तपासाची दिशा बदलली. खुनाचा सिद्धांत कोसळला.आरोपी म्हणून जेलमध्ये असलेल्या वडिलांवर आणि भावावरचे आरोप निराधार ठरले.
शिवानी नेमकी होती कुठे?
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे शिवानी गेला महिना नेमकी कुठे होती? तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार ती अरुण कलमेकर या तरुणासोबत होती. दोघेही घर सोडून गेले होते. ते महाराष्ट्रात मजुरी करत असल्याचेही समोर आले. मात्र जर दोघेही जिवंत होते, तर पोलिसांना त्यांचा मागोवा काढता आला नाही का? मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, नातेवाईकांशी संपर्क, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांमधील समन्वय या सर्व बाबींवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे मृतदेहाची ओळख निश्चित करण्यापूर्वीच पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याचा आभास निर्माण केला. डीएनए अहवालाची प्रतीक्षा न करता तपास पुढे नेण्यात आला का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण शिवानी जिवंत समोर आल्यानंतर मृतदेह तिचा नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच तपासातील सर्वात महत्त्वाचा आधारच चुकीचा ठरला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी घाईघाईने तपास करून मध्य प्रदेशातील एक आदिवासी मुलीची ओळख पटवत तिच्या वडिलांना आणि भावाला आरोपी ठरवले. मात्र संबंधित तरुणी जिवंत समोर आल्यानंतर तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या.

केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच बुलढाण्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणात शिवानीच्या कुटुंबीयांनीही गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी वडील आणि भावाला ताब्यात घेऊन दबाव टाकला. मारहाणीचे आरोपही करण्यात आले आहेत. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता होत आहे. कारण जर निष्पाप व्यक्तींना आरोपी ठरवून त्यांच्यावर दबाव आणला गेला असेल, तर हा विषय केवळ तपासातील चूक राहात नाही, तर मानवी हक्कांचाही मुद्दा बनतो.
कारवाईच्या पलीकडे उभे राहिलेले मोठे गूढ
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी चौकशीचे आदेश दिले. खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. चौकशीनंतर काही अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक आणि संबंधित ठाणेदार यांची बदलीही करण्यात आली होती.
मात्र या सर्व कारवाईनंतरही या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. राजुरा शिवारात सापडलेली ती महिला नेमकी कोण होती? तिचा खून कोणी केला? तिचे शिर कुठे गेले? मृतदेह जाळण्यामागचा उद्देश काय होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या खुनाचा आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे का?
आज या प्रकरणात पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर चर्चा होत आहे, पण त्याच वेळी एका अज्ञात महिलेच्या हत्येचे गूढ कायम आहे. शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्याने एका कुटुंबाला दिलासा मिळाला असेल, पण राजुरा शिवारात सापडलेल्या मृतदेहामागचे सत्य अद्याप अंधारातच आहे.






