टीम बाईमाणूस
- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सरोजिनी देसाई यांचे मुंबईत निधना झाले आणि पुन्हा चर्चेत आलं १९७० मधील कृष्णा देसाई हत्या प्रकरण.
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि सरोजिनी देसाई यांचे पती कॉम्रेड कृष्णा देसाई यांची मुंबईच्या गिरणगावात गुप्तीने हत्या करण्यात आली होती.
- या हत्येनंतर शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर झाले होते गंभीर आरोप.
- कृष्णा देसाई यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सरोजिनी देसाई विरुद्ध शिवसेनेचे वामनराव महाडिक अशी लढत रंगली आणि या निवडणुकीतूनच महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एन्ट्री झाली
- गिरणगावातील कम्युनिस्ट वर्चस्व, शिवसेनेचा उदय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या त्या घटनांचा घेतलेला मागोवा
या देशात पहिली राजकीय हत्या कोणती घडली असेल तर ती होती कॉम्रेड कृष्णा देसाई यांची… १९७० साली मुंबईत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असलेल्या कृष्णा देसाई यांचा खून झाला होता. आज या घटनेचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आमदार देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्यावेळी त्यांच्या पत्नी कॉम्रेड सरोजिनी देसाई उभ्या राहिल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट चळवळीत काम करणाऱ्या कॉम्रेड सरोजिनी यांचे मंगळवारी वयाच्या ८५ व्या वर्षी मुंबईच्या लालभाग येथे निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अनेक सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी कायम भूमिका मांडून आवाज उठवला होता.
५ जून १९७० च्या रात्री नेमकं काय घडलं होतं…? कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कोणी केली…? या हत्येप्रकरणी धागेदोरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कसे पुढे आले…? हत्येप्रकरणी कोणत्या शिवसैनिकांना अटक झाली आणि त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणूकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नी कॉम्रेड सरोजिनी देसाई यांच्याबाबतीत नेमकं काय झालं…? अशा अनेक घटनांचा वेध या लेखातून घेणार आहोत.
(कॉम्रेड कृष्णा देसाई यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या पत्नी कॉम्रेड सरोजिनी देसाई आणि कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी.)
कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून होण्यापूर्वी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडचा दादरच्या नायगावपासून भायखळ्यापर्यंतचा भाग म्हणजे सारं गिरणगाव. एके काळी तिथं अनेक कापड गिरण्या आणि कामगारांच्या चाळी व घरं होती. या कामगारांची अधिकृत संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही काँग्रेसची असली तरी कामगारांचा पाठिंबा मात्र कम्युनिस्ट व समाजवाद्यांना असायचा. पगार, बोनससाठी संप यांच्या नेतृत्वाखाली व्हायचे आणि गिरणी मालक करार करायचे रा. मि. म. संघाशी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या परळमधील दळवी बिल्डिंगमधील कार्यालयात सतत लोकांची गर्दी असे. प्रश्न मांडायला व सोडवून घ्यायला कामगार हक्काने तिथं येत.
शिवसेनेची स्थापना आणि कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे म्हणतात की, परळ मतदारसंघातून १९६७ च्या विधानसभेत कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कृष्णा देसाई निवडून गेले होते. आधी ते चार वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते. याच काळात म्हणजे 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली आणि मराठी कामगारांचा अड्डा असलेल्या गिरणगावात शिवसेनेनं पाय पसरायला सुरुवात केली. शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचं मराठी तरुणांना खूप आकर्षण वाटत होतं. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी’ अशी तेव्हा शिवसेनेची घोषणाच होती. त्यामुळे बाप कम्युनिस्ट पक्षाबरोबर, तर त्यांची मुलं शिवसेनेत असं चित्र गिरणगावात दिसू लागलं होतं. तरीही शिवसेनेच्या वाढीत अडथळा होता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा.
५ जून १९७० च्या रात्री कॉम्रेड कृष्णा देसाईंवर गुप्तीने घाव घातले
तो दिवस होता ५ जून १९७०… मुंबईचा लालबाग परिसरातील तावरी पाड्याच्या एका मिलमध्ये बसून कॉम्रेड कृष्णा देसाई आपल्या कामगारांच्या सहलीचं आयोजन करत होते. त्यांचं नेहमीच बसायचं ठिकाण असणाऱ्या ललित राईस मिलमध्ये आपल्या कामगार मित्रांसह बसून ते चर्चा करत होते, इतक्यात काही माणसं आत आली आणि त्यांना बाहेर बोलवलंय असं सांगितलं. बाहेर वीज नव्हती त्यामुळे होता तो मिट्ट काळोख. जणू आधी ठरवूनच दिवे बंद केले होते. काही क्षणांचा अवधीही गेला नाही आणि कॉम्रेड कृष्णा देसाईंवर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर गुप्तीने घाव घालण्यात आले. त्यांनी मागे धावत जाऊन गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते मध्येच कोसळले…कधीही न उठण्यासाठी.
(कॉम्रेड कृष्णा देसाई… भारतातील पहिली राजकीय हत्या)
कॉ. कृष्णा देसाई हे कामगार चळवळीतलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा जन्म संगमेशवर तालुक्यतल्या कुणगुस या गावात झाला. नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुळातच त्यांना राजकारणात रस होता. १९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. १९४५ साली आजाद हिंद सेनेतील सुभेदार शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर लालबागच्या तावरी पाड्यात भूमिगत असलेल्या तरुणांना लष्करी प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी क्रांतिकारी समाजवादी पक्षात काम करायला सुरुवात केली. तो काळच होता कामगार चळवळींचा. त्यांचे पक्षात काही मतभेद झाले आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे आणि गिरणी कामगार युनियनचं काम बघायला सुरुवात केली. कॉ. कृष्णा देसाई जेलमध्ये असताना त्यांना नागरिकांनी महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. तसंच त्यांना गिरणी कामगारांनी एकदा नगरसेवक आणि १९६७ साली विधानसभेचे आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभाग होता.
'कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक' अशी हेडलाईन
संजीव साबडे सांगतात की, कम्युनिस्ट आमदाराची हत्या झाल्यानं महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात या घटनेची चर्चा सुरू झाली. गिरणगावात तर कामगारांनी उस्फूर्त बंद पुकारला आणि गटागटानं कामगार जमू लागले. गर्दी वाढत गेल्यानंतर या हत्येमागे कोण असावा, याचीही चर्चा सुरू झाली. कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी मोठी अंत्ययात्रा निघाली. अनेक राजकीय पक्षांचे नेते व हजारो कामगार त्यात होते. स्मशानात झालेल्या शोकसभेत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी या हत्येला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री वसंतराव नाईक जबाबदार असल्याचा आरोप केला आणि एकच खळबळ माजली.
हे आरोप आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठामध्ये जसेचा तसे छापून आले. 'कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक' अशी हेडलाईन दैनिक मराठामध्ये छापून आली आणि एकच गहजब उडाला.
(शिवसेनेने माझ्या पतीला संपवलं - सरोजिनी देसाई)
हत्येशी आपला संबंध असल्याच्या आरोपाचा बाळासाहेब ठाकरेंकडून इन्कार
या हत्येशी आपला संबंध असल्याच्या आरोपाचा ठाकरे यांनी इन्कार केला होता. कॉ. कृष्णा देसाईंच्या हत्येच्या घटनेवर बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की,
"राजकारणात असे खुनाचे तंत्र वापरले जाऊ लागले तर ती लोकशाहीची मृत्युघंटा ठरेल. राजकीय नेत्यावर मुंबईतला हा पहिलाच हल्ला असल्याने सरकारने त्याचा त्वरित बंदोबस्त करणे जरुरीचे आहे. माझ्यावर वाटेल ते आरोप होत आहेत. पण कृष्णाची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती. चौकशी सुरू असताना सर्व डाव्या पक्षांचा रोख शिवसेनेला गुंतविण्याचा आहे. विरोधी पक्षांचे हे चाळे म्हणजे आमदारकीचं दडपण आणून, सत्य काहीही असलं तरी चौकशीचा निर्णय आपल्याच मनाप्रमाणे लागावा, यासाठी सुरू असलेला दुराग्रह आहे."
मात्र नंतरच्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांना संपवणाऱ्या शिवसैनिकांचा आपणास अभिमान आहे, अशा आशयाचं विधानही केलं होतं.
कम्युनिस्टांनी पोटनिवडणूकीत कॉम्रेड सरोजिनी देसाईंना तिकीट दिलं, पण…?
कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निधनामुळे तिथं विधानसभेची पोटनिवडणूक लागली. ऑक्टोबर १९७० च्या या पोटनिवडणुकीसाठी कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांना कम्युनिस्ट पक्षाने तर शिवसेनेने वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. सरोजिनी देसाई यांच्यासाठी कॉम्रेड डांगे व सर्व डाव्या पक्षांचे नेते आणि काँग्रेसचे मोहन धारिया यांनी सभा घेतल्या. वामनराव महाडिक यांच्यासाठी शिवसेनेच्या तब्बल २८ सभा झाल्या. त्यांपैकी १५ सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं झाली होती.
(१९७० च्या पोटनिवडणूकीत सरोजिनी देसाईंना पराभूत करून महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रुपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एन्ट्री झाली.)
20 ऑक्टोबर 1970 रोजी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालात सरोजिनी देसाईंना 29 हजार 913 मतं, तर शिवसेनेच्या वामराव महाडिकांना 31 हजार 592 मतं मिळाली. 1679 मतांच्या फरकानं वामनराव महाडिक विजयी झाले. त्यांच्या रूपाने विधानसभेत व गिरणगावात शिवसेनेचा प्रवेश झाला. परळ पोटनिवडणुकीनं केवळ डाव्यांना हादरा दिला नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रुपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एन्ट्री झाली.
तीन शिवसैनिकांना झाली शिक्षा
बाळासाहेब ठाकरे यांनी नी डाव्या आणि समाजवाद्यांनी केलेले आरोप फेटाळले, तरी या हत्या प्रकरणात तपासाअंती दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे यांना 14 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना पुण्याच्या येरवाडा तुरुंगात डांबण्यात आलं. मात्र, तुरुंगातील चांगली वर्तणूक पाहता, या गुन्हेगारांची शिक्षा कमी करून 7 वर्षे करण्यात आली. ‘’कृष्णा देसाई मला संपवणार होता,’’ असं विधान काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलं. त्यात किती तथ्य होतं कोणास ठाऊक. हत्या तर प्रत्यक्षात कॉम्रेड कृष्णा देसाईंची यांचीच झाली होती.
(शिवसेना स्थापनेच्या पहिल्या सभेत बाळासाहेब ठाकरे.)
कृष्णा देसाई यांच्या हत्येच्या आधीही शिवसेनेने गिरणगावातील कम्युनिस्ट वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे डिसेंबर 1967 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं दळवी बिल्डिंगमधील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ती जुनी दळवी बिल्डिंग पाडून तिथं रुद्रा हाईट्स नावाची उंच इमारत उभी राहिली आहे. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी कम्युनिस्ट पक्षाचा काटा काढणं गरजेचं आहे, अशी शिवसेनाप्रमुखांची तेव्हा भूमिका होती. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाही कम्युनिस्ट वर्चस्व संपवायचं होतं. त्यामुळे ते शिवसेनेला मदत करत, असा आरोप होता. शिवसेनेला तेव्हा ‘वसंतसेना’ असं हिणवलं जात असे, अशी माहिती संजीव साबडे देतात.






