अप्सरा आगा
- पुरुषप्रधान क्षेत्रात ठामपणे उभी राहिलेली स्वारगेट डेपोतील महिला इलेक्ट्रिशियन
- संसारातील संघर्षांवर मात करत मुलासाठी घेतलेली जबाबदारी
- समाजाच्या प्रश्नांना उत्तर कृतीतून देणारी प्रियांका धारकर
पहाटेची वेळ. स्वारगेट डेपोमध्ये उभ्या असलेल्या एसटी बसेसच्या रांगा, कुठे ग्रीस-ऑईलचा वास , इंजिनचा आवाज तर कुठे जड टूल्स हातात घेऊन काम करणारे कर्मचारी. त्या सगळ्या गोंधळात एक महिला शांतपणे बसच्या इलेक्ट्रिक भागाजवळ हातात टेस्टर घेऊन उभी असते. या महिलेचं नाव आहे प्रियांका धारकर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २०१२ पासून इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारी ही जिद्दी महिला पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःची ठाम ओळख निर्माण करतेय.
शिक्षणातून नोकरीपर्यंतचा प्रवास
पुण्यातील प्रियांका धारकर यांनी इलेक्ट्रिशियन आयटीआयचे शिक्षण घेतलं त्यानंतर लगेचच त्या एसटी महामंडळातील इलेक्ट्रिशियन विभागात नोकरीला लागल्या. नोकरी करत असतानाच त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सुरुवातीला संसार व्यवस्थित चालला, पण काही वर्षांत घरात तणाव वाढला. मतभेद, असहकार्य आणि रोजची मानसिक घुसमट वाढत गेली. शेवटी त्यांनी धाडसी निर्णय घेत, लहान मुलाला घेऊन नवऱ्यापासून वेगळ्या राहिल्या. त्या वेळी त्यांना कुटुंबाचा विरोध, समाजाची टीका आणि आर्थिक असुरक्षितता या तिन्हींचा सामना करावा लागला. लोक एकच प्रश्न विचारत होते, एकटी कशी राहशील? मुलाला कसं वाढवशील? पण प्रियांकाताईंनी मागे वळून पाहिलं नाही. तिनं ठरवलं की आयुष्य भीतीत नाही, तर आत्मविश्वासानं जगायचं.

धाडसी निर्णयाची वेळ..
प्रियांका बाईमाणूसशी बोलतांना सांगतात, 'एखाद्या दिवशी गाडी बंद पडली तर दुरुस्ती करायला जावं लागायचं. त्यामुळे घरी जायला उशीर व्हायचा. त्यावेळी सासरचे म्हणायचे, 'एक तर नोकरी सोड, नोकरी सोडली नाही तर नंदू देणार नाही नाही.' पण मी माझी नोकरी सोडली नाही. काही दिवसाने त्यांच्या मनात कुठून आलं काय माहिती,आपण जागा घेऊया म्हणून त्यांनी मला गोड बोलून एक लाख रुपये कर्ज काढून घेतलं. पण ती जागा त्यांनी घेतलीच नाही. काही महिन्याने मी त्यांना विचारलं तर ते पैसे दुसऱ्या कामासाठी वापरलं असं सांगितलं. ते हप्ते मी अजून भरत आहे, त्यांच्या या त्रासामुळे लहान मुलाला घेऊन बाहेर पडले. '
आज प्रियांका स्वतः मुलाला घेऊन वेगळं राहत आहे. प्रियांकाचा दिवस पहाटे सुरू होतो. सकाळी उठून मुलाला तयार करायचं, पाळणाघरात सोडायचं आणि डेपोवर हजर व्हायचं. ड्युटी संपली की पुन्हा मुलाला घेऊन घरी. संध्याकाळी मुलासोबत वेळ घालवणं, अभ्यास घेणं, घरकाम करणं, हे त्याचं रोजचं वेळापत्रक. प्रियांका सांगतात, "मुलाला पाळणाघरात सोडताना कधी मन भरून येतं, पण मी स्वतःलाच समजावते, नोकरी टिकली तरच भविष्य सुरक्षित राहील आणि मुलाला मी चांगलं सांभाळू शकेल."
पुरुषप्रधान वातावरणातील आव्हानं
स्वारगेट डेपोतील प्रियांकाचं काम अत्यंत जबाबदारीचं आहे. बसमधील लाईटिंग, वायरिंग, बॅटरी, पॅनल बोर्ड, जनरेटर, तसेच इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंग सिस्टीममध्ये हाय-व्होल्टेज करंटवर काम करावं लागतं. अनेकदा उंचावर चढावं लागतं, जड टूल्स हाताळावे लागतात, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. या सगळ्या कामात शारीरिक ताकदी इतकंच मानसिक धैर्य ही लागतं.
प्रियांका सांगतात, "मला कामापेक्षा कठीण डेपोमधील वातावरण वाटतं. डेपो पुरुषप्रधान असल्यामुळं सुरुवातीला मला अनेक टोमणे सहन करावे लागले. 'हे काम बायकांचं नाही', 'घर सांभाळा', 'रात्री शिफ्ट कशाला करता?' असे प्रश्न रोज ऐकायला मिळत. काही वेळा मदत नाकारणं, चुका शोधणं किंवा विचित्र नजरेनं पाहणं, हेही अनुभव आले. तरीही मी शांत राहून माझ्या कामाकडे लक्ष दिल. आणि प्रामाणिकपणे माझं काम करत राहिले."

प्रियंकाला आतापर्यंतच्या कामातला तिचा एक प्रसंग नेहमी लक्षत राहील असं म्हणून ती हातातलं काम बाजूला ठेवून बोलायला लागते, ''एका रात्री डेपोमध्ये मोठा पॉवर फेल्युअर झाला आणि इलेक्ट्रिक बस बंद पडली. आता सकाळपर्यंत बस कश्या सुरु करणार हा प्रश्न पडला होता. त्या रात्री मी टीमसोबत पहाटेपर्यंत काम करत राहिले. वायरिंग तपासणं, कनेक्शन बदलणं, पॅनल दुरुस्त करणं, अखेर चार्जिंग सुरू झालं आणि सकाळी बस वेळेवर बाहेर पडल्या आणि अखेर माझं मन शांत झालं.''
प्रियांका पुढे सांगतात, ''धाडस म्हणजे भीती नसणं नाही तर भीती असूनही काम करणं. डेपोमध्ये काम करताना काळजी घ्यावी लागते, पण आत्मविश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. मी नेहमी सुरक्षा नियम पाळते आणि घाईपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देते.''
प्रियांका म्हणते "ही तर बदलाची सुरुवात..."
प्रियांका घरी परतल्यावर इलेक्ट्रिशियन नसते, आई असते. मुलासोबत खेळते, त्याचा अभ्यास करवून घेते. तिचं स्वप्न आहे की त्याने चांगला नागरिक बनावं. प्रियांका डोळ्यात पाणी आणत सांगतात, 'मी यासाठी लढतेय कारण तो उद्या न घाबरता जगेल.' प्रियांका यांच्या कामामुळे डेपोतील अनेकांचा दृष्टिकोन बदलतोय. सुरुवातीला संशयाने पाहणारे काही सहकारी आता त्यांना मदत करतात, कौतुक करतात. महिला तांत्रिक क्षेत्रात काम करू शकत नाहीत, हा समज हळूहळू कमी होत आहे. आज पुण्यातील इलेक्ट्रिशियन विभागात प्रियांका सारख्या अन्य महिलाही काम करू लागल्यात. तरीही अजून सुविधांची कमतरता आणि मानसिकतेचा अडथळा कायम आहे. पण अशा महिलांमुळे बदलाची सुरुवात होत आहे.

स्वारगेट डेपोमधून रोज शेकडो बस सुरक्षित बाहेर पडतात. त्या प्रत्येक बसच्या लाईटमध्ये, प्रत्येक प्रवासाच्या सुरक्षिततेत प्रियांका यांचं योगदान आहे. त्या फक्त कर्मचारी नाहीत, तर एक जिद्दी आई आणि स्वतःच्या कष्टाने आयुष्य उभं करणारी धाडसी स्त्री आहे.
शेवटी बघितलं तर प्रियांकाताईंची गोष्ट ही फक्त एका नोकरी करणाऱ्या महिलेची नाही, तर हळूहळू बदलणाऱ्या समाजाची गोष्ट आहे. आधी 'हे काम बायकांचं नाही' म्हणणारेच लोक आज त्यांच्या कामाचं कौतुक करतात. रोज सकाळी वेळेवर बाहेर पडणाऱ्या बस, नीट लागलेले लाईट, सुरक्षित प्रवास यामागे त्यांच्यासारख्या शांतपणे काम करणाऱ्या हातांची मेहनत आहे. त्यांच्या आयुष्यात अजूनही धावपळ आहे, जबाबदाऱ्या आहेत, थकवा आहे. पण हार मानण्याचा प्रश्नच नाही. त्यांचा संघर्ष मोठ्या शब्दांत नाही, तो रोजच्या कामात दिसतो, हातात टेस्टर घेऊन बस दुरुस्त करताना, मुलाचा हात धरून घरी येताना आणि प्रत्येक अडचणीसमोर शांतपणे उभी राहताना.






