पितृसत्ताक समाजात अनेक विषयांवर बोलण्याची बंदी असते. यातील एक विषय आहे, ‘फिमेल प्लेजर’ अर्थात स्त्री सौख्याचा. स्त्रिया शेकडो वर्षांपासून अशा जगात जगत आहेत जिथे पुरुषांच्या सुखाला प्राधान्य दिलं जातं आणि स्त्रियांना लहानपणापासून असं वाढवलं जातं की, त्या आपल्या शरीराला किंवा आपल्या सुखाला समजण्याचा प्रयत्नही करू शकत नाहीत.
आपल्या घरांमध्ये इतका एकांतही नसतो की जिथे एखादी स्त्री स्वतःहून स्वतःचं शरीरसौख्य अनुभवण्यासाठी हस्तमैथुन करू शकेल आणि ते सुरक्षितपणे कसं करावं याचीही माहिती तिला मिळत नाही. आपल्या समाजात ही धारणा आहे की हस्तमैथुन फक्त पुरुष करतात आणि त्यांचाच तो अधिकार आहे.
याच प्रकारे मुख्य प्रवाहातील पॉर्नोग्राफी देखील पुरुषांना समोर ठेवूनच तयार केली जाते आणि स्त्रियांना केवळ पुरुषांना सौख्य देणारी बाहुली अशा पद्धतीने चित्रित केलं जातं. वाईट गोष्ट ही आहे की अनेक पुरुषांनाही लैंगिकतेची माहिती मिळण्याचा मुख्य स्त्रोत पॉर्नोग्राफीच असतो.
दुसरीकडे स्त्री सौख्याविषयी बोलणं तर शक्यच नव्हतं, पण याच्याशी संबंधीत उत्पादनांवरही दीर्घकाळ पुरुषांचाच अधिकार होता. या बाजारात स्त्रियांचा समावेश अगदी अलिकडेच होऊ लागला आहे.
आज लैंगिक समानता, यौन हक्क आणि स्त्रीवादी आंदोलनांमुळे स्त्री सौख्याविषयावरही बोलणं होऊ लागलं आहे त्यामुळे या उत्पादनांमध्येही स्त्रियांना समोर ठेवून जाहिराती होऊ लागल्या आहेत. पॉर्नोग्राफीतही स्त्रिया आणि त्यांचं सौख्य समोर ठेवून कार्यक्रम तयार केले जातात.

स्त्रियांच्या लैंगिक सुखासाठी बाजारपेठ तयार
स्त्री सौख्य उत्पादनांची गोष्ट करायची म्हटलं तर ऑनलाईन दुकानांत अशी उत्पादनं सहजपणे उपलब्ध आहेत. यांचा एक मोठा बाजारच तयार झाला आहे ज्यांचा अनेक स्त्रिया स्वसुखासाठी उपयोग करत आहेत. लैंगिक सुखाचे क्षण अधिक आनंददायी करण्यासाठी वेगवेगळी लुब्रिकंट्स, सेक्स टॉईज्, व्हायब्रेटर्स, डिल्डो, लैंगिक साहित्य अशांचा या उत्पादनांमध्ये समावेश होतो.
या गोष्टी स्त्रियांना त्यांचं शरीर सौख्य समजून घेण्याची तसेच ते अनुभवण्याची संधी देतात. या उत्पादनांच्या उपलब्धतेची माहिती कशी दिली जाते याचा विचार केला तर दिसून येतं की अनेक स्त्रिया स्वतःच सोशल मीडियावर याविषयी सांगत आहेत. स्त्री सौख्य उत्पादनांचा मोठा व्यवसाय तयार होत आहे आणि त्यातून स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी नवनवी उत्पादनं आणली जात आहेत.
पण या उत्पादनांच्या उपयोगाचे अनेक सकारात्मक व नकारात्मक परिणामही आहेत. ज्यांना समजून घेणं गरजेचं आहे. या उत्पादनांच्या सहज उपलब्धतेमुळे स्त्रियांना ती विकत घेणं व त्यांचा उपयोग करणं सोपं झालं आहे हे खरं आहे. या उत्पादनांमुळे स्त्रियांना आपल्या शारीर इच्छा पूर्ण करण्याचा हक्कही काही प्रमाणात मिळतो.
सध्याच्या धावपळीच्या जगण्यात या गोष्टी स्ट्रेस बस्टर प्रमाणे काम करतात. पण स्त्रियांचं लैंगिक स्वातंत्र्य आणि शरीर सौख्य फक्त या उत्पादनांचा उपयोग करण्यावरच अवलंबून आहे का? एखाद्या वस्तूमुळे कसंबसं सुख मिळवणं हेच खरं स्वातंत्र्य आहे का की बाजारवादातून स्त्री सौख्याची नवी व्याख्या तयार केली जात आहे आणि त्यांना या उत्पादनांचा उपयोग करण्यासाठी जाणीवपूर्वक चेतवलं जात आहे?

स्त्रियांच्या सौख्यासाठी तयार केलेली उत्पादने प्रचंड महाग
बाजारात स्त्री सौख्य वाढवण्यासाठी मदत करणारे व ते वाढवण्याची हमी देणारी जी उत्पादनं उपलब्ध आहेत त्यांच्या नकारात्मक पैलूकडे बघण्याचीही गरज आहे. प हिली गोष्ट म्हणजे या उत्पादनांची किंमत खूप जास्त असते. त्यांना विकत घेणं प्रत्येक स्त्रीची क्षमता नसते. ही उत्पादनं त्याच स्त्रियांसाठी तयार केली गेली आहेत ज्यांच्याकडे ती विकत घेण्याइतका पैसा आणि त्यांना वापरण्याइतका खासगी अवकाश आहे.
ही उत्पादनं कळत-नकळत अशी मानसिकता वाढवत आहे ज्यात लैंगिक स्वातंत्र्य आणि लैंगिक सशक्तीकरण याचा अर्थ उपभोग इतकाच आहे. ही सर्व उत्पादनं विकताना, आम्ही तुम्हाला सशक्त करित आहोत, अशीच जाहिरात केली जाते. यंत्रांकडून केली जाणारी लैंगिक क्रिया ही माणसांच्या लैंगिक क्रियांपेक्षा वरचढ आहेत असा प्रचार केला जातोय आणि ज्यातून माणसामाणसांमधील अंतर वाढत चाललं आहे. हे कोणीच सांगत नाही की या उत्पादनांचा उपयोग करून तुम्हाला शारिरीक सुख कदाचित मिळेलही पण भावनिक सुख मिळू शकणार नाही.
याशिवाय सौख्य देणाऱ्या या उत्पादनांचा चुकीचा उपयोगही केला जातो, उदा. लुब्रिकंट्स न लावता त्यांचा उपयोग करणं, किंवा जोर लावून त्यांना शरीरात घालणं, यामुळे इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वापरकर्त्याला ही साधनं कशी वापरावी, त्यांचे उपयोग काय याची माहिती असणं तसेच काय सावधगिरी बाळगावी हे समजणं गरजेचं आहे.
योनीतील ओलावा वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी लुब्रिकंट्स अनेकदा शरीराला हानिकारक ठरतात. यातील काहींच्या उपयोगामुळे योनीतील पीएच संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे योनीत संसर्ग होऊ शकतो.

शारिरीक सुख कदाचित मिळेलही पण भावनिक सुखाचे काय?
सशक्तीकरणाला या उत्पादनांशी जोडणं हा बाजारवादाचा प्रभाव आणि युक्ती आहे. आपण एखाद्या उत्पादनाचा उपयोग न करताही स्वतःला सुख देऊ शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण अशा उत्पादनांचा उपयोग बाजाराच्या दबावामुळे करतोय की आम्हाला त्याची खरंच गरज आहे म्हणून करतोय.
बाजार आणि सौख्याचे अनेक पैलू आहेत. उत्पादक अनेक उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर बाजारात आणतात जे स्त्री शरीर सौख्याची हमी देतात. पण यातून ते अवास्तव शारिरीक मापदंडांना पुढे आणतात, प्रचार करतात, सौंदर्याची संकुचित व्याख्या करतात. ज्यामुळे स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच लागू शकते तसेच त्यांच्या स्वतःच्या शरीराकडे बघण्याच्या दृष्टीत नकारात्मकताही येऊ शकते.
आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की भांडवलशाही पितृसत्तेला कशी टिकवून ठेवते जी स्त्रियांचं शरीर आणि त्यांची लैंगिकता यांचं नियंत्रण आणि मार्केटिंग करते. भांडवलशाही नेहमी वास्तविक लैंगिक मुक्ती आणि सशक्तीकरणापेक्षा, त्यांच्या आर्थिक फायद्याला जास्त महत्त्व देते.
बाजारासाठी स्त्रियांचा आनंद त्यांच्या फायद्यानंतर येतो. या विषयावर आपल्याला संवेदनशीलपणे विचार करण्याची गरज आहे. आपल्याला असं एक वातावरण तयार करावं लागेल जिथे स्त्री सौख्याविषयी उघडपणे बोलता येईल. जिथे स्त्रिया त्यांच्या शरीराविषयी आणि त्यांच्या गरजांविषयी सजग असतील पण त्यांच्यावर बाजाराच्या चंगळवादाचा परिणाम व प्रभाव नसेल.
स्त्री सौख्यावर बाजारात मोठी गुंतवणूक होत आहे आणि अशा उत्पादनांचा सध्या पूर वाहतोय पण पुरुषांसाठीही हे एक न सुटलेलं कोडं आहे ज्याविषयी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. सौख्य ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती केवळ ऑर्गझमपूरती मर्यादित नाही. याचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत ज्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे.
बाजारीकरण आणि फायदा यांच्यात मूळ विषयाकडे दुर्लक्ष व्हायला नको, कारण स्त्री सौख्याविषयी जी संकुचित, पारंपरिक, नकारात्मक विचारसरणी आहे त्यात बदल होणं फार गरजेचं आहे.
सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया
(अनुवाद - प्रतिक पुरी)






