(अप्सरा आगा)
राज्यभरात डान्सबार वर बंदी असतानाही अनेक सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार आणि डीजे सुरु असल्याचा गंभीर आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय, काय प्रकार सुरु असल्याचे सुरेखा पुणेकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यासंदर्भात त्यांनी काही व्हिडिओसुद्धा सादर केले. या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी सुरेखा पुणेकर यांनी केली. नाहीतर आंदोलन करू, असा इशारा पुणेकर यांनी दिला आहे.
डान्सबार वर तात्काळ बंदी हवी
राज्यात बेकायदेशीर सुरु असलेल्या या डान्सबार वर तात्काळ बंदी घातली पाहिजे. या डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली महिला डान्स करताना दिसत आहे. त्या महिलेसोबत तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांना दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राज्यात बेकायदेशीर सुरु असलेल्या या डान्सबार वर तात्काळ बंदी घातली पाहिजे. या डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली महिला डान्स करताना दिसत आहे. त्या महिलेसोबत तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांना दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 
डान्सबरमुळे आयुष्य उध्वस्त…
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, 'डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. डीजे बंद करून वाद्य चालू करा, यासाठी शासनाने मदत केली तर हे बंद होईल आणि आमच्या कलावंतांना कुठे तरी काम मिळेल. संगीतबारी ही वेगळी, थेटर, सभागृहातील कार्यक्रम वेगळे आहेत. संगीतबारीच्या कलावंतांना हेच काम केल्याशिवाय कुटुबांचा उदरनिर्वाह होऊच शकत नाही.
म्हणून आजच्या पत्रकार परिषदेतला मुद्दा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि आम्हा कलावंतांना न्याय मिळावा. यासाठी शुक्रावीर पत्रकार परिषद घेतली. सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मागण्या केल्या. अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, विकास जावळेकर, चंद्रकांत लाखे या वेळी उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे म्हणाले, ‘पुण्यातील पाचही कला केंद्रांमध्ये डीजे सुरू आहेत. लातूर, अहिल्यानगर, जामखेड, बीड येथेही अशीच परिस्थिती आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी संबंधित पोलिसांना निवेदन दिले. मात्र, त्यावर ठोस कारवाई होत नाही. याबाबत आम्ही संघटनेच्या वतीने सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांच्या हे निदर्शनास आणून दिले आहे. आम्हाला सरकारकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे.‘
न्याय मिळावा हीच मागणी…
शासन दरबारी सांस्कृतिक मंत्र्याकडे सुद्धा गेलो आता पुन्हा जाणार आहे. अजून तरी आम्हाला मिळावा तसा न्याय मिळाला नाही. न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सतत शासन दरबारी जाणार आहोत. तरीही न्याय नाही मिळालं तर आम्ही शासन दरबारी उपोषण सुद्धा करणार आहे. आम्ही जामखेडला, बीडला अशा बऱ्याच ठिकाणी उपोषण केलं. अशा अनेक ठिकाणी उपोषण करून सुद्धा आमचा काही फायदा झाला नाही. आता आम्ही मंत्रालयासमोर उपोषण करू, असे मत आम्हा सर्व कलावंतांचं आहे.' 
सुरेखा पुणेकर यांनी केलेल्या आरोपांबद्दल लोककला अभ्यासक आणि पत्रकार खंडूराज गायकवाड म्हणाले,'अनेक कलाकेंद्रांमध्ये डीजेचा वापर केला जातो हे दुर्दैव आहे आणि असं होऊ नये अशी प्रत्येक कलावंतांची अपेक्षा आहे. कला केंद्रात डीजे हा प्रकार बंद करा आणि लोकपरंपरा जिवंत ठेवा. डीजे चालू राहिले ते लोकवाद्य वाजवणाऱ्यांच काय होईल? जर डीजे बंद नाही केला तर आमचे कलावंत उपाशी मरतील. त्यांच्यावर अन्याय होईल. माझी कला केंद्रांना विनंती आहे तुम्ही डीजे चा वापर न करता लोक पारंपारिक कलावंतांना जगू द्या.
सुरेखा पुणेकर यांनी जामखेड भागातील कलाकेंद्रावर तोफ डागली आहे. याच जामखेडमध्ये कलाकेंद्रातील महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम करमारे अरुण जाधव यांनी यासंदर्भात सांगितले की, कलाकेंद्रमध्ये जो डीजे वाजविला जातो, ते अत्यंत चुकीचे आहे. लहान स्पिकरवर काही ठिकाणी नृत्य सुरू असतं हे खरं आहे, परंतू अलीकडे कला केंद्रसाठी लागणारे मास्तर, वस्ताद,ढोलकी वादक मिळत नाही, नवीन कुणी शिकत नाही.
या कला केद्र नृत्य करणाऱ्या महिलांनी उपाशी मरायचे का, त्यांना कुणी काम देखील देत नाही, त्यांना अस्पृश्यांसारखी हिन वागणुक दिली जाते. आता ढोलकी फाच्या तमाशामध्ये देखील मुळ वाद्य खुप कमी झाले आहेत. या नृत्य करणाऱ्या महिलांची मुलंमुली शिक्षण घेत आहेत. शासनचा जेवढा लाभ मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. लावणी कलावंतावरचे अत्याचार, शिक्षण, आरोग्य, निवारा, होणारे जीवघेणे हल्ले यावर देखील सुरेखाताई पुणेकरांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.
काय आहे हे कला केंद्र ज्याबद्दल सुरेख पुणेकर बोलत आहेत…? तर कलाकेंद्र म्हणजे पुणे-नगर हायवेवर, पुणे-सोलापूर हायवेवर असलेली शासनाने संगीतबारीच्या कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेली लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र… इथे एकेका नाचणारीच्या जीवावर 15-20 माणसांची कुटुंब चालतात. कुटुंबात दुसरं कोणी पैसे कमवत नाही. महाराष्ट्रातल्या कोल्हाटी समाजातल्या बायका अशा केंद्रांतून नाचतात. आता इतर दलित, भटक्या विमुक्त जातींमधल्या स्त्रिया या व्यवसायात आल्या आहेत. त्या इथेच जेवतात, इथेच राहातात, इथेच नाचतात.
संगीत बारीची पार्टी म्हणजे नेमकं काय?
संगीत बारीची पार्टी म्हणजे नेमकं काय? तर एका पार्टीत किमान 8 ते 10 लोक काम करतात. 18 ते 40 वयोगटातल्या 5 नाचणाऱ्या कलावंतिणी, त्यांच्यासाठी गाणारी एक गायिका आणि हार्मोनियम, ढोलकीच्या आवाजाने बैठकीची खोली दणाणून सोडणारे मास्तर आणि वस्ताद. अशा 7 ते 10 पार्ट्या एका कलाकेंद्रात असतात. रात्रभर नाचून जमा होणाऱ्या पैश्यांची कलाकेंद्राचे मालक आणि पार्टी मालकी यांच्यात विभागणी केली जाते.
पार्टी मालकीणीच्या हातात आलेले पैसे त्या पार्टीत काम करणाऱ्या कलाकारांना वाटले जातात. पार्टी मालकीणीने कलाकेंद्र चालकाला दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात कलाकेंद्रचालक त्यांना एक सुरक्षितता, महिन्याला लागणारं राशनपाणी आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा देऊ करतो असा सरळ सरळ व्यवहार आहे.
परंतू या कलाकेंद्रातून पारंपरिक लावणी कालबाह्य झाली हे त्रिकाल सत्य आहे.
कला केंद्रात येणाऱ्या लोकांना लावणी पाहण्यात रस राहिलेला नाही. लोक येतात, खुर्चीवर बसलेल्या पोरींची तोंडं पाहून पार्टी फायनल करतात आणि बैठक लावतात. बैठकीतही चित्रपटाची गाणी वाजविण्याची मागणी करतात. त्यामुळे बाजारात ज्याची मागणी आहे त्यानुसार नाचून पोट भरणं इतकंच या कलावंतिणींच्या हातात असतं. बंदिस्त बैठका झाल्या आणि गिऱ्हाईकाला एखादी नाचणारी बाई आवडली तर तो तिला 'बाहेर' घेऊन जातो.
राज्यातील बहुतेक कलाकेंद्रामध्ये हेच प्रकार चालतात आणि म्हणूनच सुरेखा पुणेकर यांनी त्याविरुद्ध आता आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सुरेखा पुणेकर यांच्या या मागणीला लावणी क्षेत्रातील अनेक जाणकारांकडून पाठिंबा मिळतोय, आता मायबाप सरकार इतक्या गंभीर विषयाकडे कसे बघते ते लवकर कळेलच…
सुरेखा पुणेकर यांनी लावणीला जनमाणसात रुजवलं
लोककलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरेखा पुणेकर यांनी राजकारणात प्रवेश केला. लोककला क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. पायात घुंगरू, चेहऱ्यावरचा शृगांर एकूणच सादरीकरण,येवड्यावरच लावणीला मर्यादित न ठेवता जनमाणसात रुजवण्याचं काम सुरेखा पुणेकर यांनी केलं. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशामधून सुरुवात केली. त्यांचे वडील पुण्यातील रेल्वे स्टेशनवर हमाली करत होते. हमाली करत असताना कोंडीबा टाकळीकर हा तमाशाचा फड देखील चालवायचे. त्याचवेळी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीला सुरुवात झाली. 
आई- वडील आणि सुरेखा पुणेकर मिळून पाच बहिणी असं त्यांचं कुटूंब. तमाशासाठी यांचं कुटूंब गावोगावी फिरत असत. हलाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही . त्यामुळे त्या पाच बहिणी आई- वडिलांसोबत तमाशासाठी जात. कुटूंब आणि फडातल्या कलाकारांसाठी भाकरी मागून आणून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. पावसाळ्यात तमाशा बंद असायचा त्यावेळी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागायचा. हलाकीची परिस्थिती असली तरी सुरेखा पुणेकर यांनी कला सोडली नाही. कलेची आवड असल्यामुळे त्यांनी पुण्यात काम करून मिळालेल्या पैशात कथ्थकचे क्लास केले.






