कोणत्याही समाजाच्या प्रगतीच्या मोजमापात तेथील स्त्रियांची स्थिती कशी होती आणि राजकर्त्यांचा स्त्रियांविषयक दृष्टिकोन कसा होता हा महत्त्वाचा निकष ठरतो. मोहिमेवर स्त्रिया न आणण्याची महाराजांनी दिलेली ताकीद, युद्धात स्त्रियांना पकडू नये हा त्यांचा आदेश आणि राजकर्त्या स्त्रियांविषयक धोरण ही त्यांची भक्कम उदाहरणे. रयतेचे राजे ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयक धोरणे, प्रसंग आणि निर्णय म्हणूनच शासनकर्त्यांसाठी चिरकाल मार्गदर्शक ठरणारी आहेत.
विविध अभ्यासकांच्या आणि ग्रंथांच्या संदर्भातून लेखकांनी मांडलेले हे छत्रपतींचे स्त्रियांविषयक सशक्त धोरण. राज्यकर्ते हे प्रजेचे रक्षक असतात. पण हेच रक्षक जर सरळसरळ भक्षक झाले तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा, कारण ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रूचे दरोडेखोर झालेला तो काळ होता. अशा अधिकाऱ्यांना त्या काळी सरकारही मानसन्मान आणि पदव्या बहाल करीत होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयक भूमिका, दृष्टिकोन व धोरण शासनकर्त्यांसाठी दिशादर्शक आहे.

कॉ. गोविंद पानसरे लिहितात, ‘मध्ययुगीन सरंजामदारांच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे व राजपुत्र तर सोडाच, सरदार, जमीनदार, वतनदार, देशमुख, पाटील यांच्या दूरदृष्टीने गोरगरिबांच्या लेकीसुना त्यांना हव्या त्या वेळी उपभोगाच्या वस्तू होत्या. अशा पार्श्वभूमीवर शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अतिशय उदात्त वाटतो. शिवरायांच्या या कार्यातून कळते, ते काळाच्या मानाने शिवराय फार पुढे होते. त्यांचे कार्य क्रांतिकारी होते.’
शिवरायांचे स्त्रीसंबंधीचे धोरण स्वयंभू होते. मातोश्री जिजाऊंच्या शिकवणुकीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व तसे घडले होते. ज्या काळात बादशाही सरदार- वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, त्यांची अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे, असेही प्रकार करीत असत, अशा अंदाधुंदीच्या काळात मराठ्यांचे सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते.
मोहिमेवर स्त्रिया न आणण्याची ताकीद
बादशाही सरदार आपल्या जनानखान्यासह युद्ध मोहिमेवर निघत असत. मोगली सैन्य म्हणजे मोठा लवाजमा असायचा. लढायला निघाले की सैन्याबरोबर व्यापारी साधनसामग्री, नर्तकी असे. स्वतः मनूची निकोलाय कबुली देताना म्हणतो, बादशहाच्या अंतःपुरातील स्त्रियाही स्वारीबरोबर असत. रणभूमीवर पराभूत झाल्यावर या स्त्रियांची कशी वाताहत होत असेल याची कल्पना न केलेली बरी.
म्हणून शिवरायांचे धोरण काळाच्या फार पुढे वाटते. त्यांनी स्त्रियांची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की, आपल्याबरोबर छावणीत अथवा मोहिमेवर असताना धर्मपत्नी, कुळबीन अथवा रक्षा बरोबर घेऊ नये. डॉ. फायर यांनी या मताला पुष्टी देताना म्हटले, ‘शिवरायांच्या सैन्यात स्त्रियांना मज्जाव होता. मध्ययुगात शिवरायांखेरीज असे नियम इतर सत्ताधीशांनी बनवलेले ऐकिवात किंवा वाचनात नाही. मार्टिन नावाचा एक फ्रेंच अधिकारी कर्नाटक मोहिमेवर तीन दिवस होता. तो आपल्या रोजनिशीत लिहितो की, शिवाजीराजांच्या छावणीमध्ये कसलाही भपका नव्हता. अनावश्यक सामानाची गर्दी नव्हती आणि स्त्रियांना तेथे संपूर्ण बंदी होती.

युद्धात स्त्रियांना पकडू नये
स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, या नियमांची अंमल बजावणी तर झालीच, पण शत्रू पक्षाकडील स्त्रियांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ देऊ नये हे महाराजांचे सैन्याला आदेश होते. या नियमांचे आपले सैनिक पालन करतात की नाही यावर त्यांनी करडी नजर ठेवली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास जबर शिक्षा फर्मावली. स्त्रियांसंबंधीच्या गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती, मग तो कितीही मोठा सरदार असो. ‘फॉरिन बायोग्रफिज ऑफ शिवाजी’ या ग्रंथामध्ये युरोपियन लेखक म्हणतो, शिवाजीच्या सैन्यातील सर्व शिपायांना कोणत्याही स्त्रीस उपद्रव देता कामा नये अशी सक्त ताकीद दिली होती.
हा हुकूम जर कुणी मोडला तर त्यास इतकी कडक शिक्षा करण्यात येई की तिचा धाक इतर सैनिकांना बसून त्यांनी तसे कृत्य करण्यास धजू नये. शिवरायांच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा होता. म्हणून त्यासाठी त्यांनी हातपाय तोडणे, डोळे काढणे अथवा देहदंड अशा शिक्षाही ठेवल्या होत्या. शिवरायांच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल इंग्रज, फ्रेंच, डच या परकीय इतिहासकारांनी आणि औरंगजेबाचा हस्तक खाफीखान यासारख्या इतिहासकाराने शिवरायांची अमाप स्तुतीच केली आहे. शिवरायांनी जिंकलेल्या प्रदेशातील हाती लागलेल्या स्त्रियांना आदराने वागवून वेळ येताच त्या स्त्रियांना सन्मानाने शत्रूच्या स्वाधीन केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात.
राज्यकर्त्या स्त्रियांविषयी धोरण
शत्रू हा शत्रू असतो, ती स्त्री असो वा पुरुष अशी मध्ययुगीन काळातील मानसिकता होती. परंतु शिवरायांचे धोरण त्या काळाच्या पुढचे होते. त्यांनी अबला ठरवल्या गेलेल्या स्त्रियांची बाजू उचलून धरली.
विधवा राणीस मदत
शिवरायांनी दक्षिण मोहमेत कोकण कानडा प्रांताचा उत्तरेकडील सगळा मुलूख काबीज केला. बेदनूर प्रांतात त्या वेळी एक विधवा स्त्री लहान मुलाला गादीवर बसवून त्याच्या वतीने राज्यकारभार करीत होती. आपलेच काही नातलग माझ्यावर उठले आहेत, त्यांचे पारिपत्य करण्यासाठी मला आपण मदत करावी, अशी विनंती तिने महाराजांना केली. या तिच्या विनंतीला मान देत महाराजांनी तिच्या मदतीस आपले काही लोक रवाना केले व तिच्यावरील संकटाचे निवारण केले.
योद्धा स्त्रीचा सन्मान
शिवरायांची लढणारी शत्रू जर स्त्री असेल, ती पकडली गेली किंवा शरण आली तर तिला मोठी सन्मानपूर्वक वागणूक दिली जाई. याचे उत्तम उदाहरण रायबाघीणया योद्धा स्त्रीचे आहे. उदाराम माहूरकर देशमुख या सावरगावच्या कुलकर्त्यांची हुशारी पाहून अकबराने त्यास वाशिम व माहूर येथील 52 महालांची देशमुखी दिली होती. शहाजानने त्यास राजे उदाराम अशी पदवीही दिली. भातवडीच्या लढाईत तो मरण पावला. परंतु याच्या स्त्रीने राजपुतांविरुद्ध सामना दिला म्हणून औरंगजेबाने तिला रायबघन किताब दिला होता.

डॉ. दिनेश मोरे लिहितात, ‘रायबाघीण आणि शिवरायांचा संबंध उंबरखिंडीच्या लढाईनंतर आलेला दिसतो. शिवरायांनी मोगलांचा फडशा पाडून सुरत लुटून खिंडीच्या दिशेने येत असताना रायबाघीणने त्यांना अडवले. महाराजांच्या फौजेने तिला चोहीकडून घेरून जेरीस आणले. तेव्हा ती दाती तृण धरून महाराजांना शरण आली. तिचा आदरमान करून वस्त्रालंकार देऊन शिवरायांनी तिला परत पाठवले. त्यानंतर रायबाघीण स्वतः शिवरायांची धर्मकन्या म्हणू लागली. आपल्या शत्रूच्याही स्त्रीचा सन्मान करून तिच्या अब्रूचे रक्षण करणारा राजा केवळ शिवाजीराजेच असू शकतात. मध्ययुगात अशा प्रकारची स्त्रीवादी विचारसरणी अत्यंत दुर्लभ आहे.
रांझे गावचे बलात्कार प्रकरणी वतनदार पाटलांचे हातपाय तोडून पुरंदर किल्ल्यावर त्याची केलेली व्यवस्था दोन संदेश देणारी होती. प्रजेशी बदकर्म करणाऱ्या अधिकाऱ्यावर चांगली जरब बसवली व त्याचबरोबर त्याला इतरांनी बघून असे कृत्य करू नये, असा इशाराही दिला. कानडाप्रांतातील देसाई प्रकरण असो तळागाळातील महिलेपासून सत्तेवरील महिलेपर्यंत महाराजांचे संवेदनशीलव जबाबदार धोरण जगभराच्या राजकर्त्यांना आदर्श निर्माण करून देणारे आहे.






