चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात रोशन कुडे याच्या किडनी विक्री प्रकरणाने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. या प्रकरणाच्या तपासात किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले असून, एसआयटीने सोलापूर येथून अटक केलेला डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याची माहिती समोर आली आहे. एका किडनीमागे एक लाख रुपयांचे कमिशन मिळत असल्याने तो गरजू व आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना हेरून किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रामकृष्ण हा मूळचा उच्चशिक्षित आहे. सन 2015 मध्ये व्यवसायात अपयश आल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला. याच काळात फेसबुकवरील ‘किडनी डोनर’ या ग्रुपच्या माध्यमातून तो किडनी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संपर्कात आला. या ग्रुपमधील एका एजंटशी संपर्क वाढल्यानंतर 2018 मध्ये तो कोलकाता येथे त्या एजंटला भेटायला गेला. यानंतर त्या एजंटनेच त्याला कंबोडिया येथे नेले. कंबोडिया येथील 'प्रेआ केत मेलिआ' हॉस्पिटल, फ्नॉम पेन्ह (मिलिटरी हॉस्पिटल) येथे रामकृष्णने स्वतःचीही एक किडनी विकल्याचे तपासात समोर आले आहे. किडनी विक्रीनंतर मिळालेल्या पैशामुळे तो या रॅकेटचा कायमस्वरूपी भाग बनला. त्यानंतर त्याने ‘डॉ. कृष्णा’ या नावाने एजंट म्हणून काम सुरू केले.)
एसआयटीच्या माहितीनुसार, डॉ. कृष्णा प्रत्येक किडनी विक्रीमागे सुमारे एक लाख रुपयांचे कमिशन घेत असे. आर्थिक संकटात असलेले, कर्जबाजारी किंवा बेरोजगार तरुण यांना तो गाठत असे. भारतातून अशा व्यक्तींना कंबोडियाला नेऊन त्यांची किडनी काढण्यात येत होती. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून किमान 12 भारतीय नागरिकांनी कंबोडियामध्ये किडनी विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे आहे नेमकं प्रकरण...
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी शेतीला पूरक उत्पन्न मिळावे म्हणून काही वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी दोन खासगी सावकारांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. सुरुवातीला व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र गाई आजारी पडून मृत्युमुखी पडल्या, पशुवैद्यकीय खर्च वाढला आणि दूध उत्पादन पूर्णपणे बंद झाले. शेतीतूनही पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने कर्जफेड अशक्य होत गेली.
सावकारांकडून दरमहा 10 ते 20 टक्के दराने बेकायदेशीर व्याज आकारले जात असल्याचा आरोप रोशन कुडे यांनी केला आहे. व्याजावर व्याज, दंड आणि इतर खर्चामुळे मूळ एक लाखांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी शेतीचा काही भाग, ट्रॅक्टर व घरातील मौल्यवान वस्तू विकल्या, तरीही कर्ज कमी झाले नाही.)
असह्य मानसिक दबावामुळे सावकारांच्या सांगण्यावरून किडनी विकण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कंबोडिया येथे शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली असून त्याबदल्यात मिळालेले सुमारे आठ लाख रुपये कर्जफेडीसाठी वापरले गेले.
पोलिसांनी पैशांचा मागोवा घेतला
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे रोशन कुडे याला किडनी विक्रीपोटी मिळालेले आठ लाख रुपये. कंबोडियात शस्त्रक्रिया सुरू असतानाच हे पैसे भारतीय बँक खात्यातून रोशनच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे पैसे ज्या भारतीय बँक खात्यातून वळते करण्यात आले, ते खाते नेमके कुणाचे आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या आर्थिक व्यवहारातून आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोलकात्यातील एजंट लवकरच गजाआड..
डॉ. कृष्णाला कोलकात्यात भेटलेला मुख्य एजंट हा या रॅकेटचा कळीचा सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या एजंटविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
तक्रार मागे घेण्यासाठी ‘एक कोटींची’ ऑफर?
या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले असून, ज्या दिवशी रोशन कुडे याच्या किडनी विक्रीची चर्चा समोर आली, त्याच दिवशी नागभीड तालुक्यातील आरोपी सावकारांनी त्याला तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या बाबतही पोलिसांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट झाले आहे. एसआयटीकडून तपासाचा आवाका वाढवण्यात येत असून, आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब व गरजू नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या या रॅकेटवर कडक कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.






