टीम बाईमाणूस
- तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्हा येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान 23 कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी
- स्फोट इतका तीव्र की इमारती जमीनदोस्त, परिसरात हादरे; जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले
- वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे कामगार सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा
तमिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्हा पुन्हा एकदा भीषण औद्योगिक दुर्घटनेने हादरला आहे. रविवार 19 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास कट्टनारपट्टी गाव येथे असलेल्या फटाका उत्पादन करणाऱ्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटात किमान 23 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा 18 इतका होता, मात्र बचावकार्य सुरू असताना ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने हा आकडा वाढत गेला. या दुर्घटनेने केवळ तमिळनाडूच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारखान्यात फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटक रसायनांचा साठा मोठ्या प्रमाणात होता. सकाळच्या सुमारास काम सुरू असतानाच अचानक घर्षण किंवा रासायनिक अभिक्रियेमुळे ठिणगी पडली आणि त्यानंतर काही क्षणांतच भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की कारखान्याच्या परिसरातील तीन ते चार इमारती अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला, व आसपासच्या भागात कंपने जाणवली.
स्फोटांच्या मालिकेचा भीषण इतिहास उघड
मात्र याच भागात गेल्या काही वर्षांत अशा भीषण स्फोटांच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्पष्ट दिसून येते. केवळ एप्रिल 2026 महिन्यातच या भागात एकापाठोपाठ दोन-तीन स्फोटाच्या घटना घडल्या, ज्यात काही कामगारांचा मृत्यू व अनेक जखमी झाले होते. यापूर्वी 2025 मध्येही फटाका कारखान्यातील स्फोटात कामगारांचे बळी गेले होते, तर 2021 ते 2026 या कालावधीत तमिळनाडूतील फटाका उद्योगात सुमारे 70 ते 90 स्फोट व आग लागण्याच्या घटना घडल्या असून, त्यात 200 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे…

‘बाईमाणूस’शी बोलताना क्रांतीज्योत कामगार संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात सांगतात की,
तमिळनाडूमधील ही घटना अत्यंत धक्कादायक असून, देशभरातील फटाका आणि इतर धोकादायक उद्योगांमध्ये कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार अशा दुर्घटना घडत असताना देखील सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. कामगारांच्या जीवाशी असा निष्काळजीपणे खेळ होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे…
महिला कामगारांवर सर्वाधिक फटका
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कामगारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिकांच्या मते, मृतांमध्ये 16 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. अनेक कामगार स्फोटाच्या वेळी कारखान्याच्या वेगवेगळ्या शेडमध्ये काम करत होते, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. काही कामगार स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडले, तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकून प्राण गमावले.

स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जखमी कामगार मदतीसाठी आक्रोश करत होते, तर स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. काही वेळातच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, कारखान्यात स्फोटक पदार्थांचा साठा असल्यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरत होते. अधूनमधून लहान स्फोट होत असल्याने बचाव पथकांना आतमध्ये जाणे कठीण जात होते. तरीही त्यांनी जीव धोक्यात घालून अनेक जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या विरुधुनगर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले...
सरकारकडून मदतीची घोषणा
या घटनेनंतर तमिळनाडू सरकारने तात्काळ मदतीची घोषणा केली असून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹3 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींना ₹1 लाखांची मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख आणि जखमींना ₹50 हजारांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. एकत्रित पाहता, मृतांच्या कुटुंबीयांना सुमारे ₹5 लाखांपर्यंत आणि जखमींना सुमारे ₹1.5 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारने जखमींच्या उपचाराची जबाबदारीही स्वीकारली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अनेक जखमींचे शरीर 50 ते 70 टक्क्यांपर्यंत भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले असून, त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
चौकशीचे आदेश, मालक फरार
प्राथमिक तपासात कारखान्यात सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात स्फोटक साहित्य साठवण्यात आले होते का, तसेच कामगारांना योग्य सुरक्षा साधने देण्यात आली होती का, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, या कारखान्याचा मालक घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित कारखान्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
तमिळनाडूतील सिवाकासी आणि विरुधुनगर परिसर हा देशातील फटाका उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे हजारो लहान-मोठे कारखाने कार्यरत आहेत आणि हजारो कामगार या उद्योगावर आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र, या उद्योगात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नियमांचे उल्लंघनच अपघातांचे मूळ
अनेक कारखान्यांमध्ये नियमांनुसार आवश्यक असलेली अंतराची मर्यादा पाळली जात नाही. तसेच, कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने दिली जात नाहीत. त्यामुळे छोट्याशा निष्काळजीपणामुळेही मोठी दुर्घटना घडते. दरम्यान, या दुर्घटनेने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना घडत राहतील आणि निष्पाप कामगारांना आपले प्राण गमवावे लागतील.

एकूणच, तमिळनाडूतील ही दुर्घटना ही केवळ एक अपघात नसून, ती व्यवस्थेतील त्रुटींचे जिवंत उदाहरण आहे. या घटनेतून प्रशासन आणि उद्योग क्षेत्राने काही उपाययोजना केल्या नाही, तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कामगारांच्या जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अन्यथा विकासाच्या नावाखाली मानवी जीवांचा बळी देण्याची ही शोकांतिका कायम सुरूच राहील.






