महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही.
रमाबाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब महार कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या. रमा लहानपणापासूनच खूप समझदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई-वडिल मरण पावले. लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली रमा तिच्या भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला आली.
त्या काळामध्ये अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी भिवासाठी रमाची निवड केली. रमा अवघ्या नऊ वर्षांच्या असताना 1907 मध्ये मुंबईतील भायखळा येथे त्यांचा भीमरावांशी विवाह झाला. रामी. बाबांची रामू, रामजी बाबांची लाडकी सून रमा झाली.
रमाईंची साथ नसती तर …
महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा पत्नी असू शकते. बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर कदाचित भिवाचा भीमराव झाले नसते. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे. युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्यांच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.
बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. रमाईची मुले औषधांविना मरण पावली. रमाईने अपार कष्ट केले. शेणाच्या गोवऱ्या थापल्या. त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी तसेच बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. एक काडीपेटी महिनाभर चालवित. रमाईला शेजारच्या महिला दागिन्यांवरून चिडवित असत. तेव्हा रमाई म्हणत, ‘माझा दागिना म्हणजे माझं कुंकू. माझं सौभाग्य असे आहे की ज्याची ख्याती साऱ्या विश्वाला ठाऊक आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाचं असं नेमक्या शब्दात वर्णन करणाऱ्या रमाईंचं हृदय किती संवेदनशील असेल याची आपणास प्रचिती येते. त्यांच्यातील या शोषिक वृत्तीमुळेच बाबासाहेब आंबेडकर घडू शकलेत. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईंना नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा बाबासाहेबांनाच मिळालेला फेटा लुगडं म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका. एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक लुगडं घेऊन देऊ शकत नव्हते. त्याच बाबासाहेबांमुळे आज आपण चांगले वस्त्र अंगावर परिधान करीत आहोत.
धार्मिक रमाईंना बाबासाहेबांनी समजवलं तेव्हा…
रमाबाई खूप धार्मिक होत्या. रमाईंनी एकदा पंढरपूरला जाण्याचा हट्ट केला तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते तिथे जाण्यापेक्षा आपल्या उभयतांच्या पुण्याईने, स्वार्थत्यागाने, दलितांच्या सेवेने आपण दुसरे पंढरपूर निर्माण करू आणि आज आपल्या पुढे ते दीक्षाभूमीच्या रूपात नागपूरमध्ये मोठ्या अभिमानाने आणि डौलाने उभे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्या-वाचण्यास शिकल्या. त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबतीने त्यासुद्धा समाजजागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करीत असत. त्यांच्या समोर भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना प्रेरीत करीत असत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी असताना रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरिबीचे चटके सोसत संसार सांभाळला. अशा पददलितांच्या आई - रमाईंचे 27 मे 1935 रोजी वयाच्या 37व्या वर्षी निधन झाले.
बाबासाहेबांनी लंडनहून रमाईला लिहिलेले पत्र…
बाबासाहेब इंग्लडला होते तेव्हा त्यांनी रमाईंना अनेक पत्र लिहिली होती. त्यांची ही पत्रं आजही काळजाला पिळून टाकतं… दिनांक 30 डिसेंबर 1930 रोजी इंग्लंड वरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र खास ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी…
रमा !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.
मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे
आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत
रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
सर्वांस कुशल सांग.
कळावे,
तुझा भीमराव
लंडन, 30 डिसेंबर 1930





