महाराष्ट्रात ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दिवट्यांचे प्रताप आणि त्यांच्या कृष्णकृत्यांना पालकांची साथ यात पैशांची, सत्तेची मस्ती उघडकीस आली. आता पूजा खेडकर प्रकरणाचे त्या प्रकरणांशी साम्य आहे. पुणे पोर्शे कार प्रकरण, वरळी हिट अँड रन’ आणि पूजा खेडकर प्रकरणातील साम्य म्हणजे या तीनही बाळांना पैशाने लाडावून ठेवले आहे.
त्यांना पैसा, सत्ता आणि अधिकारांची मस्ती चढली आहे. दोन दिवटे आणि एक दिवटी कोणत्या थराला जातात आणि आपण काहीही केले, तरी आपले कुणी काहीच वाकडे करू शकणार नाही हा मस्तवालपणा या मुलांत आला कुठून असा प्रश्न पडणे स्वाभावीक आहे. हा मस्तवालपणा, कायदा झुगारण्याची वृत्ती अनुवंशिक आहे, की काय असा प्रश्न पडावा असे या तीन उदाहरणांतून वाटायला लागते.
या प्रकरणांत मुले दोषी आहेत, यात कोणताही वाद नाही; परंतु त्यांच्यापेक्षा अधिक दोष त्यांच्या पालकांचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वेदांत अग्रवाल, मिहीर शहा आणि पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे मुलांच्या गुन्ह्यानंतरचे वर्तन पाहिले, तर ते जगापेक्षा आपण कुणीतरी वेगळे आहोत, कायदे आपल्याला लागू होत नाहीत, पैसा, सत्ता, संपत्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, ही मिजासखोरी दिसते.

मुलेही मग तशीच वागतात. चरित्र चांगले असावे. काम करताना ते शुद्ध भावनेने करावे. कुणाचेही वाईट होणार, याची काळजी घ्यावी हा चांगला विचार मनात येण्यासाठी तसे चांगले संस्कार होण्याची तेवढीच गरज असते. बालपणीचे मनावर झालेले संस्कार अत्यंत मोलाचे व महत्त्वाचे ठरतात. संत तुकाराम महाराज म्हणतात,
शुद्धबीजा पोटी। फळे रसाळ गोमटी॥
मुखी अमृताची वाणी। देह देवाचे कारणी॥
सर्वांग निर्मळ। चित्त जैसे गंगाजळ॥
तुका म्हणे जाती। ताप दर्शने विश्रांती॥
चांगली अपेक्षा कुणाकडून करावी? तर त्याचेही काही मापदंड ठरलेले आहेत. आंब्यांच्या झाडापासून मधुर फळांची अपेक्षा केली जाते. बाभळीचे झाड आयुष्यभर काटेच देईल. जसे बीज लावले, तसे त्याला फळ येत असते. प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यातील ओळी नुसत्या गुणगुणण्यासाठी नसतात. त्या आचरणात आणण्यासाठी असतात.‘ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ असे जे म्हटले आहे, त्याचा विचार रुजवला असता, तर ही धनिकांची बाळे वाया गेली नसती.
मराठी मुले एकतर प्रशासकीय सेवेत कमी आहेत. आता कुठे प्रशासकीय सेवेत मराठी मुलांचे (मुले+मुली) प्रमाण वाढत असताना पूजा खेडकरसारखे प्रकार पुढे येत असतील, तर मुलांचे यशही झाकोळून जाते. डॉ. पूजाची बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे पद मिळवल्याचा प्रकार उघड झाला.
दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत त्या आधारे पूजा आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते; परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणा (कॅट)कडून बाहेरचा अहवाल नाकारला होता.
त्यानंतर काही घडामोडींमध्ये तो अहवाल स्वीकारला. पूजाची हुशारी किती हे तिला विचारलेल्या दोन प्रश्नांवरून पुढे आले आहे. तिला मुलाखतीमध्ये महाराष्ट्राशी संबंधित दोन प्रश्न विचारले होते; परंतु त्याची उत्तरे तिला देता आली नाही.
‘मॉक इंटरव्ह्यू’ मध्ये तिला बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याच्या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभरात नव्हे, तर देशभरात गाजले होते. त्याबद्दल पूजाला काहीही माहीत नव्हते. त्यानंतर तिची निवड झाली. यामुळे त्यावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारी नोकरीत असताना पूजाने ‘पूजा ॲटो’ नावाची कंपनी स्थापन केली. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे तिने नोकरी मिळवल्याचा प्रकार उघड झाला. पूजाने केंद्रीय नागरी सेवा आयोगाला सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ‘ओबीसी नॉन क्रिमीलेयर’ प्रमाणपत्रात विसंगती आढळल्या. आठ लाखांच्या आतील उत्पन्न असलेल्यांनाच ‘क्रिमी लेअर’चा फायदा मिळतो.
तिच्या वडीलांचे उत्पन्न 40 कोटींचे असताना तिने फायदा लाटला. तिच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पूजा ही 2023 च्या बॅचची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आहे. ती अनेकदा तिच्या व्हीव्हीआयपी मागण्यांसाठी चर्चेत असते. ही नोकरी मिळवण्यासाठी तिने जे काही केले ते आणखी धक्कादायक आहे.
वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावण्यापुरतेच तिचे गुन्हे मर्यादित नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिने वापरलेला कोटा तिचा नव्हता. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, तीन जून रोजी कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच पूजाने स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि एक शिपाई देण्याची मागणी वारंवार केली होती.
प्रशिक्षणाच्या कालावधीत या सुविधांचा वापर करता येत नाही. असे असताना तिने एका अधिकाऱ्याच्या दालनाचा ताबा घेतला. त्यातील फर्निचर बदलले. तिने वैयक्तिक गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असा फलकही लावला आहे. मुख्य सचिव सुजाता सौमित्र यांच्या दालनातही ती दांडगाईने घुसली. पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर तिला वाशिमला पाठवण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात पंतप्रधान कार्यालयानेच तिची चौकशी सुरू केल्याने आयएएसपद राहते, की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेडकर कुटुंबीय पाथर्डी तालुक्यातील भालगावचे. या कुटुंबाचा पंकज मुंडे यांच्यांशी राजकीय संबंध. तिथली वनजमीन दांडगाईने कसत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, वाहिन्यांच्या कॅमेऱ्यावर हल्ला करणे, मुळशी, बारामतीत जमीन खरेदी, मुळशीतील शेतकऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण, तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवणे, बाऊन्सर घेऊन त्या परिसरात जाणे असे प्रकार पूजाच्या आईने केले आहेत.
पालक असे असतील, तर मुले कशी असतील, या प्रश्नाचे उत्तर पुण्यात वास्तव्यास असलेल्या अगरवाल आणि खेडकर कुटुंबीयांच्या वर्तनातून मिळते. पूजाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८२१ वा क्रमांक पटकावला आहे.
पूजाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःला दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचे सांगितले होते. तिचे वडील आणि आजोबा निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला नियमांची माहिती असायला हवी, तर तेच नियम वाकवून अनाचार करतात.

तिच्या वडिलांनीही मुलीला सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून पूजाच्या शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि पद मिळविण्यासाठी ‘ओबीसी’ कोट्यातील लाभांचा कथित गैरवापर केल्याबद्दल अहवाल मागवला आहे.
याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी’ने याप्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला आहे. धमकी आणि अपमानास्पद वर्तन केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र सरकारने पूजाची वाशिमला बदली केली.
राज्य सरकारमधून वरिष्ठ प्रशासक म्हणून निवृत्त झालेल्या तिच्या वडिलांवर जिल्हाधिकारी कार्यालयात अँटीचेंबर मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. पूजाचे व्हॉट्सॲप चॅट्सदेखील समोर आले आहेत.
त्यात ती केबिन, प्रवास इत्यादीचे अपडेट्स विचारताना दिसत आहे. पूजा प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती पूजाच्या निवडीबाबत केलेले दावे आणि इतर तपशीलांची चौकशी करेल. ‘प्रोबेशनरी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉल का बनवला गेला नाही?’ असा सवाल पूजाचे वडील करायला विसरले नाहीत.
18 जून ते 20 जून या कालावधीत अतिरिक्त जिल्हाधिकारी मंत्रालयात होते. या वेळी खेडकर यांनी चेंबरमधील सर्व सामान बाहेर काढले. त्यांच्या नावाचा फलकही काढला. याशिवाय लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, स्टॅम्पसह सर्व बाबी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे कक्ष पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
पूजाने, ‘तुम्ही मला या दालनातून हाकलून दिल्यास हा माझा खूप मोठा अपमान होईल आणि ते मी सहन करू शकणार नाही’, असा निरोप थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता! त्यानंतर पूजाच्या वडिलांनी तहसीलदारांना, ‘तुम्ही माझ्या महिला अधिकारी मुलीला त्रास देत आहात. भविष्यात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा दिला होता.






