खंडुराज गायकवाड
- आमन तांबे हे लोककलेच्या क्षेत्रातील विशेषत: तमाशामधील एक मोठं नाव… नुकतंच या महान कलाकाराचे निधन झाले.
- पारंपरिक तमाशाला आधुनिकतेचा साज चढवण्याचे सारे श्रेय आमन तांबे यांना जातं.
- आमन तांबे हे केवळ कलाकार नव्हते, तर ते लोककलेचे खरे जतनकर्ते होते.
लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला आपल्या प्रतिभेने समृद्ध करणाऱ्या कलावंतांमध्ये आमन तांबे पुणेकर यांचे तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय असे आजही नाव घेतले जाते. गोड आवाज, प्रभावी सूत्रसंचालन आणि अभिनयाची अफाट ताकद या तिन्ही गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता. आमन तांबे हे केवळ कलाकार नव्हते, तर ते लोककलेचे खरे जतनकर्ते होते. त्यांच्या आवाजातली मधुरता आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभत असे. सूत्रसंचालन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीतून कार्यक्रमाला रंगत येत असे, तर अभिनयाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना हसवत, रडवत आणि विचार करायला भाग पाडत.
लोकनाट्य तमाशा या पारंपरिक कलेत त्यांनी दिलेले योगदान नोंद घेण्यासारखी होती.. त्यांनी परंपरेचा गाभा जपत आधुनिकतेची जोड दिली आणि ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. गावोगावी जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान समजली जायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, जिद्द आणि कलेप्रती अपार प्रेम होते. सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याने वागणारा, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणारा आणि रसिकांशी आत्मीयतेने जोडला जाणारा हा कलाकार सर्वांच्या मनात घर करून गेला.

आमन तांबे आणि पुण्याच्या आर्यभूषण थिएटरचं नातं
त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर अहमद फकीर मोहम्मद तांबे यांनी 1921 साली पुण्यात आर्यभूषण थिएटरची स्थापना केली.हे थिएटर म्हणजे तमाशा कलावंतांची कर्मभूमी होती. येथे अनेक लोककलावंत घडले. म्हणूनच पूर्वी पुण्याला लोककलेचे माहेरघर सुद्धा म्हणायचे. अहमद शेठ यांनीसुद्धा काही कालावधीनंतर आपला स्वतःचा सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या नावाने तमाशाचा फड काढला आणि महाराष्ट्राभर हा तमाशा फिरविला. पारंपारिक नामांकित तमाशा म्हणून हा फड नावारुपाला आला.
एकेदिवशी सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या तमाशाच्या रंगमंचावर सोळा वर्षाचा गुबगुबीत, सतत स्मित हास्य करणारा मुलगा रंगमंचावर चढला अन् आपल्या गोड आवाज गाणी म्हणून लागला. चित्रपटाच्या विविध गाण्यावर नाचू लागला. तमाशातील अभिनय करून लागला. अशा या मुलाचे नाव होते, आमन अहमदशेठ तांबे… त्यांचा जन्म पुण्यातील गणेश पेठेतील जुन्या घरी दिनांक 3मार्च 1960 रोजी झाला. खरं तर अनेकांना प्रश्न पडतो. आमनशेठ हे मुस्लिम समाजाचे आहेत, तर त्यांचे आडनाव तांबे कसे..? मुळात अहमदशेठ तांबे यांची कुळ- वंशावळ ही कोकणातील आहे. त्यांचे पूर्वज हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालधोल (ता.चिपळूण ) या गावचे रहिवाशी होते. अन् कोकणात बहुतेक मुस्लिम समाजातील आडनावं ही मराठीत असतात किंवा त्यांच्या गावावरून असतात.
आमन शेठ केवळ एक कलाकार नव्हते, तर एक बहुआयामी कलावंत होते. त्यांच्यात विविध कलेचे पैलू होते. त्यांच्या आवाजातली गोडी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती, तर सूत्रसंचालन करताना ते कार्यक्रमाला एक वेगळीच उंची द्यायचे. त्यांच्या शब्दांमध्ये ओघवती शैली आणि प्रसंगानुरूप विनोदबुद्धी असल्यामुळे प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद साधला जायचा. दादा कोंडके आणि निळू फुले यांचा आवाज ते काढायचे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून घेण्याचे ठरविले. म्हणूनच एके दिवशी आमन तांबे पुणेकरसह सरस्वती कोल्हापूरकर असा तमाशाचा बोर्डावर आणि तमाशाच्या गाड्यावर झळकला अन् खऱ्या अर्थाने आपल्या कलागुणांनी आमन तांबे महाराष्ट्रातील लोककला क्षेत्रात नावारुपाला आले.
कधी प्रेक्षकांच्या हातात आपला तमाशा जाऊ दिला नाही
अभिनयाच्या क्षेत्रातही आमन तांबे यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. विविध भूमिकांमध्ये ते सहजपणे रंगून जायचे. त्यांची अभिनयशैली ही नैसर्गिक आणि प्रभावी असल्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटत होती. विशेषतः लोकनाट्य तमाशासारख्या पारंपरिक कलेत त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय असायचे. प्रत्येक जिल्ह्यतील गावातील कला रसिकांना काय हवं आहे.यांची जाण त्यांना चांगलीच ठाऊक होती, म्हणून प्रत्येक गावात ते तमाशा बदलून काम करायचे. रंगमंचावर आल्यावर कला रसिकांना आपलसं करून घेण्याची त्यांची एक आगळी वेगळी पद्धत होती.आमन तांबे थेट रंगमंचावरून खाली बसलेल्या प्रेक्षकांमध्ये उतरायचे. "जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, निसर्ग राजा ऐक सांगतो, जीवा शिवाची बैल जोडी, माझ्याकडे बघती गालत हसती, बांगो.. बांगो.. सारा जमाना हसीने का दिवाना, जीले ले जीले आयो आयो जीले ले..! अशा गाण्यावर त्यांनी रसिकांना थिरकायला लावायाचे. विशेष म्हणजे एलईडी लाईटचा ड्रेस घालून ते रंगमंचाच्या खाली लोकांमध्ये मिसळायचे.

हिंदी मराठी गीतांचा तो एक काळ त्यांनी गाजविला. शिर्डीच्या साईबाबाचे ते एक आपल्या गोड आवाजात साईबाबा बोलो..! हे भक्तीगीत अत्यंत भक्तिमय स्वरात गात असायचे. या भक्ती गीताला लोकं टाळ्या वाजवायचे. अगदी जमलेले प्रेक्षक अगदी भक्ती रसात बुडायचे. असे हे आमन तांबे साई बाबांची वेशभूषा परिधान केल्यावर तर अनेक वेळा ओळखू सुद्धा यायचे नाही. इतका प्रभाव त्यांनी या गाण्यात निर्माण केला होता. मात्र त्यांच्या तमाशाचे एक वैशिष्ट दिसते की, कधी ही थिल्लर मुलांनी कोणत्या गाण्यासाठी तमाशा बंद पाडला नाही. कारण अमन तांबे आपल्या मधुर आवाजाने रसिकांना ताब्यात ठेवत होते. त्यांनी कधी प्रेक्षकांच्या हातात आपला तमाशा जाऊ दिला नाही.
परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेचा स्पर्श देण्याची त्यांची इतरांपेक्षा एक वेगळी हातोटी होती अन् यामध्ये आमन तांबे यांचा कोणी हात धरू शकत नव्हता. एखाद्या हिंदीतील चित्रपट अभिनेत्यासारखा त्यांचा एक रुबाब असायचा. मराठवाड्यात, कोकणातील रायगड पट्ट्यात त्यांच्या भेटीसाठी तमाशाचा प्रेक्षक मागे लागायचे. असा त्यांनी आपला एक दबदबा निर्माण केला होता. कोणी त्यांना ज्युनिअर अमिताभ बच्चन म्हणत, तर कोणी त्यांना ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचे. असे म्हणतात की, 80 आणि 90 च्या दशकात तमाशाला आधुनिकतेचे स्वरूप त्यांनी दिले. एलईडी ड्रेस त्याला आपण लाईट अप कॉश्च्युम म्हणतो. (light up costume ) हा तमाशात पहिला प्रकार अमन तांबे यांनी आणला. इको साउंड सिस्टीम, मिरर बॉल, स्टॉपर लाईट,कलावंतांच्या ग्रुप डान्समध्ये एक सारखे ड्रेसिंग आणि तमाशा सृष्टीत रंगबाजीचा ड्रॉप पडदा, प्रथमच त्यांनी आपल्या तमाशा वापरला.
सूत्रसंचालन करताना आमन तांबे कार्यक्रमाची सूत्रे इतक्या प्रभावीपणे हाताळायाचे की, प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहायचा. कार्यक्रमाचा प्रत्येक भाग सुसंगत आणि रंगतदार ठेवण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यामुळे ते केवळ सूत्रसंचालक नसून कार्यक्रमाचे आत्मा बनला होता. लोककलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. गावोगावी होणाऱ्या जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान मानली जायची. एक काळ असा होता की,त्यांच्या तमाशाला आठ -आठ मॅनेजर काम करीत असायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांच्या फडाला चांगली बुकिंग होत होती.
अभिनयचा बुलंद आवाज..!
आमन तांबे यांची खरी ओळख त्यांच्या पहाडी आवाजात आणि डोळ्यांतील जाज्वल्य अभिनयात होती. 'संताजी घोरपडे' या वगनाट्यात त्यांनी साकारलेला 'औरंगजेब' आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. जेव्हा ते रंगमंचावर औरंगजेबाच्या वेशात उभे राहत, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत असत. क्रूरता, अगतिकता आणि दरारा यांचा असा त्रिवेणी संगम त्यांच्या अभिनयातून उमटत असे. त्यांची काही गाजलेली वगनाट्ये म्हणजे लोककलेच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत. शौर्याची गाथा मांडणारे पाच तोफाची सलामी, प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा भावूक वगनाट्य आईचं काळीज, अस्सल मराठी मातीचा संघर्ष सांगणारा दख्खनचा मराठा, खंडोबाची चोरी,, अशा वगनाट्यात त्यांनी जीव ओतून केलेल्या अभिनयला पाच तोफाची सलामी द्यावी, अशा भूमिका त्यांनी साकारल्या.
आपला गावच्या रागड्या तमाशाबरोबर त्यांची चित्रपट क्षेत्राकडे ही एक वेगळी ओढ होती. त्यामुळे चित्रपट सृष्टीत जे काही नवीन लाईट सिस्टीम आली की, हे जर आपल्या तमाशात आणले तर.... असा प्रश्न लगेच त्यांना पडायचा. म्हणून त्या काळात जेवढी लाईट सिस्टीम एखाद्या चित्रपटात आपण बघितली की, पुढच्या तमा सिझनला ती लाईट सिस्टीम आपल्याला आमन तांबे यांच्या तमाशात हमखास दिसायची. त्यामुळे आमन तांबे पुणेकर यांनी तमाशा आणि चित्रपट सृष्टीतील मनोरंजनाचा मिलाप अगदी पद्धतशीरपणे जुळवला होता. त्यातून कुठेही तमाशाच्या परंपरेला धक्का न लावता, त्यांनी आपली एक वेगळी कलाकृती निर्माण केली होती.

हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. हिंदी चित्रपट अभिनेता राकेश रोशन, जॉनी लिव्हर, गोविंदा, धर्मेद्र, हेमा मालिनी… मराठी चित्रपट सृष्टीतील दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलावंतांचे त्यांचे घरोब्याचे संबंध होते. अनेक अभिनेते त्यांच्या घरी जेवून जायचे, परंतु त्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही. अगदी दुबई,सिंगापूर, लंडन,मॉरीशस या ठिकाणी त्यांनी आपला कार्यक्रम नेऊन महाराष्ट्राची पारंपारिक लावणी, बतावणी तिथल्या रसिकांना दाखविल्या. गोवा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात त्यांनी आपला कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला. त्यांचे हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने अनेक शेरोशायरी ते स्वतः तयार करीत होते. त्यामुळे इतर राज्यातील कला रसिक आमन तांबे यांच्या तमाशाला विशेष उपस्थिती लावून त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे.
आमन तांबे यांचे तमाशातील योगदान
आमन तांबे यांनी पंढरीची वारी या चित्रपटात जेष्ठ लावणी सम्राज्ञी मोहना म्हाळुंगेकर यांची सखी बहिण चंदाबाई यांच्यासोबत जेजुरी गडावर शूटिंग झालेल्या एका गाण्यावर छान नृत्य ही केले आहे. कार्यकर्ता नावाचा चित्रपटातही त्यांनी महत्वाच्या भूमिका केली आहेत. अल्फा मराठी चॅनेलवर सोंगाड्या बाज्या या सिरीयलमध्ये त्यांनी विजय कदम आणि उषा नाईक यांच्या सोबत भूमिका केली. नांदेड जिल्ह्यातील घोडे माळेगावच्या यात्रेत तर त्यांनी तीन वेळा पहिला क्रमांक पटकवला होता. एकदा तर त्यांनी ज्युनिअर दादा कोंडके यांना रंगमंचावर आणले अन् संपूर्ण गर्दी आपल्याकडे ओढून घेतली होती.
2010 ते 2012 या कालावधीत आमन तांबेसह ईश्वर बापू पिंपरीकर,(बारामती) 2012 ते 2013 या काळात छाया खिल्लारे आणि 202014- 2015 या काळात काळू नामू वेळवंडकर, यांच्यासोबत तमाशाचा फड त्यांनी गाजविला. नंतर पुन्हा स्वतंत्र फड सुरु केला. मात्र 2016 मध्ये सुप्याच्या यात्रेत अचानक आमन तांबे यांची तबेत बिघडली आणि तेथून त्यांच्या तमाशाला उरतील कळा लागली. मात्र त्यांचे चिरंजीव राहिल तांबे यांनी पुन्हा आपल्या वडिलांचा फड सावरण्यासाठी पुढाकार घेतला. 2017 मध्ये सिनेस्टार आमन तांबे पुणेकर यांचे चिरंजीव राहिल तांबे पुणेकर हा पुन्हा नव्याने तमाशा जोमाने उभा केला. रंगमंचावर वडीलांची अनुपस्थिती त्याला सतावत होती. पण तो हरला नाही. अन एकेदिवशी त्याने स्वतः रंगमंचाचा ताबा घेतला. आता तो एक उत्कृष्ट नावाजलेला डान्सर म्हणून रंगमंचावर काम करतोय.
आमंन तांबे यांच्या निधनानंतर जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, अनेक वेळा घोडे माळेगावला आमचा शेजारी तमाशा असला की, आमन आधी माझ्या पाया पडून मग आपल्या तमाशाच्या बोर्डावर चढायचा, इतका तो गुणी कलावंत होता. त्यांचे वडील अहमदशेठ तांबे यांनी आम्हाला खूप मदतीचा हात दिला. जेव्हा जेव्हा आर्य भूषणला आमचा तमाशा असायचा तेव्हा अहमद शेठ हे आजची बारी छान झाली, असं कौतुक करून कलाकारांना पाठबळ दयायचे.
जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर तात्या शिरढोणकर यांनी म्हटले की, तमाशाला आधुनिकतेची कलाटणी आमन तांबे यांनी दिली. त्यांना आम्ही ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचो.सरस्वतीबाई कोल्हापूरकर ह्या पारंपारिक तमाशा कलावंत होत्या अन् आमनशेठ हे उत्कृष्ट गायक, सूत्रसंचालन करणारा कलावंत होता. त्यामुळे दोघांच्या कष्टाने या तमाशाला चांगली सांगड घालली गेली.

ईश्वर बापू पिंपरकर यांना सुद्धा त्यांचा सहवास लाभला होता. त्यांनीही या आठवणीला उजाळा दिला. आमन तांबे कलावंतांच्या पोटाचा पोटमारा कधी करत नव्हते.कोणाचे दोन पैसे त्यांनी कधी थकविले नाही. पुण्याचे गणपती, मुंबईची दिवाळी, बारामतीचे डोले,आणि साताऱ्याचे शिलांगण कधी चुकवू नये असे म्हणतात. कारण पुण्यातील गणपतीचे डेकोरेशन हे लाईट सिस्टीममुळे बघण्यासारखं असतात. मग तिच लाईट सिस्टीम कितीही महागडी असो. आमनशेठ आपल्या तमाशात आणायचे अन तमाशा रंगीत संगीत करायचे. एका सिझनला तर खोपोली येथील बोबल्या विठोबाच्या यात्रेला आमन तांबे यांनी साई बाबांची वेशभूषा परिधान केले होते..मात्र काही मिनिट त्यांच्या पत्नीला आणि मला सुद्धा आमनशेठ ओळखू आले नाही.असे ईश्वर बापू यांनी त्यांच्या बद्दल आठवणी सांगत होते.
दिवाळीच्या काळात पूर्वी मुंबईला नामांकित तमाशाचे फड यायचे अन् त्यांचे कार्यक्रम लालबागच्या हनुमान थिएटर, शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे मैदान, घाटकोपर, मानखुर्द, अशा विविध ठिकाणी तमाशाचे फड रंगायचे. एकदा एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तपत्राच्या एका जेष्ठ पत्रकाराला तमाशा फड मालकाची मुलाखत घ्यायची होती. ऐन दिवाळीत आमन तांबे यांचा तमाशा प्रबोधन ठाकरे मैदानात आला होता.तेथे दोघांची भेट झाली.आमन शेठ यांनी तमाशा सृष्टीतील परिस्थितीची माहिती दिली.मग एका रविवारच्या अंकात त्यांच्या इंग्रजी दैनिकात स्पेशल संडे पुरवणीमध्ये आमन तांबे यांच्यावर फोटो सह एक मोठी मुलाखत आली.अन त्यांच्या मुलाखतीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती.
त्यांनी पन्नास वर्षं लोककलेची सेवा केल्याबद्दल शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुरस्कार देवून सन्मान केला, पण राज्य सरकारला अशा लोककलावंतांची यापूर्वी दखल घ्यावीशी वाटली नाही.आमन तांबे यांनी कधी ही आपला तमाशा हाताबाहेर जावून दिला नाही.कधी ही आपल्या तमाशाची अप्रतिष्ठा केली नाही.
5 एप्रिल 2026 रोजी आमन तांबे यांच्या निधनाने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे. मात्र, त्यांच्या कलेच्या आठवणी, त्यांनी दिलेला आनंद आणि त्यांनी जपलेली परंपरा यांमुळे ते सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहतील. या निमित्याने त्यांचा एक गाजलेला शेर आठवतो.तो शेर नेहमी रंगमंचावर आल्यावर ते बोलायचे.
"दूर से देखा तो विरान था
सामने देखा तो कब्रिस्तान था
चलते चलते पैरों तले एक हड्डी दबी उस हड्डी का यह बयान था
कि यह चलने वाले चलना जरा संभल कर
किसी जमाने में
मैं भी एक इंसान था..!
असा हा “स्वर, शब्द आणि अभिनय यांचा सुरेल संगम असलेला हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याची कला आणि आठवणी कायम जिवंत राहतील.”






