शंतनू खुजे
- गुडघ्याच्या दीर्घकालीन आजारामुळे सायनाची निवृत्तीची घोषणा
- दोन वर्षे गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटनपासून दूर होती सायना
- ऑलिम्पिक पदकानंतर बॅडमिंटनमध्ये घडलेली पुढची पिढी हे खरे सायनाचे यश
2012 च्या लंडन ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती आणि बॅडमिंटनमध्ये देशाचे नाव उंचावणारी 'फुल' राणी असा जिचा लौकिक आहे त्या सायना नेहवालने मंगळवारी गुडघ्याच्या दीर्घकालीन आजारामुळे जवळजवळ दोन वर्षे खेळापासून दूर राहिल्यानंतर बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली. "मी दोन वर्षांपूर्वी खेळणे थांबवले होते. मला खरंतर असं वाटलं की मी माझ्या स्वतःच्या मर्जीवर या खेळात प्रवेश केला आणि माझ्या स्वतःच्या मर्जीनेच सोडला, त्यामुळे ते जाहीर करण्याची गरज नव्हती," असं सायना नेहवालने ऑलिंपिक्स डॉट कॉमला दिलेल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
'मी माझे ऑलिम्पिकचे कांस्यपदक घ्यायला मंचावर उभी राहिले, तेव्हा सुवर्ण आणि रौप्य मिळविलेल्या बाजूच्या दोन्ही चिनी बॅडमिंटनपटू माझ्याकडे पाहत होत्या. माझ्या जागीही चिनी मुलगी असणे अपेक्षित असल्याचे त्यांच्या नजरेतूनच मला जाणवत होते. मग मी गोपी सर, कश्यप, किरण सर, माझे तंदुरुस्ती प्रशिक्षक यांच्याकडे पाहिले, तर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ते पाहीपर्यंत माझ्या जाणिवेत हे रुजलेच नव्हते, की मी नेमके काय यश मिळवले आहे...' अशी आठवण तिने निवृत्त होताना जागवली.
आईच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडलं बॅडमिंटनचं क्षेत्र
सायना मूळची हरियाणाची. तिचे वडील कृषी क्षेत्रातील शिक्षकी पेशात तर आई राज्य पातळीवरील बॅडमिंटनपटू. वडिलांच्या बदलीमुळे नेहवाल कुटुंब हिसारमधून हैदराबादला आले. भाषा अपरिचित, त्यामुळे मित्र-मैत्रिणी फारसे नाहीत. मग सायनाने स्वतःला बॅडमिंटनमधून व्यक्त करायला सुरुवात केली. आठव्या वर्षी ही सुरुवात छंदातून झाली, पण आईचे स्वप्न होते, की सायनाने राष्ट्रीय स्तरावर चमकावे. पुढे ते सायनाचे झाले आणि लहान वयात तिने ते पूर्णही केले.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी सायना उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. तिसऱ्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी असतानाही तिने हा सामना गमावला. हे अपयश तिच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. २००९ मध्ये इंडोनेशिया ओपन जिंकून तिने सुपर सीरिज जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला.
लंडनच्या वेम्बली एरिनामध्ये रचला इतिहास
२०१२ मध्ये लंडनच्या वेम्बली एरिनामध्ये झालेल्या सामन्यात चीनची बॅडमिंटनपटू वांग झिन गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवृत्त झाली आणि सायनाला कांस्य पदक मिळवत इतिहास रचला , तेव्हा अनेकांनी याला नशिबाचा भाग मानले. परंतु, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी सायनाने जे सातत्य दाखवले, ते वाखाणण्या जोगे होते. सायनाच्या या यशाने भारतीय बॅडमिंटनचा वर्षानुवर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला. या पदकानंतर भारतात बॅडमिंटन क्रिकेटनंतरचा दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ बनला. सायनाने मिळवलेले हे पदक भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील 'टर्निंग पॉइंट' मानले जाते.
सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले, तेव्हा सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. तोवर बॅडमिंटनमध्ये कोणाही भारतीयाला ऑलिम्पिक पदक मिळवता आले नव्हते. सायनाने देशाला काय दिले असेल, तर बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात भारतातील मुलगे आणि मुलीही जग जिंकू शकतात, हा विश्वास. त्या अर्थाने तिने जिंकलेल्या पदकानंतरच्या पुढच्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांत - रिओ (२०१६) आणि टोकियो (२०२१) पी. व्ही. सिंधूने अनुक्रमे मिळवेली रौप्य आणि कांस्य पदके हे त्याचे एक प्रकारे दृश्य परिणाम.
एप्रिल २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाली. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर हे साध्य करणारी ती दुसरी भारतीय आणि पहिलीच भारतीय महिला ठरली. हा काळ सायनाच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ होता. भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू गोपीचंदने सायनाला घडवले. मधल्या काही कालावधीत विमलकुमार तिचे प्रशिक्षक होते. पण तिची गेलेली लय पुन्हा सापडली, ती गोपीचंदकडे परतून आल्यावरच. सायनाच्या या सर्व प्रवासात तिच्या प्रशिक्षकांबरोबरच तिचा लहानपणीचा मित्र, सहखेळाडू आणि नंतर पती पारुपल्ली कश्यप याचाही मोठा वाटा, ज्याचा उल्लेख सायनाही नम्रपणे करते.
दुखापतीमुळे जास्त वेळ सराव अशक्य
सन २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर दुखापतींनी सायनाचा कायम पिच्छा पुरवला, तो थेट परवा निवृत्ती जाहीर करेपर्यंत. गुडघ्याला झालेली दुखापत, वाढते वय यांमुळे तिने थांबण्याचा निर्णय घेतला. पण सायनाने निवृत्ती ही फक्त गुडघ्याच्या दुखापतीमुळे जाहीर केली नाही, तर त्यामागे आणखी एक कारण आहे. डॉक्टरांच्या निदानानुसार, सायनाला आता गुडघ्याचा संधीवात झाला आहे. सततच्या जंपिंगमुळे तिच्या गुडघ्यातील कार्टिलेज पूर्णपणे झिजली आहे. बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी खेळाडूला दररोज सरासरी ८ ते ९ तास सराव करावा लागतो. सायनाची सध्याची शारीरिक स्थिती अशी आहे की, ती १-२ तासांपेक्षा जास्त वेळ कोर्टवर तग धरू शकत नाही. जर तिने सराव वाढवला, तर गुडघ्याला येणारी सूज तिला आठवडाभर चालू देत नाही. हे गणित जुळत नसल्यामुळे आपण निवृत्ती घेत असल्याचं सायनाने सांगितलं.
आधी घटस्फोटाची घोषणा आणि नंतर लगेच माघार
गेल्या वर्षी १६ जुलै रोजी सायनाने घटस्फोटाची घोषणा केली होती. "आयुष्य आपल्याला कधीकधी वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते, खूप विचार आणि विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती आणि वेळ निवडत आहोत,आठवणींसाठी मी आभारी आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या काळात आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद," असे सायनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते.
समाज माध्यमांवर घटस्फोटाची घोषणा केल्याच्या काही आठवड्यांनंतर, या जोडप्याने त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आणि स्वतःला आयुष्यात दुसरी संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. सायनाने इन्स्टाग्रामवर कश्यपसोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचे महत्व शिकवते. त्यामुळेच आम्ही पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत."

गेली दोन वर्षे सायना गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटनपासून दूरच होती. ती सहभागी झालेली अखेरची स्पर्धा - २०२३ मधील 'सिंगापूर ओपन'. त्यानंतर तिने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली नव्हती, तरी ती आता परत खेळू शकणार नाही, याची जाणीव बॅडमिंटन वर्तुळाला नक्की झाली होती. 'मी या खेळात माझ्या अटी-शर्तीवर आले, त्याच आधारावर मी त्यातून बाहेर पडीन. तुम्हाला आणखी खेळत राहणे शक्य नसेल, तर समजून घ्यावे, की आता थांबावे;' असं सायना म्हणते.
सन २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर दुखापतींनी सायनाचा कायम पिच्छा पुरवला, तो थेट परवा निवृत्ती जाहीर करेपर्यंत. गुडघ्याला झालेली दुखापत, वाढते वय यांमुळे तिने थांबण्याचा निर्णय घेतला. चिनी, कोरियन, जपानी स्पर्धकांना आपले बॅडमिंटनपटू हरवू शकतील, असा विश्वास निर्माण झाला तो सायनाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर. तो विश्वास आणि त्यावर घडलेली बॅडमिंटनमधील पुढची पिढी हे खरे सायनाचे यश.






