पुण्यातील शास्त्री रस्त्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या चार -पाच हजार विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्टच्या रात्रीपासून आंदोलन सुरु केलं होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी 25 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणं शक्य नव्हतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी ही मागणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची होती.
सुरुवातीला या मागणीला आयोगाने नकार दिला. परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार हे आयोगाने स्पष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन आणखी तीव्र केले. त्यातच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी विद्यार्थी आंदोलनाला भेट देऊन पाठींबा दिल्याने या विषयात सरकारने हस्तक्षेप करण्याचा आग्रह वाढीस लागला.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्यसेवा संयुक्त नागरी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी या प्रमुख मागणीव्यतिरिक्त कृषी विभागाच्या मागणीनुसार 258 जागा या परीक्षेत वाढवून मगच पूर्व परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी होती. यापैकी आणखी काही मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. त्यापैकी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकात ही परीक्षा लवकरच घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे. मात्र नेमकी कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे हे निश्चित केले नसल्याने विद्यार्थ्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. इतर मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने, विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाईमाणूसशी प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक विद्यार्थी हतबल अवस्थेत असून अनिश्चिततेचे सावट असलेल्या वाटेवरून जोखमीचा प्रवास करत असल्याचे जाणवले. त्यापैकीच एक विद्यार्थिनी म्हणजे,सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी. ती सांगते की " बारावीत चांगले मार्क्स मिळूनही मेडिकल, इंजिनिअरिंग घेता आलं नाही.
मेडिकलला पैसे भरून ऍडमिशन घ्यायला तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स मधून मास्टर केलं. 2018 मध्ये पुण्यात आल्यापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. 2020 मध्ये राज्यसेवेची पूर्व परीक्षा दिली होती. अशातच कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेले. नंतर जोमाने अभ्यास केला. 28 एप्रिलला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती.
पण लोकसभेच्या आचारसहिंतेमुळे परीक्षा पुढे ढकलली ती 6 जुलैवर गेली. नंतर इडब्लूएस आरक्षणामुळे फॉर्म भरलेल्या मुलांना एसइबीसीमधून फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली. नंतर नंतर इडब्लूएसमधून कुणबी मराठा सर्टिफिकेट काढलेल्या मुलांना अडचणी आल्या.
त्यामुळे मुलांना इडब्लूएसमधून ओबीसीमध्ये फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली. तीच 28 एप्रिलला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार 25 ऑगस्टला होणार होती. अशा पद्धतीने आयोगाने आमचा छळ सुरु केला आहे. सततच्या आयोगाच्या चालढकलपणामुळे आमचं भविष्य अधांतरीच आहे का?"

दुसऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितले की,
"मी एक मुलगी असून गाव सोडून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शहरात आले.अनेक अडचणींना सामोरं जात अभ्यास सुरु आहे. आर्थिक अडचणी, वय वाढत चाललं आहे. त्यात मुलगी म्हणून वयाची मर्यादा येते. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळेवर परीक्षा न घेणे ,कमी जागा काढणे, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे ,अभ्यासाची मनस्थिती रहात नाही. आर्थिक अडचणी येतात. वय वाढत जातं, त्यामुळे काही परीक्षा देता येत नाही. तसेच ज्या परीक्षा झाल्या त्याचे निकाल वेळेत लागत नाही. यामुळे खूप मनस्ताप होतो."

काय आहेत विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या?
- मागील अनेक वर्षांपासून कृषी विभागातील पदभरती केलेली नाही. कृषी विभागाने नुकतेच 258 पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. त्यामुळे 2024 च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्वपरीक्षा घ्यावी.
- वस्तुनिष्ठ पद्धतीने होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपधीक्षक, मुख्याधिकारी, शिक्षण अधिकारीसह सर्व 35 संवर्गाच्या किमान 1500 जागांची जाहिरात काढावी
- संयुक्त अराजपत्रित गट ब आणि गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. 7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे. त्यामुळे आता याची गंभीर दखल घेण्यात यावी.
- एमपीएससीतर्फे टंकलेखक गट - क 2023 अंतर्गत सात हजार 31 पदे भरण्यात येणार आहेत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेनंतर दि. 4 ते 13 जुलै या कालावधीत कौशल्य चाचणी पार पडली. मात्र, पूर्वपरीक्षेनंतर तब्बल 19 महिन्यांचा कालावधी उलटला असूनही अद्याप आयोगाने निकाल जाहीर केलेला नाही. हा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.






