- अप्सरा आगा
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावरून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण चिघळलं आहे. विद्यापीठाच्या नावातील 'शिवाजी' हा एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली असून, त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत असा नामविस्तार करू नये, असा प्रस्ताव मांडला असून, तो मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही गटांच्या भूमिकेमुळे शिवाजी विद्यापीठ नामविस्तार प्रकरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापू लागले आहे.
शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास
शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न गेली अनेक वर्षे अधूनमधून चर्चेत येत असतो. गेल्या महिनाभरात तो परत चर्चेत आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, अशी सर्वसाधारण मागणी केली जाते. एक सप्टेंबर 1961 रोजी या संदर्भात नेमलेल्या समितीचे नावही श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी समिती असेच होते. तद्नंतर स्थापन झालेल्या विद्यापीठास मात्र शिवाजी विद्यापीठ असे नाव देण्यात आले. त्या पाठीमागेही इतिहास आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झालीये..तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं.. गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची ओळख आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे.. विद्यापीठाचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी आता जोर धरू लागलीयं
प्राचार्य सी. रा. तावडे समितीचा अहवाल काय सांगतो?
प्रस्तावित 'श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी' स्थापन करण्यासाठी आवश्यक तो अहवाल तयार करण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 1961 रोजी कोल्हापूर येथील प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने चार महिन्यांच्या आत अहवाल शासनास सादर करावा, असेही आदेश करण्यात आले होते. त्या समितीने विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा आपला अहवाल तयार करीत असताना प्रस्तावित विद्यापीठाचे नाव काय असावे याबाबतही गांभीयनि विचार केल्याचे आढळून येते. तावडे समितीच्या अहवालातील परिच्छेद 67 मध्ये त्याची माहिती मिळते.
शिवाजी विद्यापीठातील सिनेटचे ऍड. अभिषेक मिठारी म्हणाले, 'शिवाजी विद्यापीठाच्या नावापाठीमागचा हा इतिहास लक्षात घेतला तर कोल्हापूर स्थित विद्यापीठास 'शिवाजी विद्यापीठ' असे नाव देताना सखोल विचार केला असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे इतर विद्यापीठाप्रमाणे या विद्यापीठाचा नामविस्तार करावा, असा आग्रह धरू नये. तसे केल्याने थोर व्यक्तींची नावे कागदोपत्री राहतात आणि वास्तवात मात्र ती लपली जातात अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नदिड, जळगाव, नागपूर स्थित विद्यापीठांची नावे आणि त्यांची प्रत्यक्ष वापरात असलेली संक्षिप्त रूपे पाहिली तर हे सहज लक्षात येते.'
'शिवाजी विद्यापीठाचं नामविस्तार करू नये जर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं तर त्याचा शॉर्टफॉर्म होईल. उदा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला सगळे सिएसटी म्हणतात. तसंच विद्यापीठाचं होईल. शिवाजी महाराजांचं नाव लोप पावेल.' अशी भीती प्रा. एनडी पाटील यांनी चार वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.
दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे यासंदर्भात रविवारी बैठक झाली. त्यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणाले, 'शिवाजी महाराज यांच्या देहावसनानंतर मराठ्यांनी सुमारे चाळीस वर्ष मोघलांविरुद्ध लढा दिला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच लोक मराठ्यांनी हल्ला केल्यावर शिवाजीने हल्ला केला, असे म्हणायचे. त्या काळात तो परवलीचा शब्द झाला होता. इंग्रजांनी तर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेवरच बंदी घातली होती. सरकारकडे 'शिवाजी विद्यापीठ' हेच नाव असावे याबाबतचे निवेदन देण्यात यावे.'
पुरोगामी कोल्हापूरकर काय म्हणतात?
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष धनाजी गुरव म्हणाले, 'धर्माच्या नावाखाली काही मंडळींनी 'शिवाजी विद्यापीठाच' नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा, ही मागणी केली आहे त्यांचं शिवप्रेम खोटं प्रेम आहे. त्यांच्या नादाला लागून विद्यापीठाचंनाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' केलं ते शॉर्टफॉर्ममध्ये बोललं जाणार आणि मग पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच नाव प्रत्येक माणसांच्या तोंडातून गायब होणार.
शिवाजी महाराजांना गायब करणं, हाच या धर्माच्या नावाने एकत्र येऊन उच्छाद मांडणाऱ्यांचा खरा उद्देश आहे. कारण याचं शिवप्रेम खोट आहे. धर्माच्या नावाखाली याच मंडळींनी त्यावेळी शूद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता, हे आम्ही विसरलो नाही.
धनाजी गुरव पुढे म्हणतात की, ही मंडळी जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो त्यावेळी बिळात बसलेली असतात. जे अपमान करतात त्यांचं समर्थन करतात. शिवाजी महाराजांबद्दल खोट प्रेम दाखवणारी ही मंडळी जे शिवाजी महाराजांची बदनामी करतात, त्यांच्याच बाजूने उभे राहतात आणि म्हणून यांचं प्रेम खोट आहे. यांचे डावपेच आहेत... हे डावपेच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच इतिहासातून स्थान नष्ट करणं असा आहे. त्यांना औरंगजेबची समाधी उखरून काढायची आहे. मग शिवाजी महाराज झालेच नव्हते, म्हणायला हे मोकळे होणार आहेत. औरंगजेबचा पुरावाच राहिला नाही तर संभाजी महाराज झालेच नव्हते, म्हणायला हे मोकळे होणार.
इतिहासातून शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना काढून टाकणं, विसरणं आणि यांचा खोटा इतिहास आमच्यावर लादायला मोकळे होतील. शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं, त्यावेळी या मंडळींनी नाव ठेवली, अग्रलेख लिहिले ,' नवीन मराठ्यांची खानावळ' असं बोललं गेलं. ही मंडळी शिवाजी महाराजांच्या नावाने काहीही होऊ देण्याच्या बाजूने नाहीत. त्यामुळे राबणाऱ्या बहुजन समाजाने यांना गंभीरपणे घेऊ नये, यांचे डावपेच ओळखावे,. शिवाजी महाराज यांचं नाव निघाल्यानांतर आमचं मन आदराने भरून येत. विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठच राहीलं पाहिजे,असा आग्रह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा अध्यक्ष नात्याने करतो.'
कोल्हापूर विद्यापीठाचा इतिहास
बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने कोल्हापूरसाठी विद्यापीठ मंजूर झाले. त्यावेळी नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठाला जमिनीची आवश्यकता होती. अनेक मान्यवर व्यक्तींनी विद्यापीठासाठी जागा दिली. कोल्हापूर शहरातल्या विविध तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केलं. विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक रुपयाची कुपनं काढण्यात आली.
केशवराव जगदाळे, रामभाऊ ऊबाळे, डी.एस.नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साटम, काका राऊत, ए.आर. साळोखे यांनी सायकलवर फिरून कुपनं खपवली. 18 नोव्हेंबर 1962 मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचं उद्घाटन झालं. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी पदभार स्वीकारला. 1969 मध्ये कमवा आणि शिका ही योजना सुरू झाली.
कोल्हापूर विद्यापीठाच्या वेबसाईटनुसार, दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा अशा तीन जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाचा आवाका आहे. कोल्हापूर विद्यापीठाशी 280 कॉलेज आणि शैक्षणिक संस्था संलग्न असून 3 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.






