वयाच्या 35व्या वर्षी, सलग 49 दिवस पिंपळाच्या झाडाखाली ध्यान धरून सिद्धार्थ गौतमास जेव्हा पहिल्यांदा ज्ञानप्राप्ती झाली, तो क्षण सिद्धार्थ गौतम नावाच्या मर्त्य मानवास महामानव बनवितो. या महाज्ञानानंतरच्या प्रवासात बुद्धाने सांगितलेला धम्म हा गेली अडीच हजार वर्षे धार्मिक तत्त्वज्ञानातला अभ्यासाचा विषय नेहमीच होता. या प्रचलित अभ्यासाशिवाय त्रिपिटीकेच्या तीन बोधग्रंथांपैकी एका सुतपिटीकेतली बुद्धाची पाच भाष्ये हा विषय गेली दशकभर संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ऐवज बनले आहेत. विविध धार्मिक पर्यायांपैकी एक पर्याय हे बुद्धज्ञानाचे धार्मिक स्वरूप आहे.
तर जगातल्या तातडीच्या महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर असणे, हे बुद्धाचे वैश्विक स्वरूप आहे. अवघ्या दहा वर्षांत बुद्धाचे विश्वाबद्दलचे ज्ञान हे मानवजातीची सद्य:स्थितीतली तातडीची गरज का बनले असावे, याचा ऊहापोह भारतात मात्र जास्त होताना दिसत नाही किंवा मग या ऊहापोहाला प्रचारकी प्रतिवादांमध्ये अडकविण्यात सत्तेला यश आले आहे, असे म्हणता येते. असे असले तरी बौद्ध धर्म हा भारतातला सगळ्यात वेगाने वाढणारा धर्म आहे, असे केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या माहितीत दिसून येते. असे असले तरी बुद्ध धर्मीयांची एकूण संख्या आजही 2.83% इतकी कमीच आहे, आणि धर्माधारित राजकारणाचा पायपोस पाहता, ही लोकसंख्या कुणाला तितकीशी लक्षणीय वाटणार नाही.

बौद्ध धर्मीयांची ही संख्या राष्ट्रीय दृष्टीने कमी वाटत असली तरी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत गांभीर्याने घेतली जाते. उद्या विश्वशांतीच्या दृष्टीने जागतिक आणीबाणी उभी राहिली, तर जगातल्या कानाकोपऱ्यात मानवजातीला शांतता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी मूठभर का लोक अस्तित्वात आहेत, याबद्दल संयुक्त राष्ट्रांना दिलासा वाटतो. बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक असणे, हे जगाला नवीन नाही. किंबहुना, बौद्धधर्मीयांची अल्पसंख्याक असण्याची सुरुवात थेट बौद्ध धर्माच्या स्थापनेपासूनच होते.
बुद्धाने सांगितलेला धम्म हा संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ऐवज
सुतपिटीकेतल्या पाच भाष्यांपैकी अकायन सूक्तातल्या एका आख्यायिकेनुसार दिव्य बोध प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांनी सिद्धार्थ गौतमाला विचार करताना असे जाणवले की, त्याने मिळविलेले ज्ञान हे पूर्वानुमानांच्या पलीकडले, अतिगहन आणि अतिसूक्ष्म आहे, जे मिळविणे कुणाला सहज शक्य नाही. सिद्धार्थ गौतमाच्या काळचा समाज हा पिढ्यांपिढ्या लालसेने उद्दीपित होत होता, लालसा उपभोगीत होता, लालसेच्या प्रेमात होता आणि अशा समाजास धम्म समजणार नाही, असे बुद्धांचे भाष्य होते. बुद्धाच्या संकीर्ण भाष्यांमधून पुढे विज्ञान शाखा, औषधोपचार शाखा, धम्म, अर्थशाखा, राजकीय तत्त्वशाखा आणि इतर अनेक ज्ञानशाखांचा उगम झाला. काळानुसार या ज्ञानशाखांत बदल होत राहिले, विलुप्त होणे आणि पुन्हा शोधले जाणे या प्रक्रिया वारंवार होत राहिल्या.
बुद्धज्ञानाची सर्वात मोठी बाजू ही की, कालौघात नष्ट होत राहणाऱ्या ज्ञानाचा शोध पुन्हा दुसरीकडे कुठे तरी दुसऱ्या माणसास लागू शकतो, त्यामुळे बुद्धज्ञान जसे पुन्हा पुन्हा नष्ट होत राहते, तसे ते पुन्हा पुन्हा उदयासही येत राहते. मानवी इतिहासात या आश्चर्यचकित करणाऱ्या सर्वात विलक्षण प्रणालीचा शोध बुद्धधर्मास इतर धर्मापेक्षा भिन्न बनवितो. या मूलभूत भिन्नतेमुळे बहुसंख्याकांच्या राज्यपद्धतीत अल्पसंख्याक म्हणून बुद्ध धर्माचे रूप मुख्य धारेपासून बरेचसे वेगळे असते.
हिंसेच्या पश्चात बुद्ध धर्म जगाला शांतीच्या प्रभावाखाली आणतो.
माहितीच्या विस्फोटानंतर गेल्या दहा वर्षांत सर्व राजकीय तत्त्वज्ञानांचे आणि धार्मिक विचारांचा नवीन युगात होत असताना त्यातला अल्पसंख्याकांना प्रतिवादात हरविण्याचे काम हे सद्य:स्थितीतल्या बहुसंख्याकांच्या धर्मांनी आणि धर्माधारित राजकारण करणाऱ्या राष्ट्रांनी आरंभिले आहे. जगाच्या एकूण इतिहासाकडे नजर टाकल्यास जगात जेव्हा जेव्हा बहुसंख्यांचे राजकारण उफाळून येते, तेव्हा तेव्हा ते प्रचंड अशांतता आणि असुरक्षिततेच्या मार्गाने चाललेले असते, असे दिसून येते.
अशा अशांत आणि अस्थिर समाजाची पुढची वाटचाल सार्वजनिक हिंसेकडे होते आणि या हिंसेच्या पश्चात बुद्ध धर्म जगाला शांतीच्या प्रभावाखाली आणतो. शांती प्रस्थापित झाल्यानंतरच्या स्थितीत बुद्ध धर्म बहुसंख्याकांचा धर्म बनून त्यांच्या विकासाला प्रचंड पूरक ठरत असला, तरी बुद्ध युद्धांच्या पश्चातच का येतो? अहिंसेचे महत्त्व कळण्याअगोदर विपुल हिंसा का व्हावी लागते? हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. युद्धपूर्व परिस्थितीतला अल्पसंख्याकाचा बुद्ध धर्म हा युद्धपश्चात बहुसंख्याकांचा धर्म बनत असला, तरी त्याचे युद्धपूर्व भूमिकेचे स्वरुप हे जवळपास नेहमीच सारखे राहत आले आहे.
अंगुलीमाल, सम्राट अशोक, फुलनदेवी, लक्ष्मण माने आणि स्टिव्ह जॉब
अशांततेच्या काळात बुद्ध धर्माला आपलेसे करताना इतिहासात अंगुलीमालसारखा दरोडेखोर, अश्वघोषासारखा कवी, अशोकसारख्या सम्राटांचे नाव येते, तर वर्तमानकाळात फुलनदेवीसारखी विद्रोही, लक्ष्मण मानेंसारखा कवी, तर स्टिव्ह जॉब्जसारख्या प्रथितयश व्यावसायिकांचे नाव येते. बुद्ध धर्माचा प्रभाव वाढण्याच्या काळात या ठरावीक आकृतिबंधाचा माग काढणे आवश्यक ठरते.

बुद्धाच्या म्हणण्यानुसार कुठल्याही व्यवस्थेतल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत आणि सर्वोच्च आनंदाचा असतो. भांडवलशाहीत व्यक्तिस्वातंत्र्याचा वापर फक्त स्वार्थ साधण्यासाठी आणि शोषणासाठी होतो. अशा स्वार्थी व्यवस्थेत शासन आपल्या लोकांची प्रत्येक मागणी पूर्ण करू शकत नाही आणि वेळोवेळी व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणत राहते. अशा व्यवस्थेत कायदा व सुव्यवस्था ढिसाळ बनते आणि स्वार्थी माणसांसाठी शोषणाचा महामार्ग होऊन चंगळवादी अर्थव्यवस्थांचा जन्म होतो. अशा चंगळवादी अर्थव्यवस्थांचे मानवी मूल्यांशी कुठलेही घेणेदेणे नसते, ती वर वर मानवाच्या सुखासाठी कार्यरत आहे, असे भासत असले तरी ही सुखे मिळविण्याच्या नादात विजेते, पराभूत आणि कफल्लकांची निर्मिती होते. अर्थव्यवस्थेबद्दल बुद्धाचे अंतिम भाष्य हे उपयोग आणि उपभोग या दोन्हींमधला स्पष्ट फरक जाणून घेण्याविषयी आहे.
स्वार्थी प्रवृत्तीपासून परमार्थी प्रवृत्तीकडे
गिऱ्हाईकबाज व्यवस्थेबद्दल बोलताना बुद्ध म्हणतो की अमर्याद सुखांच्या शोधात असलेली जनता वाढायला लागली म्हणजे, ती गोष्टींच्या उपयोगातून उपभोगाकडे वळू लागते यातून निरर्थक गोष्टींचा अमर्याद वापर केल्याने त्याचे फलित शेवटी त्याज्य अशा कचऱ्यांच्या स्वरूपात वाढायला लागते. मानवाची गरज भागेल इतपत सर्व गोष्टी निसर्गात उपलब्ध आहेत, पण मानवाची अमर्याद लालसा भागविणे मात्र निसर्गाला शक्य नाही, कारण नैसर्गिक साधनसंपत्ती ही मर्यादित आहे आणि ती संपुष्टात आल्यास चंगळवादी व्यवस्था अंतिमतः दु:खी होऊन तिचे पर्यवसान ऱ्हासात होऊ शकते.
माणसाने जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये, कुठल्याही गोष्टीचा वापर करताना ती अंत:प्रेरणेने वापरावी, बाह्य जाहिरातींच्या प्रलोभनाला बळी पडून नव्हे, अशाच गोष्टींचा वापर करावा ज्या स्थानिक पातळीवर उपलब्ध असतील. उत्पादने ही एकूण लोकसंख्येच्या गरजेनुसार बनविली जावी. कुठल्या एका वर्गाच्या सुखासाठी नाही. बुद्धाची ही लालसायुक्त अर्थव्यवस्थेविषयीची टीका, ही मानवाला त्याच्या स्वार्थी प्रवृत्तीपासून परमार्थी प्रवृत्तीकडे घेऊन जाते.
गेल्या पंचवीस वर्षांत जगभर वाढलेली आर्थिक विषमता, गिऱ्हाईकबाजीतून होणारा निसर्गाचा प्रचंड ऱ्हास आणि भांडवलशाहीच्या अमर्याद सुखाच्या लालसेतून जगभरात वाढलेले दु:ख आणि युद्धे पाहता बुद्धाचे, भाष्य गेल्या दहा वर्षांपासून जगातले सर्वात महत्त्वाचे भाष्य का आहे, याचा अंदाज यावा. सत्तरच्या दशकानंतर राजकारणाचे स्वरूप अत्यंत जातीय झाल्याने विस्तृत स्वरूपात असलेला आंबेडकरवाद सर्व मागासवर्गीय जातींमध्ये वेगाने पोहोचला नाही आणि जातीय अस्मिता व्यवसायात शिल्लक नसल्या तरी राजकारणात टिकून राहिल्या. आता त्या वेगाने वाढतच आहेत.
बहुसंख्याकांच्या हिंदू धर्माचा अर्थ आता भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लावेल तसा आहे, आणि या अर्थामध्ये जातीपासून कुठल्याही प्रकारे सुटका मिळविण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. नास्तिक डाव्या पक्षांकडे जातिअंताचा लढा प्राधान्याचा की वर्गसंघर्षाचा? याबद्दल आजही एकमत नाही. बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मात्र जातीपासून आपोआपच फारकत घेता येते. मी अमुक एका खालच्या जातीतला आहे, असे चाचरत सांगण्यापेक्षा मी बुद्धिस्ट आहे, असे अभिमानाने सांगितले जाऊ शकते. हिंदू धर्मातल्या जाती संपुष्टात आणण्यास जर भारताला यश आले असते, तर कदाचित हे झाले नसते.
बुद्ध धर्म हा कुणाला आमिष दाखवून त्याच्यावर लादता येत नाही किंवा त्याचे राजकीय फायदेही जास्त असत नाही, बुद्ध धर्म हा माणसाच्या आतून कुठून तरी यावा लागतो आणि बाह्य स्रोतांशिवाय स्व:आकलनातून आलेला असल्याने इतर धर्मांतून बुद्ध धर्मात झालेले धर्मांतर हे नेहमी शांतीच्या मार्गाने होते, ज्याला रक्तविरहित क्रांतीही म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये शांततामय मार्गाने सुरू केलेली, ही क्रांती आता देशात जोम धरू लागली आहे.
‘बुद्ध की कार्ल मार्क्स?
भारतखंडात बुद्धज्ञानाचा पुन्हा शोध लावण्याचे सर्वात मोठे श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. मागील शतकात जेव्हा बाबासाहेबांनी ‘बुद्ध की कार्ल मार्क्स?’ हा ग्रंथ लिहिला, त्या दिवसात बहुसंख्य जगाची वाटचाल ही साम्यवादाच्या दिशेने चालली होती. या साम्यवादी जगाला बुद्ध समजावून सांगण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांच्या या ग्रंथाने केले. एकविसाव्या शतकात जगभरातून साम्यवाद बराचसा नाहीसा झाला असून, त्याची जागा आता भांडवलवादाने घेतली आहे.
या भांडवलवादाच्या मुळाशी वर्चस्ववादी धार्मिक शक्ती उच्चवर्णीयांना सबळ करून आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढवत आहेत. वर्चस्ववादी धार्मिक शक्तींशी लढा देताना बुद्ध धर्म हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मागासवर्गीयांना कळून चुकले आहे. बहुसंख्याकांच्या धर्मांचे सोयीचे अर्थ लावून लालसेच्या मुख्य पटलावर धर्म, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राजकारण आणि अमर्याद मानवी सुखाची मांडणी तिचा पुढचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास गेली दहा वर्षे वारंवार संकटात येऊनही त्याला कुठलाही पर्यायी मार्ग अजून कुणाला सापडलेला नाही.

अमर्याद सुखाच्या शोधात पर्यावरण, सम्यक विचार, मानवी मूल्ये यांचा प्रचंड ऱ्हास होत असून बुद्धाने सांगितल्याप्रमाणे अशा व्यवस्थेचे पर्यवसान अंतिमतः हिंसा आणि दु:खात होते. अशा निराशाजनक परिस्थितीत बुद्धाचे वैश्विक विचार वेगाने जगापुढे मांडले जात असताना त्याच्या अनुयायांची वाढती संख्या ही निश्चितच सुखावणारी आहे. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच युद्धपूर्व परिस्थितीतले अल्पसंख्याक बुद्ध अनुयायी जागतिक शांतता प्रस्थापित करून रक्तपात होऊ न देता जगाला बहुसंख्यांच्या बुद्ध धर्माकडे घेऊन जातील.
सार्वत्रिक अशांतता आणि दु:खाने भरलेल्या या भांडवलवादी जगासाठी ‘भांडवलशाही की बुद्ध?’ असा नवा विचारग्रंथ लिहिण्याची तातडीने गरज आहे. या अनुषंगाने अनेक चर्चाही घडत असल्या, तरी त्याचे विस्तृत विवेचन ग्रंथरूपात बाहेर येणे, अद्याप शक्य झालेले नाही. विसाव्या शतकात मानवी मूल्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य एकविसाव्या शतकात पुढे न्यायचे असल्यास भारतातील बुद्धधर्मीयांनी आंबेडकरवाद आणि बुद्ध धर्माची पुन्हा एकदा सांगड घालणे गरजेचे आहे.
सोयीचे तेवढे आंबेडकर, सोयीचा तेवढा बुद्ध
आंतराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून बाहेर पडून भारतीय परिस्थितीचे आकलन करताना बुद्ध धर्माचा वाढता प्रभाव लक्षात घेतल्यास काही स्थानिक कारणे आणि मीमांसा महत्त्वाच्या ठरतील. अनादी काळापासून जात हा भारतीय समाजव्यवस्थेचा अविभाज्य घटक राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर नवीन भारताची रचना करताना जाती व्यवस्थेचा लवकरात लवकर अंत व्हावा, असे काही विचारवंताचे म्हणणे होते, तर जातीजातींमध्ये सलोखा राखून भारतीय परंपरांचे पुनुरुज्जीवन करावे, असे दुसऱ्या काही विचारवंताचे म्हणणे पडले.
जातिअंताची लढाई हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळींचा मुख्य मुद्दा राहिला आहे, तर जातव्यवस्था तशीच ठेवून तिच्यात समरसता नांदवावी, अशी भूमिका उजवे पक्ष नेहमीच घेत आले आहेत. कुठल्याही मागासवर्गीय व्यक्तीस आर्थिक स्थैर्य आणि शिक्षणाच्या समान संधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यास त्याची निश्चितच प्रगती होते.
अशा प्रगतीपश्चात उच्चवर्णीयांच्या समकक्ष आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य आल्यास मग मागासवर्गीय लोकांना धर्माने निर्माण केलेली विषमता स्पष्टपणे दिसून येत नाही, आपल्या इतर जातबांधवाच्या प्रश्नांचे आकलन राहतेच असे नाही आणि अशा द्विधा मन:स्थितीत बहुसंख्यांचे राजकारण त्यांचा आपल्या स्वार्थासाठी व्यवस्थित वापर करण्याचा मार्ग शोधून घेते. गेली काही वर्षे हिंदुत्वाचा जयघोष करणारी वर्चस्ववादी व्यवस्था भारतात जोमाने वाढते आहे. वेगाने वाढणारा एक धर्म म्हणून बुद्ध धर्माचे स्वतंत्र अस्तित्व या अजेंड्याला निश्चितच पूरक नाही, त्यामुळेच बुद्ध धर्म हा हिंदू धर्माचीच उपशाखा आहे किंवा बुद्ध हा विष्णूचाच अवतार आहे.
अशा बुद्धिभेद करणाऱ्या प्रवादांनी वातावरण ढवळून गेले आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांमध्ये मागासवर्गीयांचा सहभाग वाढावा म्हणून सोयीचे तेवढे आंबेडकर, सोयीचा तेवढा बुद्ध वापरून वर्चस्ववादाचा अजेंडा रेटण्याचे, अविरत कष्ट उजव्या संघटना आणि पक्ष करीत आहेत. हा कावा हळूहळू लक्षात आल्यानंतर एरवी धर्माची विशेष गरज नसलेले बुद्धिवादी मागासवर्गीय लोक स्वतःची ओळख स्पष्टपणे बुद्ध धर्माशी जोडून घेताना दिसून येत आहेत.





