- समीर सरिता भगवान, नागपूर
मासिक पाळी म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर स्त्री आणि पाळीचा विटाळ येतो. धरणीच्या काळ्या गर्भात जसं बी टाकलं की अंकुर फुटून रोप उगवतं तसंच आईच्या उदरातून जन्म घेऊन मी सुध्दा धरतीवर आलो. मी शाळेत शिकत असताना पाळी हा शब्द ऐकला होता तेव्हा डोक्यात अनेक प्रश्न रेंगाळत असायचे कारण काही मित्र तिला कावळा शिवलाय म्हणायचे, तर कोणी तिला आज शिवायचं नाही वगैरे म्हणायचे.
तेव्हा मला काहीच कळायचं नाही आणि मग मनात नुसती विचारांची कालवाकालव व्हायची. पदवीचं शिक्षणं पुर्ण होईपर्यंत मला पाळी म्हणजे काय ते नीट कळलंच नाही, कारण माझ्या आईने सुद्धा ह्या विषयावर कधी माझ्यासोबत संवाद केला नाही आणि इतर ही कुणी कधी काही बोललं नाही.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई, मध्ये MA करत असताना इंटर्नशिप निमित्त ‘समाजबंध’ या संस्थेसोबत जोडला गेलो तेव्हा मनात वर्षानुवर्षे चाललेल्या या प्रश्नांची उत्तरे हळूहळू सापडत गेली. नंतर मित्र- मैत्रिणींसोबत याविषयी मुक्तपणे संवाद साधायला सुरवात झाली. मित्रांसोबत चर्चा करताना बऱ्याचदा चर्चेत एक प्रश्न यायचा, 'पाळी आणि पुरूष ह्याचा काही संबंध आहे का?' तर ते म्हणायचे 'नाही, पाळी तर स्त्रीला येते ना मग आपला काय संबंध.'
मित्रांनी नाही म्हटल्यावर त्यांच्या वैचारिक क्षमतेनुसार मी त्यांच्याशी चर्चा सुरु करायचो. मी: "तुमचा माझा जन्म कसा झाला? जर आपल्या आईला पाळी आलीच नसती तर तुमचा जन्म झाला असता का?" मग मात्र मित्र अवाक व्हायचे आणि शांत होऊन विचार करायला लागायचे.
प्रत्येक पुरुषाचा संबध वेगवेगळ्या नात्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक स्त्रियांसोबत येत असतो. मग तो घरात आई, ताई, पत्नी असो वा मैत्रिण वा अन्य कोणतीही स्त्री असो. याप्रकारे प्रत्येक पुरुषाचंही मासिक पाळी सोबत एक नातं असतं पण ते खूप कमी पुरुषांना समजतं. त्याचं एक कारण म्हणजे संवादाचा अभाव. घरात, शाळेत, समाजात, मित्र-मैत्रिणीमध्ये मोकळेपणाने चर्चा न होणे. खूप कमी कुटुंबात, मित्र मैत्रिणीमध्ये मोकळेपणाने पाळीवर बोलले जाते. त्यातही बहुतांश घरातील महिला पुरुषासमोर बोलायला घाबरतात.
काही महिला मोकळेपणाने बोलू इच्छितात पण सामाजिक दडपणामुळे त्यांना हे बोलायला तसेच समाजाला पटवून सांगण्यासाठी खुप संघर्ष करावा लागतो. त्यातलीच एक माझी आई... तीसुद्धा मला कधीच बोलू शकली नव्हती. मी याविषयी ‘समाजबंध’सोबत काम करायला लागेपर्यंत आणि तिच्या वयाची पंचेचाळीशी पार होईपर्यंत मला तिचं पाळीतलं दुःख आणि वेदना कधीच कळल्या नाहीत.
ग्रामीण आणि शहरी भागातील पुरुषांची मानसिकता
स्थानिक संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव ह्यात भिन्नता असल्यामुळे मासिक पाळीबद्दल ग्रामीण आणि शहरी भागातील पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बरीच तफावत जाणवते. ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये मासिक पाळीबद्दल अनेकदा पारंपारीक आणि रूढीवादी दृष्टीकोन बघायला मिळतो. तेथील पुरुषांना पाळीबद्दलची अपूर्ण माहिती असल्याने त्याबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा जास्त प्रमाणात आहेत. सोबतच शिक्षणाच्या अभावामुळे मासिक पाळी म्हणजे अशुद्ध रक्त, अपवित्र बाब अशा धारणा अधिक आहेत. यामुळे पुरुष मासिक पाळीवर बोलण्यास संकोच करतात किंवा टाळतात.
याउलट शहरी भागात शिक्षणाचा प्रसार अधिक असल्यामुळे तुलनेने या पुरुषांमध्ये मासिक पाळीबद्दल अधिक माहिती तसेच काही प्रमाणात आधुनिक दृष्टीकोन आढळतो. पण म्हणजे परिस्थिती पूर्णतः बदललेली नाहीये, शहरी भागातही बरेच पुरुष या विषयावर ऐकताना बोलताना अस्वस्थ होतात, कारण लहानपणापासून समाजात या विषयावर गुप्तता पाळली गेल्याचे किंवा हा विषय अतिशय खाजगी असल्याचे त्यांच्या बालमनावरच बिंबवले गेलेले असते. जे सज्ञान झाल्यावर देखील त्यांच्या वागण्यात उतरत नाही.
समाजातील अज्ञान आणि खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा
आपल्या देशातील बऱ्याच समाजात पितृसत्ताक व्यवस्था आहे त्यामुळे घरातील बहुतांश निर्णय पुरुष घेत असतात. मग ते आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असो वा इतर कुठलेही कौटुंबिक निर्णय. त्यामुळे सर्वात आधी पुरुषांना पाळीचे विज्ञान आणि गैरसमज माहित असणे आवश्यक आहे. बऱ्याच कुटुंबात मासिक पाळीच्या काळात अस्पृश्यता पाळली जाते म्हणजेच घरातील कुठल्याही वस्तूला, स्वयंपाकाला किंवा इतर व्यक्तींना स्पर्श केलेला चालत नाही.
काही आदिवासी जमातींमध्ये पाळीच्या काळात स्त्रियांना घराबाहेर रहावं लागतं. बहुतांश कुटुंबात पाळीच्या काळात स्त्रीला धार्मिक विधी करू दिले जात नाहीत कारण घरातील देव धर्माला विटाळ होतो असं त्यांना वाटतं. बऱ्याचदा घरातील धार्मिक कार्यक्रमात आड येऊ नये म्हणून महिलांना पुरुषांच्या, कुटुंबाच्या दबावात पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाव्या लागतात.
गोळ्यांचे दीर्घकालीन दुष्परिणामसहन करत आरोग्याची हेळसांड करणं हे खरंच कितपत योग्य आहे? एक बाजूला हेच पुरुष स्त्रीला पाळीच्या काळात विटाळशी समजून हिणवतात तेच पुरूष घरात लग्न वा इतर काही धार्मिक कार्य असेल आणि पाळी येणार असेल तर त्यावेळेस कामात हातभार लावण्याऐवजी तिचा एकप्रकारे मानसिक छळ करत पाळी पुढे ढकलण्यासाठी प्रवूत्त करतात. इथे पाळी जरी स्त्रीला येत असली तरी पुरुषांचा संबंध येतो की नाही?
पाळीच्या काळात महिलांमध्ये होणारे बदल
पाळी येण्याच्या 2-3 दिवस आधी स्त्रियांमध्ये काही शारीरिक बदल होतात जसे की पोटदुखी, कंबरदुखी, स्तन जड पडणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, थकवा जाणवणे वगैरे शारीरिक बदल होत असतात. त्याचप्रमाणे काही भावनिक आणि मानसिक बदल सुद्धा होत असतात, जसे की अचानक मूड बदलणे, चिडचिड, तणाव किंवा उदासीनता वाटणे, इतरांशी संवाद करण्याची इच्छा नसणे असे वेगवेगळे बदल विविध महिलांमध्ये होत असतात.
पाळी दरम्यान काही महिलांना पहिले 1-2 दिवस खूप जास्त रक्तस्त्राव होतो तर काहींचे ओटीपोट, कंबर, पाठ, पाय खुप दुखतात तसेच थकवा वाढतो, कुठलही कामं करण्याची इच्छा होत नाही. पाळी गेल्यानंतर मात्र शरीर पूर्ववत होऊन हे सर्व तात्पुरते झालेले त्रास होणे बंद होते.
मासिक पाळी आणि पुरुषांची जबाबदारी
स्त्री आणि पुरुषांमध्ये मोकळ्या संवादाची कमतरता असल्याने पाळीच्या काळात पुरुषांना स्त्रीच्या भावना आणि परिस्थिती समजत नाही. पाळीच्या काळात स्त्रीला होणाऱ्या वेदना पुरुषाला अनुभवणे अशक्य आहे, पण होणारा त्रास समजून घेतला तर तिला मदत होईल अशा अनेक बाबी करता येऊ शकतात. या काळात एक पुरुष म्हणून स्त्रीच्या शारीरिक आणि भावनिक परिस्थितीला समजून घेणे आवश्यक आहे. तिच्या स्वभावामध्ये होणारे बदल, होणारी चिडचिड हे ती मुद्दाम करत नसून पाळीमुळे ती होत आहे हे लक्षात घेऊन वर्तन ठेवावे लागते.
अशा वेळी शांत राहून तिच्या बोलण्याकडे लक्ष देणे, तिला दोष न देता तिची मनस्थिती समजून घेणे आणि किमान तिची आणखी चिडचिड होणार नाही असे वागणे टाळणे याने मदत होईल. कधी कधी यादरम्यान महिलांना शांतता आणि एकांताची ही गरज वाटते, त्यामुळे ती स्पेस देणेही महत्त्वाचे असते. या काळात तिला तिच्या भावना व्यक्त करू देणे, बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करणे, जर तिला काही वेळ एकटं राहायचे असेल तर तिला तो वेळ देणे, हे तिच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते.
समानुभूती आणि संवाद ह्या बाबी कोणत्याही नात्यात खूप महत्वाच्या असतात आणि पाळीच्या नाजूक काळात तर त्या आणखीनच महत्वाच्या ठरतात. त्यासोबतच तिला शारीरिक आराम मिळावा म्हणून स्वतःची कामे स्वतः करणे, तिच्या कामात मदत करणे, कुठलंही काम माझं तुझं न करता स्वतः करणे, तीच्या आवडीचे काही पदार्थ तिला बनवून देणे, कंबर पाय दुखत असेल तर दाबून देणे, पोटाला तेलाने हलक्या हाताने मसाज करणे, गरज असल्यास पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी गरम पाणी करून देणे, शोषक साहित्य आहेत का याची चौकशी करणे, नसल्यास आणून देणे, तिला पुरेसा आणि वेळेवर आहार मिळतोय ना याची दक्षता घेणे, तिला पुरेशी झोप घेऊ देणे हे तीच्या पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मदत करेल.
तिच्याबरोबर काही वेळ घालवणे तसेच तिला चांगलं वाटेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. ह्या गोष्टींमुळे मिळणाऱ्या आरामासोबत तिला या त्रासात ती एकटी नाही या भावनेने तिचे मनही शांत होईल आणि तिला आणखी बरं वाटेल.
स्त्रीला मासिक पाळीच्या काळात मदत केल्याने मानसिक आणि शारीरिक आराम तर मिळतोच, पण नातेसंबंध अधिक सुदृढ होण्यास ही मदत होते. मग ते नाते एखाद्या आई-मुलाचे असो, पती-पत्नी चे असो, बहीण-भावाचे असो किंवा मित्र-मैत्रिणीचे असो. ह्या काळात त्या स्त्रीला समजून घेतल्याने नात्यात प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना अधिक दृढ होते. आपल्याला समजून घेणारं, आपली काळजी असणारं, आपल्यावर प्रेम करणारं कोणी आपल्या सोबत आहे ही भावना पाळीच्या त्रासाला सामोरं जाण्यासाठी बळ देते.
पुरुषांच्या आयुष्यातील निम्मा कप्पा हा वेगवेगळ्या नात्यातील महिलांनी व्यापलेला असताना पाळी हा केवळ महिलांचा विषय कसा राहील? त्यामुळे आपल्या आयुष्यातील जवळच्या महिलांच्या आयुष्यातील जवळचा असणारा मासिक पाळी हा विषय केवळ Women Issue नाही तर Human Issue आहे हे लक्षात घेऊन पुरुषांनी वागायला हवं.
(लेखक समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते आहेत.)





