अभिजीत तांगडे
- गुजरातमधील अहमदाबादनंतर पतंगबाजीत देशातील दुसरा क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेले शहर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला.
- येवल्याच्या पतंगाचा काय आहे इतिहास?
- येवल्याची मांजा तयार करण्याची पध्दतही वेगळी
मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश असं मानलं जातं. भारतभरात हा सुगीचा सण आहे आणि वेगवेगळ्या भागात तो विविध प्रकारे साजरा केला जातो. आसाममध्ये माघ बिहु, बंगालमध्ये पौष पर्बो आणि तमिळनाडूमध्ये पोंगल. गुजरातेत त्याला उत्तरायण म्हणतात कारण हिवाळ्यामध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. आजच्या घडीला उत्तरायण म्हणजे पतंगांचा सण असं समीकरण तयार झालं आहे. अवकाशात उंच उंच जाण्याची आकांक्षा बाळगत पतंगबाजीचा निखळ आनंद देणारा पतंग महोत्सव आजपासून सुरु झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुजरात म्हणजे पतंग महोत्सव हे जरी समीकरण बनलं असलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळे अहमदाबाद येथे या काळात आंतरराष्ट्रीय काईट फेस्टिव्हलची ख्याती पसरली असली तरी आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या येवला शहरातही वातावरण फारसं वेगळं नसतं. येवला शहर परिसरात पतंगोत्सवाला विशेष महत्व असून या निमित्त बाजारपेठ सजली आहे. घराघरांत पतंगोत्सवासाठी खास बेत आखले जात आहेत. या निमित्त मांजा, आसरी आणि पतंगीच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे. येवला आणि पैठणी हे नाते सर्वश्रृत असले तरी पतंगोत्सव हे या शहराचे दुसरे वैशिष्ठय़ आहे. अत्याधुनिक सुविधा आल्या असल्या तरी आजही शहर-परिसरात परंपरागत पतंगोत्सवाचे आकर्षण कायम आहे.
येवल्याच्या पतंगाचा काय आहे इतिहास?
३५० वर्षापूर्वी रघुजी बाबा शिंदे यांनी येवला शहर बसवले. रघुजी पाटील हे येवला शहराचे निर्माते म्हणून ओळखले जातात. रघुजीबाबांनी शहराची रचना केली, त्यात राहण्यासाठी नागरिकही होते. मात्र व्यापाराशिवाय शहराला गती मिळणे शक्य नसल्याचे लक्षात घेत त्यांनी काही गुजराती व्यवसायिकांना आमंत्रित केले. त्यावेळी आठरापगड जातीची माणसे येवल्यात आणली. पाटील यांनी आणलेल्या पैठणी उत्पादकांना पैसे पुरवणे आणि त्यांच्याकडील माल विकत घेण्याचे काम या व्यापाऱ्यांनी केले. पाटील यांच्या विनंतीला मान देत अनेक नागरिक नुकत्याच वसलेल्या येवला शहरात दाखल झाले. मात्र त्यांनी आपल्या परंपरा दूर सारल्या नाहीत.
त्यात साळी, कोळी, विणकर, गुजराथी, मारवाडी यांचा समावेश असून या लोकांनी विणकामांसाठी आसारी आणली, तर पतंग हा गुजराथी लोकांनी आणला. त्या पतंगांचा अन् आपल्या आसारीची जोड जमली. कारण चक्रिला गुंडाळलेला दोरा जमा करण्यासाठी व पतंग उडविण्यासाठी दोघांची गरज लागते. तर आसारी असेल तर ते काम एकच लिलाया करु शकतो. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजही येथे पतंग उडवायचे त्यांनी वापरलेले शब्द अपभ्रंश यापुढे वापरले जावु लागले. रुढी-परंपरा गत चालत आलेले शब्द जे खुपच मजेदार अन पतंगोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारे आहे. अन या शब्दांशिवाय लहान-थोर, अबालवृध्द, तरुण-तरुणी हा उत्सव साजरा करुच शकत नाही.
काय फरक आहे येवला आणि गुजरातच्या पतंगांमध्ये?
गुजराती बांधवांमुळे पतंगोत्सव येवला शहरात आला. मात्र गत तीन शतकांत येवलेकरांनी त्यात अनेक बदल केले. त्यामुळे मूळची गुजराती परंपरा असूनही येथील पतंगोत्सव वेगळा ठरतो. येथील दांडेपटाई आणि शेरावासपासून बनवलेली धाब्याची घरांची रचनाही पतंग उडवण्याची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आली. किंबहुना आजही सिमेंटचा वापर करून स्लॅबची घरे तयार होत असली तरी पतंग उडवण्यासाठी टेरेसचा भाग मोकळा सोडलाच जातो.
गुजरात तसेच राज्याच्या अन्य ठिकाणी पतंगबाज चक्रीचा वापर करतात. तर येवल्यात बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या विशेष आसऱ्यांचा वापर केला जातो. आसरी बनवण्यासाठी दोन प्रकारचे बांबू वापरतात. त्यात एक भरीव तर दुसरा लवचिक असतो. मात्र दोन्ही बांबू ओलेच हवे. जाड बांबूपासून आसरीचा दांडा तयार केला जातो तर लवचिक बांबूपासून पाती आणि चक्री बनवल्या जातात. पूर्वी हे बांबू आजुबाजूच्या जंगलातून आणले जात होते. मात्र शहरीकरण वाढले तसे बांबू मिळणे दुरापास्त झाले.
आता आसरी बनवणारे कारागीर व्यापाऱ्यांकडून बांबू खरेदी करतात. मात्र बांबू खरेदी करताना तो ओलाच असावा, जाड किंवा लवचिक असावा, त्याला कमीतकमी डोळे (खांड) असावेत असे पाहिले जाते. येवल्यात अगदी दोन पातीपासून चार पाती, सहा पाती, आठ पाती अशा विविध आकारात आसऱ्या बनवल्या जातात. आसरीचा वापर हातमागावर देखील होत असल्याने वर्षभर आसरी निर्मितीचा व्यवसाय सुरू असतो. मात्र पतंगोत्सवाच्या काळात या कारागिरांना उसंत मिळत नाही. 
येवल्याची मांजा तयार करण्याची पध्दतही वेगळी
येवल्याची मांजा तयार करण्याची पध्दतही वेगळी आहे. पैठणीसाठी तयार करण्यासाठी लागणार्या सप्तरंगाचा वापर मांजाच्या रंगासाठी केला जातो. पाच दशकांपूर्वी या ठिकाणी लुग्द्दीचा मांजा होता. यासाठी भात, रंग, कोरफड, अंडी, मैदा व काही प्रमाणात काच याच्या मिश्रणातून मांजाचे विशिष्ट मिश्रण होई. आपला मांजा धारदार असला की समोरच्याची पतंग लागलीच गूल होते, तर काहींना वाटतं की, मांजापेक्षा पतंग गूल करण्याची कला अवगत असणं महत्त्वाचं आहे. मग मांजा कोणताही असो. असं असलं तरी बहुतांश लोक मांजाच्या धारेकडे विशेष लक्ष देतात. यासाठी साकळी, अग्नी, वर्धमान, पांडा, कृष्णा तसेच बरेली व सुरती मांजाचा वापर केला जातो. दोऱ्याचा मांजा तयार करणे या प्रक्रियेला मांजा सुतवणे असे म्हटले जाते. जानेवारी महिना जसाजसा जवळ येतो तसा येवल्यात फिरताना खलबत्यात काच कांडतानाचा आवाज ऐकू येतो.
सोडा लेमन, मद्याच्या रिकाम्या बॉटल्स वापरून अगदी पीठाप्रमाणे बारीक केलेल्या काचेचा वस्त्रगाळ केला जातो. काच तयार झाल्यानंतर चरस व मनाप्रमाणे रंग विकत घेतला जातो. चरस हा पदार्थ कोरडी काच दोऱ्याला चिकटवण्याचे काम करतो. मात्र चरस कशापासून बनतो याबद्दल विक्रेत्यांनाही माहित नाही. काही वेळ पाण्यात भिजत ठेवून नंतर चरस उकळवला जातो. दोरा त्यानंतर गरम चरस आणि त्यापुढे काच अशा पध्दतीने मांजा सुतण्यास सुरूवात केली जाते. पूर्वी लुगदीचा मांजा तयार केला जात होता. या पध्दतीत खळ किंवा भातात काच मिसळवून दोरा सुतावण्यात येत होता. मात्र चरसमधून सुतावलेला मांजा पक्का होत असल्याने हा प्रकार बंद पडला.
अंडेदार, गोंडेदार, झब्बा, डबल अंडेदार, डोळेदार, गोंडण
उंच माझा पतंगऽऽआसरी आणि मांजा तयार झाला की पतंगबाजाचे पाय आपोआप पतंगविक्री सुरू असलेल्या दुकानाकडे वळतात. येथे साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून पतंग तयार करण्यास सुरुवात होते. पतंग तयार करणारे १५ ते २० कसबी कारागीर असून त्यांच्या हाताखाली असंख्य युवक युवती काम करतात. अंडेदार, गोंडेदार, झब्बा, डबल अंडेदार, डोळेदार, गोंडण अशा विविध पध्दतीचे पतंग अर्धीचा, पाऊणचा, सव्वाचा आणि लंगर या आकारात तयार केले जातात.
आकारचे प्रमाण कागद आणि त्यावर लावलेल्या काड्यांवर ठरतो. उभ्या काडीला ‘दट्ट्या’ तर आडव्या काडीला ‘कमान’ असे म्हणतात. बांबूपासून तयार होणाऱ्या दट्ट्या व कमानीला कोठेही डोळा असता कामा नये, अन्यथा पतंग स्थिर राहत नाही असा अनुभव पतंग विक्रेते सांगतात. मोठे पतंग बनवताना ही समस्या निर्माण होत असल्याने आता पश्चिम बंगाल व इतर राज्यातून या काड्या मागवल्या जातात. दट्ट्याचा खालचा भाग जाड व वरचा भाग काही प्रमाणात निमुळता होत जातो. कमानीची काडीही लवचिक स्वरूपाची असावी लागते. त्यामुळे काड्या तयार करण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे.
याउलट पतंगाचा कागद हा नाजूक असतो. त्यामुळे त्याची निवड महत्वपूर्ण ठरते. सध्या ‘त्रिवेणी’, ‘बदामजी’ आणि ‘हैद्राबाद कलर’ अशा कागदांचा वापर केला जातोय. काही वर्षांपूर्वी हा कागद जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांतूनच मागवावा लागत असे. त्यानंतर आपल्याकडेही हा कागद बनू लागला. वजनाने अतिशय हलका असलेला हा कागद बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. थंडीच्या काळातच पतंगांसाठी याला मोठी मागणी असते. सध्या वापरला जाणारा पतंगांचा कागद टिश्यू पेपर नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे. त्रिवेणी कागदाच्या पतंग चांगल्या समजल्या जातात. प्लास्टिकच्या चलतीमुळे कागदी पतंगांबरोबरच प्लास्टिकचे पतंगही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. हे पतंग कागदी पतंगांसारखे लगेच फाटत नसल्याने त्यांना चांगलीच मागणी आहे.
पतंग उडवतानाचे मजेदार शब्द
इंग्रजही येवल्यात पतंग उडवायचे. त्यांनी वापरलेले शब्द अपभ्रंश यापुढे वापरले जाऊ लागले. रुढी-परंपरागत चालत आलेले शब्द जे खूपच मजेदार अन पतंगोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारे आहे. अन् या शब्दांशिवाय लहान-थोर, अबालवृध्द, तरुण-तरुणी हा उत्सव साजरा करुच शकत नाही. दे ढिल- हा मुळचा इंग्रजी शब्द द डिल. इंग्रज लोक पतंग उडवतांना समोरच्या पतंग उडवणार्या मुलांना उद्देशुन म्हणायचे की, हे बॉय, कमॉन, वुई वॉंट द डिल विथ यु द डील, द डिल अन शब्दाला समोरुन उत्तर यायचे दे ढिल दे ढिल. आय्युबे- मुळचा इंग्रजी शब्द आय युज बी. इंग्रज काटलेला पतंग पकडल्यानंतर म्हणायचे की आय युज बी अन आम्ही मराठी लोक म्हणायचो आयुबे.
म्हणजे इंग्रज आय युज बी म्हणायचे ते असे की, आता हा मी पकडला आहे. माझा यावर ताबा आहे. वक्काट- हा सुध्दा इंग्रजी शब्द वुई कट ईट. समोरच्याचा पतंग कापला की इंग्रज म्हणायचे वुई कट ईट. अन आम्ही त्याचा अप्रभ्रंश केला तो वक्काऽऽऽऽट. कलाट- हा सुध्दा तसाच शब्द कॉल ऑऊट. अन आम्ही म्हणत आहोत कल्लाट. वय वय वक्काटे, वक्क्ट - हा सुध्दा अपभ्रंश झालेला शब्द. वुई वुई कट ईट, वुई कट ईट- ते समोरचा पतंग कापल्यानंतर मोठ्याने असा जल्लोष करीत असत आणि येवल्याकरांनी तो शब्द वक्काटे, वक्काट असा केला.






