आपण जेव्हा स्त्री किंवा पुरुषांच्या शरीराचा विचार करतो तेव्हा, स्त्रियांसाठी नाजूक, सडपातळ शरीर आणि पुरुषांसाठी बलदंड, उंच, मजबूत शरीराची कल्पना करतो. आपली ही विचारसरणी पितृसत्ताक विचारांनी प्रभावित झालेली आहे, तसेच मुख्यप्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांनीही त्याला खतपाणी घातलेलं आहे. चित्रपटांनी आम्हाला हेच दाखवलं की एक सुंदर स्त्री ही गोरी आणि सडपातळच असते. स्त्रियांवर याचा इतका वाईट परिणाम होतो की त्यांतून त्या सडपातळ दिसण्याचा प्रयत्न करतात, खाणंपिणं कमी करतात ज्यातून पुढे गंभीर शारिरीक व मानसिक आजारही ओढवून घेतात.
भारतात विसाव्या शतकापर्यंत अशा आजारांची फारशी माहिती मिळत नाही. पण माध्यमं आणि चित्रपट यांच्या प्रभावातून शरीराची मापं काढण्याची जी प्रवृत्ती वाढली आहे त्यातून शरीराचं उदात्तीकरण किंवा खच्चीकरण करण्याचं प्रमाण वाढलं तसंच या आजारांचंही. स्त्रियांच्या बाबतीत साईज झिरो किंवा पुरुषांच्या बाबतीत मसल बॉडी असण्याचा दबाव असला तरी, स्त्रियांच्या बाबतीत तो लहान वयापासूनच असतो. त्यांचा रंग, शारिरीक ठेवण, उंची, चेहरा यावर जास्त लक्ष दिलं जातं. त्यांच्या सडपातळ असण्याला तर सांस्कृतिक, कौटुंबिक, आर्थिक इतकंच नाही तर राजकीय पदरही आहेत. असं असलं तरी या आजारांच्या बाबतीत फार काही लिहिलं बोललं जात नाही. एनोरेक्सिया नर्वोसा सारख्या आजारांतून तर मृत्यू होण्याचं प्रमाणही जास्त असतं.

सडपातळ होण्यासाठीचा सामाजिक दबाव
तुमच्य मित्रांच्या, नातेवाईकांच्या फेसबुक पोस्ट्सवर लक्ष ठेवलं तर दिसेल की ज्यात ते त्यांच्या लठ्ठपणाची चिंता व्यक्त करतात, ती तेवढी चिंताजनक बाब नसते. प्रश्न हा आहे की हे कोण आणि कसं ठरवणार की सडपातळ शरीर नक्की कशाला म्हणायचं. आज सोशल मीडियावर एक विशिष्ट शरीर असण्यासाठी लोकांना उचकवलं जात आहे. सगळीकडे जिमचे पोस्टर्स लागलेले असतात आणि त्यात सडपातळ होणं कठीण नाही असा दावा केला जातो. ‘सायंस डायरेक्ट’मध्ये आलेल्या एका अभ्यासात मुलींमध्ये त्यांच्या वजनामुळे असलेल्या नाराजीविषयीचे अनुभव नोंदवण्यात आले आहेत. यातून समजतं की वजनाविषयीची नावड या मुलींच्या आत्मविश्वासावर मोठा प्रभाव टाकत असते.
त्यांना मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून वजन कमी करण्याच्या सूचना या दबावाप्रमाणे आहेत हे त्यांनी सांगितलं. वजन कमी केल्यानं चांगलं जीवन जगता येईल किंवा इतरांची मान्यता मिळेल असं त्यांना वाटत होतं. या मुलींनी शारिरीक अवस्थेविषयी असंतोष जाहिर केला तरी त्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याचं त्यांनी नाकारलं. त्यापेक्षा मित्र-नातेवाईक यांच्याकडून मिळणारं समर्थन त्यांना मोलाचं वाटत होतं.
याविषयी बोलताना कोलकात्याची तनु सरकार म्हणते, “मला समजत होतं की मी खूप लठ्ठ झालंय म्हणून. घरी आणि कामाच्या ठिकाणीही जास्त करून लोक मला त्याची जाणीव करून द्यायचे. माझ्यावर तो दबाव होता. वजन कमी करण्यासाठी मी दही, काकडी, पोळी इतकंच खाऊ लागले.”
ही लक्ष देण्याची गोष्ट आहे की भारतात केवल सडपातळ असणं पुरेसं नसतं तर शरीराचा विशिष्ट आकारही हवा असतो आणि स्त्रियांनी तसं दिसावं अशी अपेक्षा केली जाते. प्रत्येक समाजानं आपल्या स्त्रिया कशा दिसायला हव्यात किंवा त्यांनी काय करायला हवं याविषयी वारंवार सांगितलं आहे. समाजात आपलं स्थान अबाधित राहावं म्हणून स्त्रियांनाही या नियमांसमोर मान तुकवलेली आढळते.
बॉलिवूडचा पुरुष दिग्दर्शक ठरवतो नायिकांचे मोजमाप
‘नॅशनल लायब्ररी ऑव्ह मेडिसिन’ यात कर्नाटकच्या विद्यार्थ्यांमध्ये खाण्यापिण्यावरून होणाऱ्या आजारांविषयी एक अभ्यास आला आहे. यात 26 टक्के विद्यार्थी खाण्यापिण्याच्या समस्येनं ग्रस्त होते. वजन, कंबरेचा व ढुंगणाचा घेर, बॉडी मास इंडेक्स, बेसल मेटाबॉलिक रेट, यांची परिमाणं आणि त्यासंबंधी या विद्यार्थ्यांची असलेली समजूत, नियंत्रण, अपेक्षा यात मोठं अंतर आढळून आलं. चित्रपटांचा विचार केला तर स्त्रियांच्या भूमिका कशा असायला हव्यात यात पुरुष दिग्दर्शकाचं मत मोलाचं ठरतं. ते त्याचा विचार, दृष्टिकोन, समजूती, पूर्वग्रह यावर आधारीत असतं.
प्रेक्षकांना काय पहायला आवडेल याचाही एक अंदाज त्याच्या मनात असतो. यातून एक दुष्टचक्र निर्माण होतं. यात प्रेक्षकांच्या अपेक्षा, विचारसरणी, समजूती यानुसारच चित्रपट केले जातयार तात, ज्या त्यांच्या समाजातून तयार झालेल्या असतात. त्यामुळे आम्ही एका विशिष्ट शारिरीक मोजमापाच्या नायिका बघतो आणि त्यालाच आदर्श परिमाण समजतो.
स्त्रियांच्या शरीरावर नियंत्रण ठेवणं हे त्यांच्या अस्तित्वावरच नियंत्रण ठेवण्यासारखं असतं. पुरुषी समाजात, पुरुषा विचारसरणीनुसार शरीराच्या माध्यमातून हे नियंत्रण केलं जातं आणि ते योग्यही ठरवण्यात येतं. अतिशय पतल्या मुली लग्नाच्या बाजारात नाकारल्या जातात तसंच लठ्ठ मुलींनाही नकारच मिळतो. बीएमसी पब्लिक हेल्थ मध्ये जेवणासंबंधीचे आजार-विकार आणि शारिरीक आकार यांतील संबंध शोधण्यासाठी पूर्व भारतातील मेडिकलच्या विद्यार्थीनींवर एक अभ्यास करण्यात आला.
त्यानुसार त्यांच्यात खाण्यापिण्याशी संबंधीत आजार व शारिरीक आकार, शारिर ढब, जगण्याची गुणवत्ता आणि आत्मसन्मान यांच्यात सहसंबंध असल्याचं लक्षात आलं. पाच मिनिटं जरी सडपातळ आणि आकर्षक मीडिया सेलिब्रिटींच्या संपर्कात येताच या विद्यार्थींनीमध्ये त्यांच्या स्वतःच्या शरीराविषयी असमाधान जागं होत असल्याचं दिसून आलं. ज्या मुली अशा असमाधानासोबत कॉलेजमध्ये येतात त्यांच्यात कालांतराने अव्यवस्थित खाण्यापिण्याच्या सवयी लागतात असंही दिसलं.
सडपातळ होण्याची बाजारपेठ
स्लिमनेस आता अन्न आणि औषधी उद्योगांच्या व्यावसायिक क्षेत्रात आला आहे. ज्यातून व्यक्तिगत आनंद, सामाजिक यश, सामाजिक स्विकारणा या नार्सिसिस्टिक म्हणजेच स्वप्रेमाच्या भावनेवर जोर देण्यात येतो. 0 टक्के स्त्री-पुरुष एका अशा आदर्श शरीराच्या मागे असतात जे त्यांच्या वर्तमान शरीरापेक्षा वेगळं असतं. यातील अंतर हे खाण्यापिण्याच्या सवयीतील अंतराप्रमाणेच असतं.
मासिकांमधून जो सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव पडतो त्यामुळेही स्त्रियांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी बिघडू लागतात. पण याचा दोष मीडियावर कमी आणि समाजावर जास्त येतो ज्यात या गोष्टी सामान्य असल्याचं समजलं जातं.
नॅशनल लायब्ररी ऑव्ह मेडिसिनच्या एका अभ्यासात, 18 ते 25 वयोगटातील भारतीय पुरुष आणि स्त्रिया यांच्यात शारिरीक वजन, असमाधान, खाण्यापिण्याच्या सवयी आणि माध्यमांचा याविषयीचा दबाव यांतील संबंध आणि लैंगिक अंतर यांचा शोध घेण्यात आला. यात 31 टक्के स्त्रिया आणि 22 टक्के पुरुषांनी आपल्या शरीराविषयी असमाधान व्यक्त केलं.
भारतीय माध्यमांतून आदर्श सौंदर्याचे निकष पूर्ण करण्याचा जो दबाव टाकला जातोय, जो कॉकेशियन पद्धतीचा आहे, त्यातून खाण्यापिण्याच्या विकृती आणि शरीराविषयी घृणा निर्माण होत आहे. माध्यमात दिसणाऱ्या अधिकांश मॉडेल्सचं शारिरीक वजन हे सामान्य शारिरीक वजनापेक्षा 20 टक्क्यांनी कमी असतं. यातून प्रेक्षक स्त्रियांवर विपरीत परिणाम घडून येत आहे.
स्वशरीराविषयी असलेलं असमाधान हे, खाण्यापिण्याच्या विकृत सवयी आणि त्या निर्माण होण्याच्या प्रमुख कारणांपैकी असल्याचं लक्षात आलं आहे. पण समस्या ही आहे की सामाजिक मापदंडानुसार या गोष्टीही आता सामान्य समजल्या जाऊ लागल्या आहेत. भारतात, 16 पैकी एक स्त्री आणि 25 पैकी एक पुरुष लठ्ठ आहे. स्त्रिया वजन कमी करण्यासाठी कठोर डायेट करतात.
पण किती सडपातळ झालं तर ते स्वस्थ असेल याची त्यांना माहिती असेलच असं नसतं. त्यामुळे या सगळ्यांपेक्षा स्त्रियांच्या समग्र निरोगीपणाची चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. ज्यामुळे त्यांना दीर्घायू सोबतच एक चांगलं चिंतारहीत आयुष्यही जगता येईल.
सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया
अनुवाद - प्रतिक पुरी






