प्रा. सुदाम राठोड
- मराठी भाषा म्हणजे केवळ प्रमाण मराठी नव्हे, मराठीच्या समग्र उपबोली, पोटभाषा मिळून मराठी भाषेचा अवकाश तयार झालेला आहे.
- संस्कृतकेन्द्री ब्राम्हण्यवादी मराठीला सर्वसमावेशी बहुजनवादी स्वरूप देण्यासोबतच त्यातले पुरुषलिंगी राजकारण हाणून पडण्याचे कामदेखील बहुजन स्त्रियांनी केलेले आहे.
मराठी भाषा म्हणजे केवळ प्रमाण मराठी नव्हे, मराठीच्या समग्र उपबोली, पोटभाषा मिळून मराठी भाषेचा अवकाश तयार झालेला आहे. हा अवकाश अधिक विस्तारण्याचे काम बहुजन स्त्रियांनी केलेले आहे. त्यांनी मराठीला वेगवेगळ्या प्रादेशिक बोलीतले शब्द बहाल केलेले आहे. लिंग आणि वचनाचे विषम गुणोत्तर सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्कृतकेन्द्री ब्राम्हण्यवादी मराठीला सर्वसमावेशी बहुजनवादी स्वरूप देण्यासोबतच त्यातले पुरुषलिंगी राजकारण हाणून पडण्याचे कामदेखील बहुजन स्त्रियांनी केलेले आहे.
भाषिक वर्चस्ववाद हा सांस्कृतिक राजकारणाचा एक मोठा हिस्सा असतो. कुठलीही प्रमाण भाषा ही निव्वळ जेत्यांची भाषा असू नये किंवा ती पराजित आणि अल्पसंख्य समूहावर लादू नये. याउलट त्यांच्या भाषिक सहभागाने प्रमाण भाषा अधिक समृद्ध व्हावी, त्या अंगाने भाषेची जडणघडण व्हावी. तरच ती सांस्कृतिक वैविध्य असणाऱ्या प्रदेशात एकसंघता राखू शकते. नाहीतर इतरांच्या भाषा ‘राज’ भाषेच्या सिंहासनासमोर कायम खालमानेने उभ्या असतात. मात्र इथल्या प्रमाण मराठी भाषेची जडणघडण वर्चस्ववादी संस्कृतीच्या अंगाने झाल्याने इतरांच्या भाषा आणि संस्कृती आपोआप इथे गौण ठरलेल्या आहेत.
मराठीचा अवकाश विस्तारला तो बहुजन स्त्रियांमुळे
इथली सामाजिक आणि भाषिक जडणघडण जातपितृसत्ताक अंगाने झाल्याने जात उतरंडीतील खालच्या जातींचा आणि स्त्रियांचा भाषिक सहभाग दुर्लक्षित अथवा दुय्यम ठरवला गेला. मराठी भाषा म्हणजे केवळ प्रमाण मराठी नव्हे, मराठीच्या समग्र उपबोली, पोटभाषा मिळून मराठी भाषेचा अवकाश तयार झालेला आहे. हा अवकाश अधिक विस्तारण्याचे काम बहुजन स्त्रियांनी केलेले आहे. त्यांनी मराठीला वेगवेगळ्या प्रादेशिक बोलीतले शब्द बहाल केलेले आहेत.
लिंग आणि वचनाचे विषम गुणोत्तर सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्कृतकेन्द्री ब्राम्हण्यवादी मराठीला सर्व समावेशी बहुजनवादी स्वरूप देण्यासोबतच त्यातले पुरुषलिंगी राजकारण हाणून पडण्याचे कामदेखील बहुजन स्त्रियांनी केलेले आहे.
‘डोईचा पदर खांद्यावर घेऊन भरल्या बाजारात जाण्या’ची जनाबाईची भाषा
याची सुरुवात मध्यकाळात महानुभाव पंथातील महदंबेच्या धवळ्यांपासून होते. महानुभाव पंथाने संस्कृतचे जोखड झुगारून बहुजनवादी मराठीचा पाया घातला आणि त्यावर वारकरी पंथाने कळस चढवला. ‘डोईचा पदर खांद्यावर घेऊन भरल्या बाजारात जाण्या’ची जनाबाईची भाषा एकीकडे स्त्रीमुक्तीचा उद्घोष करते, तर दुसरीकडे जात्यांवरच्या ओव्यांमधून ग्रामीण लोकतत्त्वाशी नाते सांगते. बहुजनांचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास खऱ्या अर्थाने लोकसाहित्यानेच जतन केलेला आहे आणि या लोकसाहित्याच्या निर्मितीत सर्वाधिक सहभाग हा स्त्रियांचाच आहे. या स्त्रिया नागर अथवा साक्षर स्त्रिया नाहीत.

त्या वेगवेगळ्या जाती घटकातील, वेगवेगळ्या प्रदेशातील अक्षरज्ञान नसलेल्या अनागर ग्रामीण परिवेशातील बहुजन स्त्रिया आहेत आणि या स्त्रियांनीच मराठी भाषेला म्हणी, वाक्प्रचार, श्रमगीते, उपासना गीते, नृत्यखेळगीते, विधिगीते, लग्नगीते, बारसेगीते, फुगडी-पिंगा-फेरा-भलरी-कांडणी-कापणी- जात्यावरच्या ओव्या असा एक समृद्ध वारसा दिलेला आहे. मात्र आपल्याकडे लिखित साहित्यालाच भाषिक योगदान समजले जात असल्याने या स्त्रियांच्या योगादानाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. मराठीचे खरे वैभव आणि सर्वसमावेशी रूप फक्त लोकसाहित्यातच आढळून येते.
सदाशिवपेठी मराठीचा प्रवाह तळागाळातील स्त्रियांनी अधिक गतिमान केला
आधुनिक काळात सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे यांच्यानंतर मराठी भाषेतला बहुजन स्त्रियांचा भाषिक हस्तक्षेप जवळजवळ शंभर पाऊणशे वर्षे थांबलेलाच होता. तो बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेने पुन्हा प्रवाहित झाला. बहिणाबाईंनी प्रमाण मराठीची बंधने झुगारून लोकपरंपरेतील मौखिक मराठीला लिखित स्वरूपात आणले हे त्यांचे फार मोठे भाषिक योगदान आहे. त्यानंतर दलित साहित्यप्रवाहातील स्त्रियांनी हा प्रवाह अधिक गतिमान केला आणि सदाशिवपेठी मराठीला तळागाळातील स्त्रियांच्या रोजमर्रा जगण्याशी जोडून टाकले. या दोन्हीच्या जगण्यात जेवढं अंतर होतं तेवढंच अंतर भाषेत देखील होतं.

एकीची भाषा शुद्ध आणि श्लील मानली जात होती तर दुसरीची अश्लील आणि अशुद्ध. कदाचित त्यातल्या शिव्या, त्यातले उघडेनागडे शब्द अंगावर येणारे वाटले असतील. पण या स्त्रियांचे ते रोजचे जगणे आहे आणि ती रोजचीच भाषा आहे. कुठलीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध, श्लील किंवा अश्लील, उच्च किंवा नीच असत नाही. भाषा फक्त भाषा असते आणि संदेशवहनासोबतच ती विशिष्ट संस्कृतीचे वहन करत असते. तरीही भाषिक भेदभाव होत असेल तर त्यामागे काहीतरी सांस्कृतिक राजकारण दडलेले असते.
शांताबाई कांबळे -माज्या जल्माची चित्तरकथा, कुमुद पावडे- अंतःस्फोट, बेबी कांबळे- जिणं आमुचं, जनाबाई गिऱ्हे – मरणकळा, मुक्ता सर्वगोड- मिटलेली कवाडे, शांताबाई दाणी – रात्रंदिन आम्हा, ऊर्मिला पवार- आयदान, विमल गोरे- तीन दगडाची चूल… या दलित बहुजन स्त्रियांच्या आत्मकथनांनी नागपूर,वर्ध्यापासून तर सांगली साताऱ्यापर्यंत आणि मराठवाड्यापासून तर कोकणापर्यंत असा मराठी भाषेचा समग्र भूगोल व्यापलेला आहे. यात महार, मातंग, गोपाळ, डोंबारी, गोंधळी अशा विविध जाती घटकातील भाषिक व्यवहार उतरलेला आहे. या आत्मकथनांची नुसती शीर्षके पाहिली तरी नवनव्या शब्दांची ओळख होते.
दिशा शेख यांचे पारलिंगींच्या बोलीचे एक अनोखे विश्व
‘आयदान’ हा शब्द बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी वापरला जातो. ‘मानेचा काटा मोडील अशी डोक्यावरची लाकडाची भारी’, ‘गवताची वरंड’, ‘नाचणीचा लाटा’, ‘चिव्याचा चेप’, ‘त्येनास्नी’, ‘लिकरू’ असे कितीतरी प्रमाण मराठीला परिचित नसणारे शब्द या आत्मकथनांनी मराठी भाषेला दिले आहेत. त्यामुळे मराठी भाषेला एक नवा आशय आणि नवी शब्दकळा प्राप्त झालेली आहे. कवितेच्या क्षेत्रात ज्योती लांजेवार, हिरा बनसोडे, सुषमा अंधारे, कल्पना दुधाळ, वेधिका कुमारस्वामी, दिशा शेख या कवयित्रींचे भाषिक आविष्कार सर्वस्पर्शी आहेत. त्यात दलितांची बोली, ग्रामीण बोली, सीमावर्ती भागातील बोली, तृतीयपंथीयांची बोली असा एक व्यापक पट विस्तारलेला आहे.
यात वेधिका कुमारस्वामी यांच्या कवितेची भाषा विलक्षण वेगळी आहे. ‘हेगडे मला म्हणतेला, रांडे तुझी अवकात काय्ये/ हेच्च मला आठीवलं सेम प्रश्न/ आज्जीला तिच्या नवऱ्याने विचारलाता/ हेगडेला चढतेली दारू मला दिसते लाल नेत्रांनी’ यातली शब्दकळा आणि भाषेचा लहजा पूर्णतः वेगळा आहे. दिशा शेख यांनी तृतीयपंथीयांच्या बोलीचे एक अनोखे विश्व कवितेतून उभे केले आहे. ‘भोसडीची कुटं खपलीस/ येकताच ती घाबर्ली/ तुझ्या आयची ब्याद साली/ लयी नाटक झाले/ चल साईडला’ ही भाषा कदाचित भाषिक सोवळेपणा पाळणाऱ्यांना आवडणार नाही. पण त्यातून तळागाळातील लोकांची जी प्रादेशिक किंवा अडवळणाच्या ठिकाणी वापरात असलेली बोली आहे आणि त्यातून दुर्लक्षित जनसमूहांच्या जीवनात येणारे जे मराठी शब्द आहे त्याचे दर्शन घडते.

मराठी भाषा ही केवळ अभिजनांची भाषा नाही किंवा ते ज्या भाषेत बोलतात आणि लिहितात तीच केवळ मराठी नाही. उलट त्यांनी मराठीला विशिष्ट भाषिक संवेदनात, जातपितृसत्तेच्या चौकटीत अडकून ठेवले होते. अभिजन स्त्री लेखिकांनी मराठी भाषेला पुरुषी चौकटीतून मुक्त केले तर बहुजन स्त्रियांनी पितृसत्तेसह जातीच्या चौकटीतून मुक्त करत मराठीला वैविध्य प्राप्त करून दिले. भूप्रदेशाची विविधता, लोकजीवनातील तत्त्वे आणि वेगवेगळ्या जाती घटकांतील सांस्कृतिक सत्त्व गोळा करून या बहुजन स्त्रियांनी मराठीला अधिकाधिक समृद्ध केलेले आहे.






