Skip to main content

आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!

Article in Marathi
Shantanu Khuje
Today
0 views
आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!

शंतनू खुजे


  • आणीबाणीच्या काळात गुपचूप देशाबाहेर पाठवावी लागलेली चित्रपटाची रिळे, न्यायालयात लढलेल्या सेन्सॉरशिपविरोधी लढाया आणि आता युट्यूबवरून हटवला गेलेला ‘फादर, सन अँड होली वॉर’ हा माहितीपट...


  • गेली पाच दशकं भारतीय समाजातील अस्वस्थ सत्यांची नोंद घेणाऱ्या आनंद पटवर्धन यांचा प्रवास हा केवळ एका माहितीपट दिग्दर्शकाचा प्रवास नाही; तो भारतीय लोकशाहीच्या विवेकाचा इतिहास आहे.


  • भारतीय माहितीपट परंपरेत अनेक महत्त्वाचे दिग्दर्शक झाले. पण अन्यायाच्या प्रत्येक नव्या रूपासमोर कॅमेरा घेऊन उभे राहण्याचे सातत्य फार थोड्यांनी दाखवले. आनंद पटवर्धन हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे नाव आहे…


१९७५ चा तो काळ... देशावर आणीबाणीचे सावट होतं, हजारो कार्यकर्ते तुरुंगात डांबले गेले होते. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप होती. भीती आणि शांततेचे एक विचित्र मिश्रण देशभर पसरलं होतं. अशा वेळी एका प्रयोगशाळेतून काही फिल्म रिळे गुपचूप बाहेर काढली जात होती. त्या रिळांमध्ये ना कोणतं व्यावसायिक मनोरंजन होतं, ना कोणती प्रेमकहाणी. त्यामध्ये एका उफाळून आलेल्या जनआंदोलनाचा इतिहास बंदिस्त होता. बिहारमधील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची दृश्य त्यात होती, पोलिसांची दडपशाही होती, रस्त्यावर उतरलेला जनसागर होता आणि त्या सगळ्याची नोंद घेणारा एक तरुण माहितीपटकार होता, त्याचं नाव आनंद पटवर्धन…


त्या माहितीपटाचं नावं होतं Waves of Revolution. तो प्रदर्शित होण्याआधीच आणीबाणी लागू झाली होती. चित्रपटातील अनेक कार्यकर्ते तुरुंगात होते, स्वतः आनंद पटवर्धन भूमिगत झाले होते. त्या रिळांचा नाश होऊ नये म्हणून ती चार तुकड्यांत विभागून देशाबाहेर पाठवण्यात आली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील तो एक विलक्षण प्रसंग होता.


पुढील पाच दशकांत आनंद पटवर्धन यांनी अशा अनेक स्मृती जतन केल्या. त्यांनी केवळ चित्रपट-माहितीपट बनवले नाहीत तर त्यांनी भारताच्या अस्वस्थ इतिहासाची दृश्य नोंद ठेवली. जात, धर्म, युद्ध, राष्ट्रवाद, विस्थापन, पर्यावरण, कामगार, दलित, स्त्रिया, अल्पसंख्याक, विवेकवाद, भारतीय समाजात जिथे जिथे संघर्ष आहे, तिथे तिथे त्यांचा कॅमेरा पोहोचला. म्हणूनच आनंद पटवर्धन हे केवळ माहितीपट दिग्दर्शक नाहीत; ते भारतीय लोकशाहीचे एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत.


User Image


गेल्या 40 वर्षे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतरही आनंद पटवर्धन यांची ही लढाई अद्याप संपलेली नाही. आता दोन दिवसांपूर्वीच त्यांचा अत्यंत गाजलेला 'फादर, सन अँड होली वॉर' हा माहितीपट यूट्यूबने हटवला. हास्यास्पद म्हणजे हा माहितीपट प्रदर्शित होऊन तब्बल तीन दशकं झाली आहेत. या माहितीपटाला U/A सेन्सॉर प्रमाणपत्र आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जनहितास्तव दूरदर्शनला हा चित्रपट प्राईम टाईममध्ये दाखवण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट, 'फादर, सन अँड होली वॉर' हिंसक असल्याचे सांगत यूट्यूबने हटवला आहे. पटवर्धन यांनी चित्रपट काढून टाकण्याच्या यूट्यूबच्या निर्णयाला आव्हान दिले असले तरी, प्लॅटफॉर्मने त्यांची पुनरावलोकन विनंती १५ मिनिटांच्या आत फेटाळली. 


'फादर, सन अँड होली वॉर' हा माझा १९९५ चा चित्रपट आहे. या चित्रपटाला U/A सेन्सॉर प्रमाणपत्र आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जनहितास्तव दूरदर्शनला हा चित्रपट प्राईम टाईममध्ये दाखवण्याचे आदेश दिले होते. असे असूनही, आता ३० वर्षांनंतर युट्यूबने असे ठरवले आहे की हा चित्रपट खूप हिंसक आहे. हा एक असा माहितीपट आहे जो सत्तेसाठी हपापलेले राजकारणी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसेचे वास्तव नोंदवतो. हा चित्रपट हिंसेचा पर्दाफाश करतो, हिंसेचे समर्थन करत नाही", असं पटवर्धन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.


बेफिकीर तरुणापासून आंदोलनांच्या कॅमेऱ्यापर्यंत


आनंद पटवर्धन यांच्या माहितीपटांनी गेली सुमारे 40 वर्षे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या काळात अनेक वेळा त्यांना सेन्सॉरचा विरोध झाला, शासनाविरुद्ध न्यायालयात जावे लागले आणि प्रत्येक वेळी न्यायालयात त्यांचा विजय झाला. आनंद पटवर्धन केवळ माहितीपट-निर्माते नाहीत, तर भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या लढ्यामधले क्रियाशील सैनिकही आहेत.


त्यांचा जन्म १९५० मध्ये मुंबईत एका सुशिक्षित आणि पुरोगामी कुटुंबात झाला. स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेल्या मूल्यांची परंपरा त्यांच्या घरात होती. पण त्या मूल्यांचे संस्कार उपदेशातून नव्हे, तर वातावरणातून झाले. तरुणपणी ते कोणत्याही अर्थाने राजकीय कार्यकर्ते नव्हते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकणारा, साहित्याची आवड असलेला, उच्चमध्यमवर्गीय जीवनात रमलेला एक सर्वसामान्य विद्यार्थी होता. पुढे स्वतः पटवर्धन यांनी आपल्या त्या काळाचे वर्णन "एक बेफिकीर, निवांत आणि विशेष ध्येय नसलेला तरुण" असे केलं आहे.


त्यांचं आयुष्य बदललं ते अमेरिकेत गेल्यानंतर… ब्रँडाइस विद्यापीठात ते शिकायला गेले, तेव्हा व्हिएतनाम युद्धाविरोधातील आंदोलनांनी अमेरिकेची विद्यापीठं पेटलेली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी रस्ते भरले होते. युद्ध, साम्राज्यवाद, वर्णभेद आणि सामाजिक न्याय यांवर तीव्र चर्चा सुरू होती. या वातावरणाने पटवर्धन यांच्या विचारविश्वाला हादरा दिला. गांधी, फ्रांत्झ फॅनॉन, जॉर्ज जॅक्सन यांसारख्या विचारवंतांचे लेखन त्यांनी वाचले. युद्धविरोधी निदर्शनांत भाग घेतला, दोनदा अटकही झाली.


याच काळात त्यांनी प्रथमच कॅमेरा हातात घेतला. युद्धविरोधी आंदोलनांचे चित्रीकरण करताना त्यांना जाणवलं की कॅमेरा हे केवळ प्रतिमा टिपण्याचे साधन नाही; ते प्रतिकाराचेही साधन आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून गायब होणाऱ्या कथा जतन करण्याचे ते माध्यम आहे.


User Image


अमेरिकेचे ब्रँडाइस ते बिहार : एका कार्यकर्त्याचा जन्म


भारतात परतल्यावर पटवर्धनांनी थेट चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नाही, मात्र ते मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या कामात ते सहभागी झाले. गावात राहिले, शेती केली, मुलांना शिकवलं, ग्रामीण जीवनाचं वास्तव अनुभवलं. भारताचा खरा चेहरा महानगरांमध्ये नव्हे तर खेड्यांमध्ये दिसतो, ही जाणीव त्यांना याच काळात झाली. १९७४ मध्ये बिहार आंदोलन उभं राहिलं. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार आणि सत्तेच्या केंद्रीकरणाविरोधात हजारो युवक रस्त्यावर उतरले. पटवर्धन तिथे गेले. सुरुवातीला छायाचित्रे काढण्यासाठी, पण नंतर त्यांनी मित्रांच्या मदतीने चित्रीकरण सुरू केलं. अत्यंत साधी उपकरणं, कालबाह्य फिल्म आणि मर्यादित साधनसामग्री यांच्या साहाय्याने तयार झालेला Waves of Revolution हा भारतीय माहितीपट इतिहासातील एक मूलभूत दस्तऐवज ठरला.


आणीबाणीनंतर आलेल्या Prisoners of Conscience मध्ये त्यांनी राजकीय कैद्यांची कहाणी सांगितली. राज्यसत्ता आणि नागरी स्वातंत्र्य यांच्यातील संघर्षाचा तो पहिला गंभीर दस्तऐवज होता. त्यानंतर A Time to Rise मध्ये त्यांनी कॅनडातील पंजाबी स्थलांतरित कामगारांच्या संघटनात्मक लढ्याचे चित्रण केले. मात्र १९८५ मध्ये आलेल्या Bombay: Our City ने त्यांना राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. त्या काळातील मुंबई वेगाने बदलत होती. विकासाच्या नावाखाली झोपडपट्ट्या पाडल्या जात होत्या. गरीबांना शहरातून हुसकावून लावले जात होते. मध्यमवर्गाला झोपडपट्ट्या समस्या वाटत होत्या; पटवर्धन यांनी त्याच झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लोकांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या संघर्षांना आवाज दिला. या चित्रपटाने एक मूलभूत प्रश्न विचारला, शहर नेमकं कोणाचं असतं? गगनचुंबी इमारती बांधणाऱ्या कामगारांचं की त्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांचं…?


जेव्हा आनंद पटवर्धनांचे माहितीपट रस्त्यावर उतरतात


१९९० च्या दशकात भारतातील राजकारणात धर्माधारित ध्रुवीकरण वेगाने वाढत होत. पंजाबमध्ये खलिस्तानवादी हिंसा सुरू होती. या पार्श्वभूमीवर In Memory of Friends या चित्रपटातून पटवर्धन यांनी भगतसिंगांच्या विचारांचा पुनर्शोध घेतला. धार्मिक राष्ट्रवादाच्या विरोधात उभ्या असलेल्या एका क्रांतिकारकाची आठवण त्यांनी नव्या पिढीला करून दिली.


पण त्यांचा सर्वात चर्चित चित्रपट ठरला Father, Son and Holy War. १९९२ च्या बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात सांप्रदायिक हिंसाचाराची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या चित्रपटात पटवर्धन यांनी एक धाडसी प्रश्न विचारला, धार्मिक हिंसा आणि पुरुषसत्ताक मानसिकता यांचा काही संबंध आहे का?


हिंदुत्ववादी राजकारण, मर्दानगीच्या संकल्पना, स्त्रीद्वेष आणि सामूहिक हिंसा यांचे गुंतागुंतीचे नाते त्यांनी उलगडलं. चित्रपटान प्रचंड खळबळ उडवून दिली. दूरदर्शनने तो दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर सुरू झाली न्यायालयीन लढाई, अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या बाजूने निर्णय दिला.


अशा घटना आनंद पटवर्धन यांच्या आयुष्यात वारंवार घडत राहिल्या. चित्रपट तयार होणं हा संघर्षाचा शेवट नसून सुरुवात असते, याची त्यांना सवय झाली होती. नर्मदा बचाव आंदोलनावरील A Narmada Diary असो किंवा अण्वस्त्रविरोधी War and Peace, प्रत्येक वेळी त्यांना सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला. War and Peace विशेष महत्त्वाचा ठरतो. १९९८ च्या पोखरण अणुचाचण्यांनंतर देशात राष्ट्रवादी उत्साहाची लाट होती. अणुबॉम्ब हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय बनला होता. अशा वेळी पटवर्धन यांनी अण्वस्त्रांचे राजकारण, युद्धाची भीती आणि भारत-पाकिस्तानमधील शांतता चळवळींची कथा मांडली. सेन्सॉर बोर्डाने अनेक दृश्ये कापण्याचे आदेश दिले. पटवर्धन न्यायालयात गेले आणि पुन्हा जिंकले.


User Image


त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांनी जितक्या लढाया न्यायालयात लढल्या, तितक्या कदाचित फार थोड्या चित्रपटकारांनी लढल्या असतील.


१४ वर्षांचे अथक परिश्रम… जयभीम कॉम्रेड


२०११ मध्ये आलेला ‘जयभीम कॉम्रेड’ हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा होता. हा चित्रपट केवळ दलित प्रश्नांवरील चित्रपट नाही तर तो भारतीय लोकशाहीतील जातीय विषमतेचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे. दलित कार्यकर्ता आणि कवी शाहीर विलास घोगरे यांच्या आत्महत्येपासून सुरू होणारा हा चित्रपट दलित चळवळीचा, सांस्कृतिक प्रतिकाराचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा प्रदीर्घ प्रवास मांडतो. या चित्रपटात महाराष्ट्रातील दलित शाहिरांच्या गाण्यांपासून ते पोलिसी दडपशाहीपर्यंत अनेक स्तर उलगडतात. भारतीय जातिव्यवस्थेवर दृश्य माध्यमातून केलेल्या सर्वात सखोल भाष्यांपैकी तो एक मानला जातो.


‘जयभीम कॉम्रेड’ हा माहितीपट बनवण्यासाठी मला 14 वर्षे लागली, असं सांगत पटवर्धन पुढे म्हणतात की, महाराष्ट्रभर दलित वस्त्यांमध्ये आम्ही हा माहितीपट खुल्या मैदानावर दाखवला. त्यासाठी आम्ही एक उत्तम प्रोजेक्टर विकत घेतला आणि घडी घालता येईल असा कापडी पडदा बनवला. हा पडदा टांगण्यासाठी बांबूच्या पराती उभाराव्या लागत. त्या उभारत असताना आम्ही लोकांना आकर्षित  करण्यासाठी प्रागतिक फिल्मी गाणी आणि दलित चळवळीतील गाणी वाजवत असू. अनेक वेळा हजाराच्यावर लोक जमा होत. एवढ्या खुर्च्या काही परवडत नसत. त्यामुळे लोक जमिनीवर बसत किंवा फिल्म चालू असेपर्यंत तीन तास सभोवती उभे राहत. स्क्रीनिंग संपल्यावर आम्ही त्यावर चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न करायचो. पण बऱ्याच वेळा प्रश्नोत्तराऐवजी, लोक माईक पकडून तो माहितीपट आणि तो बघून आपल्याला काय वाटले, याविषयी आपल्या भावना भडभडा मोकळ्या करत.


तो फार भारावून टाकणारा अनुभव होता. कालांतराने अशा आश्चर्यकारक प्रतिक्रियांचे इंगित मला उकलले. माहितीपटात दाखवलेले कष्ट काही त्यांना नवे नव्हते. पण अन्यायाला बळी पडलेले गरीब बिचारे असे दलितांचे चित्रण न करता, संघर्ष करणारे लढवय्ये असे केले होते आणि त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले. माझ्या चित्रपटात वापरलेले बहुतांश डावे आणि आंबेडकरी संगीत आता स्मृतिआड होत आहे किंवा बाजारीकरणाला बळी पडत आहे. त्यामुळे अनेक दशके मेहनतीने जमा केलेल्या त्या गाण्यांनी एक मौल्यवान दस्तावेज निर्माण केला. त्या माहितीपटात, राजकीय टीका करताना कुठेही हात आखडता घेतलेला नव्हता. जातीची प्राथमिकता न मानणाऱ्या डाव्यांना आणि मनुवादी हिंदुत्वामागे लागून आंबेडकरी परंपरेची प्रतारणा करणाऱ्या दलित पुढाऱ्यांनाही त्यात धारेवर धरले होते.


‘’बऱ्याच काळानंतर मी ही फिल्म शाळा-कॉलेजमध्ये आणि मध्यमवर्गीय ‘अभिजन’ प्रेक्षकांना दाखवायला लागलो. इथला प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी ‘वस्ती’पेक्षा वेगळा होता. या प्रेक्षकांना ही फिल्म जरी आवडली तरी जवळपास प्रत्येक वेळेला कोणी तरी राखीव जागांच्या दुष्परिणामांविषयी प्रश्न विचारीत असे. जणू काही थोड्या वेळापूर्वी आपण काय पाहिले, हे ते विसरून गेले असावेत! 3000 वर्षे हाताने विष्ठा गोळा करण्याचे काम एकाच जातीसाठी ‘राखीव’ ठेवल्यावर आणि त्यांना शिक्षणही नाकारल्यावर आता तरी वंचितांसाठी शिक्षणामध्ये जागा राखीव ठेवण्याची वेळ आली नाही का? अखेर बऱ्याच चर्चेनंतर प्राथमिक शिक्षणापासून ते कॉलेजपर्यंत गरीब आणि श्रीमंतांची मुले त्याच संस्थांमध्ये शिक्षण घेऊ लागतील तेव्हाच जागा राखीव ठेवणे थांबवता येईल, यावर सहमती होत असे.


अशा बहुजातीय आणि बहुवर्गीय संपर्कामधूनच आंतरजातीय विवाहांना मान्यता मिळेल. अनेक पिढ्यांच्या आंतरजातीय विवाहानंतरच जातिव्यवस्थेचा अंत होईल. हे कदाचित आदर्शवादी वाटेल; पण माझ्या मते, संकरामुळे कोण कोणत्या जातीचा हे कळेनासे होईल, तेव्हाच जातिव्यवस्थेचा अंत होईल,’’ असे ‘जयभीम कॉम्रेड’च्या निमित्ताने आनंद पटवर्धन स्पष्ट करतात.


२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला Reason पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांपासून सुरू होणारा हा चित्रपट समकालीन भारतातील विवेकवाद आणि धार्मिक कट्टरतेतील संघर्षाचा शोध घेतो. गोसंरक्षणाच्या नावाखाली होणारे जमावहल्ले, अंधश्रद्धांचा प्रसार, मतभिन्नतेचे दमन आणि हिंदुत्ववादी राजकारणाचा वाढता प्रभाव यांचे दस्तऐवजीकरण या चित्रपटात आहे. समर्थकांच्या मते हा चित्रपट आपल्या काळाचे प्रामाणिक चित्र आहे; तर विरोधकांच्या मते तो एकतर्फी राजकीय भूमिका घेतो. पण वाद काहीही असो, या चित्रपटाने राष्ट्रीय चर्चा निर्माण केली हे निर्विवाद आहे.


User Image


माहितीपट, संघर्ष आणि न्यायालयीन लढाया


आनंद पटवर्धन यांच्यावर नेहमीच "डावे", "हिंदुविरोधी", "राष्ट्रविरोधी" असे आरोप झाले. पण त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात की त्यांची प्राथमिक निष्ठा कोणत्याही विचारधारेपेक्षा लोकशाही मूल्यांशी आहे. त्यांच्या चित्रपटांचा केंद्रबिंदू नेहमी सत्तेच्या काठावर उभे असलेले लोक राहिले आहेत. दलित, कामगार, विस्थापित, अल्पसंख्याक, शेतकरी, स्त्रिया किंवा विवेकवादी कार्यकर्ते.


२०२३ मध्ये आलेला The World is Family (Vasudhaiva Kutumbakam) हा त्यांच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात त्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले आहे. त्यांच्या कुटुंबाची परंपरा, स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजवादी मूल्ये आणि त्यांच्या राजकीय जडणघडणीचा मागोवा यात घेतला आहे. हा चित्रपट पाहताना जाणवतं की आनंद पटवर्धन यांच्या चित्रपटांमध्ये दिसणारे प्रश्न बाहेरून आलेले नाहीत; ते त्यांच्या स्वतःच्या जीवनप्रवासातून जन्माला आले आहेत.


आज माहितीपटांचं जग बदलल आहे. डिजिटल माध्यमे आली आहेत. कॅमेरे स्वस्त झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. पण आनंद पटवर्धन यांचं महत्त्व कमी झालेले नाही. उलट अशा काळात त्यांचं काम अधिक महत्त्वाचं वाटतं, जेव्हा माहितीचा प्रचंड पूर आहे पण सत्य अधिकाधिक धूसर होत चालले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये कोणतीही भव्य दृश्यरचना नाही, नाट्यमय निवेदन नाही, कृत्रिम तटस्थताही नाही. आहे ती वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी... आहे तो सत्तेला प्रश्न विचारण्याचा आग्रह… आणि आहे ती इतिहासाच्या काठावर उभ्या असलेल्या लोकांप्रती असलेली खोल बांधिलकी…


कदाचित म्हणूनच आनंद पटवर्धन यांच्याकडे केवळ चित्रपटकार म्हणून पाहणं अपुरे ठरेल. ते एका अर्थाने भारताच्या लोकशाही स्मृतीचे अभिलेखक आहेत. जेव्हा सत्ताधारी इतिहास लिहितात, तेव्हा पटवर्धन कॅमेरा घेऊन रस्त्यावर उतरतात. जेव्हा असहमतीला गप्प करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते त्या आवाजांची नोंद करतात आणि जेव्हा समाज विसरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या चित्रपटांतून स्मृती पुन्हा बोलू लागतात.


भारतीय माहितीपट परंपरेत अनेक महत्त्वाचे दिग्दर्शक झाले. पण अन्यायाच्या प्रत्येक नव्या रूपासमोर कॅमेरा घेऊन उभे राहण्याचे सातत्य फार थोड्यांनी दाखवले. आनंद पटवर्धन हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे नाव आहे. कारण त्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत; त्यांनी भारतीय लोकशाहीच्या विवेकाची दृश्य डायरी लिहिली.


"आनंद पटवर्धन यांच्या कारकिर्दीकडे पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांच्या चित्रपटांचा इतिहास म्हणजे सेन्सॉरशिपविरोधातील संघर्षाचाही इतिहास आहे. आणीबाणीच्या काळात 'Waves of Revolution'ची रिळे गुपचूप देशाबाहेर पाठवावी लागली; 'Father, Son and Holy War'च्या प्रसारणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागले; 'War and Peace'वरील सेन्सॉरच्या कात्रीला न्यायालयात आव्हान द्यावे लागले. काळ बदलला, माध्यमे बदलली, पण संघर्ष संपला नाही."


युट्यूबपर्यंत पोहोचलेली सेन्सॉरशिपची सावली


"जून २०२६ मध्ये त्याचा नवा प्रत्यय आला. १९९५ मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'Father, Son and Holy War' हा माहितीपट युट्यूबने 'हिंसक आशय' असल्याचे कारण देत त्यांच्या अधिकृत चॅनलवरून हटवला. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत पटवर्धन यांनी प्रश्न उपस्थित केला की, तीन दशकांपूर्वी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला, दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरदर्शनवर प्रसारित झालेला चित्रपट आज अचानक 'अतिहिंसक' कसा ठरू शकतो? त्यांच्या मते हा चित्रपट हिंसेचे समर्थन करत नाही, तर धार्मिक कट्टरता आणि राजकीय सत्तास्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या हिंसेचे दस्तऐवजीकरण करतो. 'ही हिंसेची बाजू घेणारी कलाकृती नाही; उलट हिंसेचा पर्दाफाश करणारी कलाकृती आहे,' असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले."


User Image


"या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला. एकेकाळी राज्यसत्तेच्या सेन्सॉरशिपविरुद्ध लढणाऱ्या कलाकारांना आज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदम आणि कॉर्पोरेट नियंत्रणाविरुद्धही लढावे लागत आहे. पटवर्धन यांच्या बाबतीत ही केवळ एका चित्रपटाची कथा नाही. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा धागाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या संघर्षाशी जोडलेला आहे. म्हणूनच आज ७५ वर्षांचे आनंद पटवर्धन एखाद्या माहितीपट दिग्दर्शकापेक्षा अधिक काही वाटतात. ते भारतीय लोकशाहीच्या स्मृती जपणारे, विस्मरणाविरुद्ध लढणारे आणि सत्तेला सातत्याने प्रश्न विचारणारे सार्वजनिक बुद्धिजीवी म्हणून उभे राहतात."


Share this article
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?
कला / साहित्य / सिनेमा

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ही मालिका केवळ मनोरंजन नव्हती, तर इतिहास, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची कथा घराघरांत पोहोचवणारे माध्यम होती. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ टीआरपी हा अशा मालिकांचे भवितव्य ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असे मत व्यक्त करत फुले दाम्पत्याची कथा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

3 min read
S
Sanjana Khandare
‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज
कला / साहित्य / सिनेमा

‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज

ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा चित्रपट गाझातील पाच वर्षांच्या हिंद रजबच्या मृत्यूची हृदयद्रावक कथा मांडतो. युद्ध, भीती, मानवी असहाय्यता आणि प्रशासकीय हिंसेचे भयावह वास्तव प्रेक्षकांसमोर उभे करणारा हा सिनेमा केवळ कलाकृती न राहता मानवतेच्या जखमेचा जिवंत दस्तऐवज ठरतो.

5 min read
H
Harun Sheikh
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath

Comments

Comments are currently disabled or loading...