- किरण गीते
स्त्रीचे शरीराचे मार्केटिंग करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवण्याचा फंडा हा भांडवलशाही जगाचा नित्याचा कार्यक्रम आहे. टॅबू म्हणवणारी एखादी गोष्ट मेनस्ट्रीम मीडियामध्ये चर्चेत आली म्हणजे तिचा नायनाट झाला कारण ती चर्चा करणारे पुरुष होते आणि त्यांनी महिलांच्या आरोग्याशी निगडित महत्वाच्या गोष्टीवर संशोधन करून प्रॉडक्ट बनवलं.
परंतु चर्चा झाली म्हणजे विषय संपला असं जर तुमचं मत असेल तर मग आजपर्यंत विपुल प्रमाणात अंकलिप्या विकून सुद्धा समाजात साक्षरतेची उणिवा का आहे? त्यामुळे स्त्रियांच्या हक्क, अधिकार आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींचा विचार मेनस्ट्रीम मार्केटला बाजूला ठेऊन करणे गरजेचे आहे आणि टॅबू म्हणवणाऱ्या गोष्टींकरिता जे काही काम समाजात सुरु आहे त्याची चिकीत्सा करणे देखील गरजेचे आहे.
मासिक पाळीत महिला पूर्वी कापड वापरायच्या. वापरलेला कापड धुवायचा आणि पुन्हा तोच कापड पुढे वर्षानुवर्षे वापरत राहायचा. कालांतराने मार्केट मध्ये नवीन संसाधनं येत गेली. कापड वारपल्याने इन्फेकशन होते, ते हायजेनिक नाही आणि म्हणूनच पॅड वापरले पाहिजे असा वैद्यकीय सल्ला घेऊन पॅड्स, टॅम्पॉन्स आणि कप अशा वेगवेगळ्या गोष्टी येत गेल्या.
मासिक पाळीमध्ये स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विषयांना सोडून त्या विषयाचं मार्केटिंग करून मोठं मोठ्या कंपन्या करोडो रुपयांचा गल्ला जमवतायेत.अशातच सध्या चर्चा सुरु आहे ती पिरियड पँटींजची. 
शार्क टँक या टी. व्ही. शोमध्ये आसामचे तीन तरूण आले. पिरियड पँटीज् ही या तरूणांचीच टेक्नोलॉजी आहे असा दावा त्यांनी केला. पाळीत होणारा रक्तस्त्राव तिप्पटीने या पँट्स शोषूण घेतील आणि त्या पँट्स धुतल्यानंतर त्यांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो अशी माहिती त्यांनी आपल्या सादरीकरणात दिली.
हे प्रॉडक्ट आसामच्या किरीटी बिरकम आचार्जी, सौरव चक्रवर्ती आणि सत्यजित चक्रवर्ती यांच्या हेल्थ फॅब या कंपनीने बनवले आहे. त्याला देशभर प्रसिद्धी मिळावी आणि मार्केट मध्ये ते मोठ्या प्रमाणात लाँच करता यावं याकरिता त्यांनी शार्क टॅंक शो मध्ये फंडिंग मिळवण्यासाठी भाग घेतला होता.
शार्क टँकमध्ये असलेल्या महिला परिक्षकांनी त्यांना पाळीदरम्यान महिलांना होणारे त्रास, स्वच्छता, आणि आरोग्यासंदर्भात महत्वाचे प्रश्न विचारले आणि या तरुणांनी त्यावर उत्तरे दिली. “पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव मांड्यांना लागून बाहेर येऊ शकतो. तो रोखण्यासाठी पॅडला विंग्स असतात. तुम्ही तयार केलेल्या पिरियड पँट्सना तशी सुविधा नाही.” असा मुद्दा परीक्षक विनिता सिंगेन उपस्थित केला. त्यावेळी, या तिघांनी पँटवर लिक्विड ओतून पँट्सची शोषून घेण्याची क्षमता दाखवली.
हे प्रॉडक्ट महिलांसाठी किती योग्य आहे आणि वापरण्याकरिता किती आरामदायक आहे हे या तरुणांनी स्पष्टपणे सर्व प्रश्नाची उत्तरे देत सांगितलं. सिल्वर स्क्रिन वर अशा प्रकारची चर्चा होण्याचा कदाचित ही पहिलीच वेळ असेल, ते सुद्धा पुरुषाचं पाळीबद्दल एवढ्या मोकळ्या पद्धतीने व्यक्त होणं. परंतु यामुळे महिलांच्या पाळीसंदर्भातल्या समस्या संपल्या किंवा समाजातून टॅबू नाहीसा झाला असे म्हणता येईल का?
एकविसाव्या शतकात आपण जगत असलो तरी आजही पाळीविषयी कोड भाषेत किंवा कानातच बोललं जातं. मात्र, पाळीतील होणाऱ्या रक्तस्त्रावावर विचार करून पिरियड पँट्स ज्यांनी तयार केल्या ते सगळे पुरूष आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुरूषांनी पाळीसारख्या विषयावर विचार करत तो मुद्दा मेन स्ट्रिमवर आणला म्हणून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
पण, मेनस्ट्रममध्ये पाळीवर चर्चा झाली म्हणून याविषयी समाजात असलेला टॅबू संपुष्टात येतो का? यावरून पुन्हा समाजमाध्यमांवर चर्चेला सुरूवात झाली. याच विषयावर डॉ ऐश्वर्या रेवडकर यांनी फेसबूक पोस्ट लिहीत प्रश्न उपस्थित करत अनेक मुद्द्यांना प्रकर्षाने मांडलं..
डॉ. ऐश्वर्या म्हणतात, “शार्क tank हा कुठल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि किती लोक ते पाहतात. हा प्लॅटफॉर्म भारतीय समाजाचा आरसा नाहीये. हे जे प्रॉडक्ट्स आहेत, हे आधी पासून अनेक कंपन्या बनवत आहेत. पाळीत वापरायची underwear. हा नवीन शोध नाही.मासिक पाळीमध्ये पुन्हा पुन्हा धुतलं जाऊ शकणारे कापड वापरता येते हे अनेक वर्षांपासून भारतीय स्त्रियांना माहिती आहे आणि त्या वापरत आहेत.
हा काही नवीन शोध नाही. मार्केट फार गमतीशीर आहे. स्त्रीचे शरीर हे पैसे गुंतवण्याची उपयोगी जागा आहे हे मार्केटने अनेक वर्षांपासून ओळखलं आहे. आधी व्हिस्पर पॅड्स आले. त्यांनी स्त्रियांना कापड वापरणे चुकीचे आहे पॅड्स वापरा हे शिकवले. आता तेच मार्केट पॅड सोडून पुन्हा पुन्हा धुता येऊ शकणारे कापडाचे प्रॉडक्ट्स वापरा हे सांगत आहे.
शार्क टँकमध्ये स्त्री पुरुषांनी चर्चा केली म्हणजे टॅबू संपला का? मग आपण तर लहान असल्यापासून टी व्हीवर व्हिस्परच्या कितीतरी जाहिराती येत आहेत. पॅड घालून मुलगी पाळीमध्ये पण उड्या मारू शकते हे प्रत्यक्षात दाखवून सांगतात. जाहिराती आल्या म्हणून टॅबू संपला असं म्हणायचं का? जिथे जिथे पैसा आहे, तिथे तिथे लोक taboo वगैरे सगळं सोडून देतात.उलट सामाजिक बदल घडवण्याचा आव आणून चार पैसे जास्त कमवतात हे मार्केटिंग किंवा सेल्सचे बेसिक आहे.
कंडोमच्या किती जाहिराती फिरतात. मग काय सेक्सचा टॅबू संपला का? स्त्रीचे शरीर ही तर पैसे कमवायची खाण आहे. फेअर अँड लव्हलीपासून आंतरवस्त्र ते कॉस्मेटिक सर्जरी, मोठं मार्केट आहे. व्हिस्पर कंपनीने मासिक पाळीचे ज्ञान देणारे विनामूल्य सेशन डिझाईन केले. डॉक्टरांना घेऊन त्यांचे सेशन ग्रामीण भागात शाळेत विनामूल्य केले जातात. बदल्यात व्हिस्परची जाहिरात होते. मुलींना सँपल म्हणून एकेक पॅड वाटलं जातं.
आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संस्था ग्राउंड लेव्हलला मासिक पाळी या विषयावर आर्थिक तोटा सहन करत काम करत आहेत. अनेक वर्षांपासून स्त्रीवादी लोक या विषयावर जनजागृती करत आहेत. त्यामुळे टॅबू हळूहळू कमी होत जातो. शार्क टँक तर यासाठी अनेक वर्षे लेट झालाय. शेवटी हेच. जिथे पैसे नसतात, तिथे कोणी हात घालत नाही. स्त्रियांचे प्रश्न, कायदे यावर बोलायला गेलं की स्त्रीवादी म्हणून शिव्या दिल्या जातात. गंमत ही की समाजात 51% स्त्रिया असून, मी जेव्हा स्त्री नायिकेची कहाणी लिहिते तेव्हा स्त्रीवादी म्हणून ते लिखाण बाजूला टाकलं जातं.
पुरुष नायक असलेली कहाणी जणू काही समजाचे प्रतिबिंब वगैरे असते. पण स्त्री नायिका असली की जणू ती फक्त स्त्रीवादी कलाकृती असते असा शिक्का मारला जातो. तिथेच स्त्रियांची कहाणी पुरुषाने लिहिली की वाह. टॅबू संपला म्हणून शाबाशी मिळते. जिथे पैसा येतो. तिथे तर स्त्री हीच फोकस असते. स्त्रीचं शरीर मार्केटसाठी नफा उत्पन्न करणारं साधन आहे.”
एकविसाव्या शतकात टेक्नोलॉजीने गगनभरारी घेऊनही ग्रामीण भागातील स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पाळीत नीट स्वच्छता राखू शकल्या नाही म्हणून अनेक आजारांना स्त्रियांना तोंड द्यावं लागतं. लघवीच्या जागी खाज सुटणे, बुरशीचा आजार होणे त्यानंतर घाण कपडे वापल्यामुळे जंतू आता जाऊन गर्भपिशवीला इन्फेक्शन होणे आणि त्यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणे. या सर्व गोष्टी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत.
आपल्या समाजात पाळीत महिलांना घाणेरडी वागणूक देतात. चार दिवस त्यांना बाजूला बसवलं जातं. त्यांना स्पर्श केला की आपण बाटतो असा विचार आजही आपल्या समाजात करतात. जेव्हा एखादी स्त्री पाळीत होणाऱ्या वेदना किंवा अडचणींबद्दल बोलते तेव्हा तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहतात. पाळीत जनजागृती करण्यापेक्षा पाळीचा पैसा कसा करता येईल या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पॅड्सची किंमत आज 50 च्या घरात आहे. प्रत्येक मुलगी पॅड्सवर खर्च करू शकते हे कशावरून?
वेगवेगळे प्रॉडक्ट्स दरवेळी मार्केटमध्ये येत राहतात. पण, ते ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे तिथे खरंच ते पोहोचतात का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. टीव्हीवर पाळीबद्दल बोलून खरंच त्याचा टॅबू संपुष्टात आणण्यासाठी फायदा होईल का? हजारो,लाखो वर्षांपासून चालत आलेल्या पुरूषसत्ताक समाजात पाळीबद्दल असलेला गैरसमज एका झटक्यात संपणार नाही. त्यामुळे या गंभीर विषयावर तळागळात जाऊन काम करणं गरजेचं आहे….
पिरियड पँटीज् हे प्रॉडक्ट गेल्या 5-6 वर्षांपासून मार्केटमध्ये आहेत मग शार्क टँकमध्ये आलेल्या आसामच्या तरूणांनी केलेला दावा याठिकाणी खोटा ठरतो. गेल्या हजारो वर्षांपासून स्त्रियांनी पाळीमध्ये कपडे धुवूनच वापरले आहेत. पाळीत कपडा धुवून वापरू नये असं नंतर सांगून पॅड वापरण्याबद्दल जाहिराती करण्यात आल्या. स्त्रियांनी पॅड वापरण्यास सुरूवात केली. पुढे पॅड वापरल्याने कॅन्सर होतो पॅड नाही कप वापरा असं म्हणत पुन्हा कपच्या जाहिराती सुरू झाल्या.
हे सगळं झाल्यानंतर पिरियड पँटी आणून पुन्हा पाळीमध्ये पँट धुवून वापरण्यास महिलांना सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या या भांडवलशाही विश्वात जिथे पैसा येतो तिथे तर स्त्रीच हाच मेन फोकस कारण स्त्रीच शरीर मार्केटसाठी नफा उत्पन्न करणार साधन आहे ही जाणीव प्रकर्षाने समोर येते. त्यामुळे TABOO दूर करायच्या बाबतीत ज्याकाही गोष्टी होत आहे त्याची चिकित्सा करणे गरजेचे आहे.





