अक्षय शारदा शरद
- गेली दीड दशकं हंगेरीवर एकहाती राज्य करणाऱ्या ओर्बान यांचा हा पराभव त्यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्याने घडवून आणलाय.
- त्यामुळे तो ओर्बान यांच्यासह त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाच्या व्लादिमिर पुतिन यांच्याही चांगलाच जिव्हारी लागला आहे.
- ऑर्बान यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक राहिलेल्या पीटर मॅग्यार यांच्या 'तिसा' या पक्षाकडून त्यांना पराभव पत्करावा लागलाय.
हंगेरी. मध्य युरोपातला एक छोटासा देश. एक कोटी पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या देशात नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात हंगेरी च्या सत्तापदी अजेय राहण्याची स्वप्न पाहणाऱ्या व्हिक्टर ओर्बान यांचा पराभव झाला. अक्षरशः दारूण म्हणता येईल असा पराभव!
गेली दीड दशकं हंगेरी वर एकहाती राज्य करणाऱ्या ओर्बान यांचा हा पराभव त्यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्याने घडवून आणलाय. त्यामुळे तो ओर्बान यांच्यासह त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाच्या व्लादिमिर पुतिन यांच्याही चांगलाच जिव्हारी लागला असावा. अर्थात त्याला कारणंही तशीच आहेत.
हंगेरीची जगभर चर्चा का होतेय?
सध्या हंगेरी ची जगभर चर्चा होत असली तरी ती समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागलं. १९८० च्या दशकाचा उत्तरार्ध. सोविएत युनियनवर अवकळा येण्याचा तो काळ. त्याच दरम्यान १९८८ मधे हंगेरीत एका राजकीय संघटनेचा जन्म झाला. तिचं नाव होतं 'फेडरेशन ऑफ यंग डेमोक्रॅट्स' ( अर्थात 'फिडेझ' ). पुढे त्याचं रूपांतर राजकीय पक्षात झालं.
याच काळात सोविएत युनियन फुटलेलं होतं. अनेक देश साम्यवादाविरोधात उभे राहिलेले होते. त्यातला हंगेरी एक होता. या दरम्यान अस्तित्वात आलेला 'फिडेझ' एक महत्वाचा पक्ष होता. व्हिक्टर ऑर्बान हे या पक्षाचे संस्थापक सदस्य होते. कायद्याचं शिक्षण घेतलेले ऑर्बान हळूहळू या संघटनेच्या भूमिकांमुळे चांगलेच चर्चेत येऊ लागले. सुरुवातीला उदारमतवादी, लोकशाही, स्वातंत्र्याचे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण तो केवळ मुखवटाच राहिला.

१९९० मधे हंगेरीत संसदीय निवडणुका झाल्या. त्यात ऑर्बान पहिल्यांदा निवडून आले. पण पक्षाला फारसं यश मिळालं नाही. पुढे तीन वर्षातच म्हणजे १९९३ मधे ऑर्बान यांच्याकडे 'फिडेझ' पक्षाचं नेतृत्व आलं. वर्षभरात निवडणुका झाल्या. पण १९९४ मधेही त्यांच्या पक्षाला फार प्रभाव दाखवता आला नाही.
शेवटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ऑर्बान यांनी हंगेरीतल्या इतर मध्यम-उजव्या गटांशी युती केली. १९९८ च्या हंगेरियन संसदीय निवडणुकीत फिडेझ आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. ऑर्बान या आघाडी सरकारचे पंतप्रधान बनले.
युरोपातले सर्वात तरुण पंतप्रधान होते व्हिक्टर ओर्बान
ऑर्बान यांचं तेव्हा वय अवघं ३५ वर्ष इतकं होतं. युरोपातले सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे त्यावेळी पाहिलं गेलं. पंतप्रधान म्हणून अनेक तरुण सहकाऱ्यांना मंत्रिपदं, हंगेरीला मुक्त-बाजार अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी पावलं असे बेधडक निर्णय त्यांनी घेतले. १९९८ ते २००२ हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता. पण तोही भ्रष्टाचाराने व्यापलेला होता.
२००२ मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत हंगेरियन सोशलिस्ट पार्टीकडून 'फिडेझ' पक्षाचा पराभव झाला. ऑर्बान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं.

हंगेरियन सोशलिस्ट पार्टी सत्तेत आल्यावर २००३ मधे देशात 'जनमत' घेतलं गेलं. लोकांनी युरोपियन युनियन ( इयू ) मधे सहभागी होण्याच्या बाजूने कौल दिला. २००४ मधे हंगेरी हा युरोपियन युनियन मधे सामील झाला. पुढे 'नाटो'तही प्रवेश मिळवला. पण पुढे याच मार्गाने ऑर्बान युरोपियन युनियन ला नाकीनऊ आणतील याचा विचारही तेव्हा कुणी केला नसेल.
२००६ मधेही ऑर्बान यांचा पक्ष पुन्हा निवडणूक हरला. २००२ ते २०१० दरम्यान सलग झालेल्या पराभवामुळे ऑर्बान टीकेचे लक्ष्य झाले होते. पण या काळात हंगेरीने तीन पंतप्रधान पाहिले होते.
यावेळी नेमकी संधी हेरत ऑर्बान यांनी अनेक मुद्यांवरून सत्ताधारी पक्षाविरोधात रान पेटवलं. हंगेरीत सरकारविरोधी आंदोलनं उभी राहिली. दुसरीकडे ऑर्बान यांची देशात लोकप्रियता वाढत होती. त्याचाही फायदा घेत २०१० साली ऑर्बान हंगेरीच्या पंतप्रधानपदी आले. सत्तेत येताच त्यांनी 'अती उजवं' वळण घेत निर्णयांचा धडाका लावला. त्याचवेळी संसदेतल्या बहुमताचा फायदा घेत अनेक कायदे बदलले.
पुराणमतवादी विचारांवर आधारित देशात नवे संविधान
ऑर्बान यांचं एक वेगळं रूप हंगेरीची जनता पाहत होती. दरम्यान १ जानेवारी २०१२ ला ऑर्बान यांनी पुराणमतवादी विचारांवर आधारित देशात नवं संविधान लागू केलं. दुसरीकडे देशातल्या मध्यमवर्गाला आपल्या बाजूने वळतं ठेवण्यासाठी उदार कर सवलती लागू केल्या गेल्या.
हे सगळं घडत असतानाच ऑर्बान यांची वाटचाल ही एकाधिकारशाहीकडे झुकत होती. कायद्यांत झपाट्याने केले गेलेले बदल त्याचंच द्योतक होतं. त्यासाठी त्यांनी हंगेरीतल्याच 'यॉबीक' या अती उजव्या 'नाझीवादी' पक्षाची तत्त्वं उचलल्याचं बोललं गेलं. पुढे ऑर्बान यांच्यावर यॉबीक पक्षाने आपली विचारधारा चोरल्याचे आरोपही केले.
तर... सत्ता येताच ऑर्बान यांनी न्यायिक सुधारणेआड न्यायालयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. माध्यम कायद्यात बदल करत प्रसारमाध्यमांवर थेट फिडेझ पक्षाचं नियंत्रण आणलं गेलं. त्याचवेळी आपल्या ठराविक उद्योगपती मित्रांकडे सरकारी मिडिया हाऊसेस ची मालकी ऑर्बान यांनी दिली. तसंच परदेशी शक्तींचे एजंट ठरवत स्वयंसेवी संस्थांची गळचेपी करण्याचे आरोप ऑर्बान यांच्यावर होत असतानाच एकएक करून देशातल्या सर्व घटनात्मक संस्थाही सरकार ताब्यात घेत होतं. अशा एक ना अनेक गोष्टी बहुमताच्या जोरावर ऑर्बान घडवून आणत होते.

या काळात विरोधी पक्षांनी सातत्याने ऑर्बान सरकारवर हुकूमशाही आणि भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. मात्र २०१४ ला पुन्हा एकदा ऑर्बान यांचा पक्ष सत्तेत आला. तेव्हा विरोधी पक्षांवर अधिक कडक निर्बंध आणले. पुढे तर निवडणूक प्रक्रियेतही वारंवार बदल केले गेले आणि तेही ऑर्बान यांच्या 'फिडेझ' पक्षाच्या सोयीचे!
जसजशा २०१८ च्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तसं स्थलांतरित आणि निर्वासित तसंच राष्ट्रवादाच्या मुद्यांवरून ऑर्बान अधिकच आक्रमक झाले. विरोधकांना हंगेरीला स्थलांतरितांचा देश बनवायचं आहे असं म्हणत ऑर्बान विरोधकांना 'राष्ट्रविरोधी' ठरवू लागले. आपल्या सत्ता काळात वर्ण आणि वंशद्वेष यावर आधारित एक मॉडेलच त्यांनी देशात उभं केलं.
युरोपियन युनियनने हंगेरीचा निधी रोखला तरीही…
कधीकाळी युरोपीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेणारे ऑर्बान एव्हाना युरोपीय समुदायाच्या उदारमतवादी धोरणांची खिल्ली उडवू लागले. युरोपियन युनियनशी त्यांचे यावरून अनेकदा मतभेद झाले. परिणामी 'युरोपियन युनियन'ने हंगेरी चा निधी रोखला. पण तरीही त्यांनी कुणालाच जुमानलं नाही.
२०२० मधे सगळ्या विरोधकांनी एकत्रित येत ऑर्बान यांच्या विरोधात आघाडी केली. 'युनायटेड फॉर हंगरी अलायंस' या माध्यमांतून हे सर्व पक्ष एकत्र आले. यात ऑर्बान यांच्यामुळे ज्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असे 'यॉबीक' सारखे पक्ष ही होते. पण ऑर्बान यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
ऑर्बान यांनी आपल्या विरोधकांना अक्षरशः जेरीस आणलं. पूर्ण देश आपल्या ताब्यात घेतला. पण २०२४ येताच पीटर मॅग्यार या ऑर्बान यांच्याच एकेकाळच्या कट्टर समर्थकाने त्यांना आव्हान दिलं.
वकील राहिलेले मॅग्यार हे २०१० साली ऑर्बान यांच्या 'फिडेझ' पक्षासोबत जोडले गेले होते. ब्रुसेल्समधील हंगेरीच्या स्थायी मिशनमधे
राजनयिक अधिकारी तसंच युरोपियन संसदेसोबत काम करणाऱ्या ऑर्बानच्या टीमचं नेतृत्व अशी अनेक महत्त्वाची पदं मॅग्यार यांनी भूषवली. दरम्यान त्यांना ऑर्बान यांच्या जवळच्या वर्तुळात स्थान मिळत गेलं.

अगदी फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑर्बान यांचे निकटवर्तीय म्हणून मॅग्यार यांच्याकडे पाहिलं जायचं. पण अचानक त्यांनी पक्षाच्या धोरणांना आपण कंटाळून गेल्याची जाहीर वाच्यता केली आणि एकच गहजब उडाला. बाल लैंगिक शोषणाचं प्रकरण दडपल्याबद्दल दोषी ठरलेल्या एका व्यक्तीला राष्ट्रपतींनी दिलेल्या माफीचं प्रकरणही एक निमित्त ठरलं. पुढे राजकीय बदलाची अपेक्षा करत ते फिडेझ पक्षातून बाहेर पडले. आणि २०२४ ला 'रिस्पेक्ट अँड फ्रीडम' ( तिसा ) या पक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर एक पर्याय उभा केला.
मॅग्यार यांनी २ वर्ष पूर्ण देश पिंजून काढला. ऑर्बान यांच्या 'फिडेझ' पक्षाचं वर्चस्व असलेली अनेक शहरं, गावं त्यांनी अक्षरशः पालथी घातली. देशभर ३०० किमी चा पायी प्रवास करत ऑर्बान यांच्या राजवटीविरोधात वातावरणनिर्मिती केली. देशातला भ्रष्टाचार रोखणं आणि ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन त्यांनी जनतेला केलं. तसंच युरोपियन युनियन सोबत कमालीचे ताणलेले संबंध सुधारण्याबरोबर अब्जावधी युरोंचा निधीही आणण्यासाठी प्रयत्न करून असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.
असं असलं तरीही मॅग्यार यांनी ऑर्बान यांना आव्हान देणं इतकं सोप्पं नव्हतं. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ऑर्बान यांच्या बाजूने 'महाशक्ती' उभी केलेली होती. स्वतः ऑर्बान यांनी वेळोवेळी ट्रम्प, पुतिन यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना पाठिंबा देत त्यांच्या युद्धखोर धोरणांचं कौतुक केलं होतं.
या तिघांसह जगातले अनेक अती उजवे नेते ऑर्बान यांच्या विजयासाठी आवाहन करत होते. कारण ऑर्बान हा त्यांच्यासाठी युरोपातला आणि पर्यायाने युरोपियन युनियन मधला हुकमी एक्का होते.
ऑर्बान यांना म्हटलं जायचं उजव्या राजकारण्यांचे 'पोस्टर बॉय'
युरोपियन संघात २७ राष्ट्र आहेत. ऑर्बान हे या देशांच्या राष्ट्रप्रमुखांतले सर्वात जुने खेळाडू राहिले होते. युरोपातल्या अती उजव्या राजकारण्यांचे तारणहार किंवा 'पोस्टर बॉय' असंही त्यांना म्हटलं जायचं. त्यामुळे ऑर्बान यांचं हंगेरीच्या पंतप्रधानपदी असणं पुतिन यांच्यासारख्या नेत्यासाठी महत्त्वाचं होतं. पण हंगेरियन संसदीय निवडणुकीतल्या ऑर्बान यांच्या पराभवाने मात्र हा डाव उधळून लावला गेलाय.

ढासळती अर्थव्यवस्था, वाढती महागाई तसेच भ्रष्टाचाराविरोधात कौल देत इतिहासातलं सर्वाधिक मतदान हंगेरियन जनतेनं केलं आणि ऑर्बान यांच्या पक्षाला धूळ चारली. ऑर्बान यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक राहिलेल्या पीटर मॅग्यार यांच्या 'तिसा' या पक्षाकडून त्यांना पराभव पत्करावा लागलाय. संसदेच्या १९९ पैकी १३८ जागांवर मॅग्यार यांचा तिसा पक्ष विजयी झालाय. आता युरोपियन युनियनसोबतचे हंगेरीचे बिघडलेले संबंध सुधारण्याचं वचन मॅग्यार यांनी दिलंय.
दुसरीकडे उदारमतवाद ते मध्य-उजवीकडून थेट अती उजवीकडे वळण घेत ऑर्बान यांचा प्रवास नामुष्कीजनक पराभवापर्यंत आला. आता दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले पीटर मॅग्यार ( ज्यांनी यापूर्वी ट्रम्प यांचं कौतुक केलंय ) आणि त्यांचा पक्ष पुढच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण करतो का हे पाहावं लागेल.






