"बायकांचं कसं आहे जी गोष्ट विकत घेतली असेल त्याचा पुरेपूर वापर होईपर्यंत त्या काही सोडत नाहीत, शेवटी पैसा खर्च झालेला असतो. मग विकत घेतलेली पुस्तक आहेत आणि त्यासाठी पैसे खर्च केलेत म्हणून एकेदिवशी ठरवलं की सगळी पुस्तकं वाचायची आणि जपून ठेवायची."
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील मालती माने विद्यालयातील ‘पुस्तक भिशी’च्या पहिल्या विजेत्या शिक्षिका 'मनीषा कांबळे' यांची ही प्रतिक्रिया फार महत्वाची आहे.
अनेक वेळा आपण 'पैशांची भिशी' ऐकली असेल पण 'पुस्तकांची भिशी' ही कल्पनाच निराळी. कोल्हापूर मधील इचलकरंजी येथे असलेल्या 'मालती माने विद्यालयात' मात्र 11 शिक्षकांनी मिळून पुस्तकांची भिशी सुरु केलीये. पुस्तकं माणसं, समाज आणि देश घडवतात हा विचार घेऊन मालती माने विद्यालयाचे प्राध्यापक संजय रेंदाळकर यांनी 11 शिक्षकांना घेऊन पुस्तकांची भिशी सुरु केली.

अशी चालवली जाते पुस्तकांची भिशी
मालती माने विद्यालयात दर महिन्याला 200 रुपये एकूण 11 शिक्षक जमा करतात. प्रत्येक शिक्षकाचे नाव चिठ्ठयांमध्ये लिहायचे. दर महिन्याच्या 30 तारखेला ज्या शिक्षकाचे नाव भिशीत येईल त्या शिक्षकाला शाळेचे मुख्याध्यापक 2500 रुपयांची पुस्तके घेऊन देतात.
या भिशीमध्ये अधिक प्रमाणात महिला शिक्षिका आहेत. 11 शिक्षक भिशीमध्ये असल्याकारणाने वर्षभर ही पुस्तकांची भिशी चालणार आहे आणि या वर्षभरात प्रत्येकाच्या घरी 10 ते 15 पुस्तकं तरी जातील.
भिशीच्या पैशातून पुस्तकं देतांना विजेत्या शिक्षकाला कोणती पुस्तक वाचायला आवडतील हे विचारले जाते आणि शिक्षकांनी कोणते पुस्तक वाचावे असा विचार करून त्या शिक्षकाला पुस्तके दिली जातात. ही पुस्तके फक्त वाचायची आणि ठेऊन द्यायची असं नसून त्या शिक्षकांनी त्यावर चिंतन करून स्वतः लिखाण करावे असा हा त्यामागचा दीर्घकालीन विचार आहे.
यावर्षी दोन महिला शिक्षकांना टास्क देण्यात आला आहे की त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचून त्यांच्यावर लिखाण करावं. कारण, कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वातंत्र्य लढ्यात आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी काम करणारे एक नामवंत व्यक्तिमत्व आहे.
मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर सांगतात की, "वाचनाकडून लेखनाकडे नेण्याचा प्रवास या पुस्तकाच्या भिशी मध्ये दडलेला आहे. लिखाण करायचं म्हणलं तर तुमचं वाचन हे चौफेर असायला हवं आणि त्या व्यक्तीबद्दल किमान 15-20 पुस्तक तुम्ही वाचता. त्यातून कालसुसंगतता समजून येते. मग शिक्षक फक्त विद्यार्थीच नाही तर समाज ही घडवायला लागतो."
शिक्षक फक्त विद्यार्थीच नाही तर एक समाज घडवत असतो...
आजकाल समाज शिक्षक असणे हे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील जे कोणी विचारवंत आहे मग ते महात्मा फुलेंपासून ते आताच्या मेधा पाटकर यांच्यापर्यंत असतील ते त्यांच्या इतर कामासोबतच समाज शिक्षकही झालेत. पण असे समाज शिक्षक पुढच्या काळामध्ये होणं कठीण आहे.
शिक्षकच या पोकळीला भरून काढू शकतात. राष्ट्र उभारणी सारखे पुरस्कार जर शिक्षकांना जाहीर होऊ शकतात तर राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकाचा मोठा वाटा असतो. अशा दृष्टिकोनातून जर शिक्षकाकडे पाहिले गेले तर तो शिक्षक तेव्हाच मजबूत होऊ शकतो जेव्हा तो वाचेल.
शिक्षकांच्या घरी घरात सजावटीच्या वस्तू नसल्या तर चालतील पण पुस्तकांचा एखादा छोटासा कोपरा तरी असायला हवाच. त्यातले पुस्तक घेऊन शिक्षक स्वतः वाचेल त्या पुस्तकाबद्दल कोणाला तरी सांगेल. या पुस्तकाच्या भिशीमुळे एखाद्या शिक्षकाला वाचनाची आवड लागली तर तो शिक्षक अधिक वाचन करून समृद्ध होईल आणि फक्त तो शिक्षकच नाही तर, तो शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना शिकवेल ती एक पूर्ण पिढीच समृद्ध होईल हा एक त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे, असे संजय रेंदाळकर सांगतात.
मालती माने विद्यालयात शिक्षक निवृत्त होणार असले तर शिक्षकांच्या वतीने त्यांना पुस्तकेच भेट देण्यात येतात. शाळेमध्ये स्पर्धा असेल तर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना देखील पुस्तकेच भेट देतात.
साडी, माडी, गाडीच्या पलीकडे शिक्षक उठून दिसायला हवा..
मुख्याधापक रेंदाळकर म्हणतात की, आपल्या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. पण ते फक्त इतिहासजमा करून चालणार नाही. तर आजच्या काळात जास्त नाही पण तुमच्या गल्लीतल्या एखाद्या शिक्षकाने जर संकल्प केला तर शिक्षकाचं घर हे पुस्तकाचं घर बनू शकतं.
'पुस्तकाची भिशी' तर हे फक्त एक माध्यम आहे. त्यातून शिक्षकांना वाचनातून समृद्ध करणं हा उद्देश आहे. शिक्षक जसा दिसण्यावर भर देतो तसा त्याने असण्यावर पण भर द्यायला हवा. साडी,माडी,गाडीच्या पलीकडे शिक्षक उठून दिसायला हवा.
अनेक शाळेच्या कर्मचारी कक्षामध्ये महिला शिक्षकांमधले संवाद बघायला गेलं तर कोणती रेसिपी कशी बनवायची, साडीचा कलर छान आहे, आपला ड्रेस कोड कसा असायला हवा, घर कसं बांधलंय, या गोष्टींवर चर्चा असते. पण जो पर्यंत यापलीकडे जाऊन शिक्षकांचे संदर्भ बदलता येणार नाहीत तो पर्यंत देशाचे संदर्भ बदलणार नाही.
'शि' म्हणजे शीलवान, 'क्ष' म्हणजे क्षमाशील आणि 'क' म्हणजे कायम विद्यार्थी असण्याची वृत्ती
पूर्वी गावांमध्ये शिक्षकांना मान होता. लोकं वयक्तिक सामाजिक प्रश्न शिक्षकांकडून सोडवून घ्यायचे. 'गुरुजी आम्हाला समजत नाहीये काय करता येईल?' हे जे शिक्षकच समाजात स्थान होतं ते आज हरवलंय. शिक्षक कसा असायला हवा तर शिक्षकाच्या नावामध्येच ते दडलंय.
'शि' म्हणजे त्याने शीलवान असायला हवं. 'क्ष' म्हणजे क्षमाशील आहे आणि 'क' म्हणजे कायम विद्यार्थी असण्याची वृत्तीची त्याची असायला हवी. शिक्षकाने नैतिकतेच्या स्तरावर असलेली जबाबदारी कधीही विसरायला नको. जे की शिक्षक आज विसरत चाललाय.
‘तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच योग्य ते उत्तर देऊ शकणार नाही’
'पुस्तकांच्या भिशीत' पहिली चिठ्ठी ज्यांच्या नावाची निघाली त्या मनीषा कांबळे ह्या मालती माने विद्यालयात गेल्या पंधरा वर्षांपासून शिक्षक आहेत. त्या सांगतात, ‘शाळेमधल्या शिक्षिका मिळून आम्ही आधीपासूनच भिशी चालवायचो पण त्यातून दागिने घे, नवीन साडी घे असं करायचो.

हे जेव्हा संजय रेंदाळकर सरांना कळलं आणि त्यांनी एक संकल्पना आमच्यासमोर मांडली की आपण पुस्तकांची भिशी सुरु केली तर.. यावर्षी शाळेचा पहिला कार्यक्रम म्हणजे शाहू जयंती आणि त्याच दिवशी आम्ही या भिशीला सुरवात केली. वाचन माणसाला समृद्ध करतं हे माहिती होतंच पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला पुस्तकांच्या भिशीतून आला.
ज्या दिवशी शाळेची मीटिंग असते म्हणजे महिन्याच्या 30 तारखेला त्याच दिवशी चिठ्ठी काढायला सुरवात केली. 30 जूनला या भिशीची सुरवात केली आणि योगायोगाने पहिली भिशी मलाच लागली. संजय रेंदाळकर सरांनी मला पुस्तक आणून दिली. वेगवेगळ्या विषयांची ती पुस्तकं आहेत. साने गुरुजींची तर आहेतच पण जी नवीन पुस्तकं आहेत, जी शिक्षकाने वाचायला हव,. जी स्वतःला ही समृद्ध करतील.
आताच मी संविधानाचे पुस्तक वाचलं. संविधान कोणी लिहिलं, कधी लिहिलं आणि त्यावर आपला देश चालतो एवढंच मला ते पुस्तक वाचण्याआधी माहिती होतं. पण जेव्हा ते पुस्तक वाचायला घेतलं आणि जेव्हा वाचून ते पूर्ण झालं तेव्हा संविधानातल्या बारीक सारीक गोष्टी कळल्या. ज्यावर एवढा मोठा देश चालतो ते लिहायला किती मेहनत लागली आणि त्यातील मूल्य आपण कशी जपली पाहिजे, आपले हक्क काय या सगळ्या गोष्टी समजल्या.
बायकांचं कसं आहे जी गोष्ट विकत घेतली असेल त्याचा पुरेपूर वापर होईपर्यंत काही सोडत नाहीत. मग विकत घेतलेली पुस्तक आहेत त्यात पैसे गेलेत म्हणून त्याच दिवशी ठरवलं की सगळी पुस्तक वाचायची आणि जपून ठेवायची. त्याप्रमाणे मी पुस्तकं वाचायला घेतलीये.
शाळेमध्ये कसं आहे, मुलं लहान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचं कुतुहूल असल्याकारणाने कोणताही प्रश्न कधीही विचारतात. त्यामुळे मला वाटतं जो पर्यंत मी चौफेर वाचन करणार नाही तो पर्यंत मुलांना त्यांच्या प्रश्नांच योग्य ते उत्तर देऊ शकणार नाही. इतिहास शिकवतांना मुलं प्रश्न करतात की शिवाजी महाराज खोटे बोलून पळून गेले का? त्यांनी हातावर तुरी दिल्या होत्या.
मग ते खोटे वागले का? त्याच चांगलं उत्तर देण्यासाठी मला प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं 'दगलबाज शिवाजी' नावाचं पुस्तक वाचल्यामुळे देण्यात आलं. ते पुस्तक मी वाचल्यामुळे मुलांना शिवाजी महाराज काय होते हे शिकवतांना मला आता काही अडचण येत नाही.






