'फक्त गटारं आणि रस्ते बनवणं ,घरकुल मिळवून देणं, सिमेंटीकरण करणं म्हणजेच गावाचा विकास नाही तर, त्यापलीकडे जाऊन शाश्वत विकासाच्या ज्या काही नऊ संकल्पना आहे त्यावर काम करणं, त्या माध्यमातून गावातील लोकांचा विकास करणं, समाजाचा विकास करणं म्हणजे खऱ्या अर्थाने गावाचा विकास.. '
ज्या ‘बेला’ ग्रामपंचायतीला यंदाचा 'राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार' जाहीर झालाय त्या गावच्या महिला सरपंच शारदा मधुकर गायधने- शेंडे यांची ही भूमिका…
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात असलेलं 10 ते 12 हजार लोकवस्तीचं बेला हे गाव आता देशपातळीवर नावाजलं जाणार आहे, याच कारण म्हणजे बेला ग्रामपंचायतला 'राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार' जाहीर झालाय. राज्यातील एकूण पाच ग्रामपंचायतींना हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असला तरी सर्वाधिक चर्चा बेला या गावाचीच आहे.
2023-24 मधील देशातील 'कार्बन न्यूट्रल गाव' या अनोख्या संकल्पनेमुळे गावाने पुरस्कारावर आपले नाव कोरलयं. तसं या बेला गावाला पुरस्कार नवीन नाहीत, यापूर्वी संत गाडगेबाबा स्वच्छग्राम पुरस्कार, माझी वसुंधरा असे महत्वाचे पुरस्कारही बेला ग्रामपंचायतीने पटकावले आहेत.
परंतू, हे पुरस्कार काही सहजासहजी मिळाले नाहीत. यासाठी फक्त गावातील सरपंच नव्हे तर, किशोरवयीन मुलांपासून ते तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या परिश्रमातून या गावाचा विकास झालाय. ठरवलं तर लोकसहभागातून काय होऊ शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बेला गाव.. आणि हे सगळं घडवून आणलं ते या गावच्या महिला सरपंच शारदा मधुकर गायधने- शेंडे यांनी..
‘कार्बन न्यूट्रल’ म्हणजे नेमकं काय?
कार्बन उत्सर्जन आणि कार्बन सिंकमध्ये संतुलन असणे म्हणजेच कार्बन न्यूट्रल… वृक्षतोड, सिमेंटीकरण, इंधन जाळणे, पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्या या आणि यासारख्या बऱ्याच गोष्टींमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायूचे उत्सर्जन होते. यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते. हे कार्बन सिंक करण्यासाठी म्हणजेच कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यासाठी काही उपाययोजनाही करता येऊ शकतात, जसं की वृक्षलागवड करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करणे, कचरा न जाळणे, वीजेवर चालणाऱ्या गाड्या वापरणे. या सर्व गोष्टींमुळे कार्बन विरहित गाव तर होणार नाही पण कार्बन संतुलन राखण्यास मदत मात्र नक्कीच होते.
बेला हे 'कार्बन न्यूट्रल' गाव कसे झाले?
महिला सरपंच शारदा मधुकर गायधने- शेंडे ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतात, ‘’आमचं गाव शहरालगत आणि महामार्गावर असल्याने हवेत प्रदूषण होते. हे कमी करण्यासाठी आ्ही कार्बन न्युट्रल समिती तयार केली. त्यामाध्यमातून जनजागृती केली आणि पाच घटकांवर काम केले. 1) वृक्षारोपण 2) प्लास्टिक बंदीचा ठराव 3) ई-व्हेईकल वापरण्यावर भर 4) घनकचरा व्यवस्थापन 5) पारंपरिक वीजेची बचत…
बेला गावातील सर्व शासकीय इमारती या सौरउर्जेवर चालतात. गावातील प्रत्येक घरात ओला कचरा, सुका कचरा याचे व्यवस्थितरीत्या वर्गीकरण करून कचऱ्याच्या गाडीत तो टाकला जातो. बेला गावात घन कचरा व्यवस्थापन केंद्रही आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून ते गावातल्या शेतात आणि झाडांना टाकण्यात येतं. गावांमध्ये वृक्षलागवड करून प्रत्येक घराला पाच झाडांचं पालकत्व देण्यात आलं आहे. गावात अनेकांनी इ-गाड्या वापरण्यास सुरवात केली आहे. या सर्व गोष्टींमुळे बेला गाव हे कार्बन न्यूट्रल गाव बनले आहे.’’
शारदा सांगतात, आतापर्यंत जवळपास 90 हजार झाडं लावली. देशी जाती, विदेशी जाती, नर्सरी, अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. प्रदूषण कमी व्हायला मदत झाली. प्लास्टिकऐवजी कापडाची पिशवी वापरण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
यात कापडी पिशव्या शिवण्याचं काम गावातीलच बचत गटाला दिले आणि त्या पिशव्या लोकांना तसेच सुपर मार्केटमध्ये देण्यात आल्या.प्लास्टिकचा वापर खूप कमी झाला. त्यामुळे प्लास्टिक जाळल्यानं जे प्रदूषण होत होतं ते कमी झाले. आमच्या ग्रामपंचायतीकडे असलेल्या सगळ्या घंटागाड्या बाजूला सारून आम्ही ईलेक्ट्रीक व्हेईकल आणल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीत चार्जिंग स्टेशनही तयार केले. लोकांना पेट्रोलची किती बचत होते, ईलेक्ट्रिक वाहन किती परवडते हे आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवून दिले. त्यामुळे काही लोकांना पटलं आणि ती लोक ईलेक्ट्रीक व्हेईकलकडे वळली.
‘’मी पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा..’’
वर्ष 2012.. बेला गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार होत्या. गावाला यंदा सरपंच कोण मिळणार? अशा चर्चांना उधाण आलेलं.. कारण तोपर्यंत बेला ग्रामपंचायतवर ‘सरपंच पती’चे वर्चस्व असायचे. कागदावर सरपंच तर महिला पण कारभार सगळा तिच्या नवऱ्याकडे.. गावाचा विकास झाला तो देखील कागदावरच. शारदा मधुकर गायधने या त्यावेळी बचत गटाच्या समन्वयक म्हणून गावात काम करायच्या.
भंडारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय घाडवे यांनी शारदाला आमच्या पॅनलमधून निवडणूक लढवणार का? असे विचारले. शारदा गायधने शेंडे सांगतात - “मी माझ्या घरातली पहिलीच व्यक्ती जिने ग्रामपंचायत निवडणूक तर लढवली आणि सरपंचही झाली. तेदेखील एकदा नव्हे तर सलग दोनदा…’’
शारदा गायधने सांगतात, "गावातील समस्या, त्यावरच्या उपाययोजना आणि त्यासाठी लागणार खर्च या सर्व गोष्टींचा आरखडा काढल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शासकीय निधीच्या भरवशावर गावाचा विकास होऊ शकत नाही. कारण निधी कधी येणार, मग तो अनेक महिने काही कारणास्तव अडकून राहणार… म्हणून मग असं सुचलं की, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्याची पारितोषिकांची रक्कम ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ज्या माध्यमातून गावासाठी पैसा मिळू शकतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून गावाचा हवा तसा विकास करता येऊ शकतो."
हे गाव लयं न्यार…
आज बेला गावात तीन नावाजलेल्या CBSC शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेची पट संख्या ही ४०० पार आहे. गावात लोकसहभागातून उभी केलेली अद्यायवत अभ्यासिका आहे, जी सर्वांसाठी निःशुल्क आहे. गावातील दरवर्षी किमान दहा मुलं शासकीय नोकरीला लागतात. कुपोषणाचे प्रमाण अगदी नाहीच्या बरोबर आहे. गावातील महिलांच्या, किशोरवयीन मुला -मुलींच्या आरोग्यासाठी दर महिन्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य शिबीर राबवले जाते. गावात घन कचरा व्यवस्थापन केंद्र आहे, गावातील प्रत्येक घरात ओला कचरा- सुका कचरा यांचं व्यवस्थापन केलं जातं, ओल्या कचऱ्यापासून गावात खतनिर्मिती केली जाते, ते खत गावातील शेतात आणि इतर झाडांसाठी वापरलं जातं.
गावांमध्ये तीन युनिटचे शौचालय चौकाचौकात आहेत. गावातील सर्व शासकीय इमारती ह्या सौरऊर्जेवर चालतात. गावात एकूण पाच विभाग आहेत, त्या प्रत्येक विभागात कचरा गोळा करण्यासाठी गाडी जाते. प्रदूषण रोखण्यासाठी इ-व्हेइकल चा वापर करण्यात येतो. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासायला नको म्हणून तलावाचे खोलीकरण करून, नाल्यांचे रुंदीकरण करून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. हे सगळं फक्त एकट्या सरपंचामुळे नाही तर, लोकसहभागातून घडलं..
शारदा गायधने सांगतात, "बेला गाव हे 10 ते 12 हजार लोकसंख्येचं गाव असल्याकारणाने या गावात तब्बल 151 बचत गट आहेत. या बचत गटातील सर्व महिलांची मला मदत होते. दर महिन्याला बचत गटांची मीटिंग असते. त्यामध्ये गावात काय काम करायचे आहे? कोणते अभियान राबवायचे आहेत? या सर्व गोष्टींची माहिती बचत गटांद्वारे गावातील महिलांपर्यंत पोहचवली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या 15 समिती गावात तयार केल्या जातात.
जसे की, ग्रामस्वच्छता समिती, आरोग्य समिती, पर्यावरणदुत समिती, रेशन दक्षता समिती, पाणीपुरवठा समिती, जैववैविधता समिती, बांधकाम समिती, विद्युत ऊर्जा पुरवठा समिती… अशा अनेक समित्या स्थापन केल्या जातात. या सर्व समितीच्या मार्फत गावातील कामांची रूपरेषा ठरवणं असेल, लोकांना मार्गदर्शन करणं असेल ही सगळी कामं होतात. या समित्या बनवण्याचा उद्देश हा होता की, गावातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहचता येईल. यामार्फत प्रत्येक माणसाच्या समस्या जाणून घेता येईल.
गावात जनजागृती या पद्धतीने केली..
बेला गावात महिलांच्या आरोग्याबद्दल, स्वच्छतेबद्दल, किशोरवयीन मुलांच्या वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल या सर्व गोष्टीत जातीने लक्ष देऊन याबद्दल योग्य ती जनजागृती केली जाते. गावात ग्रामपंचायत सदस्यांचे पथनाट्याचे गट आहेत. स्वतः ग्रामपंचायत सदस्य गावातील चौका-चौकात पथनाट्य करून जनजागृती करतात. यामध्ये आरोग्यासंदर्भात, हरितक्रांतीसंदर्भात, प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात, इ. विषय असतात.
सरपंच शारदा गायधने सांगतात, "एका रिक्षावर भोंगा लावून त्या भोंग्यावर कितीही ओरडून सांगितलं तरी लोकांच्या ते लक्षात येत नाही... पण, पथनाट्याच्या निमित्ताने माणसे गोळा होतात, अर्धा-पाऊणतास ते ऐकतात. त्या नंतर गावातील मोठी मंडळी असेल किंवा बायका चर्चा तरी करतात आणि त्यामुळे आम्ही गावात जनजागृती करण्यासाठी आमचं मुख्य साधन म्हणून पथनाट्याचा वापर करतो. यामध्ये शाळेतील मुला-मुलींचे गट ही असतात."
ना आमदाराकडे हात पसरले ना खासदाराकडे…
"मी ठरवलं की कोणत्याही आमदार खासदारकडे हात पसरवायचे नाही.. कोणाचं मिंधं व्हायचं नाही. का तर, आपण कोणत्या पक्षासाठी काम करत नाही आणि करायचे ही नाही.. माझं एकमेव साधन होतं ते वेगवेगळ्या स्पर्धा.. संत गाडगेबाबा स्वछता अभियानात भाग घेतला. इतर गावांपेक्षा आमचे बेला गाव स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आले. फक्त तालुका स्तरावरच नव्हे तर जिल्हापातळीवरही… त्यात 60 लाख रुपयांचं पारितोषिक गावाला मिळालं.. ‘स्मार्ट ग्राम’ मध्ये सहभागी झालो तिथेही आम्हाला भाग घेतला त्यातही माझ्या गावाला पारितोषिक मिळालं."
सरपंचपदाच्या पुढच्या टर्ममध्ये 2023 साली बेला गावाने ‘माझी वसुंधरा’ या स्पर्धेत भाग घेतला. मात्र यावेळी पदरी अपयश आलं. बेला गावाला फक्त सहाशे गुणांक मिळाले होते. ‘माझी वसुंधरा’ मध्ये धुळे जिल्यातील बोराडी हे गाव पहिलं आलं होतं.. मग त्या गावाला सरपंच शारदा गायधने आणि त्यांच्या गावातील सदस्यमंडळी यांनी भेट दिली.
‘माझी वसुंधरा’ स्पर्धा जिंकण्यासाठी घेतलेली मेहनत
शारदा गायधने सांगतात, "माझी वसुंधरा ही पाच तत्वांवर काम करणारी योजना आहे. भूमी,अग्नी,वायू, जल आणि आकाश.. बोराडी गावात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत त्या लोकांनी कसं काम केलं, एमआयएस (माहित प्रणालीचे व्यवस्थापन) कसा भरायचा या सर्व गोष्टींची आम्ही माहिती घेतली आणि भूमी, अग्नी, वायू, जल,आकाश या पाचही तत्वांचा व्यवस्थितरीत्या अभ्यास करून आम्ही कामाला सुरवात केली.
एकाही दिवसाचा खाडा न पडू देता मी, माझे कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी यश अपयशाचा विचार न करता प्रामाणिकपणे काम केलं. सरतेशेवटी त्या प्रामाणिकपणाचं फळ आम्हाला मिळालं. ‘माझी वसुंधरा’ मध्ये राज्यात दुसरा क्रमांक बेला ग्रामपंचायतीला मिळाला. पहिल्या वर्षाला आमच्या गावाला 600 गुणांक होते आणि यावेळेस 7,190 गुणांक ग्रामपंचायतीला मिळाले.. हे बक्षीस तब्बल 1 कोटी 25 लाखांचं होतं…
आता इथे थांबून चालणार नाही...
शारदा गायधने पुढे सांगतात, जिल्हा परिषदेकडून आम्हाला माहिती मिळाली की शाश्वत विकासाच्या 'नऊ संकल्पना' अंतर्गत ग्रामपंचायतीचे नामांकन करू शकतो. त्यामध्ये आम्ही बेला ग्रामपंचायतीचे नामांकन केले. यातही तीन विशेष संकल्पना होत्या. त्यातील एक ग्राम उर्जा, दुसरी कार्बन न्यूट्रल आणि तिसरी संकल्पना होती नानाचे फडके ग्रामपंचायत.
नऊ संकल्पना ज्या होत्या त्यामध्ये बेला ग्रामपंचायत येऊ शकली नाही पण, विशेष पुरस्कार जे होते त्यात 'कार्बन न्यूट्रल गाव' यामध्ये बेला ग्रामपंचायत भारतातून पहिली आली. इथपर्यंत पोहचण्यासाठी सर्व गावकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदा गवळी, बीडीओ संघमित्रा कोल्हे, ग्रामपंचायतीचे पूर्ण सदस्य, ग्रामविकास अधिकारी, या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आज बेला ग्रामपंचायतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले.
महिलांमुळेच हे शक्य झालं..
बेला ग्रामपंचायत सदस्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. आठ महिला सदस्य आणि सहा पुरुष सदस्य आहेत. या महिला सदस्यांमध्ये दोन-तीनच महिला अशा आहेत की ज्या गृहिणी आहेत, बाकी सर्व महिला सदस्य ह्या शिक्षक आणि अंगणवाडी सेविका आहेत. सगळ्या काम करणाऱ्या महिला असल्याने घरातली कामं आणि बाहेरची कामं आवरून सर्व महिला रात्री ग्रामपंचायती मधील कामांना वेळ देता.. बऱ्याचशा ग्रामपंचायतीच्या बैठका आणि ग्रामपंचायतीचे कामं या महिला रात्रीच करतात.
शारदा गायधने यांच्या मते, "गावात आतापर्यंत विकासाची परिभाषा एकच होती, ती म्हणजे गावातील रस्ते, नाली दुरुस्तीकरण केलं म्हणजे गावाचा विकास झाला. पण, रोड नाली बनवणं म्हणजे गावाचा विकास नाही. तर, त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल… शाश्वत विकासाच्या ज्या नऊ संकल्पना असतात त्या नऊ संकल्पनेवर आधारित काम कसं गावामध्ये करता येईल हे आम्ही पाहिलं.
त्यामध्ये स्वच्छता असेल तर त्यात फक्त नाली साफसफाई नाही तर वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, जलस्रोतांची कामे, तलावाचे खोलीकरण, लोकसहभागातून विविध योजना राबवणं, जैवविविधतेवर काम करणं असेल, गावातील प्रत्येकाला वृक्षाचं पालकत्व देणं असेल, अश्या वेवेगळ्या स्तरावर गावात काम केली पाहिजे. फक्त बांधकाम, घरकुल, किंवा सिमेंटीकरण न करता त्याही पलीकडे जाऊन काम करणं म्हणजे खरा गावाचा विकास.."
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)











