- नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्या माघारी राहिलेल्या बायकांचं आयुष्य मात्र अजूनच खडतर होतं . अशाच एका शेतकरी विधवा फुलाबाई पवार यांच्या आयुष्यातील एक दिवस उलगडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
- मराठवाड्यातली 80 टक्क्यांहून अधिक शेत जमीन थेट पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाचे प्रमाण अत्यल्प. मात्र गेल्या काही काळापासून पाऊस बेभरवशाचा झालेला आहे. आणि त्याचा थेट परिणाम इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होतो आहे.
- गेल्या काही वर्षात खरं तर सोयाबीनच्या पिकाने इथल्या शेतकऱ्याला चांगला हात दिला होता. पण गेली काही वर्षे वारंवार पडणारा दुष्काळ आणि अवकाळी पाऊस ह्याच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला सोयाबीनचं पीक घेणं देखील मुश्किल झालं आहे.
- कर्जबाजारीपणा आणि चक्रवाढीचं व्याज ह्यामुळे मराठवाड्यातला शेतकरी अजूनच भरडला जातो आहे, आणि त्यामुळे आत्महत्यांच्या प्रमाणात अजून वाढ होते आहे.
स्थळ: गांधीनगर वस्ती
वेळ: सकाळची
फुलाबाईच्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर ठळक अक्षरात एक वॉशिंग पावडरची जाहिरात रंगवलेली आहे: "तुमचे कपडे राहतात स्वच्छ आणि चमकदार!"
ह्या जाहिरातीसमोर बसून फुलाबाई राखेने भांडी घासते आहे.
आजूबाजूच्या घरांमध्ये मुलांना शाळेत पाठवायची लगबग चालू आहे. इकडे फुलाबाईच्या घरात मात्र तिची दोन्ही मुलं अर्धवट मोडलेल्या टीव्हीसमोर लोळत आहेत. "माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या मुलांची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं : ना माझ्या माहेरचे, ना माझ्या सासरचे . माझा मोठा मुलगा त्यावेळी शाळेत जात होता. पण त्याची फी वर्षाकाठी 10 हजार आहे, ते कुठून आणू? धाकटा अंगणवाडीमध्ये जायचा.
पण आता मलाच कामासाठी घराबाहेर पडावं लागतं, मग या पोरांना कुठे ठेवायचं? इथे रोज पोट भरायची मारामार आहे, शाळेची फी देणं मला शक्यच नाही. त्यामुळे त्या दोघांचं नाव शाळेतून काढून घेतलं.
आता मी जाईन तिकडे कामावर ते दोघे माझ्यासोबत येतात." फुलाबाईच्या चेहऱ्यावर मुलांचं शिक्षण बंद केल्याचा अपराधी भाव स्वच्छ दिसून येतो, पण परिस्थितीसमोर तिचा नाईलाज आहे.
चोवीस वर्षाच्या फुलाबाईचं लग्न खूपच लवकर झालं. तिचा मोठा मुलगा विश्वास सहा वर्षांचा आणि धाकटा अजय चार वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली. त्यानंतर फुलाबाईचं आयुष्य अजूनच खडतर झालं आहे. समाजाच्या नजरेत ती 'विधवा' असल्याने तिचा सामाजिक स्तर खालावला आहे.
फुलाबाई तिची कहाणी उलगडायला सुरुवात करते. " दोन वर्षांपूर्वी, म्हणजे 2022 मध्ये संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला. अशीच एक दिवस मे महिन्यातल्या दुपारची वेळ होती.
अंग पोळणारा उन्हाळा होता. मी नेहमीप्रमाणे माझे पती जेवायला घरी येतील ह्या हिशोबाने स्वयंपाक केला. आणि नेहमीप्रमाणेच ते घरी (दारू) पिऊन आले. मी वाढलेलं जेवण त्यांनी रागारागाने फेकून दिलं आणि मला झोडपायला सुरुवात केली." कौटुंबिक छळ ही ह्या घरातली रोजचीच बाब होती. ह्या वेळी मात्र फुलाबाईच्या नवऱ्याने तिला आणि दोन्ही मुलांना दुपारी चारच्या सुमारास फुलाच्या माहेरी घालवून दिलं.
"रात्री नऊच्या सुमारास मला फोन आला की माझ्या नवऱ्याने जीव दिला.. " ही दुर्दैवी हकीकत सांगताना फुलाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मात्र दोन्ही मुलं काळजीने तिच्या चेहऱ्याकडे बघताहेत हे दिसल्यावर ती स्वतःच्या भावनांना बांध घालते.
फुलाबाईचे पती, 27 वर्षीय नितीन पवार ह्यांनी स्वतःचं जीवन संपवलं, पण फुलाबाईसाठी बरेच प्रश्न मागे ठेवून. नितीनची अडीच एकर शेती होती. पण पावसाने दिलेली ओढ आणि भोसरा गावातली तळाला गेलेली भूजल पातळी ह्यामुळे दिवसेंदिवस शेती करणं कठीण होऊ लागलं होतं.
स्वतःच्या शेतात काही उत्पन्न मिळत नसल्याने नितीनने शेत गहाण ठेवून ट्रॅक्टर घेतला. दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर चालवून पोट भरावं असा नितीनचा उद्देश होता. पण संबंध मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असल्याने कोणाच्याच शेतजमिनीत फारसं काही पिकत नव्हतं.
शेवटी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी नितीनने कर्ज घेतलं. ह्या कर्जाच्या चिंतेने नितीनचा जीव पोखरला जाऊ लागला. कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँकेच्या नोटिशीने त्यात अजून भर पडली. परिणामी नितीनला दारू प्यायचं व्यसन लागलं, आणि व्यसनासोबत कौटुंबिक हिंसाचारातही वाढ झाली. शेवटी एक दिवस हे सगळं असह्य होऊन नितीनने स्वतःचं आयुष्य संपवलं.
फुलाबाईला आपल्या नवऱ्याने कोणाकोणाकडून आणि काय दराने कर्ज उचललं आहे ह्याची कल्पना नाही. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या मागे राहिलेल्या सर्वच विधवांची आहे.
त्यातच भर म्हणून काहीतरी कारणाने नितीनची आत्महत्या ही सरकारी निकषांमध्ये बसत नाही- आणि त्यामुळे जी मिळू शकली असती अशी नुकसान भरपाई देखील तिला मिळाली नाही. सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देतं- ज्यातील तीस हजार रुपये रोख रक्कम आणि बाकी मुदत ठेवीच्या स्वरूपात मिळतात.
हे पैसे काही तिला मिळाले नाही. आता नेमक्या कोणत्या कारणाने ही आत्महत्या सरकारी निकषांमध्ये बसत नाही, ह्याची फुलाबाईला काहीच कल्पना नाही. "आम्हाला कोणीच काहीच सांगत नाही. मी प्रतेय्क सरकारी ऑफिसमध्ये जाऊन खेटे घालून आले आहे.
मी माझी सगळी कागदपत्रं हे काम करण्यासाठी गावातल्या एका माणसाला दिले आहेत. शिवाय आणखी पैसे पण दिले आहेत. पण त्याच्याकडूनसुद्धा आम्हाला अजून काहीच कळलं नाहीये". फुलाबाई सांगते.
ही कर्मकहाणी सांगत असतानाच फुलाबाईचे शेजारी आरडाओरडा करत तिकडे येतात. फुलाबाईला त्यांनी कर्जाऊ दिलेले पैसे परत मागण्यासाठी. थोड्या वेळाने फुलाबाईचे सासरे तिकडे दारू पिऊन हजर होतात, त्यांना भूक लागलेली असते त्यामुळे ते फुलाबाईच्या नावाने लाखोली वाहत असतात. "हे रोजचंच आहे, तुम्ही नका काळजी करू.. " फुलाबाई आम्हाला सांगत आत स्वयंपाकघरात जाते.
स्थळ: गुरांचा गोठा
वेळ: दुपारची
वस्तीतले इतर लोक तिला 'फुला' म्हणून हाक मारतात. तिचं आयुष्य मात्र आधीच कोमेजून गेलं आहे.
तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर फुलाच्या सासरच्यांनी तिला राहायला एक मोडकळीला आलेली जागा दिली आहे. त्याबदल्यात ते तिच्याकडून घरातली सर्व कामे करून घेतात. डोक्यावर एक काहीतरी छप्पर असावं ही फुलाबाईची गरज आहे, म्हणून तिला हा जाच विनातक्रार सहन करावा लागतो.
झालंच तर गावातल्या पुरुषांकडून दिला जाणारा त्रास आणि बायकांनी तिच्याबद्दल आपापसात वाईटसाईट बोलणं हे जोडीला.
सकाळची सगळी कामं संपवून फुला आता वस्तीच्या दुसऱ्या टोकाला आली आहे. तिकडे जनावरांचा गोठा आहे. रोजंदारीवर काम करून फुला आपलं पोट भरते. ज्या दिवशी हाताला काम मिळत नाही, त्या दिवशी ती गोठ्यात येऊन तिकडची साफसफाई करते. ह्या गोठ्यामध्येच फुलाची 107 वर्षांची आजेसासू राहते.
ती धड हातपाय देखील हलवू शकत नाही, त्यामुळे तिचंदेखील सगळं फुलालाच बघावं लागतं. "आज मला कुठेच काही काम मिळालं नाही, त्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकते आहे, नाहीतर माझं काम पहाटे चारपासून सुरु होतं. " गोठा झाडता झाडता फुला सांगत असते.
"मी माझी सगळी कामं पहाटेच संपवते, आणि सकाळी 7 वाजल्यापासून काम शोधायला सुरुवात करते. दारोदार हिंडून लोकांना विचारते की त्या दिवशी मजुरी करायला त्यांना कोणी हवं आहे का? कोणाच्या शेतात काही काम असलं, तर त्या दिवशीचं पोट भरतं. पण तेवढ्याने होत नाही.
मला माझ्या सासरच्यांचा, आणि घरातल्या इतर मुलांसाठी स्वयंपाक करावा लागतो. जर मी नीट वागले, तर माझे दीर जाऊ माझा महिन्याचा किराणा भरून देतात. पण जर का त्यांची मर्जी उतरली, तर मग मला माझं माझं अन्नधान्याचं बघावं लागतं. मोडकळीला आलेलं का असेना, मला राहायला घर मिळतं, त्याची ही किंमत मला चुकवावी लागते.
शालेय शिक्षण संपल्यावर 2017 मध्ये लगेच फुलाचं लग्न नितीनशी लावून दिलं गेलं. लग्न झाल्यावर हे जोडपं नितीनच्या शेतावर काम करायला लागलं. पण जसजशी वर्षे गेली तसं पाऊस आणि हवामान दिवसेंदिवस अजूनच बिघडत गेलं. "आम्ही सोयाबीनचं पीक घ्यायचं ठरवलं होतं.
पण दर वर्षी काही ना काही कारणाने पिकाचं नुकसानच व्हायचं . कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस. परिस्थिती बिघडतच गेली.. . " फुला सांगते. हे तिचं म्हणणं शेतीविषयी आहेच, पण कदाचित तिच्या वैवाहिक परिस्थितीबद्दल देखील आहे.
स्थळ: फुलाबाईचं घर
वेळ: संध्याकाळची
आठवडाभर राब राब राबल्यानंतर फुलाबाईने घरी 10 किलो हरभरे आणले आहेत. ते 10 किलो हरभरे जात्यावर दळून तिने त्याची डाळ बनवली आणि आता तिने ती डाळ उन्हात वाळत घातली आहे. तापमानाचा पारा 40 च्या घरात आहे. फुलासकट आम्ही सगळेच घामेघूम झालो आहोत, पण फुलाला थांबायला सवड नाही.
संध्याकाळचे 5 वाजले आहेत. फुलाचं डाळीचं काम झालं आहे. ती आता फारशी पुसून घेतेय, जेणेकरून उन्हातून थोडा थंडावा मिळेल आणि त्यातल्या त्यात बरी झोप लागेल. उंबरठ्याबाहेरचा दिवा कालच मोडला, त्यामुळे आता तिच्याकडे एकच विजेचा बल्ब आहे.
स्वयंपाक करताना ती तो बल्ब स्वयंपाकघरात लावते, आणि नंतर तो बाहेरच्या खोलीत हलवते. फुलाच्या आयुष्याला व्यापून उरलेला अंधार तिच्या घरामध्ये देखील व्यापून राहिला आहे.
फुलाकडे गॅस ची शेगडी आहे, पण सिलिंडर भरायला तिच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ती सरपण आणून त्यावर स्वयंपाक करते.
ती बोलू लागते: "करायच्या गोष्टी इतक्या आहेत, कशाकशाला पैसे पुरणार? त्यांनी (नितीन) आयुष्य संपवायला नको होतं. हे मागे राहिलेलं आयुष्य भयंकर खडतर आहे. पण मी जर माझ्या मुलांचं केलं नाही, तर कोण करेल?!" फुलाबाई स्वयंपाक करता करता सांगत असते: "मी वाटेल तेवढे कष्ट करायला तयार आहे. पण मी माझ्या पोरांची आबाळ होऊ देणार नाही.
मला पण कधीकधी निराशा येते, वाटतं जगण्यात काही अर्थ नाही. पण मग मी माझ्या लेकरांचा विचार करते, आणि मला बळ मिळतं. "
फुलाबाईने तिच्या पतीच्या आत्महत्येच्या आधी बाहेरच्या जगात पाऊल देखील ठेवलं नव्हतं. घरापासून 3 किलोमीटरच्या परिघाबाहेर काय आहे याची तिला काहीही कल्पना नव्हती. ती सांगते: 'सुरुवातीचे काही दिवस मी नुसती रडत बसायचे.
मला सतत आजारी वाटायचं. काय करू, कुठे जाऊ, काही कळत नव्हतं. शेवटी मला लक्षात आलं , की घरात रडत बसून उपाशी मरण्यापेक्षा घराबाहेर पडून आपला मार्ग शोधला पाहिजे. समाजात चांगले वाईट, दोन्ही प्रकारचे लोक असतात. काही जणांचा आमच्याकडे (विधवांकडे) बघण्याचा दृष्टिकोन वाईट असतो. पण त्याच्यावर मात करण्याची धडपड करायला हवी. मी अजूनही धडपडते आहे. "
फुलाबाईला रोज काम मिळत नाही, याची तिला खंत आहे. तिला रोज काम का मिळत नाही, असं आम्ही विचारल्यावर तिने आभाळाकडे बोट दाखवलं .
तिला हवामान बदल किंवा प्रतिकूल हवामानाचा शेतीवर होणार परिणाम वगैरे बोजड शब्द माहिती नाहीत. पण हवामान पूर्वीसारखं राहिलं नाही, आणि त्या बदलाचा तिच्या आयुष्यावर फार खोल परिणाम झाला आहे हे तिला चांगलं माहिती आहे.
मराठवाड्यात शेती करणं दिवसेंदिवस अवघड होतं आहे. रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतात रोज काम करणं देखील अवघड होतंय- फुलाबाईलाच रोज काम मिळवायला अडचण येते आहे. "माझ्या लेकराचं पोट कसं भरायचं?" हा तिचा रोजचा प्रश्न आहे.
सोयाबीनच्या पिकाने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चांगला हात दिला होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार येणारे दुष्काळ आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्राने सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.
फुलाच्या पतीने देखील सोयाबीनचीच लागवड केली होती, पण म्हणावं तसं पीक काही आलं नाही. पतीचा जीव तर गेलाच, पण आता त्यांची उपजीविका देखील हळूहळू जात चालली आहे, असं फुलाचं म्हणणं आहे.
स्थळ: वस्तीपासून 4 किमी अंतरावरची विहीर
वेळ: रात्रीची
गेले 16 तास काम करूनदेखील फुलाचा दिवस अजून संपला नाहीये. आता दिवसातील सर्वात महत्वाच्या कामाची वेळ झाली आहे, ते म्हणजे पाणी भरणे. त्यात देखील अर्थातच अडचणी आहेत.
तिच्या घरापासून तीन किमी अंतरावरच्या विहिरीतून फुला पाणी भरते. फुलाच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे हे तिच्यासाठी अतिशय अवघड काम आहे. ती डोक्यावर पाण्याचे हंडे ठेवू शकत नाही, किंवा जड वजन उचलू देखील शकत नाही. त्यामुळे पाणी भरण्याचं काम फुला सायकलवरून करते.
ती तिच्या मोठ्या मुलाला सोबत घेते, पाण्याचे सहा कॅन सायकलला लटकवते आणि विहिरीच्या दिशेने चालू पडते.
दिवसभर रोजंदारीवर काम करत असल्याने फुलाला पाणी भरायला फक्त रात्री वेळ मिळतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या पाण्याची गरज वाढली आहे, त्यामुळे सायकल घेऊन फुलं घरापासून विहिरीपर्यंत; आणि परत अशा चार खेपा घालते.
गावाची हद्द संपल्यावर रस्त्यातले दिवे नष्ट होऊन गडद अंधार होतो, त्यामुळे त्याच्यापुढे सायकल हातात धरून फुलं आणि तिचा मुलगा असे चालत जातात. तिच्या मुलाच्या पायात चप्पल देखील नाही...
असा पुष्कळ वेळ प्रवास झाल्यानंतर अखेर ते पाण्याच्या ठिकाणी पोहोचतात. मात्र तिकडे विहिरीचा पत्ता नाही. त्याऐवजी एका टँकर मधून येणारा पाण्याचा मोठा पाईप आहे. वस्तीतल्या इतर बायाबापड्या देखील त्यांचे त्यांचे हंडे घेऊन पाणी भरायला आल्या आहेत.
साठ -पासष्ठ बदल्या, कळशा भरून झाल्यानंतर फुलाची पाळी येते. तिचे कॅन भरून झाल्यानंतर ती परतीच्या वाटेला लागते. अर्ध्या वाटेत असताना अचानक ढग गडगडायला लागतात, विजा चमकायला लागतात, पाऊस येणार अशी सगळी चिन्हं दिसू लागतात.
फुलाचा जीव काळजीने बेजार होतो- " मी अंगणात ती डाळ वाळत घातली आहे. आता जर ती भिजली, तर आम्ही वर्षभर काय खायचं?!"
घरी पोहोचेपर्यंत अवकाळी पाऊस सुरु झालेलाच आहे. धाकट्या मुलाच्या मदतीने फुला ती वाळत घातलेली डाळ आत आणून ठेवते. या सगळ्या धावपळीत फुलाने रात्रीचं जेवणच केलेलं नाही...आता पाऊस थांबला आहे.
मुलं झोपली आहेत. फुलाच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नाही. ती सांगते: “ गेले कितीतरी महिने हे असं होतं . रात्रीची झोप येतच नाही. माझे पती वारल्यानंतर मी दोन महिने रडून काढले. रोज रात्री रडायचे. पण आता माझी मुलं जशी मोठी व्हायला लागली आहेत, तसं आता ते माझी समजूत काढतात.
माझ्या जवळ येतात, चेहऱ्यावरून हात फिरवून विचारतात, काय झालं? आता पूर्वीएवढं रडायला येत नाही. पण झोप काही मेली लागत नाही. वाईटसाईट स्वप्नं पडतात. अचानक रात्री दचकून जाग येते.
त्यामुळे आता मी रात्री माझ्या मोबाईल वर काहीतरी व्हिडीओ बघते. बघता बघता कधीतरी मला झोप लागून जाते. व्हिडीओ मात्र चालूच राहतो... "
मराठवाड्यातली 80 टक्क्यांहून अधिक शेत जमीन थेट पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाचे प्रमाण अत्यल्प. गेल्या काही वर्षांपासून इथले शेतकरी हवामानाचा लहरीपणा अनुभवत आहेत.
एखाद्या वर्षी अवकाळी पाऊस येतो, तर दुसऱ्या वर्षी पिकाला किमान भाव देखील मिळत नाही. अशा अनिश्चिततेमुळे आर्थिक गणितं कोलमडतात आणि शेतकरी त्या दुष्टचक्रात अडकत जातो. ह्या कारणामुळे, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
ह्या वर्षीच्या जून पर्यंत 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये धाराशिव, बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील आत्महत्या सर्वाधिक आहेत. 2023 मध्ये 1088 शेतकऱ्यांचा मृत्यू आत्महत्येने ओढवला तर 2022 मध्ये ही संख्या 1023 होती.
ह्याचा अर्थ असा देखील होतो, की निराशेपोटी शेतकरी आत्महत्या करतो, पण मागे राहिलेले त्याचे कुटुंबीय भरडले जातात. फुलाबाईच्या कहाणीचे तात्पर्य हेच आहे.
"मला माझ्या दोघा मुलांना एकटीने मोठं करावं लागणार असेल, तर मला माझ्या समोरच्या अडचणींना भिडावं लागेल आणि माझा मार्ग शोधावा लागेल. आणि तो मी शोधेनच." फुलाबाईचे हे बोल ह्या प्रदेशातल्या सर्वच शेतकरी विधवांचे प्रातिनिधिक बोल आहेत.
हा लेख इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(असर आणि बाईमाणूस ह्यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट धरित्री अंतर्गत ह्या लेखाची निर्मिती करण्यात आली आहे. हवामान आणि लिंगभाव याबद्दलच्या समस्यांना अधोरेखित करण्यासाठी मोंगाबे इंडियाने या प्रकल्पात सहयोगी भूमिका स्वीकारली आहे.)






