विकीभाई वनकोठेकर
- 'बाबासाहेब आणि संघ यांचे सख्य होते', 'आंबेडकर संघाचे प्रशंसक होते', 'त्यांना संघाची विचारधारा आवडत होती', असा सुनियोजित अपप्रचार गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणावर संघाद्वारे का पसरवला जात आहे?
- काय आहे संघाच्या दाव्यांची वस्तुस्थिती आणि पुराव्यांची चाळणी? आंबेडकरी कार्यकर्त्यांची दिशाभूल कशाप्रकारे केली जात आहे?
- बाबासाहेबांची विचारधारा आणि संघाची विचारधारा या दोन परस्परविरोधी ध्रुवांवर उभ्या आहेत. त्या कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, कारण एक जगण्याची विचारधारा आहे, दुसरी शोषणाची.
नाझी जर्मनीत हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स म्हणाला होता की, "एखादी खोटी गोष्ट इतक्यांदा पुनरावृत्त करा की, ती सत्य वाटू लागेल." आज भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्याचे वैचारिक सहकारी पक्ष हे तंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात वापरत आहेत. 'बाबासाहेब आणि संघ यांचे सख्य होते', 'आंबेडकर संघाचे प्रशंसक होते', 'त्यांना संघाची विचारधारा आवडत होती', असा सुनियोजित अपप्रचार गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे.
आरएसएस आणि भाजप 2014 पासून आंबेडकरांना हिंदुत्व विचारधारेचे उत्कट समर्थक म्हणून प्रोजेक्ट करण्याचे प्रयत्न करत आहेत. आंबेडकर यांना आरएसएस आणि भाजपच्या सांस्कृतिक-राजकीय शब्दसंग्रहाशी जुळणाऱ्या प्रतिमेत दाखवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. हे का होत आहे? कारण आंबेडकरांची लोकप्रियता, त्यांचे बौद्धिक वजन आणि दलित-बहुजन समाजावरील त्यांचा प्रभाव हे संघाला राजकीयदृष्ट्या आत्मसात करायचे आहे. पण त्यासाठी इतिहासाशी खेळावे लागते. या लेखात त्या खेळाचा पर्दाफाश केला आहे.

संघाचा दावा काय आहे?
संघ आणि त्याचे प्रवक्ते मुख्यतः तीन 'पुरावे' सादर करतात…
- पहिला दावा : बाबासाहेबांनी 1939 साली पुण्यात संघाच्या एका शाखेला भेट दिली आणि तेथील जातिभेदविरहित वातावरणाने ते 'प्रभावित' झाले.
- दुसरा दावा : दत्तोपंत ठेंगडी हे संघाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते आणि त्यांनी बाबासाहेबांचे 1954 च्या भंडारा पोटनिवडणुकीत निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केले.
- तिसरा दावा : गोळवलकर गुरुजींनी सप्टेंबर 1949 मध्ये बाबासाहेबांची भेट घेतली आणि त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते.
या तीन दाव्यांचे वास्तव काय आहे, हे आता एक एक करून पाहूया.
दाव्यांची वस्तुस्थिती आणि पुराव्यांची चाळणी.
दावा 1 : संघ शाखेला भेट आणि 'प्रभावित' होणे
बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि तेथील अस्पृश्यांना 'समतेची' वागणूक दिली जात होती, म्हणून ते प्रभावित झाले. हे दावे कोणत्याही दस्तऐवजी पुराव्याशिवाय केले जातात. या भेटीचे कोणतेही छायाचित्र, पत्रव्यवहार किंवा त्याकाळी प्रकाशित झालेली बातमी आरएसएसने आजपर्यंत सादर केलेली नाही. बाबासाहेबांची संघशाखा भेट ही काल्पनिक आहे. कोणताही पुरावा -छायाचित्र, पत्रव्यवहार किंवा समकालीन वृत्तपत्रातील बातमी - आरएसएस ने आजपर्यंत सादर केलेला नाही.
शिवाय, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा . जर बाबासाहेब संघाशी इतके जवळचे होते आणि हिंदू धर्म व संघाचे इतके प्रशंसक होते, तर त्यांनी 'मी हिंदू जन्मलो कारण माझ्या हातात नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही' - हे सांगणाऱ्या त्यांच्या व्यथेचे काय करायचे? हे विधान नेमके 1935 सालचेच आहे, ज्या वर्षी संघ म्हणतो की, बाबासाहेब त्यांच्या शाखेत आले होते!

दावा 2 : दत्तोपंत ठेंगडी आणि निवडणूक प्रतिनिधित्व
ठेंगडी हे अनुसूचित जाती महासंघाचे सचिव होते असा दावा केला जातो. पण या संघटनेत केवळ अनुसूचित जातींचे लोकच सदस्य होऊ शकत होते, मग ठेंगडी, जे एससी नव्हते, ते त्याचे सदस्य कसे होतील? हे अर्धसत्यांच्या संपूर्ण व्यूहरचनेचे एक उदाहरण आहे. निवडणूक प्रतिनिधी नेमणे हे तोंडी होत नाही, त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी पत्र द्यावे लागते. ठेंगडी हे बाबासाहेबांचे निवडणूक प्रतिनिधी होते, यासाठी असा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही.
दावा 3 : गोळवलकर भेट आणि सौहार्द
7 सप्टेंबर 1949 रोजी गोळवलकर गुरुजी दिल्लीत कायदेमंत्री आंबेडकर यांना भेटले. ते मराठ्यांना रोखण्यासाठी बाबासाहेबांची मदत मागण्यासाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले - "आरएसएस हा एक विषारी वृक्ष आहे. आरएसएस पेशवाईचे स्वप्न पाहत आहे. तुमच्यासोबत राहणे शक्य नाही. मी तुम्हाला पाठिंबा देऊ शकत नाही." या भेटीचा सविस्तर अहवाल बाबासाहेबांच्या 'जनता' वृत्तपत्रात 10 सप्टेंबर 1949 रोजी प्रकाशित झाला. म्हणजेच संघाने ज्या भेटीचे वर्णन 'कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो' असे केले, त्याच भेटीत बाबासाहेबांनी संघाला 'विषारी वृक्ष' म्हटले होते, हे संघाने आपल्या कथनातून सोयीस्करपणे वगळले!
त्यावेळी दिल्ली बौद्ध महासभेचे अध्यक्ष सोहनलाल शास्त्री हे या भेटीला उपस्थित होते. त्यांनी आपल्या 'बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संपर्क में 25 वर्ष' या पुस्तकात या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केले आहे. हे थेट साक्षीदाराचे लिखित विवरण आहे, जे आरएसएस च्या दाव्याला सरळ खोडून काढते.
गोबेल्स तंत्र… खोट्याचा कारखाना अन् अपप्रचाराची यंत्रणा
आरएसएस च्या वैचारिक मुळांचा शोध घेता, ती जर्मन राष्ट्रीय समाजवादात (नाझीवाद) सापडतात. आरएसएस आपल्या अपप्रचारात गोबेल्सी दुहेरी भाषेचा वापर करते . एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की, ती सत्य वाटू लागते. बाबासाहेब आंबेडकरांना 'राष्ट्रवादी' नायकांच्या मंदिरात सामावून घेण्याचे हे तंत्र म्हणजे दलित - आदिवासी - मूलनिवासी मानसात घुसण्याच्या राजकीय निराशेचे प्रकटन आहे.
आंबेडकरांनी हिंदू धर्मावर केलेली कठोर टीका त्यांच्या संपूर्ण लेखनात व्यापलेली आहे. हिंदू धर्माबद्दलचा त्यांचा विचार, त्यांच्या कृतींमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. हाच इतिहास आरएसएस च्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्दिष्टाच्या आड येतो. म्हणून दलितांना संघाच्या कारणात सहभागी करण्यासाठी, संघाला आंबेडकरांना मुस्लीम आणि कम्युनिस्ट विरोधी म्हणून प्रोजेक्ट करण्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात, त्यांचे 'भगवेकरण' करायचे आहे.
अपप्रचाराचे स्वरूप
आरएसएस आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी आंबेडकरी प्रतीकांना हिंदुत्व प्रवचनात समाविष्ट करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या कथनांमध्ये आंबेडकरांना एक 'हिंदू समाजसुधारक' म्हणून निवडकपणे चित्रित केले जाते, जे अस्पृश्यतेला विरोध करत होते आणि मुस्लिमांबाबत 'समान मते' बाळगत होते.
आरएसएस चे विचारक आंबेडकरांना जातिव्यवस्था, अस्पृश्यता, कम्युनिझम आणि मुस्लिमांबाबत त्यांच्याशी सहानुभूती असलेले म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. दुर्दैवाने, या दाव्यांपैकी कोणत्याही लेखात - मुद्रित किंवा ऑनलाइन - या गोष्टी सिद्ध करण्यासाठी कोणतेही स्रोत दिलेले नाहीत.
विशेष म्हणजे, ठेंगडी यांनी हे पुस्तक बाबासाहेबांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी लिहिले. बाबासाहेब स्वतः त्याचे खंडन करण्यासाठी हयात नव्हते. हे मृत व्यक्तीच्या नावे, हवे ते शब्द घालण्याचे काम आहे.

बाबासाहेब आणि संघ : मूलभूत विचारभेद; मनुस्मृती विरुद्ध संविधान
25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मृती जाळली, जी जातिव्यवस्थेचा मूळ आधार होती आणि अस्पृश्यांवरील अत्याचाराला धार्मिक मान्यता देत होती. संघ त्याच मनुस्मृतीला आदर्श मानत असे.
संविधानाचा अंतिम मसुदा सादर झाल्यानंतर आरएसएस च्या मुखपत्र 'ऑर्गनायझर'च्या नोव्हेंबर 1949 च्या अंकात एक कठोर संपादकीय आले - "नव्या भारताच्या संविधानात प्राचीन भारतीय संवैधानिक कायदे, संस्था, नामावली यांचा कोणताही मागमूस नाही. मनूचे कायदे हे सामाजिक व्यवस्थेचा आधार होते." - हे थेट आंबेडकरांच्या लोकशाही संविधानाचे खंडन होते. एकीकडे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि दुसरीकडे आरएसएस ने तेच संविधान नाकारले, हा एकच विरोधाभास दोघांमधील मूलभूत वैचारिक खाई स्पष्ट करतो.
हिंदू राष्ट्र : बाबासाहेबांचा स्पष्ट इशारा
बाबासाहेबांनी त्यांच्या 'पाकिस्तान ऑर दी पार्टिशन ऑफ इंडिया' (1946) या ग्रंथात लिहिले :
"हिंदू राज वास्तवात आले, तर निःसंशयपणे ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल. हिंदू काहीही म्हणोत, हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी एक धोका आहे. तो लोकशाहीशी विसंगत आहे. हिंदू राज कोणत्याही किमतीत रोखलेच पाहिजे."
हे आरएसएसच्या हिंदू राष्ट्राच्या स्वप्नावर बाबासाहेबांनी केलेले थेट आणि स्पष्ट प्रहार आहे. या एका उद्धरणाने संघाचा संपूर्ण अपप्रचार धुळीस मिळतो.
जातिनिर्मूलन विरुद्ध समरसता
आंबेडकर जातिनिर्मूलनाचे पुरस्कर्ते होते. आरएसएसने याउलट 'सामाजिक समरसता मंच' स्थापन केला. आरएसएस साठी वेगवेगळ्या जाती हिंदू समाजाला बळ देणाऱ्या भागांसारख्या होत्या, म्हणजेच जातिव्यवस्था टिकवून ठेवणे हे आरएसएस चे उद्दिष्ट होते. इथेच या दोन विचारप्रवाहांमधील मूळ विरोध आहे.
'ॲनहिलेशन ऑफ कास्ट' (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) हे बाबासाहेबांचे मूळ वैचारिक स्थान. संघाचे स्थान, समरसता म्हणजे 'वेगळ्या जाती असूनही एकत्र राहणे'. हे दोन्ही एकत्र येऊ शकत नाहीत.
संविधान सभेतील घटना : संघाकडून अडथळा
याच काळात आरएसएस संविधान सभेत बाबासाहेब लिहीत असलेल्या संविधानाला विरोध करत होती. आरएसएस ने हिंदू कोड बिलाला देखील विरोध केला. संघटनेच्या सदस्यांनी सभागृहाच्या गॅलरीत घुसून संविधान सभा विस्कळित करण्याचा प्रयत्न केला - हा प्रसंग संसदीय दस्तऐवजांत नोंदवला गेला आहे.

बाबासाहेबांच्या लेखणीतून संघाला उत्तर देण्यात आले आहे. बाबासाहेबांनी संघाच्या विचारधारेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
- चातुर्वर्ण्य व्यवस्थेबाबत : आरएसएसचे गोळवलकर गुरुजी चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते. बाबासाहेबांनी याला थेट विरोध केला. गोळवलकर गुरुजी सनातन संस्कृतीच्या रक्षणाचे आणि हिंदू राष्ट्र उभारणीचे समर्थक होते. आंबेडकरांची भूमिका यापेक्षा संपूर्णतः विपरीत होती.
- सावरकरांच्या दोन-राष्ट्र सिद्धांताबाबत : बाबासाहेब म्हणाले - "आश्चर्य म्हणजे, सावरकर आणि जिना एक राष्ट्र विरुद्ध दोन राष्ट्रे या प्रश्नावर परस्परविरोधी नाहीत, ते खरे तर पूर्ण सहमत आहेत." म्हणजेच बाबासाहेबांनी सावरकरांना जिनांएवढेच धोकादायक मानले.
- हिंदू धर्माबाबत : बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले - "मी हिंदू जन्मलो कारण माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही." हे आरएसएस च्या 'बाबासाहेब हिंदू धर्माभिमानी होते' या दाव्याला थेट खोडून काढते.
'रिडल्स इन हिंदुइज्जम'... जेव्हा आरएसएसने बाबासाहेबांच्या विचारांवरच हल्ला केला!
1987-88 मध्ये बाबासाहेबांचे 'रिडल्स इन हिंदुइज्जम' हे पुस्तक महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करण्याचे ठरवले. या पुस्तकात हिंदू देवदेवतांच्या कथांवर तर्कनिष्ठ टीका होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी, ज्यात संघाचे अनुयायी होतेच, या पुस्तकाला कडाडून विरोध केला.
आंबेडकरांच्या 'रिडल्स इन हिंदुइज्जम', 'रिडल्स ऑफ राम अँड कृष्णा' आणि 'रेव्होल्यूशन अँड काऊंटर रेव्होल्यूशन' या पुस्तकांचे आरएसएस समर्थन करते का? आरएसएस समरसता इच्छितो, तर आंबेडकरांनी जातिनिर्मूलन इच्छिले - हे त्यांचे मूलभूत वैचारिक स्थान होते.
एकीकडे, बाबासाहेबांना 'आपले' म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच पुस्तकाला विरोध करायचा, हाच संघाच्या दुटप्पीपणाचा ठळक पुरावा आहे.
आंबेडकरी कार्यकर्त्यांची दिशाभूल, एक रणनीती
भंडारा पद्धती - कमकुवत दुव्याचा गैरवापर : भंडारा पोटनिवडणुकीत आरएसएस कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांसाठी काम केले, असा दावा ठेंगडी यांनी केला. परंतु, बाबासाहेब निवडणूक हरले असले तरी त्यांनी विश्लेषण केले की, त्यांना मिळालेली मते अनुसूचित जातींच्या एकूण मतांपेक्षा जास्त होती, म्हणजे वरच्या जातींनीही त्यांना मते दिली - अशी नोंद ठेंगडींनी केली.
हा दावा लक्षपूर्वक वाचा. यात आरएसएसने बाबासाहेबांना मते मागितली, असे सांगितले जाते, पण बाबासाहेबांनी आरएसएस ला आपले मानले असे सांगितले जात नाही.
'आपले' करण्याची राजकीय गरज : आरएसएस-भाजप ला चांगले ठाऊक आहे की, दलित समाज त्यांच्या हिंदुत्व प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांची रणनीती - हिंदू वि. इतर (मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट) - ही दलितांनी स्वतःला हिंदू मानले तरच यशस्वी होते. दलित आंबेडकरांना मानतात, म्हणून आंबेडकरांनाच 'सांप्रदायिक' बनवणे हा एकमेव मार्ग उरतो. आंबेडकरांना प्रत्यक्षात भगवेकरण करता येत नाही, त्यामुळे संघ परिवार दलितांना आपल्या कारणासाठी भाग घेण्यास प्रवृत्त करत असताना, दलित चळवळीची कंबरडी मोडण्यासाठी शक्य ते सर्व करत आहे.
यासाठी संघाने तीन पातळ्यांवर काम केले :
- पहिली पातळी - आंबेडकरांचे मुस्लीमविरोधी विधाने संदर्भातून काढून वापरायची, जेणेकरून दलितांना वाटेल 'बाबासाहेबही आमच्यासारखेच विचार करत होते'.
- दुसरी पातळी - आंबेडकरांना 'हिंदू समाजसुधारक' म्हणवायचे, त्यांचा बौद्ध धर्मांतराचा निर्णय आणि हिंदू धर्मावरील टीका दडपायची.
- तिसरी पातळी - खोट्या गोष्टी इतक्यांदा पुनरावृत्त करायच्या की त्या सत्य वाटू लागतील - हे गोबेल्सी तंत्र.

सत्याची एकच कसोटी : बाबासाहेबांचे लेखन
बाबासाहेबांनी स्वतः अनेक ग्रंथांमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. बाबासाहेबांनी संघाला आणि हिंदू महासभेला ब्रिटिश राजवट जाऊन लोकशाहीच्या जागी ब्राह्मणशाही आणू पाहणाऱ्या चळवळी म्हणून पाहिले. त्यांच्यासाठी हिंदू राष्ट्राची संकल्पना दलित, बौद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना वगळणारी होती.
1. 'ॲनहिलेशन ऑफ कास्ट' — जातिनिर्मूलन. संघ जातिव्यवस्था टिकवून ठेवतो.
2. 'रिडल्स इन हिंदुइज्जम' — हिंदू धर्माची चिकित्सा. संघ या पुस्तकाला विरोध करतो.
3..'पाकिस्तान ऑर दी पार्टिशन ऑफ इंडिया' — ज्यात 'हिंदू राज सर्वात मोठी आपत्ती' असे लिहिले आहे. संघाचे उद्दिष्ट हिंदू राष्ट्र.
4. बौद्ध धर्मांतर (14 ऑक्टोबर 1956) — हिंदू धर्माशी संपूर्ण संबंधविच्छेद. संघाचा दावा 'ते हिंदू समाजसुधारक होते'.
या चार गोष्टी एकत्र ठेवा मग संघाचा अपप्रचार आपोआप खोटा ठरतो.
उपसंहार : बाबासाहेब कुणा एकाचे नाहीत; ते विचारांचे आहेत!
बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर हे कुणाच्याही खिशात बसवता येणारे नेते नाहीत. ते एक जिवंत विचारप्रणाली आहेत. संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुता हे चार शब्द ज्याच्या कार्याचा आत्मा आहेत, त्यांना जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या, मनुस्मृतीचे गोडवे गाणाऱ्या आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या संघटनेचे 'प्रशंसक' म्हणणे, हा इतिहासाशी केलेला विश्वासघात आहे.
आरएसएसच्या विचारधारेशी असलेल्या मूळ विरोधाभासांना न जुमानता, संघाचे विचारवंत आंबेडकरांचा आदर दाखवत राहतात. निवडणुकीच्या फायद्यांसाठी.
आंबेडकरी कार्यकर्त्यांना एकच विनंती - बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांचे स्वतःचे लेखन वाचा. कारण बाबासाहेबांची विचारधारा आणि संघाची विचारधारा या दोन परस्परविरोधी ध्रुवांवर उभ्या आहेत. त्या कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, कारण एक जगण्याची विचारधारा आहे, दुसरी शोषणाची.






