- सतिश चाफेकर
पद्माकर शिवलकर म्हटले की, अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो. परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा, स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही. ते केले तो प्रसंग, अखेर त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला.
काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘मराठी माणसावरचा अन्याय' या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी ते जे बोलले, ते इतके सत्य होते आणि त्याचा परिणामही तितकाच गहिरा होता... त्यावेळचे सभागृह ‘पिन ड्रॉप' झाले होते. त्यांनी मनामध्ये खदखदणारी खंत बोलून दाखवली. ती खंत वाचून आपण फक्त निःशब्द होतो.
‘हा चेंडू दैवगतीचा'
‘हा चेंडू दैवगतीचा' हे पद्माकर शिवलकर यांचे आत्मचरित्र… या आत्मचरित्रात्मक पुस्तकात पॅडी म्हणजे, पद्माकर शिवलकर काय आहेत याचे, त्यांचे त्यांच्याच भाषेमधील शब्दांकन इतके प्रामाणिक नितळ आणि निर्विष आहे, हे जाणवते. पुस्तकाला लेखन सहाय्य आणि संकलन करणारे अरुण घाडीगावकर यांची भूमिका फक्त लेखनिकाची असली तरीही, जणू पद्माकर शिवलकर त्यांच्या भाषेमधून ते ‘लाइव्ह' संवाद साधत आहेत, हे जाणवते.
पद्माकर शिवलकर यांनी कारकिर्दीतले जे पाहिले दोन चेंडू टाकले त्याचे वर्णन त्यांच्याच शब्दांत वाचणे महत्वाचे आहे. ते चेंडू टाकले कुणासमोर, तर साक्षात विनू मंकड यांच्यासमोर. तरीपण विनूभाईच्या जागी दुसरा असता, तर त्या चेंडूची अकल्पित गती-प्रगती पहाता काहीच निष्पन्न झाले नसते. वेगळेच घडले असते कदाचित, पद्माकर शिवलकर आज दिसलेच नसते, एक क्रिकेटपटू म्हणून. त्यांना विनूभाईंनी जे काही दिले ते का दिले, याचा शोध पद्माकर शिवलकर शेवटपर्यंत घेताना दिसले.
वास्तविक विनूभाई मराठी नव्हते किंवा इतर भाषिकही नव्हते, ते फक्त उत्तम जाणकार, रत्नपारखी क्रिकेटपटू होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. विनूभाई काय किंवा विजय मांजरेकर काय किंवा मित्र सुधाकर अधिकारी, दत्तू साटलेकर अशी अनेक मंडळी त्यांना सहाय्य करतच होती, ती कशी त्यांना मदत करत होती, हे पॅडी यांच्याच शब्दांत वाचणे हा एक आनंद आहे.
रुईया विरुद्ध दादर क्रिकेटर्सचा सामना हिंदू जिमखान्यावर चालला होता, त्यावेळी दादर क्रिकेटर्सचे दोन बलाढ्य क्रिकेटपटू मैदानावर उभे होते, माधव मंत्री आणि विजय मांजरेकर. त्या दोघांनी पद्माकर शिवलकर यांची गोलंदाजी बघून कुतूहलाने चौकशी केली आणि पुढला जो इतिहास घडला, तो या पुस्तकात दिला आहे. माधव मंत्री यांनी टेनिस चेंडूने गोलंदाजी न खेळण्याबद्दल ताकीद दिली होती, ती सूचना पॅडीने शेवटपर्यंत पाळली.
हे सर्व वाचताना एकच जाणवते, ते म्हणजे, आजपर्यंत खरा पॅडी त्याच्या जवळच्या माणसाना कळला होता, तो आता प्रत्येक वाचकाला आणि क्रिकेट रसिकाला निश्चित कळेल. खऱ्या अर्थाने त्यावेळचे सगळेच खेळाडू वेगळ्याच दैवगतीच्या तालावर फिरत होते, आपले कर्तृत्व दाखवत होते, काहींना देशाची कॅप मिळाली, तर काहींना नाही.
पॅडीच्या कपाळावर कसोटी क्रिकेटचं कुंकू काही लागलं नाही
पद्माकर शिवलकर यांच्या आयुष्याची जडणघडण क्रिकेटनेच केली आहे, हे वाचताना जाणवले. अगदी दादर जिमखान्याच्या एंट्रीपासून ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत आणि तेथपासून ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापर्यंत आणि पुढेही शिवलकर यांना त्यांच्या ‘दैवगतीच्या चेंडूने' साथ दिली. पण एक क्षणी मात्र त्याच चेंडूने त्यांना हुलकावणी दिली तो चेंडू होता, ‘भारतीय संघाच्या कसोटी कॅप'च्या बाबतीतला. यावरून एकच सागावे लागते एखादा चेंडू फसवा असतो जातो गंडवून, विकेट घेतो.' त्या चेंडूने शिवलकर यांची विकेट घेतली, तरी संपूर्ण क्रिकेटने त्यांना जे काही दिले, त्याबद्दल ते नम्रपणे कबूल करतात.
पद्माकर शिवलकर यांच्या आयुष्यात अनेक घटना अनपेक्षितपणे घडत गेल्या, ज्या त्यांच्या ध्यानीमनीही नव्हत्या. उदाहरणार्थ त्यांना दोन वर्षे "सीसीआय'मध्ये दोन वर्षे प्लेइंग मेंबरशिप मिळाली, अर्थात त्यांना मागून कळले ती त्यांना माधव मंत्री यांच्यामुळे मिळाली. तोपर्यंत प्रतिष्ठित "सीसीआय' म्हणजे ब्रेबॉन स्टेडियम. तेथे जगातील मोठमोठे खेळाडू खेळून गेले होते. तेथे पॅडीना जावयास मिळाले तेथील ड्रेसिंग रूमचा ते एक भाग झाले. अगदी ग्राउंड्समन पासून सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले.
त्यांच्याकडून अपेक्षा बाळगल्या. कधी त्यांनी त्या पुऱ्या केल्या, तर कधी त्या पुऱ्या झाल्या नाहीत,म्हणून देखील त्यांना काही कॉमेंट्स ऐकाव्या लागल्या. परंतु ते स्वतःच्या बाबतीत अत्यंत परखड होते, ते कधी चिडले नाहीत. कारण शेवटी ग्राउंड्समनपासून हितचिंतकांपर्यंत सगळ्यांना आपला संघ जिंकावा असावा, असे वाटत असे. बेहोशीत वेल बोल्ड म्हणून दाद दिली जाते, तर कधी ‘काय फालतू बॉलिंग केलीस रे तू आज' हे पण ऐकावे लागते. असे प्रसंग वेळोवेळी या पुस्तकामध्ये वाचावयास मिळतात. 
वयाच्या 45व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पाचारण
बापू नाडकर्णी नेहमी म्हणतात, अत्यंत क्रूर खेळ आहे हा, कोणत्या घटनेला काय आणि कोण कारणीभूत होईल, याचा नेम नाही. हे सर्वानाच माहीत आहे गोलंदाजच्या हातून एकदा चेंडू सुटला की, एकतर तो त्याला यशही देतो किंवा बरबादही करतो. वयाची 45 वर्षे ओलांडलेली आणि पदरी 486 विकेट्स असताना त्यांना ‘मुंबई संघाकडून' ‘रणजी' खेळण्यासाठी पाचारण केले गेले, ते दिलीप वेंगसरकर यांच्यामुळे.
वेंगसरकर यांचा, त्यांच्या गोलंदाजीवर प्रचंड विश्वास होता आणि त्यावेळी शिवलकर यांची त्यांना गरज होती. गंमत म्हणजे, त्यांच्याबरोबर खेळणारे अनेक खेळाडू त्यावेळी पॅव्हेलियन मध्ये बसले होते, कारण ते निवृत्त झाले होते आणि ‘पॅडी' मात्र मैदानात उतरले होते, त्यावेळीही त्यांनी ३ विकेट्स घेतल्या. त्या कुणाच्या, कशा घेतल्या, हे सर्व या पुस्तकात वाचावयास मिळते.
‘ही भळभळणारी जखम, त्याची असह्य वेदना मी एकट्याने भोगली आहे...'
पद्माकर शिवलकर आपल्या आत्मकथनात म्हणतात ‘...माझ्यावरच एवढा अन्याय झालेला असताना ... केवळ एक कसोटी सामना खेळावयास मिळावयाला हवा होता. जसा धीरज परसानाला मिळाला. त्या सामन्यात चार षटके जरी टाकावयास मिळाली असती, तरी माझ्या फिरकीचे काय गारुड आहे, हे क्रिकेटप्रेमींना दिसले असते. माझे हात त्या कसोटीनं आभाळाला टेकल्याचे समाधान तरी मिळाले असते. भारतीय संघाची ‘कॅप' मला मिळाली नाही, किंबहुना मिळू दिली नाही, ही भळभळणारी जखम, त्याची असह्य वेदना मी एकट्याने भोगली आहे...'
पॅडीचा शेवटचा रणजी सामना
गेल्याच महिन्यात प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले होते. संझगिरी आणि पॅडी शिवलकर हे खुप चांगले मित्र होते. आपल्या या लाडक्या मित्राबद्दल संझगिरी लिहितात, पॅडी शिवलकर केवढा चांगला गोलंदाज होता, हा प्रश्न मला आजच्या पिढीतल्या काही क्रिकेटप्रेमींनी अनेकदा विचारलाय. त्या पूर्वीच्या पॅडीला आज जाडेजाचं तारुण्य आणि खेळपट्टय़ा दिल्या तर तो करीयरमध्ये सहज 500 कसोटी विकेट्स घेऊन गेला असता.
रवी शास्त्रीसह त्याच्या पुढच्या पिढीपासून आजतागायत जेवढे जगाच्या कानाकोपऱ्यात डावखुरे फिरकी गोलंदाज झाले त्यातला एकही पॅडीच्या दर्जाचा नव्हता. जाडेजा कमरेच्या वर जाणार नाही. त्याची ती सुंदर ऍक्शन, ती चेंडूला फसवी उंची द्यायची कला, गवताला केवळ गुदगुल्या होतील असे फॉलो थ्रू. टर्न आणि निरुपद्रवी वाटणारा पण अचानक नागाच्या फण्याचं बळ दाखवणारा आर्मर.
एकंदरीत तंत्रशुद्धता ही त्याच्या गोलंदाजीची खासियत होती आणि सर्वात महत्त्वाचं टेंपरामेंट, फिटनेस आणि महान फलंदाजाचं आव्हान स्वीकारायला लागणारी त्याची छाती. त्यामुळे कसोटी क्रिकेट न खेळताही तो महान गोलंदाज होता. आज कालचा कुठलाही डावखुरा गोलंदाज पहिल्या चेंडूपासून स्वीपर कव्हर किंवा डीप पॉइंट ठेवतो कारण आपल्या हातून शॉर्ट चेंडू पडणार नाही याची त्याला खात्री नसते. पॅडीने असे कधीच केले नाही. इतका आत्मविश्वास त्याच्यात होता.
त्याच्या रणजी कारकीर्दीचा शेवट तर सर्वात सुंदर होता. त्याचं वय होतं फक्त 48 वर्षे! मुंबईचा कर्णधार दिलीप वेंगसरकर कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज शोधत होता. मुंबईची मैदानं त्याने पालथी घातली, पण एकही सापडला नाही. त्याने पॅडीला सांगितलं.‘‘तू खेळ.’’ तो पॅडी नावाच्या ‘दधिची ऋषींकडे’ वळला असं म्हणायला हवं.
इंद्राला एका राक्षसाला मारायला एक अस्त्र हवं होतं. त्याला सांगण्यात आलं की, दधिची ऋषीच्या हाडापासून तयार झालेल्या अस्त्रानेच तो राक्षस मरेल. दधिची ऋषीने इंद्राला आपली हाडं दिली. पॅडीनेही तेच केलं. त्याने दिलीपला आपला डावा हात दिला. 43 षटकं त्या हाताने टाकली. दोन बळी घेतले. त्यातला विश्वनाथचा बळी मी विसरणार नाही. उंची दिलेल्या चेंडूवर विश्वनाथने कव्हर्समध्ये झेल दिला. जगातल्या एका श्रेष्ठ फलंदाजाला 48 वर्षांच्या पॅडीने फसवलं.
ही झाली त्यांची एक बाजू. दुसऱ्या बाजूचे पद्माकर शिवलकर अधिकच लोभस आहेत. त्यांना गाण्याचा छंद आहे. मला आठवतंय, ते ‘चढता सूरज...' ही कव्वाली जबरदस्त गात. नव्हे, ते एका वाद्यवृंदात नेमाने गाणी गात . योग हा की, ‘हा चेंडू दैवगतीचा' हे शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले गाणे त्यांनी गायले होते, त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली होती. परंतु हे गाणे त्यांच्या ‘आयुष्याचे गाणे' झाले.
या सगळ्यातआत्मचरित्रामधील शेवटच्या ओळी ‘दैवगतीचा' प्रभाव दाखवतात. त्या शेवटच्या ओळी आहेत,' "माझ्या पश्चात माझी ‘शोकसभाही' आयोजित करू नये. कुणीही कुठेही. मी काही आता रडत जाणार नाही. जन्मल्याबरोबर आपण रडतोच. पण जमले तर हसत जाणार! दुखवट्याची भाषणं, दुःख व्यक्त करतानाचे त्यांचे खोटे मुखवटे, शो करणारे... हे मला ऐकवणार नाही, पाहवणार नाही. माझ्या आत्म्याला ते सारे क्लेषकारक ठरेल.
मला शांततेत, आनंदात जाऊ दे... ‘आनंदयात्री' म्हणून राहू दे... इतकीच माझी माफक अपेक्षा आहे..





